मलाही हवे आहे माझे माहेर या सासरी ..

#मलाही_हवे_आहे_माझे_माहेर_या_सासरी .....! 


✍©️ जया पाटील 





" निधी ,आज सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या चपाती बनवून जाशील गं ... ! आज माझी तब्येत ठीक नाहीये आणि इशू पण झोपलीय .... " 


रमा ताई आपल्या सुनेला निधीला सांगत होत्या.


निधीचे एक वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तिच्या कुटूंबात तिचा नवरा यश, सासूबाई रमाताई , सासरे शरदराव आणि नणंद इशा असा पाच माणसांचा राबता होता.


आजतर खुप महत्वाची मीटिंग आहे. स्वयंपाक पण बनवायचा आहे. सगळे वेळेवर कसे होणार ...? निधी असा विचार करत किचनचे काम आटोपण्याचा प्रयत्न करत होती. तितक्यातच तिला तिची मैत्रीण निताचा फोन आला ...


" अगं निधी, निघालीस ना ऑफिसला यायला .... तुला माहित आहे ना ..आजचा दिवस तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे ते .... ! "


" सॉरी अगं निता ..... , पण मला नाही वाटत मला जमेल आज प्रेसेंटेशन द्यायला. आईंची तब्येत बरी नाहीये आणि घरातली सगळी कामे पण बाकी आहेत आज ... ! "


" अगं काय बोलतेय निधी तु ....? आजचा दिवस पाहण्यासाठी तु पाच वर्षे मेहनत केलीय आणि घरातल्या कामांसाठी तु तुझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवते आहे. "


" अगं एक दिवस काम नाही केले तर काही बिघडत नाही ,तुझ्या घरच्यांचा राग एकदोन दिवस असेल पण आज तु ऑफिसला आली नाहीस तर तुझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरेल. ये पटकन ऑफिसला मी वाट पाहतेय ..."


निताचे बोलणे निधीला पटले आणि आज तिने बंडखोरी करायची हे ठरवलेचं ... ती आवरायला निघाली, तयार होऊन आईंबाबांना सांगितले.


" आईबाबा , आज ऑफिस मध्ये खुप इम्पॉर्टन्ट मीटिंग आहे त्यामुळे मला निघावे लागेल , ब्रेकफास्ट तुम्ही ऑर्डर करा आणि शेजारच्या काकूंची बाई येणार आहे ती चपाती बनवून देईल , आई तुम्ही फक्त भाजी बनवून घ्या.. "


" सॉरी आई , पण आजच्या दिवस मॅनेज करा ..प्लीज .. "


आणि कोणाचे ऊत्तर ऐकण्याच्या आत ती घराबाहेर पडली सुद्धा ...


इकडे मात्र रमाताईंचा पारा चढला. एक जबाबदारी म्हणून नाही या मुलीला ... आज बघतेच ऑफिस हुन आल्यावर हिला ... असे म्हणत यश, इशा आणि शरदराव सगळ्यांना निधीचे वागणे रमा ताई सांगू लागल्या.


आता सगळेच निधीवर चिडले...


ऑफिसच्या एका मोठ्या प्रोजेक्टवर निधीची प्रोजेक्ट लीडर म्हणुन नियुक्ती झाली होती , तिच्या मेहनतीचे यश तिला मिळाले होते. निधी खुप आनंदात होती , घरी जाताना तिने सगळ्यांसाठी मिठाई घेतली. कधी एकदा घरी जाऊन खुशखबर सगळ्यांना सांगते असे निधीला वाटत होते. 


निधी घरी पोहोचली परंतु आज मात्र सगळे तिला  सकाळच्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठीच बसले होते. ती घरात पाय ठेवत नाही तितक्यात रमा ताई बोलु लागल्या ...


"काय गं निधी , या घराविषयी तुझी काही जबाबदारी आहे की नाही .... ? " 


"आज मी आजारी असताना सुद्धा तु काम सोडून निघुन गेलीस ...?"


