प्रेम विरहानंतरचं



 #प्रेम_विरहानंतरचं

© Velvet Kavisha

आज दहा दिवसांनंतर तो भेटणार म्हणून विभा खुश होती. हे दहा दिवस खुप काळजीयुक्त समाधानात गेलेत. आज नवीन रुपात तिला तिचा पुर्वीचा विलास भेटेलं. सगळं कसं त्याच्या मनासारखं सजवलयं. त्याला आवडतं तसं. फुलदाणी ही पांढऱ्या फुलांनी सजलीयं. थोडा मोगराही अडकवलाय त्यात. मोगऱ्याच्या वासाचा वेडा आहे न तो!!... 


एक गजरा राखून ठेवलाय. तो आला की माळेन केसांत. नाहीतर त्याच्याकडूनच माळून घेईन. त्याच्या आवडीचा बेत करायचं असं ठरलयं. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पोचेन असं म्हणालाय. दहा दिवसांनी त्याचा सकाळी आवाज ऐकला आणि मोरपीस फिरलं अंगावरून. किती छान आणि गोड!!! आजचा विलास हवाहवासा, वेडावणारा, अगदी विभाच्या मनातला!!!


मी सौ. विभा विलास जोशी. माझा नवरा विलास इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर. दोन मुलं आणि सासूबाई. छान पंचकोनी कुटुंब. विलास जात्याच हुशार. कंपनीच्या मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी बाहेर पाठवतात त्याला. Out of India...  


"वर्षांतून चार पाच महिने बाहेर राहील" लग्नाआधी सगळी कल्पना दिलेली. विभानेही  ते मान्य केलेलं.   विलासला पाहताक्षणी विभा प्रेमात पडली होती. तो ही असाच!! जसा आवडला तसा. खुप समजूतदार, क्षणात आपलंस करणारा, नातं हळूवार जपत जपत खुलवणारा.  


'पार खुळी आहे मी त्याच्यासाठी ...!!! सकाळपासून मनाने ही कितीवेळा विचारलयं .."Is this second honeymoon??? आणि "आपणही लाजून मोहरून उत्तर दिलयं की मनाला.... Yes it is!!!"


तेरा वर्षे झालीत लग्नाला. मोठा मुलगा अकरा तर धाकटा आठ वर्षांचा. विलास दर दोन तीन महिन्यानंतर दीडदोन महिने बाहेर असतो. आता कंपनीने ही खुप मोठी जबाबदारी टाकलीय त्याच्यावर प्रमोशनसहीत. पगार ही मजबूत येतोय घरात.  


सुरुवातीला तो असा बाहेरगावी निघाला की घालमेल व्हायची दोघांच्या जीवाची. समजून उमजून केलेलं आणि झोकून दिलेलं प्रेम बळंच द्यायचं अशावेळी. या दीडदोन महिन्याच्या विरहाने प्रेम वाढतंच गेलं दोघांमधलं.  आज जशी नटलीयं ना विभा तशीच नटायची तो येणार असेल त्या दिवशी. मात्र गेले सहा महिने ती हैराण झाली होती विलासच्या वागण्याने.


घराची, घरच्या माणसांची ओढ असलेला तो कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी जात होता पण तिथे गेल्यावर मात्र त्याचं वागणं बदलू लागलं. नेमक्या ठरलेल्या वेळी फोन करणारा विलास कधीही फोन करु लागला.  


रात्री, मध्यरात्री, अपरात्री विडिओ call करून विभाला "तुझी आठवण येते. तु जवळ असावीस असं वाटतं. तुला सांगत होतो त्या क्षणांचे विडिओ काढतो. तु काढू नाही दिलेस. दुधाची तहान ताकावर भागवली असती ना. आता मला तुला असं पाहायचं आहे. फोटो पाठव. विडिओ पाठव. तसं पाहायचयं फोटो पाठवं." सांगायचा.


