विवंचना

 #विवंचना 

 ©️जया पाटील 




" अगं भार्गवी , किती दिवस असे चोरून लपून भेटायचं ...? मला कंटाळा आला या भेटींचा... " 


" आपल्या नात्याबद्दल थोडीशी कल्पना मी माझ्या आईला दिली आहे आणि मला खात्री आहे कि आई बाबांना देखील नीट समजावून सांगेल आणि ते देखील आपल्या नात्याला मान्यता देतील."


" मनाने तर आपण एकमेकांचे आहोतच ..पण साखरपुडा , लग्न .... अजून पुढे काय 😉 ....? ते तुला आणि मला माहिती आहेच ना , भाग्या😍 ....! हो कि नाही ....🥰?   " 


" लग्नातील विधी , नववधूच्या रूपात सजलेली तू  , मित्र-मैत्रिणींचे चिडवणे , वाजंत्री , उखाण्यांची गंम्मतजम्मत , सप्तपदी , तुझ्या गळ्यात मंगळसूत्र टाकण्याचा अनमोल क्षण ..., 


या सगळ्या अनमोल क्षणांचा साक्षीदार व्हायचं आहे गं , भाग्या ... ! 


आयुष्यभराचं अनमोल नातं जोडायचं आहे मला तुझ्यासोबत  ....! " 


" तुझ्यासोबत लग्नानंतर घालवायच्या क्षणांचा विचार करूनच माझी रात्रीची झोप उडते आता ..!  थोडीशी प्रॅक्टिस आताच करावी वाटते पण तुला नाही आवडत ना ...मग समजावतो मी स्वतःला ...😉😉 ! "


यशाच्या या बोलण्याने भार्गवी लाजून चूर झाली.


" तुझ्या भावना मला समजतात रे , राजा ... पण काय करणार ...? घरात मोठी बहीण असताना माझ्या लग्नाचा विचार आधी कसे काय करणार रे .. माझ्या घरचे ...?  "


" अजून फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. मग आपल्या दोघांच्याही लग्नाला माझे घरचे देखील नकार देणार नाहीत हे मात्र तितकेच खरं आहे. "


" आम्ही दोघी बहिणी असलो तरी प्रत्येक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांनी आम्हाला दिले आहे. आजपर्यंत त्यांचा कुठलाही निर्णय त्यांनी आमच्यावर लादला नाही. "  


" लग्न म्हणजे तर आयुष्यभराची गाठ त्यामुळे माझ्या पसंतीला माझे आईबाबा नक्कीच नकार देणार नाहीत. " 


" अजून फक्त थोडे दिवस यश .. आपण दोघेही सध्या करियर वर लक्ष केंद्रित करूया आणि दोघेही स्वतःच्या पायावर उभे राहिलो कि लग्नाचा विचार करूया. तोपर्यंत माझ्यासोबतची स्वप्न आहेतच .. तुझी साथ द्यायला😊😊 ...!  "


भार्गवी यशला समजावणीच्या सुरात सांगत होती.


यश आणि भार्गवी दोघेही कॉलेजपासूनचे मित्रमैत्रिणी ... मैत्री म्हणता म्हणता कधी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले ते दोघांना देखील समजले नाही. प्रेमात पडले तरी मर्यादेचा उंबरठा त्यांनी कधीही ओलांडला नाही. 


भविष्यातील सोनेरी क्षण आयुष्यभर स्मरणात राहावे म्हणून भार्गवी आणि यश दोघेही मर्यादा सांभाळून वागत असत. दोघांच्याही घरी त्यांच्या मैत्रीबद्दल सगळे माहिती होते. एकमेकांचे कुटुंबीय त्यांना दोघांनाही चांगल्या परिचयाचे होते. भार्गवीच्या बहिणीचे लग्न ठरले कि त्यांच्या नात्याबद्दल घरी बोलूया असे दोघांनीही ठरवले आणि दोघांनीही सध्या उत्तम करियर घडवायचे म्हणून त्यावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले.


इंजिनीरिंगची डिग्री पूर्ण झाली आणि यशने MS करण्यासाठीच्या प्रवेशपरीक्षा देण्यास सुरुवात केली. खरंतर दोन वर्ष देखील भार्गवीला सोडून परदेशात शिक्षणाला जाण्याची यशची इच्छा नव्हती. परंतु ही दोन वर्षे भुर्रकन उडून जातील .. तुला समजणार देखील नाही असे भार्गवीने यशला समजावले. तोवर ताईचे लग्न होऊन ती देखील सेटल होईल म्हणजे आपल्या लग्नाबद्दल आपण दोघेही घरी बोलायला मोकळे असे यश आणि भार्गवीने ठरवले.


