आ ओ हुजूर तुम को.....
© Velvet Kavisha
शरयूला जाग आली. डोळे उघडले तर रवि हातावर डोकं ठेवून तिच्याकडेच पाहत होता. "किती वाजले? अलार्म झाला नाही का?? बाप रे आता उशीर होईल." शरु अंगावरची रजई बाजूला सारत म्हणाली. "सहा वाजलेत. काही उशीर नाही होतं." असं म्हणतं रविने ऊठू पाहणाऱ्या शरुला स्वतः जवळ ओढली. त्याच्या अशा अचानक वागण्यानं तिला ही काही सुचलं नाही.... इतक्यात तिच्या कपाळावर ओठ टेकवून "राणी वाढदिवस आहे तुझा... छान शुभेच्छा तर देऊ देत."
"रात्री दिल्यास हां बारा वाजता, अगदी झोपेतून उठवून. त्या आहेत माझ्याकडे...😉😉 आता आगाऊपणा बंद कर आणि आवरून खाली ये. सगळ्यांना बोलावलं आहेस. मुलं कालपासूनच आलेली आहेत. बाकीचेही सगळे यायला लागतील. मला आवरायला हवं लवकर." शरू उठून उभी राहत म्हणाली.
रविने तिच्या हाताला धरून स्वतःजवळ बसवलं. तिने मान वाकडी करून लाडिकपणे त्याच्याकडे पाहिलं. "काय तू पण सकाळीच...जाऊ दे ना प्लीज" असा विनवणीचा भाव तिच्या डोळ्यात. तिचा हात त्याच्या हातात होता. त्याने हात दाबत "थांब ना थोडा वेळ" म्हणत स्वतःकडे ओढली तिला. ती लाजली नव्या नवरीसारखी. "जाऊ दे रे राजा. खुप उशीर झालाय बघ." म्हणाली.
तो घायाळला तिच्या अदांनी. तिचा चेहरा ओंजळीत पकडला आणि कानामागे ओठ टेकवले. शहारली ती. तिनेही त्याच्या मानेवर ओठ टकवले. एक बाईट कानाच्या पाळीला घेतला. आपलं तोंड त्याच्या कानाजवळ नेलं. "पन्नाशीची झाले आता मी. किती छळशील. सोड. जाऊ देत मला वेडोबा..." असं त्याच्या कानापाशी कुजबुजली. त्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून त्याला बाजूला करत स्वतः ची सुटका करून घेतली आणि पळतच दरवाजा उघडला. एक डोळा बारीक करून म्हणाली "आवर आता. भेटू रात्री.."
अरे व्वा!!! स्वतःहून म्हणालीय... म्हणजे चान्सेस आहेत... रवि हसला...
हसणाऱ्या रविकडे पाहतच शरु दार उघडून जोरात बाहेर आली आणि दाराबाहेर उभ्या असलेल्या सीमावर आदळली. सीमाने सावरलं शरुला. सगळी चिल्लीपिल्ली दारात उभी होती. हातात बुके घेऊन. "हँप्पी बर्थडे काकी, हँप्पी बर्थडे मामी, हँप्पी बर्थडे आत्या" म्हणत एकच जल्लोष केला पिल्लांनी.
"Thank you my all lovely baccha party. " म्हणत तिने तेवढ्याच उत्स्फूर्तपणे आभार मानले. दाराबाहेरचा गोंधळ रवि दरवाजाला टेकून पाहत होता. छोटे मोठे बच्चे लोग पळून गेले खाली. लग्न झालेली पुतणी सीमा मात्र तिथेच थांबली...
"काय झालयं काकी...?? एवढ्या जोरात का पळत होतीस..?? किती जोरात आदळलीस माझ्यावर. मीच पडता पडता वाचले.." सीमाने शरुच्या दंडाला धक्का देत विचारलं.
"अग्गं.. अशी कशी गं शरु तू.!! कुठे चाललेलीस इतक्या घाईत..?? वाघ मागे लागल्यासारखी. बघत जावं गं चालताना. पडली असतीस, कुठे लागलं असतं म्हणजे...??" रविने बोलता बोलता शरयूकडे पाहून डोळा मारला.
अरे काय माणूस आहे हा..!! किती छळतोय..!! खरंतर या वाघोबाच्या तावडीतून सुटून पळाले आणि आदळले सीमावर. एका बाजूला ती फिरकी घेतेय आणि हा तिला हवा देतोय. आगाऊ कुठला...मनात आलेल्या विचारातच तिने रविला "लूssssक" दिलेला सीमाने पाहिलं.
