शाळा आणि अनुभव
✍©️जया पाटील
प्रत्येक आईच्या आयुष्यात स्वतःच्या मुलाचे प्रत्येक क्षण खूपच अनमोल असतात मग त्याच्या जन्माचा क्षण असू दे , त्याला कुशीत घेऊन पहिल्यांदा छातीशी कवटाळणे असू दे , त्याने बोललेला पहिला शब्द असू दे , किंवा त्याचे रांगणे , बसणे, उभे राहून पहिले पाऊल टाकणे असू दे , असे कितीतरी भावोत्कट क्षण प्रत्येक आईच्या आयुष्यात येत असतात.
माझ्यासारखी प्रत्येक आई आपल्या लाडक्या लेकाच्या आठवणी मनाच्या कुपीत अगदीच अलगद जपून ठेवत असते ... आणि त्या आठवणी त्यांच्या सुगंधाने आपल्याला नेहमीच सुखावत असतात.
खरे तर आईवडील दोघेही मुलांची प्रथम शाळा असतात . तरीही पुढच्या आयुष्यात प्रगतिशील बनण्यासाठी प्रत्येक मुलाला आपले शिक्षण पूर्ण करावेच लागते. त्यामुळे आपल्या लेकाच्या शाळेत जाण्याच्या आठवणी देखील पालकांसाठी अविस्मरणीय असतात.
माझ्या मुलाची शाळेची आठवण देखील तितकीच गोड आहे. माझा मुलगा तीन वर्षाचा झाला आणि आम्ही चांगल्या शाळेच्या शोध मोहिमेवर निघालो.
आजकाल अगदीच अडीच वर्षांच्या मुलांना पण शाळेत घालतात परंतु दक्षिण भारतात राहत असल्यामुळे इकडे शाळेचा वेळ सकाळी आठ ते दुपारी चार . इतक्या लहान मुलाला इतका वेळ जास्तच होतो आणि तो त्याचे बालपण जगणार तरी कधी ..?
त्यामुळे आम्ही वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याला शाळेत घालायचे ठरवले. आपल्यासाठी मुले कितीही लहान असली तरी जगरहाटी प्रमाणे तर चालावेच लागते.
आता शाळेचा शोध सुरु झाला. CBSE , ICSC , Cambridge pattern , Switzerland board असे एक ना अनेक शाळेचे बोर्ड आम्हाला समजले .
डिजिटल क्लासरूम आणि विविध extra curricular activities , अजुन नवीन उपक्रमांची माहिती हे सगळे काही या शोध मोहिमेतुन आम्हाला शिकायला मिळाले.
इकडची मातृभाषा इकडे अभ्यासक्रमात होती पण मराठी आपली मातृभाषा .. तिचे काय ?
माझा मुलगा ती लिहायला वाचायला कशी शिकणार ...? हा खुप मोठा प्रश्न नजरेसमोर होता. शेवटी थोडा कळता झाला की आपणच शिकवूया त्याला मराठी असे ठरवून टाकले. मातृभाषा नाही तर राष्ट्रभाषा हिंदी तरी अभ्यासक्रमात असली तर फार बरे अश्या दृष्टिने आम्ही शोध सुरु केला. शेवटी अभ्यासक्रमात हिंदी असलेली एक चांगली शाळा शोधून काढण्यात आम्हाला यश मिळाले.
आता पुढे वेळ होती मुलाची मानसिक तयारी करणे . त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले.
बाळा , आईला सोडून शाळेत गेल्यावर तिकडे त्रास द्यायचा नाही. तुझ्या सारखेच खूप दादा आणि दीदी तिकडे आईला सोडून येणार ... या सूचनांचा पट्टा रोज सुरु होता.
CBSE curriculum नुसार एप्रिल महिन्यात शाळा आणि नंतर मे आणि जुन सुट्टी आणि पुन्हा नवीन शालेय वर्ष सुरु होते. त्यानुसार माझ्या मुलाची पण 5 एप्रिल 2020 ला शाळा सुरु होणार होती.
प्रत्येक आईला सुरुवातीला असते ते टेन्शन मला देखील होते. इतक्या वेळ आईला सोडून हा मुलगा कसा राहणार ? मग पुढे पुस्तक आणि युनिफॉर्म त्याची खरेदी सुरु झाली. मुलाची शाळेत बसण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयारी केली आणि ....
पुढे काय झाले ..सांगू .....?