त्यांचे बोलणे थांबवून शरदराव बोलु लागले. 


" निधी, आजकाल घरापेक्षा तुझे लक्ष ऑफिस कडेच असते. आमच्याविषयी तुला काही आस्था नाही का ..? "


तितक्यात यश बोलु लागला ... 


" निधी ,आई आजारी असताना तु असे निघुन जायला नको होते. "


राहता राहिली इशा , ती पण बोलु लागली ...


" काय गं वाहिनी .., नोकरी मी पण करते ..पण तु जरा जास्तच possesive आहेस या जॉब बद्दल ... "


सगळ्यांच्या या बोलण्यावरून निधीच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा येऊ लागल्या . तिच्या आनंदावर विरजण पडले होते.  


पुन्हा रमा ताई बोलू लागल्यात...


" आता अश्रु आणून जास्त वाद वाढवू नको गं बाई ..आम्ही तुला बोलणारे वाईट आणि तु किती चांगली हे दाखवण्याची गरज नाही." 


" एक तर तुझा जॉब किंवा आम्ही ..दोघांपैकी एकच काहीतरी निवड तु ......"  


निधी बोलु लागली ... 


" आईबाबा  , सॉरी  मी आज असे जायला नको होते , पण आजचा दिवस माझ्यासाठी खुप महत्वाचा होता. " 


" प्लीज ..मी जे काही सांगतेय ते ऐकून तरी घ्या आणि नंतर तुम्ही सगळे जे सांगणार ते मी ऐकून घेईल ..."


शरदराव म्हणाले बोल ... , ऐकतो आम्ही ....


" आईबाबा , आज मी निघुन गेली तरी इशा आणि यश तर घरातच होते . ते देखील आईंची काळजी घेऊ शकत होते. "


" मला जमेल तितकी आईंची सोय करून जाण्याचा प्रयत्न मी नक्कीच केला , मी मुद्दामहुन नाही गेले  , काम तितके महत्वाचे होते म्हणुन गेले , पण माझ्या वाटेचे काम यश आणि इशाने का नाही केले...? "


" तुम्ही त्यांच्यावर तर नाही चिडला ना आई ..? "


" का ...? ती दोघे तुमची मुले आहेत म्हणुन ....की मी तुमची सून आहे म्हणुन ....? मला तुमची माया मिळवण्याचा अधिकार नाहीये का आई ...? "  


" मी माझ्या मीटिंगचे कारण सांगून ऑफिसला जाण्यासाठी विचारले असते तर तुम्ही मला जाऊ दिले असते का आई ...? "


" इशा...तु म्हणत होतीस ना ...वहिनी जॉब मी पण करतेय .. पण आपल्या दोघांच्याही जॉब मध्ये फरक आहे ...मी सासरी राहून जॉब करतेय आणि तु तुझ्या माहेरी राहून .....! "


" यश...तु रात्री उशीरा पर्यंत काम करतो तर बाबा तुला स्वतः चहा बनवून आणतात ....रात्री जागून काम तर मी पण करते ना बाबा ...पण अलार्म स्नूझ करून झोपायची मुभा मला कधीच का नसते रे .... असे का ..? "


" का मी  तुझी बायको आहे म्हणुन की या घरची सून आहे म्हणुन ....? "


" बाबा ...गेल्या पाच वर्षापासून मी ज्या प्रोजेक्ट वर इतकी मेहनत घेतेय , त्या प्रोजेक्टसाठी माझी टीम लीडर म्हणुन नेमणूक झालीय. त्यासाठीच्या प्रेसेंटेशन साठी आज मला जावे लागले बाबा ...." 


" तुम्हाला सगळ्यांना माझी अचिएव्हमेन्ट कधी एकदा सांगते असे झाले होते मला बाबा..."