यशला MS साठीच्या प्रवेशपरीक्षेत उत्तम गुण मिळाले आणि त्याला एका चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळाला. भार्गवीला देखील एका कंपनीत चांगल्या पदावर नोकरी मिळाली. दोन वर्षे भार्गवीला सोडून जायची यशची इच्छाच होत नव्हती परंतु फक्त काही दिवसांचा काळ आहे एकदा भार्गवी सोबत लग्न झाले कि आपण जिथे असू तिथे तिला आणु शकू अशी स्वतःच्याच मनाची यश समजूत काढत असे.  


अखेर यशचा परदेशवारीला जाण्याचा दिवस उजाडला. काळजावर दगड ठेवून तो जायला निघाला. मनात फक्त त्याच्या भाग्याची चिंता होती. भार्गवीची अवस्था देखील काही वेगळी नव्हती. खूप जड अंतःकरणाने दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला. यशचा पुढील शिक्षणाचा प्रवास सुरु झाला. भार्गवीदेखील तिच्या नोकरीत सेटल झाली. या सगळ्यात मात्र दोघांचेही एकमेकांसोबत फोनवर बोलणे सुरूच होते.


यश परदेशात गेल्यावर अवघ्या दोनच महिन्यात भार्गवीची बहीण स्नेहासाठी धीरजचे स्थळ सांगून आले. कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडल्यावर स्नेहा आणि धीरज दोघांनीही लग्नाला होकार दिला. स्नेहाचे लग्न ठरल्यामुळे यश परत आल्यानंतर भार्गवी आणि यशचा विवाहाचा मार्ग मोकळा होणार म्हणून भार्गवीला देखील खूप आनंद झाला. भार्गवीने यशला देखील फोनवर ही आनंदाची बातमी कळविली. यशला देखील खूप आनंद झाला.


स्नेहा आणि धीरजचा विवाह खूप थाटामाटात पार पडला. त्यांच्या नवीन संसाराची सुरुवात झाली. त्यांचा संसार आनंदाने बहरू लागला. लग्नानंतर अवघ्या तीन - चार महिन्यात स्नेहाने आनंदाची बातमी दिली. घरातील सगळ्यांच्या आनंदाला पार उरला नाही. नऊ महिन्यांनी स्नेहाने एका मुलगा आणि एका मुलगी अश्या दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. नातवंडांच्या येण्याने स्नेहा आणि धीरजचे कुटुंबीय आनंदाने न्हाहून निघाले.  


स्नेहा बाळंतपणासाठी माहेरी असल्यामुळे भार्गवीला देखील छोट्या बाळांचा लळा लागला. ऑफिस नंतरचा भार्गवीचा सगळा वेळ स्नेहाच्या बाळांसोबत खेळण्यात जाऊ लागला. भार्गवी आणि यशचे फोनवर बोलणे सुरूच होते. स्नेहा तिच्या संसारात सेट झाली म्हणजे भार्गवी आणि त्याचा मार्ग मोकळा ..म्हणून तो मनोमन खुश होता. कधी एकदा भारतात परत जातोय अशी त्याची मनाची अवस्था झाली होती.


बघता बघता स्नेहाची मुले तीन महिन्यांची झाली. स्नेहाला डॉक्टरांनी चेकअपसाठी हॉस्पिटलला बोलावले होते. मुलांना घरी टाकून ती धीरज सोबत हॉस्पिटलला गेली परंतु देवाच्या मनात काही वेगळेच होते. वाटेत धीरजचा गाडीवरचा ताबा सुटला आणि दोघांचाही मोठा अपघात झाला. स्नेहा आणि धीरज दोघांनाही गंभीर दुखापत झाली. स्नेहाच्या शरीराने उपचारांना साथ न दिल्यामुळे तिचा उपचाराअंती दुर्दैवी मृत्यू झाला. भार्गवी आणि तिच्या परिवारावर दुःखाचे पहाड कोसळले.



