#हाऊसवाइफ
©️जया पाटील
" ऐ मम्मा , आटोप ना , पटकन. किती उशीर टिफिन बनवायला , तुझे हे रोजचेच असतं आणि मला रोज लेट होते स्कूलमध्ये जायला ..."
" सॉरी ईशान , अरे रुहीच्या प्रोजेक्टचे प्रेसेंटेशन आहे ना आज , त्यामुळे तिला मदत करत होती. सॉरी रे बाळा ...प्लिज ..."
" मी अगदी पाचचं मिनिटात टिफिन पॅक करते मग तर झाले ..."
शर्वरी स्वतःच्या लाडक्या लेकाला म्हणजेच ईशानला समजावणीच्या सुरात सांगत होती.
" ओके , पण रोजरोज नको उशीर करत जाऊस . रुहीला मदत करायची तर रात्रीच करायची ना . असेही तु तर दिवसभर घरीच असते , तुला तर वेळच वेळ असतो. "
एवढं बोलून ईशान निघून गेला.
तितक्यात रुही चिडचिड करत तिथे येऊन पोहोचली आणि शर्वरीला बोलु लागली ...
" ऐ काय गं मम्मा , तुला माहिती आहे ना , आज माझा प्रोजेक्ट होता मग मला मदत करायची सोडून तु ईशान दादाचा टिफिन काय बनवत बसली आहे ? "
" रुही बाळा , अगं त्याला टिफिन नसता दिला तर दिवसभर उपाशी राहिला असता तो आणि तुला माहिती आहे ना कि त्याने बाहेरचं काही खाल्लं कि त्याला किती त्रास होतो ते , म्हणून उशीर झाला. टिफिन बनवायची तयारी करायला पण वेळ लागतो ना ..
hope u can understand ...! " शर्वरी तिला समजावू लागली.
" नो मम्मा , i cant ... मी नाही समजुन घेऊ शकत तुला. तुला प्रोजेक्ट साठी माझी मदत करायची होती आणि ईशान दादाचा टिफिन पण बनवायचा होता तर टिफिन साठीचे प्रिपरेशन तु रात्रीच करायचे ना ..."
" एका गोष्टीचे प्लॅनिंग म्हणून नाही तुला , दिवसभर तर घरीच असते ना तु , मग प्लॅन करत जा ना ... "
रुही देखील तावातावात निघून गेली.
रुहीचे आटोपले तोवर मनीष बाहेर आला आणि म्हणाला ...
" शर्वरी , नाष्टा दे पटकन , माझी महत्वाची मीटिंग आहे... "
" हो मनीष , ईशानच्या टिफिन साठी आलू पराठा केला आहे , आणते लगेच ..."
" एक मिनिट शर्वरी , तुला माहित आहे ना ..मला पराठा वगैरे नाही आवडत नाष्टा म्हणून खायला ..
तुला काही नवीन नाही बनवता येत का गं ..? "
" सकाळ सकाळ मध्ये डोक्यात जातेस शर्वरी तु ...! "
" मला दिवसभर ऑफिसमध्ये किती काम असते . तुला नुसता ब्रेकफास्ट आणि जेवण बनवायचे काम , ते सुद्धा नीट बनवता येत नाही तुला. नको मला नाश्ता , मी ऑफिस मध्ये जाऊन खाईल काहीतरी .."
ईशान ,रुही आणि मनीष सगळ्यांचे बोलणे शर्वरीच्या मनावर खूपच मोठे ओरखडे ओढून गेले. ती मनोमन विचार करू लागली . मी घरीच असते म्हणून मी कुठलेच काम करत नाही का ...? एव्हाना आता रुही , ईशान आणि मनीषचे हे वागणे रोजचेच झाले होते. शर्वरी घरी असते म्हणजे तिला कुठलेच काम नसते असे त्यांनी मनोमन ठरवून टाकले होते.
त्यावेळेस तिच्या समोर एका सुंदर पोस्टर फ्रेम लावलेली दिसली. ईशानच्या वेळेस प्रेग्नेंट असताना ते पोस्टर मनीषने तिला गिफ्ट केले होते. त्यात आई आणि मुलाचा एक फोटो होता. त्याखाली काही ओळी लिहिल्या होत्या..