" त्याच गडबडीत माझ्या बाबांना सुद्धा फोन केला नाही मी ..कारण आता तुम्ही सगळे माझा परिवार आहात. "


" इतक्या आनंदात घरी आल्यावर माझे बाबा ...कौतुकाने म्हणायचे .. आली माझी परी... आज पण नक्की काही तरी कमाल केली असेल माझ्या लेकीनं ...! "


" तेच कौतुकाचे शब्द तुमच्या कडूनही ऐकायचे होते मला बाबा .... का ..? ते कौतुक तुमच्या कडून ऐकायची इच्छा चुकीची आहे का बाबा ...? " 


" मी घरी आल्यापासून आम्ही तिघे आणि तु असे तुम्ही बोलताय. तुमच्या तिघांमध्ये मला स्थान का नाहीये बाबा ....? आपल्या चौघात हा शब्द का नाही वापरला बाबा तुम्ही ...? "


" मी कुठल्याही चुका मुद्दामहून नाही करत पण गडबडीत होतात माझ्याकडून चुका.... "


" माझा तुम्हाला दुखवायचा कोणताही उद्देश नाही आईबाबा... माझ्या आजच्या बोलण्यावरून मी असे पण नाही सांगत आहे की तुम्ही यश-इशा आणि माझ्यात फरक करतात. "


" तो निसर्गाचा नियम आहे . कोणतेही आईवडील आपल्या मुलांवर भरभरून प्रेम करतात. त्यामुळे  त्यांच्या चुकाही त्यांना दिसत नाही. त्यामुळे मी तुम्हाला दोषी ठरवणार नाही..... ! "


" मला यश आणि ईशाचे स्थान नकोय, आईबाबा... "


" पण त्यांच्यासारखीच एक छोटीशी जागा मला देखील हवी आहे तुमच्या मनात ....! "


" मला देखील हवा आहे आईबाबा....तुमच्या मायेचा ओलावा .. तुमच्या पंखाखाली विसावा.... ! "

 

" मलाही हवे आहे माझे माहेर या सासरी ......! "


" माझी ही इच्छा चुकीची आहे का आईबाबा ..? "


असे बोलून निधी रडत रडत आपल्या खोलीत निघुन गेली. सगळेच एकदम शांत झाले होते. कोणीच काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी निधी सगळे काम आटोपून लवकर ऑफिसला निघुन गेली. 


संध्याकाळी घरी आली तर दरवाजा उघडून आत येताच तिच्यावर ईशाने फुलाचा वर्षाव केला.


यश, रमा ताई आणि शरदरावांनी टाळ्या वाजवत तिचे स्वागत केले. घराची केलेली सुंदर सजावट .. डायनिंग टेबलवर ठेवलेला केक आणि सुंदर भेटवस्तू पाहून निधी हरकून गेली .


" हे सगळे काय आहे आईबाबा ...?" निधी 


 रमाताई बोलु लागल्या...,


" आमची लेक प्रोजेक्ट लीडर झाली आहे .. तिचे कौतुक नको का करायला... ?  सेलेब्रेशन तो बनता है ..... ! "  


रमाताई आणि शरदराव निधीच्या डोक्यावर हातात ठेऊन म्हणाले ...


" देवा ...आमच्या लाडक्या लेकीला ...उदंड आयुष्य दे ...भरभरून यश दे ..हीच तिच्या आईबाबांची तुझ्या चरणी प्रार्थना ....! " 


निधीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.


यशचे जोडीदार आणि मित्राच्या रूपात, ईशाचे बहिणीच्या रूपात, रमाताईंचे आईच्या रूपात  आणि शरदराव यांचे वडिलांच्या रूपात तिला नव्याने प्रेम गवसले होते. 


या विविधरूपातील प्रेमामुळे तिच्या आयुष्यात आज जणू इंद्रधनुष्य उमटले होते...कारण तिला आज तिच्या सासरीच नवे माहेर मिळाले होते....!  


वाचकहो, माझी ही कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरु नका. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील 




   


Post a Comment

0 Comments