बेबी

बेबी

© Velvet Kavita



ती बेबी पाटील. दिसायला खुप सुंदर. हुशार आणि मनमिळावू.  मैत्रिणींच्या घोळक्यात वेढलेली नेहमी. बारावीची परीक्षा दिली आणि लग्न झालं तिचं. अचानक लग्न झाल्यामुळे मैत्रिणी लग्नाला गेल्या नाहीत. लग्नानंतर सरप्राइज देण्यासाठी मोठ्या उत्साहात मैत्रिणी भेटायला गेल्या आणि हबकल्याच. स्वतःच सरप्राइज झाल्या.

तिचा नवरा 'श्याम' रिक्षा ड्रायव्हर. शिक्षण नाही. वय पण जास्त दिसतं होतं. बेबी अगदीच कोमेजलेली. बडबड, अवखळपणा जाऊन पोक्त मोठी स्त्री झालेली. लग्नाला फक्त एक महिना झालेला. पुर्णपणे बदलेली मैत्रीण पाहून सगळ्या निघाल्याच पटकन तिथून. 

 बाजूला राहणाऱ्या सीमाकडे गेल्या. तिथे बोलण्यात एकच विषय. "फक्त बदललेली बेबी आणि हळहळ." बेबीने मैत्रिणींसोबत शेअरबेबीच्या केलेली भावी आयुष्याची स्वप्नं, जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा काहीच जुळतं नव्हतं. सीमाला विचारलं तर सीमा काही सांगेना. शेवटी सीमाच्या आईने म्हणजे काकुंनी सांगितलं....

बेबी, एक भाऊ आणि आई असे तिघे राहायचे गावी. बेबीचे वडील मुंबईत कामाला. मुंबईत सगळ्यांना घेऊन राहणं परवडणारं नव्हतं. ते दर महिन्याला मनीऑर्डर पाठवायचे. सहा महिन्यांतून एकदा पंधरा दिवसांची रजा घेऊन यायचे गावी. एरव्ही तिघेच रहायचे. 

सावंताचा श्याम बिघडलेला चोवीस पंचविशीचा मुलगा. मुंबईत राहून सगळी व्यसनं आणि भाईगिरी करत फिरायचा. आईवडिलांनी त्याची वाईट संगत सुटून थोडा सुधरेल  म्हणून गावी पाठवला. धाकट्या काका काकुंकडे.  बेबीच्या घरी येणं जाणं असे त्याचं. पुर्ण वयात आलेला तो आणि नवऱ्याची सहा महिन्यातून एकदा भेट होणारी ती. बेबीची आई. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी घसरली.

दिवसभर मुले शाळेत जात. रोजची भेट अनैतिक संबधांना बहार आणत होती. पाच वर्षे झाली. अनैतिक असले तरी दोघेही सुख उपभोगत होते.

 एका बाजूला वयात येणारी बेबी आणि दुसरीकडे चर्चेत येणारे श्याम - बेबीच्या आईचे संबंध. पाच वर्षांच्या या घरातल्या फेऱ्यांमध्ये, श्याम बेबीला जवळून पाहत होता. वयात येऊन दिवसेंदिवस सुंदर, कमनीय होत जाणारी बेबी आणि दुसरीकडे आपल्यापेक्षा दहा अकरा वर्षाने मोठी विवाहित स्त्री. नात्याला खरंतर काहीच अर्थ नव्हता.  त्याच्या मनात द्वंद्व सुरु होतं आणि एका विचारापाशी ठाम झाला.

बारावीची परीक्षा झाल्यावर बेबी मुंबईत येणार होती. नातेवाईकांकडे राहून नोकरी करणार असं ठरलेलं. एकदा बेबी मुंबईत गेली की संपलं सगळं असं वाटून श्यामने नवीन डाव टाकला. त्याने बेबीच्या आईला धमकी दिली. ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. जर बेबीचं लग्न त्याच्यासोबत करून दिलं नाही तर तो सगळ्या गावात सांगेल त्यांच्या पाच वर्षांच्या संबधाबाबत. त्यानंतर जे काही होईल त्याला तो जबाबदार नसेल. मुलगा म्हणून त्याला सगळं माफ होऊन जाईल. पण बेबीची आई मात्र बदनाम होईल.

