हौस कांदे खाते....!!
खरतरं माझा वाढदिवस सोडून मी फेसबुकवर तसं काही आणत नाही शक्यतो. ना स्वयंपाक, ना मुलींचे कारनामे, ना पिकनिकचे फोटो. काही म्हणजे काहीच नाही. मैत्रिणींचे फोटो पाहिले की खुप वाटायचं आपण ही असे सुंदर सुंदर फोटो पोस्टावेत. मस्त काही काही कॅप्शन द्यावं. मोठ्या महत्प्रयासाने मी हा मोह आवरलेला आहे.
त्यामुळे माझी चमकूगिरी करायची माझी "हौस" पुर्ण होत नव्हती. ते म्हणतात ना, "अगर दिल से कुछ चाहों तो कायनाथ पुरी भाजी खा सकती है " तसंच काहीसं. Whatsapp ने स्टेटस आणून ती हौस पुर्ण करण्यास मदतच केली....
मी पहिल्यापासून हौशी. माझी आई म्हणायची. "तुझी हौस कांदे खाते." खरचं हो. अगदी दिडशे रुपये किलो झाले तरी कांदे खातेचं. कधीकधी त्या हौसेपुढे कोणाचं काही चालत नाही. अगदी माझं ही. मग कांदे नाकाला लावायची वेळ येते. 🤭🤭
झालं काय की, मस्त दोघांच्या फोटोंचा विडिओ बनवलेला. इफेक्टस वगैरे दिले. जोडली एकदम रोमँटिक छान गाणी जोडीला आणि विडिओ गेला whatsapp status ला... निमित्त होतं marriage anniversary चे.... !!!
माझा स्टेटस् पाहून सगळ्यांनी खुप छान शुभेच्छा "वगैरे वगैरे" दिल्या.
एक भाऊ नावाचा मित्र म्हणाला, "ताई, तुझा विडिओ पाहिला. जूने रोमँटिक दिवस आठवले. जेव्हा मी प्रेमात होतो. कॉलेजमध्ये असतानाच तिच्याशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. सात जन्मांसाठी दोघांनी एकमेकांना फिक्स करून टाकलं. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होतं. त्यांच्या विरोधात काहीतरी कारस्थान रचलं गेलं. तिच्या घरच्यांनी तिचं लग्न करून दिलं. आणि याच्या घरच्यांनी याचं. दोघांनीही कर्तव्य म्हणून लग्न केलेलं. संसार रेटत असताना तेरा वर्षांनी दोघं एकमेकांसमोर आले. खुप चुकीचे निरोप दिले गेले होते, खुप गैरसमज पसरवले गेले होते. मागचं सगळं बोलून झाल्यावर दोघेही स्वस्थ झाले. आता मित्र म्हणून जगतात दोघे. कोणत्याही तक्रारीशिववाय..."
त्याने स्वतःच मन मोकळं केलं आणि म्हणाला, "भावोजी आणि तू छान रहा. तुमच्याकडे पाहिलं की वाटतं, तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलेत. जपा एकमेकांना. माझ्या शुभेच्छा तुम्हाला. सगळ्यांना मनासारखं प्रेम मिळत नाही. तुला मिळालंय तर जपायला हवंस" त्याच्या मेसेजेसमधून खुप आपुलकी जाणवली. भारी वाटलं.
दुपारनंतर एका मैत्रिणीचा फोन.
"कसला भारी विडिओ बनलाय गं. भावोजींनीच बनवला असणार. किती कौतुक आहे गं त्यांना तुझं. किती जपतात तुला ते.. किती प्रेम आहे तुझ्यावर त्यांच. माझ्या शुभेच्छा गं तुम्हां दोघांना.." तिने एकदम हरखून जात शुभेच्छा दिल्या.
च्यायला..... हिला बरं सगळं विडिओवरून कळलं. इथे तेरा वर्षे झाली. फुटपट्टी घेऊन बसलेय. पार अगदी लांबी, रुंदी, खोली मोजण्याचा प्रयत्न केला तरी किती प्रेम आहे ते अजून काही कळलेलं नाही. पण जाऊ दे म्हणत "थँक्स" म्हटलं. कारण आपल्यापेक्षा बाहेरच्यांना आपल्या घरातलं जास्त कळतं..😜😜
इकडचं तिकडंच बोलून फोन ठेवणार होते. तर म्हणाली, "खरं सांगू का..?? तुमच्या दोघांचं प्रेम पाहून डोळे भरून आले माझे. असेच रहा कायम. पैसा काय चाटायचा आहे का गं. तुमच्या गरीबीतही सुख आहे. आणि माझ्याकडे पैशाला सुख समजणारी माणसं आहेत. गाडी आहे, दागिने आहेत, करोड रुपयांचं घर आहे. पण ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मोकळं व्हावं तो नवरा नेहमीच सासूच्या पदराला बांधलेला. नशिबात नाही गं असं प्रेम. त्याला काही सांगायला जावं तर 'वसकन' खेकसतो अंगावर. प्रेम असं नाहीच मुळी. शरीराचा ही व्यवहारच म्हणायचा..!!" कदाचित ती खुप रडत होती. बरेचसे हुंदके अस्पष्ट ऐकू आले.
प्रसंग काय. चाललंय काय.... माझा टॉपचा मजला भिरभिरलेला. आता गं बया...काय करावं 🙆🙆 हे रडीब्रेशन थांबवायचं कसं..?? माझी तर अगदीच कोंडी ना रावं. "बरं गं. शांत हो. नंतर बोलूया." म्हणत फोन दिला ठेवून.