"काssssका, तु काही केलसं का..??? कारण काकीचे गाल काही वेगळंच सांगताहेत हां...." म्हणत सीमाने रविलाच थेट प्रश्न विचारला.
"अरे, मी काही नाही केलं हां. तुमचा गोंधळ ऐकून मी झोप सोडून पाहायला आलो. पण सीमा, बरं झालं तु सावरलंस म्हणून. नाहीतर आज तोंडाचा मारुती झाला असता मॅडमच्या.." म्हणत शरूकडे पाहत रवि गडगडाटी हसला. तशा दोघीही हसल्या आणि खाली जायला वळल्या. मनातून रवि थोडा घाबरला होता. नशीब शरु काही बोलली नाही. नाहीतर सीमा चिडवत राहिली असती दिवसभर. ही सीमा खतरनाकच आहे.. उगाच काही बाही विचारून घाबरवते सकाळी सकाळीच.... शरु आणि सीमा हातात हात घेऊन जीना उतरत होत्या..
थोडा वेळ लोळून मग उठावं म्हणून तो बेडवर आडवा झाला. झोप येईना. वळून पोटावर झोपला. समोर ठेवलेला दोघांच्या फोटोवर नजर गेली त्याची. शरु किती छान दिसते अजून. पन्नाशीच्या झाल्यात मॅडम वाटतच नाही. झुबकेदार केसांचा यु कट, रुळणाऱ्या केसांखाली पाठीवर काढलेला टॅटू, वक्री भुवया, आणि त्या उडवत बोलायची सवय. आजही नजरेत हरवतो तिच्या. पाठीवरचा टॅटू तर weak point झालाय आपला... ओठच टेकवतो आपण पटकन त्यावर.... अजूनही किती जीव गुंततो तिच्यात. नवीन लग्न झाल्यासारखे आपण किती मागे मागे करतो हिच्या... मित्रमंडळी चिडवतातही. मैना तोते की जोडी, लव्हबर्डस् आणि काय काय.
खरंतर तिच्याशिवाय अर्थच नाहीय आयुष्याला. शरु सर्वस्व आहे माझं. तिला ही कदर आहे माझी. झोकून देते माझ्यासाठी स्वतःला. आणि गुंतू देते मलाही स्वतःत... त्याने तिच्या फोटोवर ओठ टेकवले. कुशीवर होत फोटो छातीशी धरून विचारात हरवला.
खरंतर शरयू आणि रविचा प्रेमविवाह. शरुच्या घरुन कडाडून विरोध. फक्त जातच नाही तर कम्युनिटीही वेगळी दोघांची. ती महाराष्ट्रीयन ब्राम्हण तर तो भैय्या. खातंपितं घर त्याचं. Automobile चा डिप्लोमा होल्डर तो आणि ती पोस्ट ग्रँज्युएट. पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. वय आणि प्रेम परिपक्व झालेलं.. खरंखोटं, बरंवाईट नक्कीच कळत होतं. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेतला दोघांनी. तिने तिच्या घरी आणि त्याने त्याच्या घरी सांगितले... थोड्या मतभेदानंतर रविच्या घरच्यांनी मान्य केलं. शरयूच्या घरून मात्र कडाडून विरोध होता. रवि जाऊन भेटला, रितसर मागणीही घातली. शरयूच्या घरच्यांनी काही दाद दिली नाही. रविला वाटतं होतं तिच्या घरच्यांनी समजून घ्यावं... खुप धडपडले दोघेही त्यांचा होकार मिळावा म्हणून.... पण काही उपयोग झाला नाही.
एका संध्याकाळी रविने शरयुला भेटायला बोलावलं. तिच्या घरच्यांच्या निर्णयाबाबतीत बोलला शरयुशी. "काय करायचं गं शरु ? तुझ्या घरून टोकाचा विरोध आहे .. " रवि म्हणाला.
"हं" शरु विचारातच होती.
"थांबायचं का अजून थोडे दिवस? काय वाटतं तुला? आपलं नातं पुढे न्यायचं की थांबायचं इथे?? हे बघ तुला काही त्रास होणार असेल तर मला नाही चालणार. तु म्हणशील तसं करु. तुझा निर्णय मला मान्य असेल." रवि समजुतीच्या सुरात म्हणाला.
खुप वेळ गप्प असणाऱ्या शरुच्या डोळ्यात पाणी आलं.
"तुझं प्रेम आहे ना माझ्यावर??" रविकडे पाहून म्हणाली.