घरात अजूनही तीन व्यक्ती राहतात विभासोबत हेच विसरून जायचा. समजावलं तरी ऐकायच्या मनस्थितीत नसायचा. एकच तुणतुणं. मला तुझी आठवण येते. त्याच्या प्रेमापोटी विभाही त्याचे हट्ट पुरवतं गेली. त्याला हवे तसे विडिओ, फोटो पाठवत राहिली.  


"येईलच ना आठवण त्याला. कुटुंबापासून दूर राहतो तर. एकटं वाटतं असेल. आपला ही दिवस कामात जातो पण रात्र अंगावर येतेच की त्याच्या आठवणीने... आपण नाही त्याचे हट्ट पुरवायचे तर दुसरं कोण पुरवणार???? " असा विचार विभा करत असे. कदाचित हेच चुकत होतं तिचं...


असाच वीस दिवसांपूर्वी आला ट्रिपवरून. आल्या आल्या दरवाजातच हात पकडून स्वतःकडे ओढलं. मुले, आई आनंदाने पाहताहेत. तो एवढ्या दिवसांनी भेटणार म्हणून. हे विसरून कसा गेला तो. तिने सावरलं कसंतरी. मुलेही आता मोठी होताहेत. त्याला यक्ष भानच नाही कशाचं. विचित्रच वागणं. आपल्याला हल्ली थोडी कल्पना आलीय त्याच्या वागण्याची. आज काय वाढून ठेवलयं काय माहीत?  


सुरुवातीला कंपनीच्या कामाच्या वेडाने झपाटलेला असायचा. प्रोजेक्टवरून आला की भरभरून बोलायचा. आता मुलांशी, आईशी सुध्दा नीट बोलत नाही. चिडचिड करतो. नुसता विभाच्या मागें मागे.  

का बरं हा असा वागत असेल या विचाराने डोकं फुटायची वेळ आली विभावर. 


आज तर काही बोलायलाच नको. इतक्या दिवसांनी आलाय.  


विलासने आल्या आल्या बेडवर झोपून घेतलं. आंघोळ, नाश्ता सगळंच बाकी आहे अजून. का बरं झोपला असेल ??? विचारलं ही. पण हुं की चूं नाही. दमून झोप लागली असेल. झोपू दे निवांत. अशा विचारात विभा बेडजवळून निघतच होती इतक्यात त्याने पाठीमागून मिठी मारली. 


बापरे, याला काय झालं.. मुलांनी पाहिलं तर काही खरं नाही.." मुलं आहेत रे. तु आंघोळ करून घे ना प्लीज. नाश्ता देते." विभा म्हणाली.


"मला नको तुझा नाश्ता. तुच खा तो. तुला आहे का माझी काळजी? नाहीतर अशी वागली नसतीस. मला झिडकारून नसतं टाकलंस." विलास तणतणला.


"इतक्या दिवसांनी आलास तर रागावू नको. मी बघते सगळं.  राजू जाईल क्लासला. आई जातील भजनी मंडळात. बंटी खेळायला जाईल. थोडा वेळ दे. तुझं आवर तोवर नाश्ता करून घे." विभाने सांगितलं.


सगळे एक एक करत घराबाहेर पडले. एकांत मिळाला. त्याने तिला जवळ ओढले. सगळं अधाशीपणे उरकलं. तिच्यापरीने तिने साथ दिली. तरीही असमाधानीच. मागच्या वेळेस थोडं तरी ठीक होतं. यावेळी जास्तच बिघडलीय परीस्थिती...   


तासाभराने झोपून उठला तरी पुन्हा तोच त्रागा. मुलं बाहेर खेळायला, आई मंदिरात,  धास्तावणारा एकांत, शरीर ओरबाडणारं मिलन, ती हतबल. रात्री त्याच्या हक्काचा निवांतपणा, तिचं विटलेलं मन आणि त्याचं उत्तेजित होऊन सारं उरकून झोपून जाणं. तिचं पुन्हा पुन्हा हतबल होणं. हा तिचा विलास नाहीच मुळी. काय झालयं याला ?? झोपून ही गेला लगेच. आपला विचारही नसावा याला??


