आनंदी वास्तू 🏠

#आनंदी वास्तू 🏠 ..


✍©️जया पाटील 





विलासराव घाटगे , त्यांचे आईबाबा , त्यांची धर्मपत्नी रमा, मुलगा शेखर आणि मुलगी श्रेया .... अगदी सुखाने भरलेला षष्टकोनी परिवार. 


अगदी छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा घरात एकमेकांना शेयर करायच्या. आपल्या अडचणी मनात न ठेवता त्या घरातील सगळ्यांसोबत शेयर करून त्या अडचणींवर मार्ग काढायचा ही शिकवण लहानपणापासून विलासरावांना त्यांच्या आईबाबांनी दिली होती. त्यामुळे अर्थातच ते गुण शेखर आणि श्रेया दोघांमध्येही होतेच.


कुठल्याच संकटांनी खचून न जाता सगळे मिळून त्यावर मात करायची हे सगळ्यांनी ठरवलं होते.

घाटगे परिवाराला देखील आयुष्यात अनेक अडचणीचा सामना करावा लागला पण सगळ्यांची सोबत असल्यामुळे त्यांना ती संकटे अगदीच शुल्लक वाटली. 


एकमेकांच्या साथीने विलासरावांनी आणि त्यांच्या परिवाराने सगळ्या अडचणींचा धैर्याने आणि नेटाने सामना केला त्यामुळेच ते त्यांच्या वर्तमानकाळात यशस्वी झाले.


कालांतराने वृद्धापकाळाने विलासरावांच्या आईबाबांचा मृत्यू झाला. विलासराव आणि रमाताई थोडेसे एकटे पडले. घरातील मोठी माणसे घराचा भक्कम आधार असतात हे ती दोघेही जाणून होती परंतु निसर्गाचा नियम आहे जो जन्माला आला तो एक दिवस अनंतात विलीन होणारच म्हणुन त्यांनी स्वतःला सावरले.

 

या पुढचा काळ आपल्याला फक्त आईबाबांच्या आठवणीत व्यतीत करावा लागेल हे त्यांनी जाणले आणि आलेल्या दुखाचा सामना करून विलासरावांनी त्यांच्या आईबाबांच्या चांगल्या शिकवणीच्या , संस्कारांच्या आधारावर पुढे जायचे ठरवले.


काळ पुढे सरकत होता. श्रेया आणि शेखर दोघेही   मोठे होत होते. दोघेही आपले शिक्षण पूर्ण करत होते. थोड्याच दिवसांनी श्रेयाचे ग्रॅजुएशन पूर्ण झाले. ती त्याच शहरात चांगल्या नोकरीला लागली. त्यांनतर विलासरावांनी श्रेयासाठी योग्य असा मुलगा शोधायला सुरुवात केली. काही काळानंतर त्यांनी श्रेयाचा विवाह अतिशय गुणी, चांगल्या परिवारातील आणि त्याच शहरात  नोकरीला असलेल्या अभिजित सोबत लावून दिला.  


विलासरावांची एक जबाबदारी तर पूर्ण झाली होती आता शेखरचे दोनाचे चार हात केले म्हणजे आपण मोकळे असे विलासरावांनी मनोमन ठरवूनच टाकले.


शेखर त्याचे उच्चशिक्षण संपवून तो देखील चांगल्या नोकरीत सेटल झाला होता. विलासरावांनी मग शेखर साठी वधूसंशोधन सुरु केले. शेखरला त्याच्याच ऑफिस मधली शुभांगी खूप आवडत होती. त्याने तिला प्रोपोज पण केले होते.


घाबरत घाबरत त्याने विलासरावांना शुभांगी  बद्दल सगळे काही सांगितले. मुलाची आवड तिच आपली आवड......शेवटी संसार त्या दोघांनांच करायचा आहे असे समजून विलासराव  आणि रमाताईंनी या लग्नाला होकार दिला.


शुभांगी एका श्रीमंत व्यावसायिकाची मुलगी होती. आईवडिलांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे ती खुप हट्टी होती. त्यामुळे पैश्याची उधळपट्टी करणे , सतत बाहेर फिरायला जाणे , हॉटेल मध्ये जेवायला जाणे अश्या गोष्टी तिच्या फार आवडीच्या होत्या. यात वेळ आणि पैसे दोघांचाही अपव्यय होतो आहे हे तिला समजतच नसे.  


