समाधानातील सुख

 #समाधानातली सुख....

 ©️जया पाटील 




सीमा, विशाल आणि त्यांचा पाच वर्षांचा छोटा आयुष अगदी सुखी असे त्रिकोणी कुटुंब. विशाल सरकारी नोकरीत मोठ्या हुद्यावर होता. सीमा देखील लग्नाआधी पासूनच चांगल्या कंपनीत नोकरीला होती. लग्नानंतर काही दिवसांनी आयुषचा जन्म झाला आणि आयुषचा सांभाळ करण्यातच सीमाचा वेळ जाऊ लागला. आयुषला पुरेसा वेळ देता यावा म्हणून तिने नोकरीचा राजीनामा दिला.  


आयुषच्या बाललिलां मधे रंगणे,आपल्या घराची देखभाल करणे यातच सीमाचा वेळ जाऊ लागला. विशाल देखील सीमाला जमेल तसा वेळ देतच होता. एकमेकांसोबत सिनेमा पाहणे , सुट्टीच्या दिवशी मनसोक्त गप्पा मारणे , एकमेकांचा वाढदिवस साजरा करणे सगळं अगदी छान पद्धतीने सुरू होते. थोडक्यात सांगायचे तर सीमा आणि विशाल  यांचा अगदी दृष्ट लागावी असा सुखी संसार होता. पैसा, प्रेम आणि हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी सीमाकडे होत्या. कोणालाही तिचा हेवा वाटावा असेच तिचे कुटुंब होते.


आयुष हळूहळू मोठा होत होता. आयुष अगदी समजदार आणि गुणी मुलगा होता. 

त्याच्या या समजुतदारपणा मुळे सीमालाही आता बराच फावला वेळ होता. तिचे विविध छंद जोपासण्यासाठी वेळ मिळत होता. 


सीमाचा स्वभाव मुळातच थोडा लाजरा बुजरा होता त्यामुळे फारसे कोणासोबत बोलणे तिला आवडत नसे. पुन्हा जाॅब सुरू करावा असे देखील वाटत होते पण त्याला देखील थोडा वेळ जाणार होता, तसे पाहता आता पैशाचीही तितकी निकड नव्हती त्यामुळेतिला जाॅबची देखील घाई नव्हती. 

विशालने देखील सीमाला सगळीच मोकळीक दिली होती, तुला हवे असेल तर नोकरी कर अथवा वेगळा काही छंद जोपास,मैत्रिणी वाढव असे विशाल सीमाला नेहमी सांगत असे.


सीमाचा थोडा वेळ जावा म्हणून तिच्या वाढदिवसाला विशालने तिला स्मार्टफोन गिफ्ट केला. सीमाने स्मार्टफोन मिळताच WhatsApp आणि Facebook ,इतरही सोशल साइट वापरायला सुरुवात केली. Facebook वर तिला तिच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणी सापडल्या आणि मग काय messages , photos , likes , whatsApp chat या सगळ्यात तिचा वेळ कसा जाऊ लागला हे तिला देखील कळलं नाही.  


विशालला देखील चांगले वाटले की आयुष आणि तो घरी नसताना सीमाला तिच्या मित्रमैत्रिणींमुळे चांगला विरंगुळा मिळतोय. असेच काही दिवस लोटले , मग मात्र नेहमी शांत आणि हसतमुखानं असणार्या सीमाचा पारा अगदी थोड्या वेळातच चढु लागला. ती डिप्रेशन मधे गेल्यासारखी वागु लागली. सतत नाराज आणि तिच्याच विचारात गुंतुन राहु लागली. 


विशालने तिच्या या अवस्थेमागचे कारण समजुन घेण्याचा खुप प्रयत्न केला , तिला वेळ दिला , तिच्या सोबत खुप गप्पा मारल्या पण तरीदेखील सीमाच्या अशा वागण्यामागचे कारण विशालला समजत नव्हते आणि मग मात्र त्याने काउंन्सिलींग  साठी सीमाला त्याच्या एका डाॅक्टर मित्राकडे म्हणजेच अजित कडे न्यायचे ठरवले.तिच्या बाबतीत सगळी माहिती विशालने आधीच अजितला दिलेली होती.