" यूँ ही नही गूंजती किलकारियां
घर के आँगन के कोने में ... । "
"जान हथेली पर रखनी पड़ती है
माँ को माँ होने मे ... । "
त्या ओळी वाचून ती तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना रोखू नाही शकली. विचार करता करता ती तिच्या भूतकाळात हरवली.
शर्वरी कारखानीस - एक टॅलेंटेड , स्मार्ट , मॉडर्न , डॅशिंग , स्टायलिश मुलगी... एका आय टी कंपनीत सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणारी ...
अतिशय फोकस्ड , करियर ओरिएंटेड मुलगी. तीचे स्वप्न म्हणजे सतत पुढे जाण्याचे , यशाचे नवीन क्षितिज गाठण्याचे ...!
त्यातच तिची भेट तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या मनीष सोबत झाली. प्रोजेक्टच्या कामाच्या निमित्ताने भेटी वाढल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही समवयस्क , हुशार त्यामुळेच घरच्यांकडून देखील त्यांच्या लग्नासाठी लगेच होकार मिळाला. दोघांचेही लग्न थाटामाटात पार पडले. माप ओलांडून शर्वरी मनीषच्या घरची लक्ष्मी झाली. करियर करतानाच तिच्या संसारात देखील तितकीच रुळली.
लग्नानंतर काही काळ मनीष आणि शर्वरी दोघांचेही ऑफिस अगदी सुरळीत चालू होते. त्याच वेळेस शर्वरीने गोड बातमी दिली. शर्वरी आई होणार होती. त्यामुळेच ती खूप खुश होती. एक वेगळेच तेज होते तिच्या चेहऱ्यावर. ऑफिस आणि घरची कामे सगळे अगदीच व्यवस्थित मॅनेज केले होते शर्वरीने.... !
शर्वरीला नऊवा महिना सुरु झाला. तिचे डोहाळेजेवण देखील खूप थाटामाटात पार पडले. पूर्ण दिवस भरले आणि एक दिवस तिला बाळंतकळा सुरु झाल्या. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. जन्मजात बाळाला निमोनिया चे निदान झाल्यामुळे बाळाच्या lungs मध्ये इन्फेकशन पसरले आणि त्याला NICU ला शिफ्ट करण्यात आले. आपल्या नवजात बाळाला मृत्यूच्या दाढेत पाहून शर्वरी खूप खचली परंतु जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून शर्वरीचा " ईशान " तिच्या कडे परत आला. एका आईसाठी याहून मोठी आनंदाची गोष्ट दुसरी काय असणार ..?
छोट्या ईशानच्या बाललीलांमुळे शर्वरीचा वेळ कसा जाऊ लागला हे तिलाच कळेनासे झाले. त्याचे गोड हसणं, घरभर पळणं, सगळ्या घरात खेळण्यांच्या पसारा करणे, कारणाशिवाय त्याचे रुसुन बसणे या सगळ्यात शर्वरीचा वेळ कुठे जात असे ते तिलादेखील समजत नसे. नोकरी करून छोट्या ईशानचा सांभाळ देखील ती उत्तम प्रकारे करत होती. ईशानच्या जन्मानंतर तीन वर्षांनी रुहीचा जन्म झाला. शर्वरी , मनीष , ईशान आणि रुही ..त्यांचा परिवार पूर्ण झाला. दोघीही मुलांच्या जबाबदाऱ्या आणि ऑफिस सांभाळताना शर्वरीची ओढाताण होऊ लागली. तरीही ती सगळेच योग्य प्रकारे सांभाळत होती.
परंतु ईशान पुन्हा खूप आजारी पडला. त्याला डेंग्यूचे निदान झाले. त्याच्या प्लेटलेट पूर्ण पणे कमी झाल्या. ईशानची बरी होण्याची शक्यता खूप कमी आहे असे डॉक्टरांनी सांगितले. खूप प्रयत्नांती ईशान बरा झाला आणि शर्वरीने ईशान आणि रुहीच्या देखभालीसाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. करियरच्या उंचीवर असताना हा निर्णय घेणे शर्वरी साठी खूपच अवघड निर्णय होता. तिचे सहकारी , मित्र मैत्रिणी सगळ्यांनी तिला वेड्यात काढले पण ती ठाम होती कारण कितीही झाले तरी ती तिच्या मुलांची आई होती आणि प्रत्येक आई आपल्या मुलांबाबतीत खूप हळवी असते. स्वतःचे संपूर्ण करियर एका क्षणात सोडून शर्वरी मुलांच्या पालनपोषणात लागली.
