#थांब_बाबांना_जाऊन_नाव_सांगते_तुझे ..!
©️जया पाटील
प्रसंग एक ------
अंगणात छोटा प्रितेश , ध्रुव आणि त्यांचे इतर लहान मित्र खेळत होते. बॅटबॉलचा खेळ चांगलाच रंगात आला होता. ध्रुवकडे बॅटिंगचा टर्न होता. ध्रुव देखील चांगलाच फॉर्म मध्ये आला होता. प्रितेशने ध्रुवला आऊट करणासाठी आपल्या बॉलिंग वर जोर लावला. झाले मात्र उलटेच ... ध्रुवने प्रितेशच्या बॉलवर जोरदार षटकार मारला. बॉल नेमका पोहोचला ते शेजारच्या माने काकांच्या वॉल कंपाऊंड मध्ये ...
माने काका एका नंबरचे खडूस ...!
सगळी चिल्लर कंपनी बॉल मागण्यासाठी माने काकांच्या घरी पोहोचली पण रागावलेल्या माने काकांनी मुलांना बॉल मात्र दिला नाही.
आता काही आपला बॉल मिळणार नाही त्यामुळेच चिडलेला प्रितेश लागला ध्रुव सोबत भांडायला....
" ध्रुव , तू सिक्सर नसता मारला तर माझा बॉल माने काकांच्या कंपाउंड मध्ये गेलाच नसता..."
"तुला पण काय ओव्हर शायनींग मारायची हाऊस आली होती रे .... ! "
"मुद्दामहून केलास तू हे ...!"
माझा इतका महागडा बॉल होता. आता माझे झालेले नुकसान कोण भरून काढणार ..?
" मला काहीच माहिती नाही. एकतर माझा बॉल माने काकांकडून तूच परत आण. किंवा तसाच बॉल मला नवीन विकत घेऊन दे. "
" मला माझी नुकसानभरपाई हवी आहे. बाकीचे मला काहीच माहिती नाही. "
" काहीही बोलू नकोस प्रितेश ...सिक्सर मारणे काही जोक नाहीय ..! "
" तू मुद्दामहून मला फसविण्यासाठी वेगळी बॉलिंग टाकतो. पण फुलटॉस नसला तरी तुझ्या बॉलवर सिक्सर फक्त मीच मारू शकतो म्हणूनच जळतो तू माझ्यावर ... ! "
" बॉलिंग तर तू करत होतास ना ...प्रितेश ..मग मी तुझ्या बॉलची नुकसानभरपाई का करू ...? "
" तूच जाऊन परत आण ना ....माने काकांकडून बॉल मागुन ...! "
" घाबरतो कि काय माने काकांना ...? "
ध्रुव देखील प्रितेश सोबत वाद घालत होता. दोघांमधील वाद थांबायचा नाव घेत नव्हता. गोष्ट मारामारी करण्यापर्यंत पोहोचली.
त्यांच्यासोबतची सगळी मुले ध्रुव आणि प्रितेशच्या आईला बोलावून घेऊन आली. दोघांच्याही आयांनी ध्रुव आणि प्रितेश मधला वाद मिटविण्याचा खूप प्रयत्न करत केला. दोघंही मुलं मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. रागावून , मारून झाले पण दोघंही मुले मागे हटायला तयार झाली नाही.
शेवटी ध्रुवची आई म्हणाली ....
" थांब ... येऊ दे आज तुझ्या बाबांना आज घरी ..! "
" तुझ्या सगळ्या करामती सांगते त्यांना ...! "
" त्यांच्या रागापासून आज पर्यंत तुला वाचवत होती मी ..आज मात्र नाही वाचवणार ...! "
आतापर्यंत वाद घालणारा ध्रुव एकदम शांत झाला.
प्रितेशच्या आईने देखील त्याला बाबांना नाव सांगण्याची धमकी दिली आणि प्रितेश देखील शांत झाला.
बाबा नावाचे हत्यार दोघीही आयांनी म्यानातून बाहेर काढले. मात्र हत्यार चालविण्यापूर्वीच शत्रूने माघार घेतली. प्रितेश आणि ध्रुवचा वाद तेवढ्यावरच थांबला.