बेबीच्या आईने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण श्याम ऐकायला तयारच नव्हता. शेवटी वयाच्या चाळीशीत त्या आईने स्वतःचे (लोकांना कुणकुण असलेले) अनैतिक संबध लपविण्यासाठी आपल्या लेकीचा बळी दिला. 

बेबीचं श्यामशी लग्न झालं...एकाच गावात सासर माहेर. लग्न झालं तेव्हा तिला आईच्या संबधांविषयी काही माहिती नव्हतं. फक्त मुंबईला जाता आलं नव्हतं आणि दहा वर्षे मोठ्या व्यसनी मुलासोबत लग्न करावं लागलं म्हणून ती नाराज होती.

एक वर्षाने बेबीला मुलगा झाला. दुसऱ्या वर्षी मुलगी. दहा बारा वर्षे बरी गेली. श्यामचा रिक्षा ड्रायव्हर असलेला मित्र 'प्रविण' घरी यायचा. त्याला बेबी आवडायची.

त्याला श्यामची "कुंडली" माहिती होती. त्याने एकदा संधी साधून बेबीला सगळं सांगितलं. बेबीचा राग, संताप झाला. आईविषयी ही काही वाटेनासं झालं. श्यामशीसुध्दा फटकून वागू लागली. प्रविणशी जवळीक वाढली. त्याचे रुपांतर पुन्हा "अनैतिक संबधातच" झालं.

मुलांना मात्र जिवापाड जपत होती. 

चूक कोणाची..?? पाय घसरलेल्या आईची??? की आईशी संबंध ठेवून मुलीशी लग्न करणाऱ्या श्यामची..??

मैत्रिणींनो आजकाल आपण अशा बऱ्याच स्त्रिया तसेच पुरुष ही पाहतो आपल्या आजूबाजूला. क्षणिक मोह, शारीरिक भुक, कामातूर, सद्सद्विवेक बुध्दीचा अभाव अशा गोष्टींमध्ये अडकलेले विवाहित स्त्री पुरुष. मुलंबाळं, पत्नी, घरसंसार सगळं असतं. तरीही अशा समाजाच्या द्रुष्टीने अनैतिक नात्यात गुरफटलेले. असे हे संबंध मनस्तापच देतात...

कधी घटस्फोट, कधी प्रियकराच्या /.प्रेयसीच्या मदतीने पार्टनरचा खुन, अपहरण करण्याइतपत मजल जाते. पण आईच्या चुकीची शिक्षा बेबीसारख्या सालस मुलीला जेव्हा भोगावी लागते तेव्हा मात्र मन विषण्ण होतं...

मी फार फार तर असा एखादा ब्लॉग लिहू शकते. शारीरिक, बौध्दिक आणि मानसिक पुर्ण वाढ झालेल्यांना आपण काय सुधरवणार सांगा यांना...??? त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतात, जी आपल्याला या जन्मी तरी पटणार नाहीत... 

मागे एका ओळखीच्या बाईला म्हटलं "कशाला ग इकडे तिकडे फिरतेस.. पोरांच्या मनातूनही उतरशील ना..." तर मला म्हणाली.. "बंदर क्या जाने अदरक का स्वाद"

"मर ना मग.. झक् मार पण मला कहाण्या सांगू नकोस.. घराबाहेरच्या..." 

बडी सिद्दत से....हम तो बंदर ही अच्छे है ना बाब्बो...!!

कथा आवडल्यास लिंक कॉपी करुन फॉरवर्ड करा. तुम्ही वाचून सभ्य शब्दांत अभिप्राय देताय. खुप धन्यवाद तुमचे. 

साहित्यचोरी हा गुन्हा आहे, तेव्हा नावासहीतच शेअर करा.

फोटो गुगल साभार

© Velvet Kavisha


Post a Comment

0 Comments