मिठी

मिठी

© Velvet Kavisha





लग्नाला नऊ महिने झालेले. प्रेग्नंसीचा सहावा महिना सुरु झालेला.  "येतांना पुढच्या वेळी काही टेस्ट करून या."  असं डॉक्टरांनी सांगितले. सगळ्या टेस्ट आणि त्याचे रिपोर्ट्स घेऊन मी आणि तो रुटीन चेकअपला गेलो. डॉक्टरांनी रिपोर्ट्स पाहिले.  एका रिपोर्टने अनपेक्षित दगा दिला होता. दोघेही पार कोसळलो.
मी धाय मोकलून रडायला सुरुवात केली. त्याने कसंबसं सावरत घरी आणलं. शॉक मोठा होता.  रडत रडतच घरी आलेली मी. दार उघडताच मी सासूबाईंना मिठी मारली.. त्यांने सगळं सांगितले. "कसं रे सहन करेल पोर" म्हणून त्यांनी ही छातीशी धरलं.. एका आईने दुसऱ्या आईला त्या एका मिठीत समजून घेतलं. आजही तसाच आधार देणारी, माझ्या संसारातला खांब असलेल्या आईची मिठी... प्रेरणादायी.  


लेकीच्या शाळेत एकदा मातृदिनाचा कार्यक्रम. स्पर्धा होत्या. मी आणि लेकीने भाग घेतलेला. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच माझ्या आईची तब्बेत अचानक बिघडली. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. शाळेत कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊला पोचायचं. पोचताच नाही आलं वेळेत.. रात्रभर हॉस्पिटलचं जागरण आणि टेन्शन. तरीही धावतपळत दहा वाजता कार्यक्रमाच्या हॉलमध्ये पोचले. लेकीचा एवढासा चेहरा पाहिला. अर्धा कार्यक्रम संपलेला. आमचा नंबर ही येऊन गेलेला. शाळेने संधी देऊ केली. पण मी अवतारात होते. कॉस्च्युम वगैरे काहीच नाही. मूड ही नव्हता.
 

लेकीकडे पाहिलं. ती पहिल्या रांगेत बसलेली. मला पाहून उठून आली. सहा वर्षांचे लेकरू माझी वाट पाहून थकलं होतं. तरीही तिने आजीची चौकशी केली. मला तिच्या टिचर म्हणाल्या काही बोलता का मॅडम?? एक आई जगवताना कदाचित मी एक आई म्हणून कमी पडले होते.
माईक हातात घेतला. तेव्हा काय बोलले ते आता आठवत नाही पण मान्यवरां सहीत दीडदोनशे गहिवरले. मलाही खुप भरुन आलं. स्टेजवरून खाली उतरले तोच गर्दीतून पटकन माझी मैत्रीण उठून आली. तिने मिठी मारली. संयमाचा बांध फुटला. अक्षरशः रडलो दोघीही. मोकळं होण्यासाठीची ही मैत्रीची आश्वासक मिठी..  



बऱ्याच ठिकाणी जाणं होतं.. कोणीतरी कोणाला तरी गमावलेलं असतं.. कोणाला काही तरी कमी पडलेलं असतं... आपल्या भेटीमूळे  उभारी मिळते.. डोळे भरून येतात त्यांचे.. अशावेळी त्या माऊलीला छातीशी धरावं आणि मी आहे तुझ्यासोबत म्हणावं -  ही आधाराची मिठी..



लेकींना वात्सल्याचे स्पर्श कळावेत म्हणून किंवा मी आहे तुझ्यासोबत हे सांगणारी मिठी. शाळेतून आल्यावर,  एखादी स्पर्धा, एखादी परीक्षा देऊन आल्यावर अजिबात काही न विचारता "माझी बबडी ग ती"  म्हणत मारलेली मिठी माझ्या आईपणाची अनुभूती...



टीनएजर्स भाची-भाच्यांना " हम है तो क्या गम है!" म्हणावं.  डोक्यावरून हात फिरवताना त्यांनी खांद्यावर टेकवलेलं त्यांच डोकं आणि मोकळं होणारं मन यातील मिठी दोन पिढ्यांमधील दुवा....
 

एखादी काही चांगली घटना आयुष्यात घडावी आणि दूरवरच्या एखाद्या मैत्रिणीने "ये ले मेरी प्यारवाली झप्पी.." म्हणावं आणि आनंदाने ती "झप्पी" आपण जगावी, अनुुभवावी यासारखं मैत्रीतलं दुसरं सुख नाही.... पण- - 


कधी कधी मी हादरते.. हादरते कसली घाबरतेच म्हणा ना.... मिठीच्या बाबतीत.