प्रसंग दोन -------
शाळेच्या परीक्षा संपल्या आणि सगळ्या पालकांना परीक्षेचा निकाल घेण्यासाठी शाळेत बोलवण्यात आले.
छोट्या वेदच्या पालकांना तर टीचरने खास स्वतः फोन करून बोलावून घेतले. त्याला कारणही तसेच होते.
वेद वर्गातील सगळ्यात खोडकर विद्यार्थी होता. टीचरची नजर दुसरीकडे वळली कि त्याच्या खोड्या सुरु होत असत.
कितीदा तर वर्गातील मुलांसोबत त्याचा वाद मारामारी पर्यंत पोहोचला होता आणि ती मुले जखमी होता होता थोडक्यात वाचली होती. टीचर वेदला शिक्षा देऊन कंटाळली होती. शेवटी वेदच्या पालकांना शाळेत बोलावण्याचे शालेय प्रशासनाने ठरवले होते.
काही कारणास्तव वेदचे वडील शाळेत जाऊ शकले नाही मात्र शाळेच्या मीटिंगला त्याची आई उपस्थित होती. वेदच्या आईला वेदच्या टिचरने त्याच्या सगळ्या खोड्या सांगितल्या.
" आमच्या पद्धतीने आम्ही खूप प्रयत्न केले परंतु मुलांना खूप जास्त रागावले तरी आजकालचे पालक शाळेतील शिक्षकांवरच आरोप करतात त्यामुळे वेद बाबतीत सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहिती असाव्या म्हणूनच तुम्हाला आज शाळेत बोलावले आहे. वेदच्या खोड्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत त्यामुळे वेद कडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. "
वेदची टीचर वेदच्या आईला सांगत होती.
वेदच्या आईने देखील त्याला खूप रागावले. त्यावर स्वतःची चुकी कबूल करण्याऐवजी वेद आईसमोर आणि टीचर समोर जोरजोरात रडू लागला. खूप समजावले तरी त्याचे रडणे मात्र थांबत नव्हते. शेवटी त्याच्या आईने त्याला सांगितले ...
" थांब , घरी जाऊन बाबांनाच नाव सांगते तुझे... त्याशिवाय तू सरळ होणार नाहीस ...! "
रडणाऱ्या वेदचे रडणे लगेच थांबले आणि तो अगदी शिस्तीत त्याच्या आईसोबत घरी गेला.
प्रसंग तीन ------
"मम्मा , प्लीज ट्राय टू अडरस्टॅंड ... !"
" माझ्या सगळ्याच मैत्रिणी पबलाच बर्थडे पार्टीज करतात. "
" पबला कपल कम्पल्सरी असल्यामुळे प्रत्येक पार्टीला बॉईज पण सोबत असतात..."
" माझा पण बर्थडे येतोय ... प्लीज ..मला पण माझा बर्थडे यावेळेस पबला सेलेब्रेट करायचा आहे.... ! "
" प्लीज ..मला परमिशन दे ना ...यावेळेस माझ्या फ्रेंड्स सोबत बर्थडे सेलेब्रेट करण्याची ...! "
नुकतीच कॉलेज लाईफ मध्ये पाऊल ठेवलेली रुही तिच्या आईचे मन वळविण्याचा प्रयत्न करत होती.
" हे पहा रुही , पब ..पार्टीज या सारख्या फालतू गोष्टींवर वायफळ पैसे वाया घालणे मला आवडत नाही ..."
" मुळात पब ,हॉटेल अश्या गोष्टी आपल्या सारख्या सामान्य माणसासाठी नसतातच मुळी...."
" ह्या सगळ्या गोष्टी माझ्या एथिक्स मधे नाही बसत...!"
" ए काय गं मम्मा, अशी करतेस...इतके कसे जुनाट विचार आहेत गं ...तुझे..."