 

सीमा आणि विशाल ठरल्या वेळेप्रमाणे अजित कडे पोहोचले. काही प्रश्न अजितने सीमाला विचारले.सीमाने त्याची उत्तरे पण दिली पण तिचे जास्तीत जास्त लक्ष तिच्या स्मार्टफोन कडे होते. अजितने ही गोष्ट लक्षात घेतली .सीमा आणि विशालला पुन्हा आठ दिवसांनी परत या असे सांगून अजितने त्यांना जाण्यास सांगितले. बोलण्याच्या ओघात सीमाचा स्मार्ट फोन मात्र अजितच्या कॅबिन मधेच राहीला.


सीमाचा फोन अजितच्या केबिनमधे राहिल्याचे अजितच्या लक्षात आले पण जाणुनबुजुन अजितने ते सीमाच्या लक्षात आणुन दिले नाही. सीमाच्या अस्वस्थतेचे कारण मोबाईलच होता हे अजितने हेरले होते. 


सीमा आणि विशाल घरी गेल्यावर अजितने सीमाचा फोन तपासण्यासाठी घेतला, खरं तर असा कुणाचाही फोन त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय पाहणं चूक आहे हे देखील अजित जाणुन होता पण सीमाच्या टेन्शनचे कारण शोधून काढणे महत्त्वाचे असल्याकारणाने त्याने तो फोन तपासायचे ठरवले.  


अजितचे लक चांगले म्हणून सीमाने फोनला कुठलाही सेक्युरीटी कोड लावलेला नव्हता. त्यामुळे लगेचच सीमाचा फोन ओपन झाला. Frequently contact list मधे अजितला निहारिका , विशाखा , वेदिका आणि दिशा या चार  मुलींचेच नाव दिसत होते. सोशल साइटस् वर देखील यांचे फोटो , लाईक्स आणि इतर पोस्ट दिसत होत्या. अजितने त्या चारही मुलींचे फोन नंबर आणि इतर माहिती आपल्या मोबाईल मधे सेव केली आणि पुढे अजून त्यांची थोडी माहिती मिळवायचे ठरवले.


सीमा आणि विशाल घरी पोहोचले. आपला फोन आपल्या जवळ नाही हे लक्षात आल्यावर सीमा व्याकुळ झाली, ती परेशान होऊन स्वतःचा फोन शोधु लागली. तितक्यात विशालला अजितचा फोन आला की सीमा आपला फोन इकडेच विसरली आहे. फोनचा तपास लागल्याने सीमाच्या जीवात जीव आला. 


आठ दिवसांनी अजितने पुन्हा बोलावले असल्या कारणाने सीमा आणि विशाल ठरल्या वेळेप्रमाणे अजितच्या क्लिनीकला पोहोचले. काही साधारण प्रश्न विचारुन झाल्यावर अजितने काही वेळा साठी विशालला बाहेर जाण्यास् सांगितले कारण त्याला सीमा सोबत एकांतात बोलायचे होते.  


अजित बोलु लागला.... काय सीमा....निहारिका, दिशा , वेदिका आणि विशाखा या तुझ्या मैत्रिणी का...?


सीमा:- अरे हो अजित...माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी...पण तु कसा काय ओळखतो....?


अजित:- अगं असंच, एका कार्यक्रमात भेट झाली होती आमची.....छानच आहेत सगळया....!


अजित आपल्या मैत्रिणींना ओळखतो म्हटल्यावर सीमा आणखीनच उत्साही होऊन बोलु लागली.

 

सीमा:- अरे अजित ,सगळ्या छान तर आहेतच पण त्यांचे लाइफ तर कसले भारी आहे. वेगवेगळे देश फिरणे, पार्टीज आणि कितीतरी मज्जा.....! कोणालाही हेवा वाटावा असेच आयुष्य आहे रे अजित त्या सगळ्यांचे......!  


आता माझंच पहा ना, त्यांच्या सारखे कुठलेच thrill नाही रे अजित, माझ्या आयुष्यात....सगळे अगदीच साधे-सुधे चालु आहे.......कसलीच मज्जा म्हणून नाही. 

सीमाची नेमकी खरी अडचण अजितच्या लक्षात आली आणि मग तो पुढे बोलु लागला...