तर झालं काय की... एका मैत्रिणी सोबत तिच्या नणंदेच्या घरी गेलो. तिच्या नणंदेचे सासरे वारलेले. त्यामुळे सांत्वनपर भेट ठरली ही.." कसे गेले? काय झालं?? जाणारा जातो आपण त्यांच्या मागे धीराने घ्यायला हवं" अशी सगळीकडे वाजवलेली टेप वाजवली. रडारड आणि सांत्वन संपल्यावर गाडी रुळावर आली. इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये काकांबद्दल बरंचसं कळलं. खुप वेळ झाला म्हणून मैत्रीणीला खुणावलं. "निघुया आता." या अर्थाने.
 

"सांभाळा स्वतःला", "काकांच्या मागे आता तुम्हीच आधार आहात", "तुम्ही पण सांभाळा काकुंना" अशी बोलण्याची सांगता करत दोघी उठलो. निघताना काकुंना "काकू निघतो आता. काळजी घ्या" असं म्हटलं.  त्या बसल्या जाग्यावरून उठल्या. आम्ही  निघायला वळणार इतक्यात अचानक मला मिठी मारुन रडु लागल्या.



मी पाच फूट दोन इंच.. त्या जवळजवळ सहा फूट, धिप्पाड.. माझ्यावर अचानकपणे झालेला मिठीचा हल्ला. मी बेसावध.  माझ्यापासून भिंत पण बरीच लांब... टेकून आधार घेता येईना आणि काकूंचं वजनही तोलेना... बरं भोकाड पसरुन रडताहेत. बाजूला करावं तर अजुन जोरात हँहँहँ..... पाडणार बहुतेक या आता. मग आज आहे आपलं ओम फट् स्वाहा... काही खरं नाही माझं. "काका नक्की कशाने गेले ..? या मगरमिठीने तर नसतील गेले..??" असा विचार त्याही परिस्थितीत आला मनात.🙆‍♀️🙆



कशीबशी मान वर करून मैत्रीणीला खुणावलं. खरं यांनी तिच्या गळ्यात पडायला हवं.. पण त्यांना राँग नंबर लागला. मी इतकं चांगले सांत्वन केलं की, यार मला पाहून यांना गळ्यात पडावंस वाटलं 🤔🤔



काय बोलावं!! मैत्रिणीच्या नणंदेकडे पाहिलं. मानेने खुणावलं.  ती ही हेल्पलेस.  "आमच्याकडे असेच रडतात.." असा तिचा चेहरा.
बाप रे..!!  पश्चिम महाराष्ट्रात असे रडतात तर.!! त्याही परिस्थितीत नवीन शोध. सगळ मरुं दे. काकुंना आवरायला हवं. या दोघी काही कामाच्या नाहीत. 



नशिबाने माझे दोन्ही हात मोकळे होते. देवाची कृपा दुसरं काय! हातांनी काकुंच्या खांद्याला धरलं.
"काकू इतकं रडू नका हो, दातखीळी बसेल. सगळ्यांचे वांदे कराल. मग आहे काकांच्या मागे तुमचा नंबर...  सावरा जरा स्वतःला" डोकं बऱ्यापैकी सटकलेलं होतं... पण हीच भाषा वर्मी बसली.... खांद्यावर लटकलेलं ओझं कमी झालं... हुश्श!!! थोडक्यात जीव वाचला..... अशी ही दुःखारितेकाची जीवघेणी मिठी...



एकदा अशीच कल्याणहून ठाण्यात गेलेले. बहिणीला स्थळ बघायला. चार महिन्यांची लेक सासुबाईंकडे. दुपारी गर्दी नव्हती आरामात पोचले. खरंतर पाचच्या आधी ठाण्याहून ट्रेन पकडली असती तर निवांत गेले असते. कार्यक्रम लांबला आणि उशीर झाला. घरी लवकर पोचायचं म्हणून फास्ट ट्रेन पकडली. नेहमी कसारा, आसनगाव, टिटवाळा साईडला जाणारी ट्रेन पकडणारी मी बदलापूर ट्रेनमध्ये चढले. वीस पंचवीस मिनिटांत पोचायला होईल हा हिशोब.  पोरीने हैराण तर केलं नसेल ना..?? हा विचार डोक्यात.
गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये नीट उभं तरी राहता आलं तरी ठीक. म्हणून आत घुसले आणि फसले मधल्या मध्ये.  चार पाच जणींच्या घोळक्यात अडकले.  दोन्ही बाजूने दाबले गेले.. उंंची कमी हात वर पोचेना.. कसाबसा श्वास टिकवून ठेवावा म्हणून मान उंच करत राहिले. 



कुठेतरी ट्रेन वर खाली झाली आणि मागच्या एका बाईने मला सावरत कमरेत हात घातला..
गर्दीच्या प्रेशरसोबत स्वतःच्या अंगावर इतकं ओढून घेत होती काही विचारु नका... दोनतीन वेळा तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला पण अगदीच निरर्थक...



