वहिनी माझी नवसाची

 #वहिनी_माझी_नवसाची 


 ©️जया पाटील 





" इतकी सोन्यासारखी लेक माझी ...आणि तिला सासरी इतका त्रास ...! "


" आमच्या इथे मात्र लव्हमॅरेज करून सुद्धा इतका तोरा सूनबाईंचा ... लग्नात मानपान सुद्धा केला नाही आमचा ..तरीही आमच्याकडे मात्र कौतुक सुरु असतेच तिचे ... " 


" खरंच लायकीपेक्षा जास्तच नशीब काढून येता काही लोक .... ! "


ऋचाच्या सासूबाईंचे अर्थातच उमाताईंचे  नेहमीप्रमाणे तिला टोमणे मारणे सुरू होते. ऋचाचा नवरा विशाल आणि सासरेबुवा सुनीलराव त्यांना नेहमीप्रमाणे शांत करण्याचा प्रयत्न करत होते . ऋचाने मात्र तिकडे लक्ष दिले नाही. असंही ती कधीच लक्ष देत नसे सासूबाईंच्या अश्या वागण्याकडे ... कारण तिला माहिती होते ...


ऋचाची नणंद मेघा तिला सासरी खूप त्रास देत असत. मेघाला दोन गोड मुली , पण मुलगा झाला नाही म्हणून तिच्या सासूचे तिला टोमणे मारणे सुरूच असायचे. मेघाचे आईवडील मानपान करण्यात देखील कुठेच कमी पडत नव्हते तरीदेखील तिच्यावर सासूबाईचे समाधान होत नव्हते. घरातील , तिच्या मुलींबाबतीत देखील कुठलाच निर्णय घेण्याचा अधिकार मेघाला नव्हता. मेघाचा नवरा आदित्य त्याचे देखील त्याच्या आईसमोर काहीच चालत नसे. मेघा मात्र अतिशय शांत , सालस स्वभावाची ... ती सगळा त्रास सहन करत असे. दोन दिवस माहेरी येऊन राहण्याची देखील तिला परवानगी नव्हती. मेघाच्या आईबाबांना देखील तिच्या घरी जाण्यायेण्याची परवानगी नव्हती आणि गेल्यावर देखील अपमान होत असल्यामुळे उमाताई आणि सुनीलरावांनी मेघाच्या घरी जाणे येणे पूर्णपणे बंद केले होते.


एकुलत्या एका लेकीला होणारा त्रास पाहून उमाताई व्यथित होत असत. त्याउलट त्यांची सून ऋचा ... , विशाल आणि सुनीलराव तिला घरातील प्रत्येक निर्णयात तिला सहभागी करून घेत. सुनीलराव तर तिला अगदीच मेघाप्रमाणेच मुलीसारखा जीव लावत असत. उमाताई स्वभावाने वाईट होत्या असे नाही परंतु त्या मेघा आणि ऋचा दोघींची सतत तुलना करत असत. मेघाच्या सासरी इतके कडक वातावरण आणि इकडे मात्र ऋचाला किती मोकळीक , त्यामुळेच त्या ऋचाला देखील तशीच वागणूक देण्याचा प्रयत्न करत. आई टेन्शन मध्ये असतात म्हणूनच ऋचा देखील उमाताईंच्या वागण्याकडे लक्ष देत नसे. ती त्यांना सतत समजुन घेण्याचा प्रयत्न करत असे.  


ऋचावरून सुनीलराव आणि उमाताईंमध्ये नेहमीच वाद होत असत. उमाताईंचे म्हणणे होते कि मेघा सारखेच ऋचाला देखील कडक वातावरणात ठेवायला हवे. त्यातल्या त्यात ऋचा आणि विशालचा प्रेमविवाह  , त्यामुळेच ऋचा त्यांच्या पसंतीने घरात सून म्हणून आली नसल्यामुळे त्यांचा जास्तच राग होता ऋचावर ...


सुनीलराव उमाताईंना नेहमीच समजावत असत ...


" अगं उमा , मान्य आहे आपल्या मेघाला सासरी खूप त्रास आहे , पण त्याचा अर्थ असा होत नाही  कि आपण देखील तसेच वागायला हवे.! "


" आपण सुशिक्षित आहोत , समजदार आहोत ... दुसऱ्या कुणाच्या चुकीची शिक्षा आपल्या सूनेला द्यायची याला काहीही अर्थ नाही... ! "


" ऋचा देखील खूप समजदार मुलगी आहे. तु कितीवेळा तिला काहीबाही बोलते तरी देखील एका शब्दाने तिने तुला उत्तर दिलेले नाही . 