ज्या निहारिकाचे आयुष्य तुला इतकं छान वाटतं आहे ना... तिचा नवरा भ्रष्टाचाराच्या आरोपा खाली काही दिवस तुरुंगात होता.त्यामुळे त्याची नामुष्की झाली.  नातेवाईक , आप्त-स्वकीय कोणाकडे जाण्याची सोय राहिली नाही , म्हणूनच निहारिका आणि तिचा नवरा परदेशात स्थायिक झाले... पण आता खरे कारण जगासमोर यायला नको म्हणून आम्ही आमचे आयुष्य खुप enjoy करत आहोत म्हणून Facebook वर फोटो अपलोड करण्याचा हा खटाटोप......


पण सीमा, तुझ्या बाबतीत मात्र असे काहीच नाही. विशाल अगदी शून्यातून वर आलेला आहे , जे काही त्याने मिळवले आहे हे त्याच्या कष्टाचे यश आहे हे सगळेच म्हणतात ... मग मला सांग ... निहारिकाचे आयुष्य छान कि तुझे ...?

विशाल सारखा प्रामाणिक आणि कष्टाळू नवरा तुला मिळालाय ..... माझ्या दृष्टीने तर निश्चित तुझेच ......!


आता विशाखा बद्दल सांगतो. दुसऱ्या स्त्री सोबत अफेयर असल्यामुळे तिचा तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोट झाला आहे. सिंगल पॅरेण्ट म्हणून ती एका मुलाचा सांभाळ करत आहे. यात येणाऱ्या अडचणी किती आहेत हे तू देखील समजू शकते , पण जगासमोर तर मी खुप आनंदी आहे हे दाखवणे आवश्यक आहे नाहीतर मग जगच  आपल्या मजबुरीचा गैरफायदा घेऊ लागते .पण याबाबतीत देखील तू किती नशीबवान आहेस.... अगदी  जीवापाड प्रेम करणारा विशाल सारखा जीवनसाथी तुला मिळाला आहे .


आता वेदिका बद्दल बोलतो , ती अजूनही सिंगल असून आज देखील खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. प्रेमात धोका मिळतो तेव्हा किती त्रास होतो हे वेदिका पेक्षा जास्त कोणीच नाही समजु शकत  त्यामुळे सिंगल असूनही माझे किती मित्रमैत्रिणी आहेत आणि मी किती खुश आहे हे दाखवण्या साठी ह्या facebook वरच्या फोटोजचा आधार ती घेते.


धोका तर सोड .....विशालने तुला साधे एका शब्दाने देखील दुखविलेले नाही , तुझी चिडचिड , संताप सगळेच सहन केले फक्त आणि फक्त तुझ्यावर असलेल्या प्रेमासाठी ...... !


राहता राहिली दिशा .. , दिशा आणि तिचा नवरा दोघेही त्यांच्या आयुष्यात मुलबाळासाठी प्रयत्न करत आहे पण त्यात त्यांना यश येत नाहीये. परंतु मुलबाळ नसल्याने आमच्या आयुष्यात  काहीच कमी नाही व आम्ही दोघेही खूप खुश आहोत हे दाखवण्यासाठीच हा Facebook वरच्या फोटोजचा आभासीपणा आहे .सीमा या बाबतीत देखील तू खूप नशीबवान आहेस. तुला आयुष सारखा इतका गोड , समजूतदार आणि गुणी मुलगा आहे .


आता मला खरे सांग ,सीमा .... आयुष्यातले खरे सुख तुझ्या पायाशी लोटांगण घालत आहे आणि तू त्यांच्या आभासी आयुष्याला सुखी आयुष्य समजत आहेस . 


सीमा, अग Facebook , whatsapp हे जग आभासी - virtual जग आहे. त्यातून बाहेर येऊन बघ की  तू किती सुखी आहेस ...!

कदाचित तुझ्याजवळ जे आहे ते अगदी एखाद्याच नशीबवान व्यक्तीला मिळते ते म्हणजे भरभरून प्रेम .....विशाल आणि आयुषचे ......!


दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा करून तू तुझ्या आयुष्यातले समाधान गमावते आहेस. आपल्याकडे असलेल्या गोष्टीत समाधानी असणे हीच खरी सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. समाधानातच खरी श्रीमंती आहे .


सीमाला स्वतःची चूक उमगली आणि ती अजितला सांगून विशालची माफी मागण्यासाठी केबिन बाहेर गेली आणि विशालला तिने घट्ट मिठी मारली.तिच्या या मिठीतूनच विशाल त्याला काय समजायचे ते समजला.


वरील कथेविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ..... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा.


फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील











Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box