हा सगळा विचार करत असतानाच दरवाज्याची बेल वाजली. शर्वरीच्या कामवाल्या मावशी दारात उभ्या होत्या.
" मावशी , आज इतक्या लवकर कश्या आलात ..?
" काय सांगू ताई , सकाळी घरचे आवरून बाहेरची कामं बी करते म्या , तरी बी पोरं
आणि धनी म्हणत्यात , दिनभर काय बी काम नसते तुला ... आता सकाळच्या पहारीच येणार मी . करू देत त्यांची कामे त्यास्नीच. चांगला धडा शिकवते कि नाही त्या सम्द्यास्नी पहाच आता ..."
एवढं बोलून मावशी कामाला लागल्या आणि शर्वरीचे विचार चक्र पुन्हा सुरु झाले. प्रत्येक आईला , गृहिणीला ,पत्नीला सगळीकडे गृहीतच धरले जाते. मावशीसारखी अशिक्षित स्त्री आता या गृहीत धरणाऱ्या परिवाराला धडा शिकवण्याचे धाडस करते तर मी का नाही ..?यापुढे मी ईशान , रुही आणि मनीषचे विनाकारणचे बोलणे ऐकून घेणार नाही आणि त्यांना चांगलाच धडा शिकवणार असा शर्वरीने मनोमन निश्चय केला.
दुसऱ्याच दिवशी रविवार होता. सकाळी सात वाजताच शर्वरीने सगळ्यांनाच उठवायचे ठरवले.
ईशान आणि रुहीच्या खोलीत जाऊन ती त्या दोघांना उठवू लागली. ईशान आणि रुहीचे पुन्हा सुरु झाले ..
" ऐ मम्मा , काय गं ..एकच सुट्टी असते पूर्ण वीक मध्ये तरी सुद्धा झोपू देत नाहीस. तुझ्यासारखे थोडीच आम्ही घरी असतो दिवसभर कि हवे तेव्हा आराम करू शकू ..."
शर्वरीने मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि अर्धा तासात मला डायनिंग टेबलवर तुम्ही दोघेही नाश्ता करण्यासाठी प्रेसेंट हवे अशी वॉर्निंग तिने ईशान आणि रुहीला दिली. आणि शर्वरी तिथून निघून गेली. ह्याच गोष्टीची पुनरावृत्ती मनीष बाबतीत देखील झाली. मनीषने देखील लवकर उठण्यासाठी शर्वरीला नकार दिला. पण तिने त्याचे काहीही न ऐकता त्याला उठण्यास सांगितले. ईशान , रुही आणि मनीष आज शर्वरीचे वागणे पाहून अवाक झाले. तिच्या बदललेल्या रुपामुळे ते तिघेही उठून वेळेवर नाश्ता करायला डायनिंग टेबल वर येऊन पोहोचले.
त्यांना नाश्त्याच्या प्लेट हातात देऊन शर्वरी पुढे बोलु लागली ...