तिने तुझ्यासोबत भांडण देखील केले तरी कोण काय बिघडवू शकते तिचे ..? "


" तिने मात्र मोठ्या व्यक्तीचा अपमान करण्याची मर्यादा आजवर तोडली नाही ..यातच आपण जिंकलो ..! "


" पुरे झालं तुमचं ..सून बाईचे कौतुक पुराण " उमाताई बोलल्या.


" हे बघ उमा , ऋचाची काही एक चुकी नसताना तिचा दुस्वास केलेला मला चालणार नाही. तिची काही एक चुकी नसताना मी तिला शिक्षा देणार नाही आणि तुलाही तसे वागू देणार नाही .. ! "


सुनीलराव उमाताईंना खडसावून निघून गेले.


सुनीलराव आणि उमाताईंचे सगळे बोलणे दाराच्या आडून ऋचाने ऐकले आणि सुनीलरावांविषयी तिचा मनात आदर आणखीनच वाढीस लागला. तसे पाहायला गेल्या तर उमाताईं स्वभावाने वाईट नव्हत्या पण त्या मेघाच्या बाबतीत खूप जास्तच हळव्या होत्या. खरंतर प्रत्येकच आई आपल्या मुलांबाबतीत खूप हळवी असते. सुनीलरावांना देखील त्यांच्या लेकीची मेघाची खूप काळजी वाटत असे. मनातून ते खूप खचले होते परंतु बाहेर मात्र खूप खंबीर असल्यासारखे वागत सुनीलराव ... , हे सगळे काही ऋचा देखील जाणून होती. 


आपल्याला स्वतःच्या लेकीप्रमाणे वागवणाऱ्या सुनीलरावांचे टेन्शन दुर करण्यासाठी , मेघाताईचा त्रास कमी करण्यासाठी काही तरी करायलाच हवे असे ऋचाने ठरवले.  


एक दिवस ऋचा आणि विशाल सहजच मेघाताईच्या घरी गेले. नेहमीप्रमाणेच मेघाच्या माहेरच्यांचे तिच्या सासरी स्वागत झाले ते टोमण्यांनीच ...मेघाला खूप वाईट वाटले.


तिने ऋचाची माफी मागितली पण ऋचाने मात्र तिला समजुन घेतले. 


ऋचा घरी जाण्यासाठी निघाली त्यावेळेस मेघाच्या सासूबाईंचा नमस्कार करण्यासाठी म्हणून त्यांच्या रूम मध्ये गेली. दाराआडून तिने ऐकले तर मेघाची नणंद आदितीचा फोन सुरु होता. आदितीचे नवीनच लग्नाला झाले होते. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे करायची , जावईबुवांना ताब्यात ठेवायला शिक वगैरे .. , शिकवण त्या आदितीला देत होत्या. ऋचाला पाहून त्यांनी घाईगडबडीत फोन ठेवून दिला. मेघाताईला निरोप देऊन ऋचा आणि विशाल तिथून निघाले.


घरी परत येतांना ऋचाच्या डोक्यात मेघाच्या सासूबाईंचाच विचार सुरु होता. किती चिप बुद्धीची बाई आहे म्हणून ऋचाला तिच्या बुद्दीची किव आली. 


" स्वतःच्या सुनेचा संसार खराब केलाच आहे ..पण स्वतःच्या मुलीचे देखील घर तोडेल ही बाई एक दिवस  ...ऋचा ..तुला आता काहीतरी करायलाच हवे .... " 


ऋचा मनोमन स्वतःसोबतच बोलत होती आणि  अचानक तिच्या डोक्यात एक प्लॅन आला.