इतक्या वर्षात दोघांनी खुप सारे सुंदर असे क्षण धुंदीत जगलेत. ओढ असायची दोघांना मिलनाची. रात्रीची वाट पाहताना किती तरी वेळा चोरून मिठ्या मारल्यात की दिवसा उजेडी. कितीतरी रात्री फक्त हातात हात घेऊन बसून काढल्यात गप्पा मारतं. कधी त्याच्या खांद्यावर विसावली तर कधी मिठीत. कधी त्याच्या केसांतून हात फिरवताना डोक्यावर डोकं ठेवून झोपून गेले. तर कधी कुशीत शिरून त्याचा हात अंगावर घेऊन झोपली. खुप रात्री रंगल्या, रंगवल्या. विरहाच्या नंतरच्या पहिल्या रात्री तर अशीच भेट व्हायची. नव्या प्रेमाने, ओढीने, आनंदाने आणि स्वखुशीने. दोन शरीरे एक मन. विरहाचा ताण निघून जायचा.....


सध्या मात्र सगळंच बिनसलंय... तो फक्त तिच्या शरीराचा भुकेलेला. स्वतःखेरीज काही दिसत नाही त्याला. असा वागतो आहे ना की त्याला फक्त शरीराची ओढ आहे.. मी available नसेन तर हा कोणाकडून आपली इच्छा पुर्ण करून घेईल. उद्या कोणावर बलात्कार करायला ही मागे पुढे पाहणार नाही. विकृतीच की ही. विभा विचारात तशीच बसून होती. 


सहा वाजलेत. अख्खी रात्र बसून काढलीय आपण. रडून रडून डोळेही सुजलेतं. हा व्यवस्थित बोलायला हवा आपल्याशी. इतक्यात त्याला जाग आली. विभा काही न बोलताच उठू लागली. सुजलेल्या डोळ्यांकडे त्याचं लक्ष गेलं आणि भानावर आला.  


"काय झालं विभा? तु रडलीस का?? तुझ्या दंडाला ही लागलयं की!..काय लागलं?? माझ्यामुळे त्रास झाला ना तुला हा?? पण मी तरी काय करू ग! मला काही कळतंच नाही मला काय होतं ते" म्हणत तो स्वतःलाच मारून घेऊ लागला...


विभाने त्याला थांबवत त्याचा चेहरा आपल्या तळव्यांत पकडला.."काय झालयं राजा तुला?? सध्या तु असा का वागतोस?? इतक्या वेळेस आपण जवळ येऊनही तु असमाधानी कसा?? कुठे गेला तुझा हळूवारपणा? हे कुठून शिकलास सगळं..???" तिने एकामागोमाग एक प्रश्न विचारले.


"कोणत्याही स्त्रीच्या शरीराचा वापर तिच्या संमतीशिवाय करणे म्हणजे बलात्कार." असं म्हणतोस ना तू नेहमी??  तुझ्यामुळे मला काही त्रास होत असेल याचंही भान नसावं तुला? मी नसते तर तु कोणालाही टार्गेट केलं असतंस का?? कसा वागतोस तू?? किती समजून घ्यावं म्हटलं तरी मला तुझं काहीच कळेनासं झालयं. तुला दुसरं काही सुचतच नाही.


