वाट पहाते पुनवेची..!

#वाट_पहाते_पुनवेची ..! 


©️जया पाटील 


प्रिय नवऱ्यास..... ,


आज अहो सोबत बोलायचे नाहीय कारण आज मी फक्त माझ्या प्रियकरासोबत बोलतेय म्हणून आज फक्त अरे ...... प्रियकरा .....


आज वटपौर्णिमा ... सातजन्मासाठी तूच आणि तूच माझ्या आयुष्याचा जीवनसाथी असावास म्हणूनच हा उपवास आणि पूजेचा प्रपंच...! 


सुंदर असा साज शृंगार करून , नवीन पैठणी लेऊन , नथ, बांगड्या सगळा सौभाग्याचा शृंगार करून आम्ही सगळ्या स्त्रिया वडाच्या झाडाला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याचे साकडे टाकतो.


तुझ्या कुंकुवाशी माझ नात 


जन्मोजन्मी असाव...


मंगळसुत्र गळ्यात घालताना 


तू डोळ्यात पाहून हसाव...


कितीही संकटे आली 


तरी तुझा हात माझ्या हातात असावा...


आणि मृत्युलाही जवळ करताना

 

देह तुझ्या मिठीत असावा...


अज्ञात लेखकाच्या या ओळी वाचनात आल्या आणि माझ्या विचारांचे चक्र सुरु झाले...


वटपौर्णिमा , हरितालिका अशीच विविध परंपरा आम्ही जपतोय फक्त तुझ्या उदंड आयुष्यासाठी .!  तुझ्या उज्वल भविष्यासाठी ..!

आज वटपौर्णिमेच्या दिवशी तुझ्या सुखासाठी तुझी ही सौभाग्यकांक्षिणी प्रार्थना करते आहे कारण ... 


वडाच्या झाडाचे आयुष्य मोठे असते, तसेच त्याचा विस्तार देखील मोठा असतो. वडाच्या झाडाप्रमाणे तुला खुप दीर्घ आयुष्य मिळावे आणि त्या वडाच्या पारंब्यांप्रमाणे तुझ्या सुखाचा आणि आनंदाचा विस्तार व्हावा हीच त्या मागची माझी प्रेमळ भावना आहे. आज देखील सात जन्मी तूच पती म्हणून मिळावास म्हणून मी पूजा करणार आहे पण तुला मात्र मी सात जन्म हवी आहे की नको ....? हे मात्र न उमगलेले कोडंच आहे माझ्यासाठी.....! 


वटपौर्णिमेच्या दिवशी स्वतःच्या चातुर्याने आणि तपस्येने सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले , मग 

सावित्रीसारखीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी म्हणून उपवास तर तू करायला हवा पण झाले मात्र उलटेच .... सगळ्या प्रथा लादल्या गेल्या त्या फक्त आम्हा बायकांवरच ....


माझ्या कपाळावरील कुंकू , हातातील बांगड्या , पायातील जोडवे ..माझा सगळा शृंगार , माझे सर्व दागिने हे फक्त तुझ्याच नावाचे ....तू नसलास तर माझ्या या दागिन्यांना ...माझ्या अस्तित्वालाच महत्व नाही. तू माझा मान आहेस मान्य आहे रे मला ...पण ज्या स्त्रीयांच्या पतीचे काही कारणास्तव निधन होते किंवा काहींचे पती त्यांची अर्ध्या वाटेत साथ सोडून निघून जातात ..त्यांना देखील एक माणूस म्हणून नटण्याचा ,शृंगार करण्याचा अधिकार मिळत नाही ....पण हे चूक नाही का ...? 


तुझ्या अस्तित्वात मला तुझी सोबत हवी आहेस ..मला देखील तितकाच मान हवा आहे. पुराणकाळापासून शिवशक्तीला महत्व दिले गेले आहे. शक्ती शिवाय शिव कायमच अपूर्ण आहे मग मलाही शिवशक्तीचा मान मिळायला हवा कि नाही ...? 

प्रेमाच्या अधिकाराने इतके छोटे मागणे तर मागूच शकते ना तुझ्याकडे ...?


तुला वाटत असेल कि आज बायको जरा जास्तच मोकळी बोलते आहेस ....पण राग मात्र मानून घेऊ नकोस ...कारण खूप दिवसानी माझ्या मनाने , परंपराची बेडी तोडून मला तुझ्या सोबत बोलायची परवानगी दिली आहे. आजच्या माझ्या या बोलण्याचा राग न करता गोड मानून घे ....