" ईशान , रुही आणि मनीष आज तुम्हाला तिघांनाही मला काही सांगायचे आहे. तुमच्या तिघांच्याही बोलण्यातून एक गोष्ट मी सतत ऐकते आहे ती म्हणजे तु दिवसभर घरीच तर असते दुसरे काय काम असते तुला ...! त्यामुळे तुम्हाला वाटते त्या रिकाम्या वेळेचा मी सदुपयोग करायचा ठरवला आहे. "
" चार वर्षांपूर्वी मी माझ्या करियरच्या सगळ्यात सक्सेसफुल टर्नवर होती पण तुमच्यासाठी मी माझे करियर अर्धवट सोडले.आता पुन्हा मी माझा जॉब सुरु करणार आहे. "
" मनीष , आता तुझ्या मनात येईन कि एकदा करियरला ब्रेक लागल्यावर लगेच मला कोण जॉब देणार ...? म्हणून त्यासाठी मी आता नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीशी रिलेटेड क्लास करायचे ठरवले आहेत ते कंप्लिट झाल्यावर मग मी जॉब साठी ऐप्लिकेशन करायचे ठरवले आहे. मला माझे हरवलेले अस्तित्व पुन्हा नव्याने शोधायचे आहे. "
" त्यामुळे उद्यापासून बराच वेळ मी घरात नसणार आहे. अर्थातच तुम्हाला वाटते कि दिवसभर मी घरात रिकामी असते त्याच रिकाम्या वेळेचा उपयोग मी करणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठलेही ऑब्जेक्शन नसणार याची मला खात्री आहे. "
" उद्या पासून नाश्ता आणि जेवण दोघेही किचन मध्ये तयार असतील. तुमचा नाश्ता तुम्हीच स्वतःच घेऊन खायचा आहे. स्वतःचे टिफिन पॅक करून इशान , रुही तुम्ही दोघांनीही शाळेत आणि मनीष तु ऑफिसला न्यायचा आहे. तुमचे कपडे , बॅग्स या सगळ्या गोष्टी आता तुम्ही स्वतःच हाताने घ्यायच्या आहेत.थोडक्यात सांगायचे तर तुम्हाला तिघांनाही आता इंडिपेंडंट व्हायचे आहे. "
इतके बोलून शर्वरी तिथून निघून गेली. ईशान , रुही आणि मनीष तिच्या बदलेल्या अटीट्युडने आश्चर्यचकित झाले.
दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत शर्वरी घराबाहेर पडली. इकडे सगळ्या गोष्टी आणि मुलांच्या गोष्टी स्वतः मॅनेज करताना मनीषची खूपच धावपळ झाली. रोजच या गोष्टी मॅनेज करताना ईशान , रुही आणि मनीषची खूपच त्रेधा तिरपीट उडत होती. शर्वरीच्या कामाचे महत्व त्यांना आता जाणवत होते.
एक दिवस शाळेतून घरी आल्यावर रुहीला भूक लागली असल्याने ती वरच्या कप्प्यात असलेला खाऊचा डबा खाली काढायला गेली आणि चुकून तो तिच्या हातून खाली पडला. आता झालेला पसारा आवरणार कोण ..? या गोष्टीवरून ईशान आणि रुहीचा वाद सुरु झाला. त्यांनी बाबाला अर्थातच मनीषला ऑफिस मधून घरी बोलवून घेतले. घरी येऊन घराची अवस्था पाहून मनीषने डोक्याला हात मारून घेतला.
त्याने ईशान आणि रुहीला शांत केले. आणि मुलांच्या मदतीने घर आवरायला सुरुवात केली. परंतु तरीही त्यांना नीटसे काम जमले नाही. थकून भागून ते एका जागी शांत बसले. परंतु त्याच वेळेस त्यांना जोराची भूक लागली. घरात शोधून पण बिस्कीट आणि चुरमुरे याशिवाय काहीच सापडले नाही. यासगळ्यात रुहीला जोरात रडू यायला लागले. ती बोलू लागली ...
" बाबा , आपण खूप वाईट आहोत ना ...मम्मा आपल्या साठी किती काम करायची. सगळ्या गोष्टी आयत्या आणून आपल्या हातात द्यायची. स्कूल मधून आलो कि लगेच आमच्या आवडीचे खायला बनवून द्यायची. आपली सगळीच कामे आणि घरातील पण इतर काम तिचं करायची. आपण मात्र सतत तिला बोलत असायचो कि मम्मा , तु नेहमी घरी असते. "
" i really feel sorry for her. आपण खूप चुकलो ना बाबा ..आपण तिला आता जॉब सोडून घरीच रहायला सांगूया .."
" हो बाबा , मम्मा घरी आली कि सगळ्यात पहिले म्हणूया आपण तिला सॉरी म्हणूया आणि तिला जॉब सोडण्यासाठी रिक्वेस्ट करूया." ईशान रुहीच्या सुरात सुर मिळवत म्हणाला.
