तु तिथे मी .. !
✍©️जया पाटील
तेरे बिना ज़िन्दगी से कोई
शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं
तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन
ज़िन्दगी तो नहीं, ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं
तेरे बिना ज़िन्दगी से..
रेडिओ वर सुंदर स्वरात ह्या गाण्याचे बोल ऐकू येत होते. ह्या शब्दातली वेदना बाल्कनीत बसलेल्या शरदरावांच्या डोळ्यातून अश्रूंच्या रुपाने वाहवत होती. त्यांच्यासमोर त्यांचा भूतकाळ तरळत होता. ते जुन्या आठवणीत हरवले होते. भूतकाळात घडलेले सगळे प्रसंग त्यांना जसेच्या तसे आठवत होते.
शरदराव एका छोट्याश्या फर्मवर नोकरी करणारे एक साधारण गृहस्थ. मीनाताई त्यांची पत्नी आणि एक मुलगा अमेय असा त्यांचा अगदीच छोटासा त्रिकोणी आणि सुखी परिवार होता.
नव्वदीच्या दशकातले लव्ह बर्डस अशी दोघांचीही ओळख होती. सतत एकमेकांसोबत असणे , सगळ्यागोष्टीत एकमेकांचा सल्ला घेणे यामुळे त्या दोघांचेही प्रेम वय वाढत होते तसेच आणखी जास्त खुलत होते.
कधी कधी मीनाताई शरदरावांच्या कामामुळे वैतागून त्यांच्या नोकरीला स्वतःची सवत म्हणत असत. माझी सवत काही तुम्हाला घरी टिकू देत नाही म्हणून मीनाताई शरदरावांना चिडवत असत.
अग मीना , दोन वर्षात रिटायर्ड होणार आहे मी ..मग काय सगळा वेळ फक्त तुमचाच असणार आहे...
अश्याच नोकझोक मध्ये शरदराव आणि मीनाताई दोघेही आनंदून जात असत. अमेय पण मोठा झाला आणि इंजिनीरिंग पूर्ण करून एका चांगल्या कंपनीत त्याने कामाला सुरुवात केली. शरदरावांनी त्याच्यासाठी वधूसंशोधनाला सुरुवात केली. खूप गुणी , सुंदर आणि चुलबुली श्रेयासोबत अमेयचा विवाह थाटामाटात पर पडला. शरदराव देखील रिटायर्ड झाले. आता शरद सगळा वेळ आपल्याला मिळणार म्हणून मीनाताई मनोमन खुश झाल्या.
शरदराव मीनाताईंना सांगू लागले ...
मीना , उद्या पासून माझ्या ऑफिसच्या पटावर शरद देशमुख हे नाव नसणार आहे. यापुढे आता आपल्या दोघांचेही जग वेगळे असणार आहे. आता तु पण घरातल्या जबाबदाऱ्यांपासून रिटायरमेंट घे. श्रेया आणि अमेय दोघांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या समजायला हव्या. आपण आता संसाराचा सगळा भार आता त्यांच्या दोघांवर सोपवायला हवा. आपण दोघेही आता त्यांचे मार्गदर्शक आणि मदतनीस म्हणून असणार आहोत.
चोरून भेटणे , चोरून बोलणे ,चोरून प्रेम करणे ,चोरून एकांतात बसून मोकळेपणाने एकमेकांसोबत बोलणे , चोरून पत्र लिहिणे ..हे सगळे तेव्हाचे आपल्या तरुण पणातील आपले राहिलेले प्रेम आता करायचे.
आणि बरे का .. मीना .., आता तुझा संपूर्ण वेळ फक्त माझा असणार आहे आणि माझा संपूर्ण वेळ तुझा ... !
संसाराच्या रहाटगाड्यात जे काही जगायचे राहून गेले. अनेक छोटी-मोठी स्वप्न जी आपण पूर्ण करू शकलो नाही ती दोघेही मिळून आता आपण पूर्ण करूया. मला तुझ्यासोबत भरभरून जगायचे आहे. या पेक्षा दुसरे काही नकोय मला ....
मीनाताई यावर काही बोलूच शकल्या नाही पण त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू शरदरावांना त्यांचा होकार कधीच सांगून गेले.
