स्वराज्यप्रेरिका माँसाहेब......माझ्या नजरेतून....
©️जया पाटील
" हे राज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा आहे " या मंत्राचा ध्यास घेऊन त्याला सत्यात उतरवून स्वराज्य स्थापन करण्याऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझे शतशः प्रणाम. परंतु या ध्यासाला स्वप्न बनवून त्याला साकार करण्यासाठी आपल्या लाडक्या शिवबास घडवणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेबांना माझे कोट्यावधी नमन.
माँसाहेब यांच्याबद्दल काही लिहिणे म्हणजे माझ्या सारख्या सामान्य माणसाने शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे , परंतु तरीदेखील मला समजलेल्या माझ्या वाचण्यातून मला उमगलेलं जिजाऊसाहेबांविषयी काही लिहायचा प्रयत्न करते आहे .
१२ जानेवारी १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे गिरिजाबाई उर्फ म्हाळसाबाई व लखुजी जाधवांना कन्यारत्नाचा लाभ झाला त्या म्हणजे जिजाऊ....!
अगदी लहानपणीच ही गुणवंत कन्या श्री मालोजीराजे भोसले यांची सूनबाई झाली आणि श्री शहाजीराजे भोसले यांची अर्धांगिनी झाली. १६०५ च्या रंगपंचमीला अर्थात फाल्गुन वदय पंचमीला जिजाऊ माप ओलांडून भोसले घराण्याच्या गृहलक्ष्मी झाल्या. अगदी कमी वयात त्यांच्यावर कुटंबातील जबाबदारी येऊन पडली.
त्या शतकात सामान्य माणसाची परिस्थिती मात्र अत्यंत जिकीरीची आणि कठीण होती. महाराष्ट्रात आणि सर्वत्र मोगल आणि विजापूरचे सुलतान , निजामशाह यांनी धुमाकूळ घातला होता. आपलीच लोकं एकमेकांसोबत लढत होती.
अशा प्रसंगी जिजाऊ गरोदर होत्या , परंतु सगळीकडे माजलेली अराजकता , मराठ्यांच्या प्रदेशांची , त्यांच्या संसारांची झालेली दैना जिजाऊनां सहन होत नव्हती.
या सगळ्यागोष्टी संपवण्यासाठी संघर्ष अटळ आहे हे त्यांना माहित होते , म्हणूनच आपल्या लाडक्या शिवबास त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचे बाळकडु पाजले. पतीपासुन दुर असूनही शिवबाची आई आणि वडील म्हणुन त्यांची जबाबदारी त्यांनी अगदी नेटाने आणि धैर्याने पार पाडली. मराठा साम्राज्याच्या जडणघडणीत त्यांचे खूप मोठे योगदान आहेस. " जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगते उध्दारी " ही म्हण त्यांनी शत-प्रतिशत सत्य करून दाखवली.
आयुष्यभर संघर्ष करताना त्या कधीही डगमगल्या नाही. जाधव आणि भोसले घराण्याची सोयरीक जुळली खरी पण मने मात्र जुळली नाहीत. एका अकल्पित प्रसंगी दोन्ही घराण्यातील वाद पराकोटीला जाऊन युद्धापर्यंत पोहोचले , पण जिजाऊ मागे हटल्या नाही.
प्रसंगी जन्मदात्यां सोबत संघर्ष करतांना देखील त्या तितक्याच कणखर राहिल्या. गरोदर असताना घोड्यावर शिवनेरी कडे वाटचाल करणारी ही माता , खरा स्वराज्य स्थापनेचा पाया तिने त्या क्षणीच रोवला होता. प्रचंड संकटे धावून आलेली असताना शिवनेरीवर या मातेने सगळ्यांना संकटातून बाहेर काढणाऱ्या छत्रपतीना जन्म दिला. शिवनेरीवरील " शिवाई देवीचा कृपाप्रसाद " म्हणून " शिवाजी " असे बाळाचे नामकरण करण्यात आले.
रांझ्या पाटलांचा निवडा असो किंवा इतर न्यायनिवाडे .. प्रत्यक्षात न्यायनिवाडा करण्याची शिकवण छत्रपती शिवाजीराजेंना मिळाली ती माँसाहेबांकडूनच... !
सह्याद्रीच्या कुशीत वावरताना माँसाहेबानी शिवरायांना महाभारत आणि रामायणातील कथामधून स्वराज्य स्थापनेचे बाळकडू पाजले.
एका आईचे संस्कार किती मोठा बदल घडवून आणू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आणि माँसाहेब जिजाऊ..!
" स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते " , ही उक्ती त्यांनी खरी करून दाखवली. पतीच्या अनुपस्थितीत देखील त्यांनी आपली जबाबदारी धैर्याने आणि नेटाने पार पाडली.
स्त्री ही केवळ माता नसून ती एक शक्ति असु शकते हे जिजाऊंनी सिद्ध केले. प्रसंगी स्वराज्यासाठी आपल्या लाडक्या पुत्राच्या प्राणांची आहूती देण्यासाठी तयार असणारी ही माता अगदीच जगावेगळीच....
" तिच्या सारखी फक्त ती आणि तिच .......ध्येयवेडी,स्वातंत्र्याचा-स्वराज्याचा ध्यास घेतलेली,स्वराज्यप्रेरिका-स्वराज्यजननी आईसाहेब जिजाऊ.... !"
जिजाऊसाहेबांविषयी लिहायचे म्हटले तर शब्द देखील अपुरे पडतात असे म्हणणे वावगं ठरू नये. माझ्या वाचनात आलेल्या आणि मला खरया अर्थाने भावलेल्या जिजाऊसाहेबांविषयीच्या काही ओळी.....
"युगपुरुष घडविला जिने खास राज्याचे उभारले तोरण अदमास शिवनेरीच्या भूवरती , सह्याद्रीच्या कुशीत , उदयास आले एक अनमोल रत्न! उभारली हिंदवी स्वराज्याची गुढी फलदुप झाली जिजाऊंची स्वप्ने वेडी. तिच्या योगदानाची किती वर्णावी महती तिच्या प्रत्येक कृतीतूनच झाली स्वराज्याची स्वप्ननिर्मिती!"
स्त्री म्हणजे ऊर्जा ...शक्ती यांचे मूर्त स्वरूप. ही संपूर्ण सृष्टी चालविण्याची जबाबदारी निसर्गाने स्त्री कडे सोपवली आहे. आई होण्याची एक नवीन जीव जन्माला घालण्याची , आई होण्याची अभूतपूर्व शक्ती विधात्याने फक्त आणि फक्त स्त्रीला दिली आहे. राजमाता जिजाऊंसारख्या स्त्री शक्तीने ही जबाबदारी अगदी सार्थ पद्धतीने पार पाडली त्यामुळे माँसाहेबांपुढे माझे हे मस्तक आदराने झुकते.
वरील लेखनविषयाच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ..... !
धन्यवाद!🙏
सदर लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box