काल तु आल्यापासुन आईना, मुलांना बसून भेटलास तरी का? पोरांना ही कळतं नाही पप्पाला काय झालयं ते. मोठी होताहेत रे आता मुलं. काल दिवसभर मुलांच्या नजरेतून स्वतःला  वाचवण्यासाठी किती आटापिटा करावा लागला तुझ्या वागण्यामुळे. एकटेपणा काय तुलाच असतो का? मी ही इथे एकटीच असते ना तुझ्याशिवाय ? हा एकटेपणा नवीन आहे का आपल्याला? मग मी ही तुझ्यासारखीच वागू का? ताळतंत्र सोडून? विभाला हुंदका अनावर झाला आणि  हुंदक्यासोबतच कालपासून आणलेलं उसनं अवसान गळून पडलं. डोळ्यातील पाण्याच्या रुपाने...


अगतिक विलास तिला समजावत राहिला आणि शेवटी बोलता झाला "विभा, मागच्या वेळेस गेलो ना बांगलादेशला तेव्हा अजून एक कलिग होता चेन्नईवरून आलेला. मी होमसिक. अस्वस्थ व्हायचो. बैचन वाटायचं. सगळ्यांची आठवण यायची. निघून यावसं वाटायचं. त्याच्याशी बोललो... "अरे ये तो बिबी की याद आ रही है तुझें. उसका सोल्यूशन तेरे मोबाईल में ही है..." आणि मी तेव्हापासून त्या साईड बघायला सुरुवात केली. सुरुवातीला मज्जा वाटली. कल्पनेत समोर तुला ठेवून सारं पाहू लागलो. ती ट्रिप संपली अशीच. यावेळी मात्र मी सोलवटून निघालो ग विभा. त्या साईड पाहताना स्वतःवरचा ताबा हरवून बसलो. तुलाही त्रास दिला. स्वतः ही उलटसुलट सगळं करून स्वतःलाही त्रास करून घेतला. त्या साईडवरच्या क्लिपस् पाहून पाहून मन चलबिचल होत राहिलं. बऱ्याचवेळा मोबाईल बाजूला ठेवायचो पण वाढलेल्या बेचैनीसहित पुन्हा घ्यायचो. Addict झालो. अक्षरशः गुलाम झालोय त्या क्लिपसचा आणि असमाधानी राहू लागलं मन" विलासने भडाभडा सगळं सांगून टाकलं.  


"अरे वेड्या माणसा! हे काय करून बसलास?? तुला कधी बोलावसंही नाही वाटलं इतक्या दिवसांत?" विभा.


"खुप वेळा प्रयत्न केला पण हिंमत नाही झाली. विभा, मला यातून बाहेर पडायचं आहे. Pls help me, vibha...." - - विलास.


"बरं. आतापर्यंत जे झालं ते झालं. तुला आजतरी माझ्याशी मोकळेपणाने बोलावंस वाटलं हेच खुप आहे माझ्यासाठी.  तुला स्वतःला यातून बाहेर यावसं वाटतयं ना?" - - विभा.


"हं" म्हणत त्याने मान डोलावली. "प्लीज मला यातून बाहेर काढ विभा. काही कर. काही सांग. मी ऐकेन सगळं" - -  विलासने काकुळतीला येऊन म्हटलं.


"बरं. मी चहा नाश्त्याचं आवरते. मग बोलू. तू ही आवरून घे." विभाने सांगितलं.


"हो" म्हणत विलास उठून उभा राहिला. विभाचा हात हातात घेतला. "सॉरी गं." म्हणाला.

 

"आता आवर आणि बाहेर ये." - - विभा.


चहा नाश्त्याची सोय करून विभाने मोबाईल हातात घेतला. खुप वेळ सर्च करून एका निर्णयापर्यंत पोचली. 


विभाने स्वयंपाक बनवला. जेवणं उरकून जो तो आपापल्या कामात गुंतला. मोठा होमवर्क करत होता. छोटा टीव्ही बघत तर आई तिच्या बेडरूममध्ये वामकुक्षी घेत होती. विलासही बेडवर पडून मोबाईल ढवळत होता. कामवाल्या मावशीं पण काम करून गेल्या.  