भार्गवी धीरजच्या बाळांची खूप उत्तम काळजी घेत होती.धीरज मात्र उपचारांना साथ देत नव्हता. भार्गवी त्याच्या मुलांना घेऊन हॉस्पिटलला आली. मी तुमच्या बाळांची उत्तम काळजी घेत आहे ही गोष्ट तिने धीरजला पटवून दिली. भार्गवी धीरजची देखील खूप चांगली काळजी घेऊ लागली. आपल्या मुलांची सोबत आणि भार्गवीचा आपलेपणा त्यामुळेच धीरजच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. थोडेच दिवसात डिस्चार्ज मिळून तो घरी आला.


स्नेहाच्या लहान बाळांची काळजी मात्र धीरज , त्याचे कुटुंबीय आणि भार्गवीच्या आईबाबांना सतावत होती. या दरम्यान घडलेल्या सगळ्या घटना भार्गवी यशला सांगतच होती. अशा संकंटांच्या प्रसंगी आपण भार्गवी सोबत नाही म्हणून यशला स्वतःचाच राग येत होता पण काही वेळा आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण मजबूर असतो.


स्नेहाच्या मुलांना आईची आवश्यकता होती पण दुसरे लग्न करून जर येणाऱ्या स्त्रीने माझ्या मुलांना परके केले तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही असे धीरजचे मत असल्यामुळे धीरज दुसऱ्या लग्नाला तयार होत नव्हता. धीरजची चिंता त्याच्या आईबाबांना स्वस्थ बसू देत नव्हती. इकडे भार्गवी दोघही बाळांची अगदी आईप्रमाणे काळजी घेत होती. न राहवून धीरजच्या आईबाबांनी भार्गवीलाच धीरजसाठी मागणी घालायचे ठरवले. भार्गवी स्नेहाच्या मुलांना कधीच अंतर देणार नाही याची त्या दोघांनाही खात्री वाटत होती.  


धीरजच्या आईबाबांनी आपले मत धीरजला सांगितले. भार्गवीच्या काही अपेक्षा असतील तर तिचा अपेक्षाभंग होईल त्यामुळे धीरज मात्र भार्गवी सोबत लग्न करायला नकार देत होता. भार्गवीला आम्ही कुठलीही जबरदस्ती करणार नाही फक्त तुझ्या मुलांसाठी तिच्यापेक्षा चांगली आई मिळू शकणार नाही हे धीरजच्या आईबाबांनी धीरजला समजावले. भार्गवी जर खरंच मनापासून तयार असेल तर मला चालेल म्हणून धीरज या लग्नाला तयार झाला.


धीरजच्या आईबाबांनी भार्गवीला मागणी घातली. भार्गवीचे आईबाबा खुश झाले पण या सगळ्यात आपण भार्गवीच्या इच्छांचा बळी तर देत नाही म्हणून सर्वप्रथम त्यांनी भार्गवीला तिचा निर्णय विचारायचे ठरवले. भार्गवीला त्यांनी घडलेली सगळी हकीकत सांगितली. आईबाबांनी सांगितलेल्या गोष्टीने भार्गवीच्या पायाखालची जमीन हादरली. या गोष्टी सोप्या नसतात म्हणून तुझा जो निर्णय असेल तो तुझा पूर्ण वेळ घेऊन पूर्ण विचार करूनच दे. तुझा जो निर्णय असेल तो  आम्हाला मान्य असेल असे भार्गवीच्या आईबाबांनी तिला समजावले.


धीरज सोबत लग्नाची गोष्ट ऐकल्यावर भार्गवीला काहीही सुचेनासे झाले. यशवरचे तिचे प्रेम , त्यांनी एकमेकांसोबत घालवलेला वेळ , सोबत पाहिलेली स्वप्न , त्याच्या अनेक आठवणींनी ती व्याकुळ झाली. तिने मनोमन ठरवले धीरजसोबत लग्नाला नकार द्यायचा कारण कितीही झाले तर यश तिचे प्रेम होते. भार्गवीचा लग्नाला नकार देण्याचा निर्णय पक्का झाला आणि त्याच वेळी तिची नजर पाळण्यात झोपलेल्या बाळांकडे गेली.


त्यांच्याकडे पाहताच मात्र तिच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा आल्या. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले. ती मनोमन विचार करू लागली ..


" भार्गवी , तू तर तुझे प्रेम म्हणजेच यशला मिळवून मोकळी होशील पण या चिमुकल्या जीवांचे काय ...? त्यांच्या आयुष्यात मात्र आयुष्यभराचा सावत्रपणा सोडून निघून जाशील. प्रेम म्हणजे खरंच भोगण असत का ..? त्यागात देखील प्रेम असतेच कि ..." 