रिटायरमेंट नंतरचा महिना शरदराव आणि मीनाताई दोघांसाठी अमृतासारखा आल्हाददायक ठरला. अमेय आणि श्रेया दोघेही गुणी होते. शरदराव आणि मीनाताईंच्या मदतीने ती दोघेही आपल्या जबाबदाऱ्या उत्तम पार पाडत होते. श्रेयाने गोड बातमी दिली. त्यामुळे शरदराव आणि मीनाताई नातवंड खेळवायला मिळतील म्हणून खूप खुश झाले.
पण कोणीतरी म्हटले आहे ना सुख हे नेहमीच क्षणिक असते. सुखानंतर दुःख असल्याशिवाय आपल्याला जगण्याची किंमत तरी कशी समजणार. तसेच विपरीत शरदराव आणि मीनाताईंसोबत घडले.
काही काळ गेल्यानंतर मीनाताईंची तब्येत अचानक खूप खराब राहू लागली. सुरुवातीस वाढीस लागलेल्या वयामुळे या प्रकृतीच्या तक्रारी असतील असे मीनाताईंना वाटले. त्यानंतर मात्र मीनाताईंचा त्रास आणखीनच वाढीस लागला. त्यादरम्यान श्रेयाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. नातू झाल्याचा आनंद तर खूप होता परंतु डॉक्टरांनी मीनाताईंच्या पुढच्या टेस्ट करायला सांगितल्या आणि त्यात त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले.
मीनाताईंकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे असे डॉक्टरांनी सांगितले. शरदराव आणि अमेय दोघांनीही हवे हे सगळे उपचार करण्याची तयारी ठेवली परंतु मीनाताईंचे शरीर मात्र त्या उपचारांना साथ देत नव्हते.
एकीकडे आनंद आणि एकीकडे दुःख ... अशी देशमुख कुटुंबीयांची अवस्था झाली. मीनाताईंच्या या आजारपणामुळे शरदराव देखील मनाने खचले.
मीनाताईं आणि शरदराव दोघांनीही सोबत पाहिलेली स्वप्न तुटताना त्यांना दिसू लागली. शरदराव मात्र मनातील दुःख मनातच ठेवून मीनाताईंना त्रास होऊ नये म्हणून ते नॉर्मल असल्यासारखे वागत होते. शरदरावांच्या मनाची अवस्था मीनाताई जाणून होत्या. माझ्या अश्या अचानक जाण्याने शरदरावांचे काय होईल या गोष्टीची चिंता त्यांना सतावत होती.
मीनाताईंची तब्येत दिवसेंदिवस खराब होत होती. शेवटी ती वाईट वेळ देशमुख कुटुंबियांवर येऊन ठेपली. त्या रात्री मीनाताईंवर काळाने घाव घातला आणि मीनाताई अनंतात विलीन झाल्या.
शरदराव मनातून हरले होते.
का सोडून गेलीस ग ..मीना...? मला अश्या अर्ध्या वाटेवर सोडून ....... कसा जगू मी आता एकटा .. तुला सोडून ..?
हाच एक विचार त्यांना क्षणोक्षणी सतावत होता.
मीनाताईंच्या मृत्यूनंतर त्यांचे गंधमुक्ती , श्राद्धादी सर्व धार्मिक विधी पार पडले. आलेली सर्व नातेवाईक आणि जवळची माणसे आपापल्या घरी गेली. श्रेया आणि अमेय दोघांनीही आता ऑफिस जॉईन करायचा निर्णय घेतला. शेवटी कितीही काही झाले तरी आयुष्य कोणासाठीच थांबत नाही त्यामुळे अमेय आणि श्रेया दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होते.
त्यावेळेस एक पत्र घेऊन श्रेया शरदरावांना देत म्हणाली ...
बाबा , आईंनी काही दिवसांपूर्वी हे पत्र तुमच्यासाठी लिहिले होते. मी ते उघडून पाहिले नाही कारण आईंनीच मला तसे सांगितले होते की हे पत्र तुमच्या व्यतिरिक्त कोणीही वाचायचे नाही.
ते पत्र पटकन हातात घेऊन शरदराव श्रेयाला विचारू लागले..
अग मीना , माझ्यासाठी पत्र लिहून गेलेली असताना तु ते पत्र मला आज देते आहे ..तिला जाऊन 13 दिवस पूर्ण झाल्यावर ... मला आधीच का दिले नाहीस तु हे पत्र ...?
सॉरी बाबा , पण आईंनी मला त्यांच्या जाण्यानंतर सर्व विधी पार पडल्यानंतर हे पत्र तुम्हाला देण्यास सांगितले होते. त्यांची तशी शेवटची इच्छा होती .. त्यामुळे मी नाही म्हणू शकले नाही...श्रेयाने शरदरावांना समजावणीच्या सुरात सांगितले आणि ती तिथून निघुन गेली.