शेखर आणि शुभांगीचे लग्न झाल्यावर नव्याचे नऊ दिवस सगळे काही छान चालू होते परंतु शुभांगीचा सतत बाहेर जाण्याचा हट्ट करणे , आज ही पार्टी , उद्या ती पार्टी ह्या सगळ्या गोष्टी शेखरलाही पटेनाश्या झाल्या होत्या. 


शेखर शुभांगीला सतत समजावत असे की प्रत्येक वेळेस खूप पैसे खर्च करून आनंद मिळतोच असे नाही , आपण आपल्या घरातील लोकांसोबत सुद्धा उत्तम वेळ घालवू शकतो ,  त्यातच खरा आनंद असतो. ह्या सगळ्या गोष्टी मात्र शुभांगीच्या  समजण्या पलीकडच्या होत्या.


शुभांगी घरात देखील रमाताईंना घरकामात फार मदत करत नसे. सगळीकडे तिची मनमानी करत असे. जवळच्या नाईवाईकांकडे कार्यक्रम असला की कार्यक्रमला जायचे नाही. ऑफिस मधुन उशिरा यायचे आणि स्वयंपाक तयार असताना सुद्धा जबरदस्तीने शेखरला बाहेर जेवायला नेणे. असे प्रकार आता नेहमीचेच झाले होते.


विलासराव आणि रमाताईंना हे सगळे काही पटत नसे परंतु आपल्यामुळे आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारात वितुष्ट येऊ नये म्हणुन ती दोघेही गप्प बसत. शेखरला देखील बऱ्याच गोष्टी पटत नसत , पण शुभांगीच्या हट्टी स्वभावापुढे त्याचा नाईलाज होत असे.


एक दिवस असेच शुभांगीने ऑफिस मधुन शेखरला फोन केला की तुझे काम आटोपून आपण बाहेर मूवी आणि डिनरला जाऊया . शेखर घरी आला तर रमाताईंची तब्येत खूप जास्तच बिघडलेली होती त्यामुळे त्याने बाहेर जाण्याचा प्रोग्राम कॅन्सल केला. या सगळ्यामुळे शुभांगी चिडून शेखर आणि रमाताईंसोबत भांडु लागली ..


ती रमाताईंना म्हणाली ...


मम्मी , तुम्हाला आमचे फिरणे , एन्जॉय करणे सहनच होत नाही. आज आम्ही कुठेही फिरायला जाऊ नये म्हणुन हे आजारी पडल्याचे सोंग घेऊन बसल्या आहात तुम्ही ...


आपल्यावरचे खोटे आरोप ऐकून रमाताईंना अश्रु  अनावर झाले पण त्याला काहीही बोलल्या नाहीत.


आईची चुकी नसताना आईवर केलेले आरोप शेखरला सहन झाले नाही म्हणुन त्याने शुभांगीवर  हात उगारला परंतु त्याआधीच त्याचा हात विलासरावांनी थांबवला. शुभांगी रागातच आपल्या खोलीत निघुन गेली. सगळीकडे शांतता पसरली. 


घरातील भांडणात शेखरने शुभांगीची बाजू घेतली नाही त्यामुळे शुभांगी शेखर , रमाताई आणि विलासराव सगळ्यांवरच खूप नाराज होती. खरे पाहिलं तर या सगळ्या वादात चूक शुभांगीची होती पण आपला अहंकार बाजूला ठेवून आपली चूक स्वीकारेल ती शुभांगी कसली ?


या वादानंतर शुभांगीने शेखरसह घरातील इतर सदस्यांसोबत बोलचाल बंद केली होती. विलासराव आणि रमाताईंना परिस्थितीत कशी सुधारणा करावी हेच कळतं नव्हते. शुभांगी खूप हट्टी होती त्यामुळे तिची समजूत काढणे अवघड होते. 