विभा सगळं आवरुन बेडरूममध्ये आली. विलासने पटकन उठून तिला वॉर्डरोबपाशी ओढलं. तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिला मिठीत घेतलं. मिठी घट्ट झाली. तो पुन्हा सैराटला. आणि बेडरुमचं दार बंद झालं. 


तासाभराची झोप काढून तो उठला. विभा त्याच्या उठण्याची वाट बघत होती. तिच्याकडे पाहिलं. त्याला आठवलं. "विभा सॉरी गं.  पुन्हा चुकलो...."  


"विलास मी काही सांगितले तर ऐकशील..??" विभाने विचारलं.


"हो." - - विलास. 


"असं नुसतं हो नको...? नक्की ऐकशील?" विभाने पुन्हा विचारलं. 


"हो. तुझी शप्पथ!..." विलास म्हणाला.


"एक महिन्याची सुट्टी टाक आणि resignation नंतर दे. एक महिना आराम करून दुसरी नोकरी बघ... package कमी असलं तरी काही फरक नाही पडत.... खुप झाली तुझी भटकंती. मला काही नको. जेवढा पगार आणशील त्यात सगळं भागवेन मी... तसंही बरेच लाख आहेत आपल्याकडे. त्यात मुलांच शिक्षण आरामात होईल.... करशील इतकं???"  


"हो. फक्त तुझं ऐकायचं असं ठरवलं आहे. कदाचित दुसरी नोकरी मिळायला वेळ ही लागू शकतो." विलासने सांगितले.


"असू दे. होईल नीट. तु उठ आता. आवरून घे. संध्याकाळी सहा वाजता डॉ. सानेंची अपॉइंटमेंट  आहे." विभाने सांगितले. 


"अगं,  ते तर psychologist आहेत ना." - - विलास


"हो. पण आता त्यांचीच मदत घ्यावी लागेल ना राजा...!!" - -  विभा


"ओक्के मॅडम.. !! तुम्ही म्हणाल तसं." म्हणत विलास उठून बसला.  


डॉ. साने झाले. डॉ राणेंचे हिप्नाँटिझमचे तीन सेशन्स. आणि सगळ्यात शेवटी आता हे दहा दिवस विपश्यना केंद्र, इगतपुरी. 


अडकला पटकन पण बाहेर निघताना फार सायास पडले. खरंतर संमोहनाच्या तीन सेशनमध्येच ओके वाटला विभाला तो. तरीही तिला आता रिस्क नको होती. म्हणून तिने विपश्यना केंद्रांचा दहा दिवसाचा मेडिटेशन स्टे बुक केला. Meditation is the best medicine. तिथे मोबाईलला परवानगी नाही. शुद्ध, सात्विक खाणं आणि तसेच विचार. मनही तंदुरुस्त..  


आज सकाळीच " विभा, मी निघालोय इकडून. येतोय घरी. आई आणि मुलांना सांग" म्हणाला. 


"आई सीमाकडे गेल्यात. मुलांना घेऊन. अथर्वचा वाढदिवस आहे ना उद्या. जातो म्हणाले म्हणून पाठवलं रे. आज तू येणार म्हणून मी घरी थांबले. उद्या जाऊ आपणही सीमाकडे. येतांना सगळे सोबत येऊ.." विभाने सगळं सांगून टाकलं. एका दमात.


"बरं. येतो मग मी. पोहोचेन आठपर्यंत." - - विलास.

"सावकाश ये रे." विभाची काळजी.

"हो. तब तक दिल थाम के बैठियें मोहतरमा." विलास मस्करीच्या मुडमध्ये.  


"विलास sss.." विभाचा कातर स्वर. आणि त्याबरोबर तिचा विलास पहिल्यासारखाचं झालाय याची खात्री. 