" हो..खुप आणि मनापासून. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचार ही करु शकत नाही.." रविने सांगितले.
"माझ्यासाठी काय करू शकतोस??"---- शरुने अनपेक्षित प्रश्न विचारला.
"काहीही म्हणजे काहीही. फक्त तु बोल"---- रविने आश्वस्त केलं...
"माझ्या घरच्यांच्या मागे लागणं बंद कर. रजिस्टर लग्न करुया." ---- शरु म्हणाली.
"नक्की ?? जमेल तुला माझ्या सोबत यायला?? सगळ्यांना सोडून ?? आईबाबा, भाऊ ??? सगळे विरोधात आहेत. कदाचित नातही तोडतील कायमच.'" रविने कल्पना दिली.
"माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझं ही आहेच की माझ्यावर प्रेम. काय करणार आपण जर घरचे ऐकत नाहीत तर. तुटतील नाती बहुधा. पण राजा, तु आहेस ना माझ्यासोबत मग मला भिती नाही कशाची."..... ती विश्वासाने बोलली.
बापरे! किती विश्वास आहे ह्या पोरीचा आपल्यावर.. तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या हाताला धरून स्वतःकडे ओढली. छातीशी धरली. डोक्यावर थोपटत राहिला. कपाळावर ओठ टेकवतं 'माझं जगणं फक्त तुझ्याचसाठी असेल गं राणी' असं सांगितले तिला. तेव्हाच ठरवलं काही झालं तरी हिला दुःखी होऊ द्यायचं नाही. हाताच्या घट्ट मिठीत ती ही सामावली बराच वेळ.
एका महिन्यात लग्न झालं. मित्रमैत्रिणी होत्या लग्नाला. तिच्या घरून कोणी ही नाही. माझ्या घरी तिचं छान स्वागत झालं. आमच्या एकत्र कुटुंबात सामावली गेली. एकांत मिळणं जरा कठीण होतं. कुटुंब मोठ होतं. माझ्या नाराजीला एखाद्या सुंदर सकाळीही भेट मिळायची कोणी घरी नसताना. मिलनाच्या वेळी एका गडबडीत माझ्याकडून झालेल्या वेदनेसह तिच्या तोंडून उसाशासहित 'एक टोपण नाव' मिळालं. आता गडबड नाही होतं पण नाव मात्र मिरवतोय गेली पंचवीस वर्षे 'रावण'. तिच्या मैत्रीणींनाही माहिती झालंय माझं टोपण नाव.
माझा दिवस तिच्यापासून सुरु होतो, आणि संपतोही तिच्या सोबतच. अख्खं विश्व बनून राहिलीय ती. ज्या क्षणी आयुष्यात आली त्या क्षणाचे आभार मानायला हवेतं. माझ्या माणसांमध्ये मिसळताना तिची माणसं दुरावली तिला. दिवस कामात निघून जायचा पण रात्रीच्या शांततेत माहेर आठवायचं तिला. खंबीर मनाची कमजोर बाजू हमसून हमसून रडताना जाणवायची. आपल्यामुळे, आपल्या प्रेमामुळेच तिला हे भोगावं लागतं याचं वाईटही वाटायचं.. कितीदा बोलूनही दाखवलं मी तिला. पण 'रडून मोकळं व्हायला होतं. तु नको तुझ्यावर घेऊस.' असं म्हणतं कुशीत शिरायची. मग आपण काही चुकीचे नाही केलयं याचं समाधान वाटायचं. जीव तुटायचा तिच्या रडण्याने. सगळं विसरून तिच्या घरच्यांना भेटुन सांगितले ही, निदान मुलीसाठी तरी घरी या. पण नाहीच आले. त्यांच्या दृष्टीने रजिस्टर लग्न म्हणजे पळून जाऊन केलेलं लग्न. नाईलाज होता.
घरी सगळं मस्त चाललेलं. मोठ्या भावाला बरीच वर्षे मुलबाळ नाही. त्यामुळे सगळ्यांच्या आशा आमच्या लग्नाने पल्लवीत झालेल्या. आम्ही ही मग ऐकलं त्यांचं...