" तुझ्या बहिणीच्या या चिमुकल्या आठवणींसाठी तुला तुझ्या प्रेमाचा त्याग करावाच लागेल. नाहीतर प्रेमावरचा विश्वास उठेल गं , लोकांचा "


स्नेहाच्या बाळांचा विचार करून भार्गवीने धीरज सोबत लग्नाला होकार दिला. धीरजचे कुटुंबीय आणि भार्गवीच्या आईबाबांना तिच्या या निर्णयामुळे खूप आनंद झाला. एका आठवड्याच्या आत धीरज आणि भार्गवीचा विवाह देवळात साधेपणाने पार पडला.  


धीरजसोबत लग्न झाल्यावर भार्गवीने यशसोबतचा संपर्क पूर्णपणे तोडला. भार्गवीसोबत काहीच संपर्क होत नसल्यामुळे यश खूप व्याकुळ होत होता. यशने परदेशातील त्याचे काम लवकरात लवकर संपवून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. 


भार्गवी दोघेही बाळांचा सांभाळ अगदी उत्तम रित्या करत होती. धीरजच्या तब्येतीची देखील ती खूप चांगली काळजी घेत होती. धीरजला देखील स्नेहाची उणीव भरल्यासारखी वाटत होती परंतु धीरज अजूनही स्नेहाच्या आठवणींमध्ये गुंतलेला होता. त्यामुळे पती-पत्नी म्हणून अजूनही कुठलेच नाते धीरज आणि भार्गवीमध्ये नव्हते.


भार्गवीच्या देखील आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून अपेक्षा असतील. तिची देखील खूप स्वप्न असतील. माझ्यासोबत लग्न झाल्यामुळे तिची स्वप्न तुटू नये म्हणून धीरजने आयुष्यात पुढे चालायचे ठरवले. एक नवरा म्हणून भार्गवीला तिचे सगळे अधिकार देण्याचा त्याने निश्चय केला. 


त्याने भार्गवीला आनंदी ठेवण्यासाठी , एक पाऊल पुढे ठेवले परंतु भार्गवीने मात्र त्याला साथ दिली नाही. भार्गवीने माझ्यासोबत लग्न करून खूप मोठी तडजोड केली आहे याची जाणीव धीरजला झाली. भार्गवीच्या सुखासाठी नेमके काय करता येईल असा पेच धीरजसमोर उभा राहिला.  


भार्गवीसोबत कुठलाच संपर्क न झाल्यामुळे यश भारतात परत आला. एअरपोर्ट वरून तडक तो भार्गवीच्या घरी आला परंतु भार्गवीचे आईबाबा बाहेरगावी गेल्यामुळे शेजारच्या काकांकडून यशने भार्गवीचा पत्ता मिळवला. भार्गवीच्या घरी आल्यावर त्याने दरवाज्याची बेल वाजवली. भार्गवीने दरवाजा उघडला. यशला पाहून ती स्तिमित झाली. माथ्यावर सिंदूर , गळ्यात मंगळसूत्र , साडी अश्या अवतारात भार्गवीला पाहून यशच्या पायाखालची जमीन सरकली.


यश आणि भार्गवी दोघेही एकमेकांना पाहून भावुक झाले. दोघेही एकमेकांना भेटून रडू लागले. अश्रूंच्या धारा खूप काही सांगत होत्या. शब्दांना व्यक्त होता येत नसल्यामुळे डोळ्यातील अश्रूच खूप काही सांगत होते. थोडा वेळ गेल्यानंतर भार्गवीने यशला घडलेला सगळा प्रकार सांगितला. झालेला प्रकार ऐकून तो सुन्न झाला. यश पुढे बोलू लागला...


" भाग्या , तुला जे काही करावे लागले ती परिस्थिती तशी होती पण मला खरे सांग ..मला सोडून जगू शकशील तू ?  ...मी नाही जगू शकणार ... आपण दोघेच बनलो आहोत एकमेकांसाठी ...मी आजही तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे....सोड ह्या सगळ्या बेड्या ....मी नाही जगू शकत तुझ्यासोबत ...! हवेतर आपण उद्याच घटस्फोटाची प्रोसेस सुरु करूया ..." 