हा माझा विलास! खोडकर, नटखट.  नाती जपणारा.  मनं आणि माणसं जपणारा. उगाच पाठवलं सगळ्यांना सीमाकडे. त्यांना भेटून भारी वाटलं असतं त्याला. पण चालतंय की. एक दिवस फक्त दोघांचा. दोघांसाठी. ही ओढ भारी आहे. उगाचच प्रेमात पाडल्याचा आणि पडल्याचा फील येतोय. श्रेया घोषालचं "अधीर मन झाले" आणि "कधी दूर दूर कधी तु समोर" गाणी पन्नास वेळा ऐकून झालीत सकाळपासून. आठ वाजेपर्यंत येतो म्हणालाय तरी आपण कितीतरी वेळा दरवाज्याच्या peep hole ला डोळा लावलाय.


ये ना राजा लवकर. किती बोलायचं आहे तुझ्याशी. डोळे भरून पाहायचंय तुला. चुकलंच आपलं सकाळीच जायला हवं होतं त्याला घ्यायला.  दिवसभराची जीवघेणी हुरहूर तरी नसती लागून राहिली. स्वतःच्या हाताने इतकं दूर लोटलंय त्याला गेले वीस दिवस. त्यापेक्षा दुप्पट प्रेमाने शिरायचं आहे त्याच्या मिठीत. अगदी भान हरपून. आजची मी फक्त त्याची विभा. मनातल्या विचारांसह तिने स्वतःभोवती एक गिरकी मारली. 


तेवढ्यात दाराची बेल वाजली. सात वाजलेत. आता कोण आलं असेल...?? या विचारात विभाने दरवाजा उघडला.


"अरे विलास???  तू एवढ्या लवकर?" विलासला पाहताच विभाने प्रश्न केला. 


"रस्त्यात traffic नव्हतं म्हणून मग वेळ वाचला आणि आलो घरी..." त्याने सांगितले.


त्याला पाहून विभाला आनंदाने काही सुचेना. "Welcome back my love" म्हणताच तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रु पाझरले.


"हं. विभा, चहा वगैरे नको बनवूस. आंंघोळ करून झोपतो जरा. फार थकायला झालं आज. एक छान झोप काढतो. उठवू नकोस लगेच.." सगळं बोलून,  आंघोळ करून झोपून गेला.


दमला असेल. झोप होऊ दे नीट त्याची.  बिचारा!! आपण डिसिजन घेत गेलो आणि तो ऐकत गेला निमुटपणे. काही न बोलता. आपल्यावरच्या प्रेमापोटीच ना!! आता काही मी त्याला लांब जाऊ द्यायची नाही. पार दशावतार झाले होते त्याचे... जपायला हवं त्याला जीवापाड.


साडेनऊ झालेतं. दोन तास झोपला की छान! आता उठावं ना याने. पण नाही. ढाराढूर झोपलाय अगदी. किती बोलायचं आहे त्याच्याशी. विचारातच विभा त्याच्या बाजूला जाऊन बसली. खूपवेळ झोपलेल्या त्याला पाहत राहिली. हळूच केसांत हात फिरवत हलकेच त्याला हलवून "उठायचं नाहीय का जेवायला?? सगळं तुझ्या आवडीचं बनवलंय. उठून जेवून घे ना प्लीज. " असं म्हणाली.. 


"जेवण नको गं. एक ग्लास मसाला दुध दे फक्त. तोपर्यंत झोपतो जरा." म्हणाला.


"बरं." म्हणत विभा उठून किचनमध्ये गेली. दुध तापत  ठेवून बाहेर आली. खिडकीतून बाहेर पाहत उभी राहिली. "आपलं चुकलंच. नवरा आहे तो माझा. किती बोलले त्याला. अगदीच दूर लोटला  स्वतःपासून. दोन अडीच तास झाले. काहीच बोलला ही नाही माझ्याशी. इतकी तयारी केलीय. त्याकडे लक्ष ही नाही दिलं साधं. स्वतः खपून त्याच्या आवडीचा स्वयंपाक बनवला तर फक्त मसाला दूध पिणार आहे आता. विभा मनात धुसमुसत राहिली.   