हुश्श..!!! बाकीच्या शुभेच्छा मस्तच. नेहाला मेसेज करून शुभेच्छा मागणारच होते तोवर तिचाच शुभेच्छांचा मेसेज आला. बाकी मैत्रिणींनी ही मेसेजेस मधून शुभेच्छा दिल्या. "आशिर्वाद द्या गं" म्हणत आशिर्वाद ही घेतले काहींचे. मोठ्या आहेत ना त्या माझ्यापेक्षा म्हणून.....पण मोठं म्हटलं की राग येतो ना त्यांना...🙊🙊
खरंतर लग्न हा माझ्या आयुष्यातला खुप आनंददायी सोहळा. मी दिवसभर त्या आठवणीत जगते. Whatsapp, Fb पासून दूर राहते. मोबाईल airplane मोडवर सेट असतो. रश्मीची चारोळीसहीत सुंदर पोस्ट पडली आणि मी नियम बाजूला ठेवून मोबाईल ऑन केला.
एका मैत्रिणीने विचारले की फेसबुकवर का नाही पोस्ट टाकलीस.... तर तुम्हांला सांगते, आठ वर्षापुर्वी मी फेसबुकवर नवऱ्याला marriage anniversary च्या शुभेच्छा दिल्या. एफबीवरची एक भेटली chat box मध्ये. तेव्हा चॅटबॉक्स तिथेच ओपन व्हायचा. वेगळा मेसेंजर नव्हता. तशी ओळख होती पण अगदीच जेमतेम. तिने शुभेच्छा वगैरे दिल्या. आणि बोलणं पुढे सुरू ...
"अग, साखरपुडा कधी झालेला तुझा... आणि जूनच्या शेवटाकडे लग्न केलंत. पाऊस नव्हता का लग्नात ???" तिने विचारले.
"होता की. पण तीच तारीख निघाली. नंतर नोव्हेंबरची निघत होती तारीख. खरतरं घाई पण झाली गं फार. साखरपुड्यानंतर एका महिन्यात लग्न झालं." मी दिलं उत्साहात सांगून...
"मग नोव्हेंबरमध्ये करायचं ना निवांत लग्न.. इतक्या घाईत करण्यापेक्षा. की काही "गडबड" केली होतीस?? हा हा हा...." ती.
बाब्बो.... डायरेक्ट कॅरेक्टर वर आली बयो. ती पण माझ्या. अरे...देणंघेणं काही नाही. उगाच एखाद्यावर स्टँप मारून द्यायचा?? तीस पस्तीस स्थळ धांडोळून झाल्यावर माझं लग्न झालेलं.
माझी आई याबाबतीत फार स्ट्रीक्ट. ती स्पष्ट बोलायची. तिला लग्न जमवून सहा महिने ठेवणं मान्य नसायचं. म्हणजे लग्न पक्कं ठरत आलं की, "तुम्ही जर साखरपुडा आता करणार असाल तर लग्न महिना-दीड महिन्यात करा. जर लग्न उशिरा करणार असाल तर साखरपुडा पण तेव्हाच करा. माझ्या मुलीला उगाच अडकवून ठेवू नका. सहा महिन्यात तुमचा मुलगा बदलला तर माझ्या पोरीला "लग्न मोडल्याचा" बिल्ला लागेल." असं फायनल बोलणी करतानाच सांगायची. त्यामुळे साहजिकच मे च्या पहिल्या आठवड्यात जमलेलं लग्न जूनच्या तिसऱ्या आठवड्यात झालंच. यात "गडबडीचा" काही प्रश्नच येत नाही ना....
तिला जमलं तसं सुनावलं. आणि तेव्हाच ठरवून टाकलं की... यापुढे फेसबुकवर सगळे सेलिब्रेशनस् बंद... फक्त आपला वाढदिवस तेवढा सेलिब्रेट करायचा.
बाब्बो.... तुम्ही पण बघा ना काय लोकं असतात रावं. आगाऊपणा माझ्या वागण्याबोलण्यात आहे. मनाला बुध्दीला आगाऊपणाची सवय आहे पण शरीराला नाही... कोण सांगणार यांना... 🙆🙆
रश्मी... थोड्या दिवसांपूर्वीची फेसबुकवरची ओळख. तिने खुप प्रेमाने पोस्ट टाकली. मस्त वाटलं. तरीही स्वतःहून पोस्ट टाकावीशी वाटलीच नाही.
संध्याकाळी "केक" कापून सेलिब्रेशन झालं. मस्त मेनू होता. पण केक पोटात गेल्यावर काही तरी "केमिकल लोच्या" झाला. तासाभराने दणादण उलट्या झाल्या. सगळाच मेनू फिस्कटला. शेवटचा सोडून बाकीचे किस्से सासुबाईंना माहिती. सगळ्यांचे स्टेटस् त्यांना माहिती. त्यामुळे "आता असे विडिओ वगैरे ठेवत नका जाऊ रे... नजर लागते.." असं धास्तावून म्हणाल्या. त्यांचा काळजी युक्त स्वर कळला... आता यापुढे अजिबात असे विडिओ आणि फोटो टाकायचे नाहीत. स्टेट्सला नाही की स्टोरीत नाही. एकदम शहाण्या सारखं वागायचं...
पण तरीही... प्रत्येक वेळी मी खुप संकल्प करते. पण सगळे अल्पायुषीच असतात. तसंच हे ही झालं तर काय करायचं....🙆🏻♀️🙆🏻♀️🙆🏻♀️
कारण आई म्हणायची त्याप्रमाणे "माझ्या हौसेला कांदे खायची सवय आहे ना बाब्बो...!!!" 😂😂😂😂
इति कथा संपुर्णम्.....
© Velvet Kavisha
(नावासहितच शेअर करा. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box