यशचे बोलणे ऐकून भार्गवी सुन्न झाली , पण डोळ्यातले अश्रू पुसून ती बोलती झाली..


" नाही यश ... लग्न म्हणजे खेळ नाही ... दोन परिवार घट्ट धरून ठेवणारा धागा आहे हा ....


माझे पहिले प्रेम तू होतास ...मान्य आहे मला ... पण ...भोग म्हणजेच फक्त प्रेम नाही तर त्याग म्हणजे सुद्धा प्रेमच... ! "


" तुझ्यासाठी सगळे सोडून मी येईलही कदाचित पण यात धीरज आणि माझ्या चिमुकल्या बाळांचा काय दोष ..? त्यांनी कुठे मला सांगितले होते की माझ्या आयुष्यात त्यांना घेऊन ये म्हणून ....त्यांना माझ्या आयुष्यात आणण्याची निवड माझीच होती ..भलेही ती परिस्थितीच्या दबावाखाली केली होती...! "

 

" आज धीरजला हे समजले तर काय वाटेल त्याला ... ? तो देखील स्नेहाला विसरून एक पाऊल पुढे आलाच माझ्यासाठी .... ! स्नेहाची जागा मला देण्याचा प्रयत्न तो करतोय तसा तुझी जागा त्याला देण्याचा प्रयत्न मी देखील करायलाच हवा कि नको ... ? "  


" एक सुंदर स्वप्न म्हणून विसरून जा सगळे ..आपल्या हृदयात एक सुंदर आठवण म्हणून जपून ठेवून दे या आपल्या प्रेमाला ...! नाहीतर आता ते व्यभिचार म्हणून बदनाम होईल"


" मी खूप दुखावले ना तुला यश ... ! पण सगळ्यात जास्त हक्क तुझ्यावर होता म्हणूनच दुखावले रे मी तुला ...जीवनसाथी म्हणून नसला तरी एका मित्र म्हणून तू हवा आहेस मला ..माझ्या आयुष्यात ..म्हणूनच आजपर्यंत मी आपल्या या नात्याबद्दल धीरजला काहीही सांगितलेलं नाही. यश , देशील ना माझी साथ आयुष्यभर एका चांगला मित्र म्हणून ...? "  


भार्गवीचे बोलणे ऐकून यश निशब्द होता. त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. आयुष्यभराची स्वप्न तुटल्याच्या वेदना होत्या त्या ... ! तरीही भार्गवीचा हात हातात घेऊन तो बोलू लागला ...


" ऐ , वेडाबाई ...साथ काय मागतेस ....मी तर आयुष्यभर तुझा बेस्ट फ्रेंड आहे ... तुला कधी काही नाही म्हटले आहे का मी आजपर्यंत ....? तर आजतरी कसे नाही म्हणणार ...! मी आयुष्यभर एक चांगला मित्र म्हणून तुझ्यासोबत असणार आहे. फक्त तू मात्र आयुष्यभर सुखात आनंदात  राहा ...! इतकेच वचन दे मला जाता जाता ..." 


भार्गवीसमोर वचनासाठी यशने हात पुढे केला. भार्गवीनेने देखील त्याच्या हात मिळवला आणि त्याला रागात म्हणाली ...

 

" किती वेळा सांगितले आहे रे यश ...येतो म्हणावे ...जातो नाही ..." 


एकमेकांना निरोप देतांना भार्गवी आणि यश खूप भावुक झाले आणि यश तिथून निघून गेला.


सारे काही आवरून भार्गवी तयार झाली कारण आज ती धीरज सोबतच्या नात्याची नवीन सुरुवात करणार होती. काही वेळात धीरज परत आला. भार्गवीच्या चेहऱ्यावर एका वेगळेच तेज भासले त्याला... आणि त्यानेही एक पाऊल पुढे ठेवले त्यांचे नाते जपायला ...! "


खरेतर धीरज खूप आधीच घरी आला होता. त्याने यश आणि भार्गवीचे सगळे बोलणे ऐकले होते पण भार्गवी समोर त्याला ही गोष्ट माहिती असल्याचे कधीच दर्शवायचे नाही असे त्याने मनोमन ठरवले कारण ....


" भोग म्हणजेच फक्त प्रेम नाही तर त्याग म्हणजे सुद्धा प्रेमच..... ! "


समाप्त!


कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - pixels/google 


✍©️ जया पाटील






Post a Comment

0 Comments