शुभांगीला रागावणे किंवा तिच्याशी भांडण करून तिला तिच्या चुकीची जाणीव होणार नाही आणि  कदाचित तिला याची जाणीव झाली तरी तरी कायमस्वरूपी नसणार हे विलासराव जाणून होते. त्यामुळे शुभांगीमध्ये बदल करण्यासाठी काहीतरी वेगळे सोलुशन शोधावे असा मनोमन विचार विलासराव करत होते.


दोन-तीन दिवस अबोल्यातच निघुन गेले. त्यानंतरच्या दिवशी शुभांगी ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली. कोणासोबत न बोलता नाश्ता करत असताना तिला तिच्या आईचा फोन आला . तिची आई फोनवर खूप रडत होती. शुभांगीच्या बाबांना अर्धांगवायूचा झटका आला होता. शुभांगी हे ऐकून रडू लागली. 


शेखर , विलासराव आणि रमाताईंनी तिला सावरले. सगळेजण लगेचच तिच्या सोबत हॉस्पिटलला पोहोचले. रमाताईंनी शुभांगीच्या आईची समजूत काढली. शेखर आणि विलासरावांनी शुभांगीच्या बाबांच्या ट्रीटमेंटची पूर्णतः काळजी घेतली.  


शुभांगीच्या आईबाबांच्या नाश्ता , खाण्यापिण्याची सगळी सोय रमाताईं आणि विलासरावांनी केली. त्यांच्या प्रकृतीची सगळी योग्य ती काळजी विलासराव, रमाताई आणि शेखरने घेतली. शुभांगीच्या बाबांना आपल्याला मुलगा नाही याची यत्किंचितही जाणीव शेखरने होऊ दिली नाही.


शेखर आणि त्याच्या आईबाबांची आपुलकी पाहून शुभांगीला आपल्याच वागण्याची लाज वाटली. तिला जाणवले की आपण चुकीचे वागलो 

तरी देखील आपल्या संकटाच्या काळात आपल्या लोकांनी आपली साथ दिली.  


शुभांगीने सगळ्यांची मनोमन माफी मागितली पण त्यांच्या समोर जाऊन माफी मागायची हिम्मत मात्र शुभांगीमध्ये नव्हती. कदाचित या सगळ्यातही शुभांगीचा हट्टीपणा आणि अहंकार आडवा येतच होता. 


माणूस हा पृथ्वीतलावरचा एकमेव प्राणी आहे कि प्रत्येक गोष्टीत त्याचा अहम त्याला कधीच सोडत नाही पण असे म्हणण्यापेक्षा माणूसच अहंकाराला सोडत नाही असे म्हणणे जास्त योग्य ठरेल असे मला वाटते.


शुभांगी आता घरातील लोकांसोबत थोडेसे चांगले वागत होती. तिचे बाबा डिस्चार्ज मिळून घरी आलेले होते. त्यांची तब्येतही व्यवस्थित सुधारत होती. शुभांगीचे पार्टी प्रकरण पुन्हा सुरु झाले होते. आज पुन्हा बाहेर जाऊया म्हणुन तिने शेखरच्या मागे तगादा लावला. विलासराव आणि रमाताईंनी आता मात्र डोक्याला हात लावून घेतला .


नव्याचे नऊ दिवस चांगल्या वागण्याचा शुभारंभ केलेल्या शुभांगीचे वागणे पुन्हा पाहिल्यासारखेच झाले होते  मात्र यात बदल करणे जरुरी होते. विलासरावांनी त्या दिवशी शेखरला शुभांगीसोबत बाहेर जायला सांगितले. घरातून परवानगी मिळाल्यामुळे शुभांगी खुश होती. 


शेखर आणि शुभांगी बाहेरून आल्यावर विलासरावांनी त्यांना बाहेर बोलावले. रमाताईंना पण बाहेर येण्यास सांगितले. विलासराव बोलु लागले...


शेखर आणि शुभांगी येत्या आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस तुम्ही कामावरून सुट्टी घ्या , शनिवार आणि रविवार सुट्टी असतेच तुम्हाला ... चार दिवसांच्या ट्रीपला जायचे आहे आपल्या सगळ्यांना ...


शुभांगी मधेच बोलु लागली ...बाबा ..आम्हाला सांगायचे तरी आधी ....अशी मधेच सुट्टी कशी मिळेल ...? तिला हे ट्रिपचे प्रकरण टाळायचे होते.