ऋचाने मेघाच्या नणंदेच्या नवऱ्याला म्हणजेच  आदितीच्या नवऱ्याला सचिनला संपर्क करायचे ठरवले. मेघाकडून बोलण्या बोलण्यातून त्याचा फोनवर नंबर ऋचाने मिळविला. सचिनला फोन करून ऋचाने त्याला भेटण्याची विनंती केली फक्त ही गोष्ट आदितीला समजु नये ह्याची तिने खबरदारी घेतली आणि सचिनला देखील याबद्दल समजुन सांगितले. ऋचाने सचिनला भेटून मागच्या सगळ्या घटना सांगितल्या. मेघाला होणारा त्रास देखील सांगितला. आदितीसोबत तिच्या आईचे फोनवरचे बोलणे देखील सांगीतले. जो त्रास मेघाताई सहन करते आहेस , तसेच वाद तुमच्या घरात देखील होऊ शकतील त्यामुळे हे सगळे थांबण्यासाठी मला तुमची आणि तुमच्या आईबाबांच्या मदतीची आवश्यकता आहे अशी हात जोडून ऋचाने सचिनला विनंती केली.  


भविष्यातील परिणामांच्या चिंतेने सचिन व्यथित झाला. त्याने आईवडिलांसोबत बोलून ऋचाला कळविण्याचे ठरवले. सचिनने खूप विचार केला आणि त्याच्या आईबाबांसोबत देखील तो या विषयावर बोलला. सचिनचे आईबाबा खूप समजदार होते त्यामुळे मेघाच्या सुखासाठी त्यांनी ऋचाला मदत करण्याचे आश्वासन दिले.


दुसऱ्या दिवसापासूनच आपण ठरलेल्या प्लॅन प्रमाणे वागायला सुरुवात करूया असे ऋचाने सचिन आणि त्याच्या आईबाबांना सांगितले. त्यांनी देखील तसे वागणे सुरु केले.


ठरल्याप्रमाणे सचिनच्या आईने आदितीला किचन मध्ये मदत करणे बंद केले. घरातील सगळ्या कामाच्या मदतनीस बंद केल्या त्यामुळे आदिती वर कामाचा खूप लोड आला. सतत आईसोबत फोनवर बोलणे चालणार नाही असे सचिनच्या आईने आदितीला निक्षून सांगितले. आदितीला तिच्या सासूबाईंच्या अश्या वागण्याचा खूप त्रास होऊ लागला. घरातील कुठलाही निर्णय घेतांना सचिन आणि त्याचे आईबाबा आदितीला सहभागी करून घेत नव्हते. आदितीला या सगळ्या गोष्टींचा खूपच राग आला आणि तिने सचिन आणि त्याच्या आईबाबांसोबत जोरदार भांडण केले. आईबाबांना उलट उत्तर दिल्याने सचिनने चिडून आदितीला माहेरी निघून जाण्यास सांगितले.


आदिती रडतच माहेरी आली. घडलेला सगळा प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. अदितीची आई सचिन आणि त्याच्या आईबाबांवर खूप चिडली. त्यांना जाब विचारण्यासाठी आदितीच्या बाबांना घेऊन आदितीच्या घरी गेली. गेल्यावर  आदितीची आई सचिन आणि त्याच्या आईबाबांना बोलू लागली ...


" माझ्या सोन्यासारख्या लेकीला मोलकरीण बनवून ठेवण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला ..? " 


" कायदेशीर कारवाई करून मी तुम्हाला जेल मध्ये डांबू शकते हे लक्षात घ्या.. "  


आदितीच्या आईचा म्हणजेच मेघाच्या सासूबाईंचा  तोंडाचा पत्ता चालूच होता , तितक्यात टाळ्या वाजवत ऋचा दुसऱ्या खोलीच्या बाहेर पडली.  तिच्या मागोमाग विशाल , सुनीलराव आणि उमाताई पण बाहेर पडले. मेघा आणि आदित्य दोघेही त्याचवेळेस आदितीच्या सासरी पोहोचले.


इतक्या सगळ्या माणसांना पाहून आदितीची आई   गोंधळली.  


ऋचा टाळ्या वाजवत मेघाच्या सासूबाईंना उद्देशून बोलू लागली ....