" माझे सगळे फ्रेंड्स मला नावे ठेवतील गं .....किती ओल्ड फॅशन आहेस तू ..आणि तुझे मम्मी - पप्पा ..असे म्हणतील ना ते ...! "
रुही तिच्या मम्माला शर्वरीला समजावण्याचा प्रयत्न करत होती पण शर्वरी मात्र रुहीचे काहीच ऐकून घ्यायला तयार होत नव्हती. माय लेकींमधला वाद बराच वेळ सुरु होता.
" ठिक आहे रुही , तू माझे ऐकत नाहीस ना ...तू बाबांना जाऊन विचार ...त्यांनी तुला पार्टीसाठी हो म्हटले तर मी देखील हो म्हणणार ..."
शर्वरीच्या या एकच वाक्यावर वाद संपला आणि काहीही न बोलताच रुही तिच्या रूम मध्ये निघून गेली.
वरील तिन्ही प्रसंग आपण पहिले त्यात बाबा नावाचा उल्लेख झाल्यानंतर मुले लगेच सगळ्या गोष्टी ऐकायला तयार होत होती. संपूर्ण भारतातील सत्तर टक्के घरातील आयांच्या तोंडातील हा अगदीच फिक्स डायलॉग आहे.. "
" थांब ..माझे ऐकत नाहीस ना ...बाबा आले कि तुझे नाव त्यांनाच सांगते.
लहानपणीपासूनच आपणच " बाबा " नावाच्या व्यक्तीचा प्रभाव मुलांवर बिंबवत असतो. कधी तो प्रभाव चांगला प्रभाव टाकतो तर कधी वाईट ....
त्यात आईचे महत्व मात्र कुठेतरी कमी होते आहे. जेव्हा एखादी आईच मुलांना कुठलीही गोष्ट ऐकून घेण्यासाठी बाबांचा धाक दाखवते त्याच वेळेस तिचे स्वतःचे महत्व कुठेतरी कमी होत असते.
आईवडील हे दोघेही मुलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे व्यक्ती आहेत. आई नऊ महिने पोटात वाढवून जन्म देते हे जरी खरे असले तरी वडील आयुष्यभर मुलांना जोपासण्याची , त्यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी पार पाडतात
त्यामुळे आई आणि बाबा दोघांचेही महत्व मुलांच्या आयुष्यात सारखेच आहे.
मात्र काही प्रसंगात आई कठोर निर्णय न देता बाबाला नाव सांगून मोकळी होते. नकळत मुलांच्या मनात आई आणि बाबा दोघांचेही महत्व सारखे नाही अशी भावना तयार होते. अथवा आई तयार आहे पण बाबा ऐकतील कि नाही अशी शंका जेव्हा मुलांच्या मनात तयार होते. त्यावेळेस नकळत मुलांसाठी बाबा " व्हिलन " बनून जातो.
मुलांच्या मनात आईबाबांविषयी तयार होणारी ही विषमता पुढे जाऊन आईवडील आणि मुले दोघांच्यात खूप मोठीच दरी निर्माण करून जाते.
आई मला सगळ्या गोष्टीत समजुन घेते आणि बाबा मात्र नाही अशी भावना देखील काही मुलांच्या मनात तयार होते. पूर्वीच्या काळापासून बाप नावाच्या व्यक्तीरेखेला नेहमीच कठोर दाखवण्यात आले आहे. माझ्या मते , मात्र आई-वडील दोघांचेही प्रेम आणि धाक दोघांतही समानता असावी. मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय घेताना मुलांना आईबाबांच्या अधिकारांची समानता समजायला हवी इतकेच माझे वयक्तिक मत आहे. ज्या भावना आपण लहानपणापासून मुलांवर बिंबवतो त्या आयुष्यभर त्यांच्या मनात घर करून राहतात. त्यामुळेच आईबाबा दोघांचेही प्रेम आणि धाक मुलांवर सारखेच असावे असे मला वाटते.
वरील लेखातील विचार हे माझे वयक्तिक मत असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नाही. आई आणि वडील दोघेही एकसमान आहेत ही शिकवण लहानपणापासूनच मुलांना मिळावी इतकाच संदेश मी या लेखातून देऊ इच्छिते.
धन्यवाद !
लेख आवडल्यास लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box