भावविभोर होऊन शरदराव ते पत्र वाचू लागले. त्या पत्रातून तरी आपल्याला मीना भेटेल यामुळे त्यांची उदासी थोडीशी कमी झाली. मीनाताईंनी पत्रात लिहिले होते ..
प्रिय अहो ,
आपण खूप खूप गप्पा मारायचो त्यामुळे देवाघरी गेल्यानंतर देखील तुमच्यासोबत एकदा बोलायचे होते म्हणून हा पत्र प्रपंच... हे माझे शेवटचे मनोगत असेल परंतु माझी हीच शेवटची इच्छा होती.
सर्व प्रथम सातफेऱ्यांच्या वचनामध्ये आपण एकमेकांना आयुष्यभर एकमेकांची सोबत करण्याचे वचन दिले होते पण मी मात्र ते वचन निभावू शकले नाही म्हणून मला माफ करा.
आपल्या दोघांचीही खूप सारी स्वप्न अधुरी राहिली आहे ..परंतु देवाच्या मर्जीपुढे कोणाचेही चालत नाही त्यामुळे मी तुमच्या सोबत नसली तरी देखील तुम्हाला पुढे तर जावे लागणारच आहे ... आपल्या अमेय आणि श्रेयासाठी ..आपल्या दुधावरच्या साई साठी म्हणजे छोट्याश्या कृष्णा साठी ...!
आई, बाबा , आजी आणि आजोबा म्हणून त्यांच्या प्रती असलेली आपली दोघांचीही जबाबदारी आता तुम्हाला फक्त एकट्याला निभवायची आहे. यामुळे तुम्ही निराश राहणार नाहीत असे मला वचन द्या.
या पुढे तुम्हाला श्रेयाचे सासरे म्हणून नाही तर तिच्या मुलाप्रमाणे वागायचे आहे. राग करू नका हो ..पण हे सगळे तुम्हाला सांगताना मी लहान तोंडी मोठा घास घेतेय ..पण श्रेया काम करत असेल तर लगेच तुम्ही जाऊन तिची मदत करत जा ..घरातील छोटी कामे जसे दळण दळून आणणे , भाजीपाला आणणे , ते स्वच्छ करून देणे अशी सगळी कामे आता तुम्हीच करत राहा. आता श्रेया आणि अमेय दोघांनाही तुमचा त्रास नाही तर अगदी त्यांच्या मुलाप्रमाणे तुमची ओढ वाटली पाहिजे असेच तुम्हाला वागायचं आहे.
श्रेया आणि अमेय ने कुठेही बाहेर जायचा प्लॅन बनवला आणि त्यांनी तुम्हाला सोबत येण्याचा कितीही आग्रह केला तरी तुम्ही त्यांना नाही म्हणायचे आहे. श्रेया बनवलेल्या कुठल्याही वस्तूत माझी आठवण काढून किंवा मीना ते पदार्थ किती छान बनवायची असे सांगून तिचे मन मोडायचे नाही. अगदीच शहाण्या लहान मुलाप्रमाणे तुम्हाला वागायचे आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला आपल्या घराची , आपल्या मुलांची साथ लाभावी हीच माझी शेवटची इच्छा आहे.
तुम्हाला तुमच्या वृद्धत्वातील बालपण आपल्या नातवाच्या साथीने जगायचे आहे. आपण स्वतःहून समजदारीने वागलो की जीवन खरंच खूप सोपं होऊन जातो हो...
मला माहिती आहे या सगळ्यात तुम्ही एकटेच असणार आहात पण ..तुमचा एकटेपणा दुर करायला आपल्या आठवणी आहे ना ....आपल्या बेडरूमच्या कपाटात आपल्या सगळ्या सुंदर आठवणी मी सजवून ठेवल्या आहे. त्या तुमचा एकटेपणा घालवण्यासाठी नक्की मदत करतील कारण शेवटी शरीराने नसलो तरी मनाने मात्र आपण आजही एकत्रच आहोत ....
" तु तिथे मी " हे आपले समीकरण आठवणींच्या रूपात तरी कायमच असणार आहे ..कारण आपण हजारो ऊन संकटे घेलून देखील आपल्या अनमोल आठवणींच्या चांदण्यात तृप्तीने न्हाहणार आहोत ...
तुमचीच प्रिय
मीना
वरील कथेविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ..... !
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box