विचारांच्या गर्दीत एकदम एक विचार आला तशी ती स्वतःशीच बोलली.. 

"अरे देवा!! माणूस बनायला पाठवलेलं याला. साधू तर नाही ना बनून आला??" 


"नाहीsss" पाठीमागून कानाजवळ त्याचा आवाज. 


ती मागे वळणार तोच तिला केस बाजूला होत तिच्या मानेवर सुंदरसा ओठांचा स्पर्श जाणवला. तिचं शहारलेलं अंग. शहाऱ्यांनी उठलेल्या रोमांचवर त्याने बोटं फिरवली. तिने आपल्या हातात त्याचे हात पोटावर पकडले.   त्याने मनगटं घट्ट करत तिला तसंच स्वतःजवळ धरून ठेवलं. तिच्या हातावर त्याचे हात. घट्ट झालेली मिठी. त्याच्या दणकट बाहुत जखडलेले दंड. त्याच्याकडे पाहण्यासाठी मागे वळवलेली मान. त्याने साधलेली संधी आणि तिच्या ओठांवर टेकलेले ओठ. "चोचीमध्ये चोच घालूनी" उष्टं झालेलं चुंबन. बेधुंद मनं मिठीत विसावलेली...शरीरं एकमेकांत सामावलेली. त्याचा हळूवारपणा. त्याच्या सादाला तिचा प्रतिसाद. फक्त आणि फक्त तिचाच तो....


गॅसवर ठेवलेल्या पातेल्यातलं दूध करपून पातेलं तडतडल्याचा आवाज आणि भंगलेली तंद्री. तिच्यामागे तो ही किचनमध्ये. सफेद दूध काळं झालेलं आणि पातेल्याची झालेली दुर्दशा. दोघेही साक्षीदार त्यांच्या प्रेमाचे. "पातेलं जपायला हवं. मी साधू झालेलो नाहीय अजून त्याची आठवण म्हणून"  असं विलासने म्हणताच दोघेही हसले.  


सजलेला डायनिंग टेबल , केसांत आलेला गजरा ,  मेणबत्त्यांचा मंद उजेड,  instrumental music ची धून, एकाच ताटात जेवणारे दोन वेडे जीव. त्यानंतर चंद्रप्रकाशात रंगलेल्या अखंड गप्पा. घड्याळात पडलेले दोनचे ठोके आणि पावलांना  बेडरुमचं आकर्षण. सजलेला बेड, फवारलेलं अत्तर, पुन्हा म्युझिकची हलकी धून, बहराच्या वाटेवरचं विरहानंतरचं प्रेम. त्याचा सर्वांगावरून फिरणारा हात आणि तिचे मोहरून येणारे क्षण. डोळ्यांतील प्रेम ओठांनी टिपणारा तिने जगवलेला तिचा तो जिवलगा. तिला हवाहवासा. हळूवार व्यक्त होणारं त्यांचं एकमेकांवरच प्रेम. तेवढ्यात गाण्याची बदलेली धून " रात बाकी बात बाकी होना हैं जो हो जाने दो...."


बाब्बो....🙆‍♀️🙆‍♀️ तुम्ही कुठं चाललात..?? दोन वाजलेत झोपायचं नाही का तुम्हांला..??  झालं की आता. सगळं मीच सांगत बसू होय..???जावा तिकडं. तुम्हांला माहिती आहे. पुढे काय ते. तेव्हा तुम्ही शेवट करा तुमच्या पध्दतीने तुम्हांला आवडेल तसा.  😉😉

©Velvet Kavisha


वाचकहो, या addiction बद्दल एक वाक्य ऐकू आलं आणि कथा सुचली. रोमान्स लिहून हा गंभीर मुद्दा मांडायचा प्रयत्न केलाय. काही तरी कुठेतरी चुकलेलंही असू शकतं. सांभाळून घ्या.

Post a Comment

0 Comments