लग्नाच्या एक वर्षाने डॉली झाली. डॉली तीन वर्षांची झाली. पुन्हा दुसऱ्या बाळाची चाहूल. अजून एक परी आयुष्यात. बास्स झालं आता चौकोनी कुटुंब. सगळं छान चाललं होतं पण म्हणतात ना तशी नजर लागली कोणाची तरी. दीड वर्षाच्या परीला जीवघेण्या आजाराने हिरावून नेलं. आभाळ कोसळलं. दोघेही हादरलो. मला एका क्षणी मनात वाटूनही गेलं, हिच्या आईबाबांना दुखावलं म्हणून तर नाही ना आपल्या काळजाचा तुकडा हिरावला गेला. तिलाही ते कळलं. म्हणाली "तु वाईट नको वाटून घेऊस. कदाचित परीला आपण आईवडील म्हणून आवडले नसू. म्हणून सोडून गेली आपल्याला." परीच्या आजारपणात आणि नंतरही तिचं खंबीर असणं सावरून गेलं मला. स्त्रियांना परमेश्वराने एक अद्भुत शक्ती दिलीय. त्या स्वतःच्या दुःखांतही दुसऱ्याला धीर देतात.
शरु एका रात्री खुप घाबरून उठली. मला गच्च मिठी मारून म्हणाली "सोडव यातून मला." मी ही हबकलो. मला धीर देत उभी करणारी ही, इतकी कोसळलीय आतून. बापरे!!!! आपल्याला ही समजलीच नाही अजून. खुप समजावून डोकं मांडीवर घेऊन झोपवलं तिला. रात्रभर जागलो. सकाळी एका नव्या विचारात नव्या उमेदीने निर्णय घेतला. स्वतःजवळील पैशांमधुन मेडिकल स्टोअर सुरु केलं परीच्या नावाने. शरुवर जबाबदारी सोपवली. ती ही घराबाहेर पडली. शिक्षण होतचं सोबतीला. एकीकडे डॉली मोठी होतं होती. दुःख विरत होतं आणि स्टोअरचा व्याप वाढत होता. शरयूशी बोलून मी ही नोकरी सोडून स्टोअरमध्ये जायला सुरुवात केली.
मध्यंतरीच्या काळात शरुच्या बहिणीशी असलेले संबध सुधारले. ती ही पूर्वीसारखी होत गेली हळूहळू. काळाच्या औषधाने. एकत्र असतो हल्ली स्टोअरमध्ये. दोघांना खुप वेळ मिळतो. सरीतेसारखंच तिचं खळाखळतं हसू, तिचा बिनधास्तपणा मी परत आणण्यात यशस्वी ठरलो. आताही तशीच भेटते पूर्वीसारखी आवेशात. थट्टेने "रावण" चिडवतं. मी ही मग तिच्यासोबत तरंगतो तिच्या राज्यात 'yes madam' म्हणत.
-------×-------×---------
डॉली मोठी झाली आता आणि शरुही गुंतत चालली नात्यांच्या बंधनात. लाडकी आत्या, मामी, मावशी, काकी आणि आता तर आजीही झालीयं. भाऊ गेली दोन वर्ष रक्षाबंधन, भाऊबीजेला येतो. पण नात्यांमधला ओलावा नाहीच दिसतं. भाच्यांवर भारी जीव बाईसाहेबांचा. पोरांमध्ये असताना तिच्यातलं लहान मुलं आणि मैत्रिणींच्या घोळक्यातली अल्लड सखी पाहत राहतो मी. शरु माझी, माझ्या घरची लक्ष्मी आहे ही भावना सुखावते मला.
दोन वर्षांपूर्वी heart attack आला मला. हिने स्कुटीवर बसवून hospital गाठलं. सत्यवानाची सावित्री जणू. अँजिओप्लास्टी झाली. डॉक्टरांची धावपळ संपून धोका नसल्याचे कळलं आणि जीव भांड्यात पडला हिचा. आयसीयुत आली. कपाळावर ओठ टेकवले. हात हातात घेतला दुसरा हात छातीवर ठेवत म्हणाली "तुला असं कमकुवत होण्याचा काही अधिकार नाही. मी तुला काही होऊं देणार नाही. हे माझं हृदय आहे. लवकर बरा हो...."
--------×------×--------
घरी आल्यावर ही सगळी पथ्यपाणी, औषधे यांचा चार्ज घेतला. या सगळ्याला कंटाळलेल्या मला कधी दटावुन, कधी प्रेमाने तर कधी सुंदरसा किस घेत, तर कधी 'माझ्यासाठी घे ना राजा' म्हणत जागेवर आणलं. स्वतः जीम लावलीय सोबत मलाही. जगायचं आहे तिच्यासाठी. गेल्यावर्षी लेक नोकरीनिमित्त बडोद्याला गेली. आणि आम्ही दोघे राजाराणीच राहिलो...