अहो .... 22 मार्च ला जनता करफ्यू आणि मग लॉकडाऊन ...😒😒😒
माझा मुलगा शाळेत जाणार हे स्वप्न अजूनही माझ्यासाठी स्वप्नच बनुन राहिले.😔😔
असो , तो शाळेत जाणारच... ! 🙂🙂😊
पंरतु त्याआधी ....,
देवा... , या कोरोना रुपी महामारीचा या जगातून नायनाट कर आणि त्यानंतर माझ्या लेकाचा शाळेचा पहिला दिवस मला अनुभवता येऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शाळेचा पहिला दिवस मला अनुभवता आला नाही तरी देखील शाळेतून 3 वर्षाच्या मुलांचे ऑनलाईन क्लासेस सुरु करण्याच्या सूचना मात्र आल्या. ज्या मुलांना शाळा म्हणजे नेमके काय ह्याची कल्पना देखील नाही इतकी छोटी मुले ऑनलाईन क्लासेस कसे अटेंड करणार हाच एक मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला.
ज्या मोबाईल आणि लॅपटॉप पासून आपण मुलांना दुर ठेवण्याचा प्रयत्न करतो ,ऑनलाईन क्लासेस मुळे आपल्याला हे सगळे जमणार आहे की नाही ? शाळेच्या वातावरणाचा अर्थातच मुले , शिक्षक , या गोष्टी मुलांना अभ्यास करण्यासाठी नक्कीच परिणामकारक ठरतात असे मला वाटते.
आर्थिक परिस्थिती ,ऑनलाईन क्लासेससाठी लागणाऱ्या सुविधा प्रत्येकाला उपलब्ध असतील असे देखील नाही. प्रत्यक्ष वर्गात बसून घेतले जाणारे शिक्षक ते घरी बसून घेतले जाणारे शिक्षण हा बदल खरेच आपल्याला झेपणारा आहे का ? आणि हा बदल स्वीकारण्याची मानसिकता खरंच आपल्या पालकांमध्ये आणि मुलांमध्ये आहे का ? ही देखील सखोल विचार करण्याची गोष्ट आहे.
आजकाल शिक्षण पद्धतीबद्दल बोलणे खरेतर तो माझा प्रांत नाही परंतु एक पालक म्हणून मला वाटते की आपल्या वेळेस मी वर नमूद केलेले बोर्ड आणि इतर ऍक्टिव्हिटी उपलब्ध नव्हत्या तरी देखील परिपूर्ण आणि दर्जेदार शिक्षण आपल्या वेळेस देखील मिळतच होते.
खरे आजच्या शिक्षणपद्धती विषयी सखोल बोलायचे ठरवले तर आजची शिक्षण पद्धती प्रचंड स्पर्धेची झालेली आहे. मुलांना सतत अभ्यास , विविध क्लासेस , मुलाला इंजिनीरिंग किंवा मेडिकलला घालणे, या डिग्री व्यतिरिक्त इतर कुठल्याही क्षेत्रात मुलाने जायचे ठरवले तर त्याला फारसे महत्वाचे न समजणें , परदेशी शिक्षण पूर्ण करण्याच्या अट्टाहासासाठी मुलांना शालेय जीवनापासूनच तयारीला लावणे , ही आजकालच्या शिक्षण पद्धतीची मुख्य वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. प्रत्येक पालक या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या मुलांना तयार करतो आहे पण quality पेक्षा quantity ला महत्व द्यायचे हे आपले आपणच ठरवायला हवे. आपल्याला फक्त विद्यार्थी जन्माला घालायचे नाहीत तर त्यांच्यातले माणूसपण पण जपायचे आहे.
खरंच मुलांना वाढविण्यासाठी खरेच या सगळ्या स्पर्धेची गरज आहे ? मुलांना वाढविण्यासाठी खरेच खूप जास्तच पैश्यांची गरज आहे ? माझ्यामते तरी नक्कीच नाही. आपले संस्कार आणि आपली नीतिमूल्ये आपल्या मुलांना उत्तम घडविण्यासाठी पुरेशी आहेत असे मला वाटते.
तळटीप - सदर लेख लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर लिहिला होता परंतु काही वयक्तिक कारणामुळे पोस्ट करता आला नाही.
वाचकहो, सदर लेखनाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा. माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे त्यामुळे लेख आवडल्यास लाईक करा. तुमच्या ही आयुष्यात असे काही अनुभव असतील तर नक्की शेयर करा.
तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद !🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box