"अशा विनयभंगाची तक्रार करता येते का पाहायला हवं एकदा." पण करता काय रावं. डोंबिवली आल्याशिवाय सुटका नव्हतीच बहुतेक...
दिवा गेलं डोंबिवलीकर उठू लागले... मधल्या passege मध्ये अजून चेंगराचेंगरी. तिचा गाल गालाजवळ आला. आधीची लगट शिसारी आणणारी आणि त्यात हे. टाळकं सटकलं.  "अग बाई, काय चाललंय तुझं कधीचं..?? किती फालतूगिरी ही. तुझ्या अशा वागण्याने रात्री स्वप्न पडेल मला, तु माझ्यावर बलात्कार करतेस असं" इतक्या आवेशात बोलले काही विचारु नका.  बाकीच्यांनी ही दमात घेतली तिला.... म्हणाली "माझ्या सँडलचा बेल्ट निघाला म्हणून खाली वाकत होते. तेव्हा गालाला टच झाला असेल.  सॉरी." ही अशी किळसवाणी मिठी. स्पर्शाला आसुसलेली....
 



स्टेशनवर उतरल्या बरोबर नवऱ्याला फोनवर सांगितले. तो म्हणाला, "पुरुषांच्या डब्यात ही गर्दीच्या वेळी असे बरेच प्रकार घडतात. पुरुष ही पुरुषांसोबत असे वागतात." श्शी!!! कठीणच आहे सगळं. 



ट्रेनमधून उतरून पार्किंगकडे आले. रिक्षांना गर्दी असते. लाईनमध्ये उभं राहायला नको म्हणून मैत्रीणीच्या लेकीला तिची गाडी घेऊन बोलावलेलं.
  वेळ वाचवून लवकर घरी पोचायचा खटाटोप.  



"काय झालं काकी?? इतक्या का वैतागलात??" माझा वैतागलेला चेहरा बघून तिने विचारलं. तिला सगळा प्रकार सांगितला तशी ती हसली. 



"अहो काकी, आमच्या कॉलेजमध्ये मध्ये दोन मुली आहेत मैत्रिणी. त्यांच काय चाललेलं असतं काय सांगू?? हल्ली त्या दोघी वाशरुममध्ये गेल्या की आम्ही कोणी जात नाही तिकडे." तिने सांगितले.



"बाप रे, खतरनाक आहे सगळं.."  असं म्हणतानाच मला नटरंग मधला गुणा कागलकर आठवला. कारण तेव्हाच कळलं होतं समलिंगी बलात्कार वगैरे.  



"काकी यांना लेस्बियन म्हणतात..." या तिच्या वाक्याऩतर उरलंसुरलं डोकही गरगरायला लागलं.



बाब्बो....!!! हल्ली हे आणि असे प्रसंग, त्यावर सरकारने उठवलेली मोहोर आणि खुलेआम चालणारी काही नाती. माझ्यासाठी साजूक तुपात चिकन लेगपीस बुडवून खाण्यासारखं झालं ना रावं...
 



परवा एक मैत्रीण  "चल पळून जाऊया दोघी कुठेतरी!!!" असं सहज बोलली आणि मी घाबरले.. "या संसाराच्या कटकटीतून लांब".... बरं झालं पुढे बोलली. नाहीतर माझं हार्ट फेल डेफिनेटली...😜😜



आता आजीच्या गळ्याला नातवंडांनी मारलेली मिठी, आईबाबा, बहिणी, मुली आणि जीवलग मैत्रिणी यांची आम्ही आहोत तुझ्यासोबत सांगणारी आपुलकीची मिठी. खुप हवीहवीशी आणि आल्हाददायक...!!
 



तर्रर्रर्र.... विसरलात ना. त्या एका मिठीबद्दल. ती मिठी समर्पणाची, त्यागाची, कधी वडिलांसारखा आधार, तर कधी भावाचं भाऊपण. काय नसतं त्या मिठीत...??? आपुलकी, माया,काळजी, हित, प्रेम सगळंच असतं की..!! सल्लागार, तत्वज्ञ, वाटाड्या अशा जीवनसाथीची मिठी आम्हां स्त्रियांना आकाश ठेंगणं करणारी!!!



आता आपलं कसंय ना की, "पांढऱ्या घोड्यावर बसून राजकुमार येणार " या स्वप्नांत रमून  तरुणपण जगलो. पुढे जाऊन नशिबाने ज्या राजकुमाराशी गाठ बांधली. त्याच्याशी एकनिष्ठ राहिलो. पण हे सगळं पाहता पुढे काय होणार आहे तो परमेश्वरचं जाणो..  



चिमणीबाईंनो... यार जावई म्हणून चिमणेच आणा गं.... म्हणजे बौद्धिक मला झेपेल ना बाब्बो..🙆‍♀️🙆‍♀️



© Velvet Kavisha

Post a Comment

0 Comments