माझा आज उपवास पण तरी देखील घरातील सगळ्यांचा स्वयंपाक , मुलांची देखभाल कशातूनच सुटका नाही रे माझी ...... , 

मग कधी तरी वाटते आयुष्याचे सोबती आपण.... लग्न तर दोघांनीही केलेय मग तुला सात जन्म मिळवण्या साठी उपवास, प्रार्थना मात्र मी एकटीनेच का करावी ....? 


आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा अभिमान आहे मला...पण सगळ्या गोष्टी स्त्रियांनीच का कराव्या...? नवऱ्याला देखील बायकोची साथ हवीच असते की जन्मभर ....... ! असो ...


आपल्या संस्कृतीची प्रतिमा ....


सावित्रीच्या निश्ठेचे दर्पण ....


बांधूनी नात्यांच बंधन ....


करेन साता जन्माच समर्पण ...


ह्या कवितेच्या ओळी खूप काही सांगून जात आहेत. या सगळ्यातून मला फक्त इतकेच सांगावेसे वाटते कि .....


मी तुझ्यासाठी उपवास केला म्हणून लगेचच तु देखील माझ्यासाठी उपवास करावा या मताची मी नक्कीच नाही ... कारण प्रेमात कधी तुझ माझं नसते, फक्त......


" थकलीस का गं आज खुप ....?  चल मग ... , मस्त माझ्या हातचा मसालेदार चहा बनवतो तुझ्यासाठी ..... "


" किती काम करतेस गं घरासाठी ,मुलांसाठी आणि माझ्यासाठी ...कधीतरी स्वतःसाठी पण वेळ काढत जा ... "


" घरातल्या सगळ्यांची इतकी काळजी घेणे काहीही न विसरता कस काय जमते बुवा तुम्हा बायकांना .. आम्हा पुरुषांना तर नाहीच जमायचं ...मुळातच आम्ही मुलुखाचे विसरभोळे...! "


ही सगळी प्रेमाची वाक्य तुझ्याकडुन ऐकण्याचीच रे फक्त माझी इच्छा .....!


 तुझ्या हाताचा चहा मला अमृतापेक्षाही जास्त सुख देतो..... ! 


तुझे प्रेम साज शृंगारपेक्षा किती तरी जास्त नटल्याचा अनुभव देतो मला.... !


तु माझ्या भावनांचा केलेला आदर खुप सुखावतो मला .....!


आज वटपौर्णिमेला वडाऐवजी तुलाच बांधते मी ... सुत गुंडाळून माझ्या जवळ .....!


आज फक्त तुलाच वेळ द्यायचा आणि तु देखील  फक्त माझ्या सोबत वेळ घालवायचा ... , तुझ्या  सोबत बोलायच्या राहुन गेलेल्या सगळ्या गप्पा आजचं बोलून पूर्ण करायच्या...., रुसवे फुगवे एका क्षणात संपवायचे ... तु पण व्यक्त होशील ना माझ्यासाठी ..... ? 


करशील ना या वटपौर्णिमेला माझी ही इच्छा पूर्ण ...... ?


कदाचित जर प्रत्येक दिवस तुझ्या सोबत इतक्या आनंदाने मी घालवू शकले तर मात्र मी रोजच या पौर्णिमेची वाट पाहत राहिल .....  आणि मनात फक्त एकच कविता घोळवत राहिल...



वाट पहाते पुनवेची ...हाती आरती सजली गं .!

वर्षा मागुन वर्षांची परंपरा मी पुजली गं .... !


हात जोडून वडाला भाग्य कुंकुवाच मागू ..

गरतिच्या संसारच त्याला सुख दुःख सांगू ..!


डोळे मिटता भक्तीने पंख पापणी भिजली ग ..

वर्षा मागुन वर्षांची परंपरा मी पुजली ग .. !


माझा सावित्रीचा वसा हाती घेईन मी वाण ...

धाग्या-धाग्यात गुंफेन तन मन पंचप्राण ....!


दान टाकील पदरात मनी भावना रुजली ग ....

वर्षा मागुन वर्षांची परंपरा मी पुजली ग ....!


वाट पहाते पुनवेची ...हाती आरती सजली गं .!

वर्षा मागुन वर्षांची परंपरा मी पुजली गं .... !




                                         तुझीच ... 

                                    लाडकी बायको



वरील लेखनविषयाच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ..... !


धन्यवाद!🙏


सदर लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा.


फोटो साभार - pixels & Google 



✍©️ जया पाटील









Post a Comment

0 Comments