" स्वतःच्या लेकीला झालेला त्रास तुम्ही काही दिवस सहन करू शकल्या नाही आणि लगेच कायदा शिकवायला आल्या ...पण तुम्ही मात्र वर्षानुवर्षे हे करत आहे त्याचे काय ....? "


" मेघाताईंना तुम्ही किती वर्ष त्रास देत आहात .. तुमच्याच मनाला विचारा ...? स्वतःच्या लेकीला त्रास झाला पण तुमच्या अश्या वागण्याने मेघाताईंना किती वेदना झाल्या असतील याची कल्पना तरी केली आहे का तुम्ही... ? "


" मेघाताईंच्या आईबाबांना तुमच्या वागण्यामुळे किती त्रास झाला असेल , त्यांची मनस्थिती कशी असेल याची कल्पना तरी केली आहे का तुम्ही ...? तरी देखील एका शब्दाने जाब विचारला नाही तुम्हाला आईबाबांनी ..

मेघाताई देखील सगळे सहन करत आल्या. आदितीची सहनशक्ती मात्र लगेच संपुष्टात आली आणि ती तक्रार घेऊन तुमच्याकडे आली ..." 


" 'स्वतःच ते बाळ आणि दुसऱ्याचे ते कार्टे' असे समजुन वागल्या तुम्ही नेहमीच ... मेघाताईला मुलगी समजुन त्यांच्या त्रासाची कल्पना करा कधीतरी ...."  


" मेघाताई हे सगळे का सहन करत आल्या सांगू का ....काकू ...? कारण त्यांना त्यांच्या सासरची अब्रू वेशीवर टांगायची नव्हती. तुम्ही इतका त्रास देऊन देखील मेघाताईनी फक्त तुमचा विचार केला .." 


ऋचाचे बोलणे ऐकून मेघाच्या सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी मेघाला जवळ बोलावले. तिच्या डोक्यावर हात ठेवून त्या बोलू लागल्या ...


" मला माफ कर , मेघा ..मी तुझी गुन्हेगार आहे. तुझ्या दुःखाची जाणीव मला कधी झालीच नाही ..पण आज आदितीला त्रास झाला आणि मला माझ्या चुकांची जाणीव झाली. मला माफ कर ..." 


ऋचाला उद्देशून त्या बोलू लागल्या ...


" खूप खूप थँक्यू ऋचा बेटा , मला माझ्या चुकांची जाणीव करून दिल्याबद्दल .... योग्य रस्ता दाखवणारा देखील गुरूच्या स्थानावर असतो आणि आज तु मला योग्य रस्ता दाखवला म्हणून तूच माझी गुरु आहेस .... ! " 


सचिन आणि त्याच्या आईबाबांना हात जोडून त्या विनंती करू लागल्या ....


" माझ्या चुकांची शिक्षा आदितीला देऊ नका ..सचिनचे आईबाबा .. हवे तर मी तुमच्या पाया पडते... "  


असे बोलून त्या सचिनच्या आईच्या पायावर झुकल्या त्याचवेळेस त्यांना अडवत सचिनची आई बोलू लागली ...


" आदिती आमची मुलगीच आहे फक्त तुमच्या चुकीची तुम्हाला जाणीव व्हावी म्हणून आम्ही ऋचाने केलेल्या प्लॅन मध्ये सहभागी झालो. नकळत आम्ही तुमचे मन दुखावले असेल तर आम्हाला देखील तुम्हीच माफ करा ... " 


हे सगळे ऐकून उमाताईंना देखील आपल्या चुकांची जाणीव झाली. त्यांनी ऋचाबद्दल जो वाईट विचार केला , तिला जो त्रास दिला त्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला. त्यांनी ऋचाची माफी मागितली. सुनीलरावांना ऋचाचे खूप कौतुक वाटले.  


आयुष्यातला खरा आनंद झाला होता तो मात्र मेघाला ...तिने ऋचाला घट्ट मिठी मारली आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून बोटे कडकडून मोडत तिची नजर काढली आणि म्हणाली ....


" खरंच .. , वहिनी माझी नवसाची .... ! "


तिच्या या वाक्यावर सगळयांनी सहमती दर्शवली  आणि सुनीलराव म्हणाले ...


थ्री चिअर्स फॉर ऋचा ....


हिप हिप हुर्रेर्रे ....


हिप हिप हुर्रेर्रे .... 


हिप हिप हुर्रेर्रे ....


या आनंदाच्या क्षणी उपस्थित असलेले सगळेच कुटुंबीय मनमुराद हसत होते. त्या आनंदाची किंमत खूपच मौल्यवान होती  .. कशातही न मोजता येणारी ..! 


समाप्त !


कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - pixels/google 


✍©️ जया पाटील






Post a Comment

0 Comments