विलासराव म्हणाले ...हे पहा शुभांगी आम्ही कोणीही तुला कधी अडवत नाही पण तुला यावेळेस माझे ऐकावेच लागेल .. त्यामुळे मी सांगितले त्याप्रमाणे सुट्टी घ्या तुम्ही दोघेही ...


नाईलाजाने शुभांगीने हो म्हटले आणि शेखर , शुभांगी आपल्या रूम मध्ये निघुन गेले. विलासराव आपल्याला कुठे घेऊन जाणार ह्याची मात्र सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती.


बुधवारी रात्री विलासरावानी सगळ्यांना बोलवून सांगितले.

सकाळी लवकर तयार होणार आपल्याला निघायचं आहे. ट्रिपला जाण्यासाठी...कुठे जातो आहे ते सकाळी समजेलच तुम्हाला ....


विलासरावांनी सांगितल्याप्रमाणे शेखर , रमाताई आणि शुभांगी सकाळी लवकर तयार झाले. विलासराव त्यांना घेऊन ठरलेल्या ठिकाणी जायला निघाले. थोड्याच वेळात गाडी शुभांगीच्या बाबांच्या घरापाशी येऊन थांबली.


शुभांगीने विलासरावांना लगेच प्रश्न विचारला ...


हे काय बाबा ...तुम्ही तर आम्हाला माझ्याच घरी घेऊन आले ट्रिपला ... ? यात काय नवीन ..?


इथे तर मी नेहमीच येते. सुट्टी फुकट घालवली तुम्ही आमची ....


विलासराव बोलु लागले ...शुभांगी ह्या सुट्टीच्या काळात फक्त माझे ऐकायचे ...मी सांगेल तेच करायचे.


सगळेजण घरात गेले. शुभांगीचे आईबाबा दोघेही तयारच होते. त्यांनी अगदीच हसून स्वागत केले सर्वांचे... 


मग काय गेल्यावर गरम गरम पोह्यासोबत सगळ्यांनी चहा घेतला आणि मग जुन्या आठवणींच्या गप्पा रंगात आल्या. सगळे गप्पामध्ये इतके रंगले होते की जेवायची वेळ झाली आहे हे देखील कोणाच्या लक्षात आले नाही.  


पोटभर जेवण झाल्यावर मग  सगळ्यांनी पत्त्याचा डाव मांडला. शुभांगी म्हणाली मला तर खेळताच येत नाही ...मी काय करू ? 


विलासराव म्हणाले,  ...अगं मी शिकवतो शुभांगी ...


घरातील सगळ्यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला या  खेळाला ...मग जेवण , चेसचा खेळ , गाण्यांच्या भेंड्या आणि खूप दंगा मस्ती ... ! सगळे खूपच एन्जॉय करत होते. दोन दिवस कुठे गेले कोणालाच समजले नाही ..अगदी शुभांगीला सुद्धा नाही हं .....!


शुक्रवारी रात्री विलासराव सगळ्या परिवारा सोबत घरी आले. दोन दिवस तर संपले उद्या काय  होणार ..? उद्या काय सरप्राईज असणार ? हाच मोठा प्रश्न आहे ..? सगळ्यांच्या डोक्यात हेच चालू होते. 


शनिवारची सकाळ झाली. रमाताई उठून नाश्त्याची तयारी करू लागल्या. कधी नव्हे तर शुभांगी आज त्यांना मदत करू लागली. विलासराव किचन मध्ये येऊन बोलले ..


शुभांगी आणि रमा ..आज दोघांनाही सुट्टी ..आजचा नाश्ता मी आणि शेखर बनविणार आहोत ..तुम्ही आरामात बाहेर जाऊन गप्पा मारा ..


आता हे काय नवीनच ...? रमाताई 


अग जा ग ...नेहमी करतातच तुम्ही ही कामे आज तुम्हाला जरा आराम ...! विलासराव  


शेखर आणि विलासरावांनी मस्त पैकी सँडविच आणि चहाचा बेत केला. सगळ्यांनी मजेत खाल्ले .. पुन्हा गप्पा रंगल्या. विलासराव  आणि रमाताई त्यांच्या लग्नाच्या गमतीजमती सांगू लागले. शुभांगीपण इंटरेस्ट घेऊन ऐकत होती हे विशेष ...