मनीषला देखील आपल्या चुकीची जाणीव झाली. शर्वरीने आयुष्यात मुलांसाठी आणि त्याच्यासाठी किती अडजस्टमेन्ट केली याची देखील जाणीव त्याला झाली. आता आपण शर्वरीसाठी काही तरी करायला हवे असं त्याने मनोमन ठरवले. त्यामुळे समजावणीच्या सुरात मुलांना तो म्हणाला ..
" मम्माला जॉब सोडायला सांगणे म्हणजे आपला स्वार्थीपणा होईल ना बाळा , तिने तुमच्या काळजीसाठी तिची इतक्या मोठ्या पदावरची नोकरी एका क्षणात सोडली. आता ती पुन्हा नव्याने काही तरी करू पाहते आहे आणि त्यात सुद्धा आपण तिला त्रास द्यायचा हे चुकीचं आहे ना ..! आपल्याला इतके सेल्फिश नाही व्हायचे आहे. त्यामुळे मम्माला सॉरी म्हणून आपण तिला आता प्रत्येक गोष्टीत हेल्प करायची आहे..."
मनीष , रुही आणि ईशानने सगळे घर नीटनेटके आवरले आणि डायनिंग टेबल छानसा सजवून कॅण्डल लाईट डिनरचे मस्त सरप्राईज शर्वरी साठी प्लॅन केले.
सायंकाळी शर्वरी घरी आली तर घराचे पालटलेले रूप पाहून ती आश्चर्यचकित झाली. आल्या आल्या रुही आणि ईशानने तिला घट्ट मिठी मारली आणि ते बोलू लागले...
" i am really very very sorry , मम्मा
आम्ही चुकलो . तु आमच्यासाठी किती कष्ट करायची पण आमच्या ते कधीच लक्षातच आले नाही. तु नसतेस तेव्हा मात्र आम्हाला काहीच काम जमले नाही. "
त्याचवेळेस मनीष देखील पुढे बोलू लागला ..
" मला पण माफ कर शर्वरी , मुलं तर लहान आहेत पण तु केलेले कष्ट , तु केलेले कॉम्प्रमायजेस हे सगळे मी तर पाहिले आहेत. तरीही मी तुला गृहीत धरले. त्याबद्दल खरंच मला माफ कर. अवघ्या चार दिवसात तु करत असलेल्या कष्टांची कल्पना आम्हाला आली.पण आता मात्र आम्ही तुला सगळ्या कामात मदत करयची ठरवली आहे. तुझे हरवलेले अस्तित्व पुन्हा शोधण्यासाठी आता आम्ही तुला मदत करणार आहोत. हो कि नाही ..रुही आणि ईशान ..."
हे सगळे ऐकून मात्र रुही बोलू लागली ..
" मम्मा , बाबा आणि ईशानदादा रेडी आहेत तुला जॉब करू देण्यासाठी पण तु नको ना जाऊस जॉबला ...i really need u ..ईशानदादाला पण तु घरी हवी आहेस. "
" सांग ना रे ईशान दादा , आम्ही किती लोनली फील करू तु रोज घरी नसणार तर ...."
" प्लीज ..मम्मा .. तुला आम्ही महत्वाचे नाही का ग मम्मा ..." हे बोलताना रुहीच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहू लागल्या.
आपल्या लेकीला रडतांना पाहून शर्वरीला राहवले नाही आणि रुही , ईशानला जवळ घेऊन ती बोलू लागली ...
" तुम्ही तर माझ्यासाठी प्राईजलेस आहात बाळांनो. U are precious gems for me. तुम्हाला सोडून मी जॉबला कशी जाणार ..? नाही जाणार... हा पण आता मला देखील काहीतरी नवीन करून दाखवायचे आहे म्हणून घरीच राहून सायंकाळचे तीन तास मात्र मी ऑनलाईन कोडींग चे क्लासेस घेणार आहे. तेवढा वेळ तर मम्माला हेल्प करणार ना ..."
शर्वरीचे बोलणे ऐकून रुही आणि ईशानने तिला घट्ट मिठी मारली. मायलेकरांचा हा मायेचा सोहळा पाहून मनीष गालातल्या गालात हसत होता आणि स्वतःशीच गुणगुणत होता ...
" प्रेम तुझे आहे आई
या जगाहूनी भारी ....!
म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी ....! "
समाप्त.
कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद !🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels & google
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box