लेक ही थेट आईसारखी झालीयं स्वभावाने. दिसतेही खुप सुरेख. दुसरी शरुच. एकदोन वर्षात लग्न करायला हवं तिचं. आता तेवीस संपलं. पण मुलगा मी पारखून घेणार. तिच्या आईच्या नजरेत जसा मी आहे तसा हवा जावई. तिने पाहिलेला असला तरी चालणार आहे आपल्याला. ती योग्य निवड करेल याची खात्री आहे.
बापरे आजचा अख्खा दिवस भुतकाळात गेलाय रविचा. सव्वीस वर्षे आणि त्याधीची पाच वर्षे. सगळं अगदी काल घडल्यासारखं डोळ्यासमोरून गेलं. माझा डॉल्याही आला सुट्टी टाकून मम्माच्या बर्थडेला. ठरल्याप्रमाणे सगळं पार पडलं. घरगुती पार्टीही मस्त झाली. शरुच्या मागे मागे करण्यात आणि तिच्या नजरेने घायाळ होण्यात अख्खा दिवस संपला. जेवणाच्या पंगती उठल्या. मैत्रिणी, पाहुणे निघालेत घरी जायला. दिवसभराच्या दंगामस्तीने दमलेली पोरंही झोपायला गेली. डॉल्याही सीमाताई सोबत झोपते म्हणाली. रवि ही जेऊन बेडरुमध्ये आला. रुम मस्त तयार केली. सुंदर सेंट फवारला तिच्या आवडीचा आणि वाट पाहत बसला.
सर्व आवरून शरु बेडरूममध्ये आली.....साडीत खुप छान दिसत होती... रविच्या बाजूला बसत गोड हसली. "छान झालं हां सेलिब्रेशन." म्हणत रविचा हात हातात घेऊन "thanks for everything & thanks for being with me" म्हणत हळूच ओठ टेकवले हातावर तिने...
रविने ही मग तिच्यासाठी आणलेली अंगठी तिच्यासमोर धरली. तिने आपला हात त्याच्यासमोर धरला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेत अंगठी बोटात सरकवली. बोटात छान बसलेल्या अंगठीवर ओठ टेकवले. "खुप जगायचं आहे ग तुझ्यासोबत राणी" म्हणत भावुक झाला.
"मलाही..." म्हणत त्याच्या मिठीत शिरली.
मिठी घट्ट झाली. "मेरी जान, my love...तुझें तों हमनें मोहब्बत का खुदा माना हैं" म्हणत एकदम साँल्लिड रोमँटिक मूडमध्ये तो हसला.....
"असु दे. असु दे. इतकं काही रोमँटिक व्हायची गरज नाही. पन्नाशी झाली की आता. आवराव स्वतःला. जावई ही येईल, एकदोन वर्षांत. तेंव्हा जरा जपून... थांब आलेच चेंज करून... साडीत आहे दिवसभर.." म्हणत शरु त्याला स्वतःपासून दूर करत हसली.
आय हाय...!!!रवि वेडावला त्या हसण्याने...
उठता उठता "गिफ्टसाठी थँक्स" म्हणतं डोळा मारून, केसांचा झुबका उडवत वळली आणि रविला तिच्या मानेवरचा tattoo दिसला....फिर दिल मचल उठा.... थंडी हवा लहराई... मौसम भी है... माहोल भी है... और हाय ये कमबख्त दिल आज पागल भी है... कान गरम झाले.. आवाज घोगरा.. श्वास वाढले... डोळे चमकले...
रवि पटकन उठला.... तिच्या मागे गेला.... तिच्या हाताला पकडून थांबवली. तिला मागून मिठीत घेतली. मानेवरच्या tattoo वर ओठ टेकवले... तिने पटकन फिरून घट्ट मिठी मारली... सकाळचं वचन आठवलं. आणि मनात गाणं वाजलं.."आ ओ हुजूर तुमको, सितारों मे ले चलूँ। दिल झूम जाएं ऐंसी, बहारों में लें चलूँ।..."
आँ..??? पुढे काय झालं विचारताय??? बाब्बो...!! जसं काय तुम्हाला माहीतीच नाही!! जावा तिकडं. आता कथा पुढे तुम्ही न्यायची. तुम्हांला हवी तशी. नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसतं...😉😉
वाचकहो तुम्ही आवडीने वाचताय तर तुम्हाला वाचनातून आनंद मिळावा म्हणून स्टोरी सलग पोस्ट केलीय......
वाचून झालं की नक्की कमेंट, लाईक आणि शेअर करा लिंकसहित......
© Velvet Kavisha
फोटो गुगल साभार....

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box