दुपारचे जेवण बनवायचे नाही आज आपली लेक श्रेया सगळ्यांसाठी  नूडल्स , सुप अजून काय ते पिझ्झा वगैरे असते ना ते बनवून आणणार आहे .. सो.. आज आपल्या किचनला आज सुट्टी...


श्रेया दुपारचे जेवण बनवून घेऊन आली. त्यात सगळे काही शुभांगीच्या आवडीचे पदार्थ होते. सगळ्यांनी नवीन पदार्थ आवडीने खाल्ले. त्यानंतर सगळ्यांनी मूवी पाहिला. पॉपकॉर्न ,गप्पा  आणि मूवी ... सगळ्यांनीच हा मूवी टाइम एन्जॉय केला. या सगळ्यात पुढचे दोन दिवस कसे गेले .. अगदीच कोणालाच समजले नाही ..शुभांगी तर आपण ट्रिपला जाणार होतो हा प्रश्नच विसरली होती बहुदा .... कारण गुरुवार नंतर तिने पुन्हा हा प्रश्न विचारलाच नाही ..


रविवारची सायंकाळ झाली. त्यावेळेस विलासराव बोलु लागले.


काय मग शुभांगी ..कशी वाटली आपली ट्रिप तुला ? तु एन्जॉय तर केलेस ना ? 


शुभांगी बोलु लागली ...काय बाबा ..ही कुठे ट्रिप होती ..घरातच तर होतो आपण ..हा ..पण खूप मज्जा आली मला  ....सुट्टी कुठे संपली मला समजले पण नाही.


अरे बाळा ...हीच तर आपली ट्रिप होती आपल्या आनंदी वास्तूची ...आपल्या या सुंदर घराची ...


आपल्या जिव्हाळ्याची माणसं सोबत असली की आपले  घरसुद्दा खूप मजेचे ठिकाण वाटू लागते. शुभांगी ..तुला नेहमीच बाहेर फिरायला ..हॉटेलिंग  करायला आवडते ना .... या चार दिवसात तुला एकदा तरी त्याला सगळ्या गोष्टींची आठवण आली का ? 


त्या सगळ्या गोष्टी वाईट आहे...असे नाहीच मुळी.. बाहेर फिरणे ,हॉटेलिंग करणे या सगळ्या गोष्टीही एन्जॉय करायलाच हव्या ..फक्त आपल्या घरातील व्यक्तींशी वाद करून आपण ह्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला खरा आनंद नाही मिळू शकत बाळा ....  


घरातील सगळेमिळून जगलेले क्षण आयुष्यातील सोनेरी क्षण - सोनेरी आठवणी बनून जातात ..कोणत्याही किंमतीत ना मोजता येणाऱ्या अनमोल आठवणी ...क्योकी असली मजा तो सब के साथ होता है ..! विलासराव 


काय शुभांगी ...आहे की नाही आपले घर सुद्धा एखाद्या ट्रिप डेस्टिनेशन सारखे.... ?


अहो बाबा ... आपले घर ट्रिप डेस्टिनेशन सारखे नाही तर त्याहून सुद्धा खूप जास्तच ...अर्थातच स्वर्गाहूनही सुंदर आहे ...कारण ही आपली आनंदी वास्तू आहे ...शुभांगी ..


शुभांगीला आपली चूक लक्षात आली होती. दिखाव्याच्या नादात आपण किती सुंदर गोष्टीना , आनंदाला मुकत होतो हे तिच्या लक्षात आले होते.


घरातील प्रत्येक सदस्यांची साथ आणि प्रेम विलासरावांच्या सोबत असल्यामुळे विलासराव घाटगेंचे घर आज पुन्हा पूर्वीप्रमाणे  " 🏠 आनंदी वास्तू 🏠 " झाले होते.  


विलासराव कृतकृत्य होऊन ह्या आनंदासाठी परमेश्वराचे आभार मानत होते.


कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - pixels


✍©️ जया पाटील


Post a Comment

0 Comments