घाबरलेल्या बाबाची कहाणी!!

 


घाबरलेल्या बाबाची कहाणी!!

© Velvet Kavisha


आज सकाळपासूनच रोहनचं चित्त 

थाऱ्यावर नाहीयं. 

त्याला जाग आली तिच मुळी आईच्या फोनने. आईचा घाबरलेला आवाज ऐकून 

त्याच्याही काळजात धस्स झालेलं.  

तो प्रायव्हेट कारने पोहोचलाय आता हॉस्पिटलमध्ये.

"कुठेयं तन्वी?" आईचा हात हातात घेऊन त्याने विचारलं. 

"आताच नेलयं ओ टी मध्ये. 

डॉक्टर तुझीच वाट बघताहेत. 

जा भेटून घे त्यांना लगेच." तो धावलाच डॉक्टरांच्या केबिनकडे.  


"असं काय झालं अचानक डॉक्टर??" - -  रोहन.


"बाळ खाली सरकलं आहे. 

फिरत नाहीय. आणि कळा सुरू झाल्यात. 

It's labour pain.."  डॉक्टर म्हणाल्या.


"पण नववा महिना तर कालच लागलाय ना डॉक्टर ...??" - -  रोहन.


"हो. तन्वीच्या बाबतीत सगळंच unpredictable आहे." - - डॉक्टर.



"डॉक्टर तुम्हाला काय वाटतं ?? 

सगळं नीट होईल ना??" 

 त्याने धास्तावून विचारलं. 


"हो. आपण प्रयत्न करू. 

सी टाईप डिलिव्हरीसाठी फॉर्मवर आईची सही घेतलीय. 

पुर्ण दिवस भरले नाहीत तर फुफ्फुसे डेव्हलप झालेली नसतात.

मी आल्या आल्या dexa  इंजेक्शन दिलय.  

थोडा अंदाज होता म्हणून परवा ही एक dexa दिलं होतं. 

बाळ रडलं नाही तर NICU ला शिफ्ट करावं लागेल. 

आपल्याकडे NICU ची सोय नाही. 

त्यामुळे दुसरीकडे हलवावं लागेल. 

आम्ही त्या हॉस्पिटलची अॅम्बुलन्स मागवून ठेवलीयं. Let's see.."  

डॉक्टरांनी समजावून सांगितले...


"काळजी करण्यासारखं काही..??"

 रोहनने घाबरत विचारलं. 


"बाळाचे heart beats अजून तरी नॉर्मल आहेत. 

तन्वीचं ब्लडप्रेशर थोडंस वाढलं असलं तरी धोकादायक नाही.. 

आपण आपले सगळे प्रयत्न करू. 

तुम्ही थोडं रिलॅक्स व्हा." - - डॉक्टर.


डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्या  

रोहन ओटीसमोर असलेल्या बाकड्यावर बसला. 

या डॉक्टर मॅडम तन्वीची मैत्रीण. 

पुर्ण काळजी घेऊन करतील सगळं यात शंकाच नाही. 


"देवा..!! सगळं नीट होऊ देत." 

रोहनने स्वतःच्या नकळत देवाला हात जोडले. 

डोळे मिटून डोकं मागे टाकत रेलून बसला. 


तन्वी रोहनची बायको. 

आठ वर्षांपूर्वी वयाच्या अठ्ठाविशीत त्याचं लग्न झालं.  

ती सव्वीसची. 

दोघेही नोकरदार. 

वर्ष नवलाईत  गेलं. 

संसाराच्या वेलीवर फूलं असावं असं दोघांनाही वाटलं. 

मनासारखं झालं. 

घरात गोड बातमी आली. 

सगळा आनंदीआनंद.  

सूनेचं कोडकौतुक करण्यात सासूबाई बिझी होऊन गेल्या. 

पाच महिन्यांपर्यंत रेग्युलर फॉलोअप सुरू होतं. 

सहाव्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात anomaly scan करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. 

रिपोर्ट आले. 

दोघेही डॉक्टरांकडे पोचले. 

रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली..


"हे बघा मिस्टर आणि मिसेस रोहन, 

आपण योग्य ती मेडिसीन देत होतो. 

फॉलोअप ही वेळच्या वेळी घेत होतो. 

हे रिपोर्ट आपल्याला असं सांगतात की, बाळाच्या मणक्याची वाढ नीट झालेली नाही. 

हे बाळ जन्माला आलं तरी ते पुर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असेल. 

मेंदुची वाढ ही झालेली नाही.  

मणक्यातील मज्जारस बाहेर येऊन कुबडासारखं झालेलं आहे. 

बाळाच्या हृदयाचे ठोके कमी जास्त होत आहेत. 

बाळ नऊ महिने पोटात वाढेल की नाही हे सांगता येत नाही. 

ते जगेल याचीही शाश्वती नाही. 

एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला अॅबॉर्शनचा सल्ला देतेय. 

गर्भ पाच महिन्यांचा आहे.

त्यामुळे काही कायदेशीर बाबी पुर्ण कराव्या लागतील.

तेवढ्या करून घ्या. 

तुमच्यासाठी हे धक्कादायक वास्तव असलं तरी तुम्हाला आधी कळलंय त्यामुळे तुम्ही त्या बाळाची परवड थांबवू शकता.  

माझ्याबाजूने मी सगळे प्रयत्न करेन. 

तुम्ही तुमचा निर्णय काय तो घेऊन तसं मला कळवा." 


रोहन आणि तन्वी पुतळ्यासारखे बसून होते. डॉक्टरांच बोलणं कानांनी ऐकलं होतं पण मन मानायला तयार नव्हते. 

"हे खोटं आहे." असंच सांगत  होतं. 

दोघांनी बाळाची खुप स्वप्ने पाहिली होती. 

खुप गप्पा मारल्या होत्या. 

बाळाची हालचाल अनुभवली होती.  

आई-बाबा होण्याच्या प्रवास आता थांबणार होता. पाच महिने जीव लावलेला अव्यक्त, अस्पष्ट जीव अकालीच जाणार होता. 

रोहनने डोळे पुसले.

डॉक्टरांकडे पाहत "सांगतो आमचा निर्णय" म्हणत  तन्वीच्या खांद्यावर हात ठेवला. 

त्या स्पर्शाने आतापर्यंत सुन्न होऊन बसलेल्या तन्वीचा बांध फुटला. 

दोन दिवसांत पून्हा टेस्ट करून सेकंड ओपिनियन घेऊन कन्फर्म केलं. 

रोहनने स्वतःला सावरत तन्वीची समजूत घातली.  

अॅबॉर्शन झालं. 

एका दिवसात भरली बांधलेली ती रिती झाली फुटलेला पान्हा सावरत. 


"का रे हा परमेश्वर असा...?? 

थोडी उशिरा झोळी भरली असती तरी चालली असती. 

पण असं अर्ध्यातल्या रिकामेपणाचं काय करू??

आई-बाप म्हणून आपण नाकारले गेलोय की 

त्या मुक्या जीवाला आपण नाकारलंय...?? 

देव नक्की माझी ओटी भरेल ना पुन्हा की..." 

तिचा आक्रोश रोहनला सहन होत नव्हता.   

त्याचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती पण तो पुरुष ना.. 

ढसाढसा रडून व्यक्त होणं त्याच्या नशिबी नाही. आणि तो रडला तर तन्वीला कोण सावरणार...!! 

ते बाळ तिच्या शरीराचं भाग होतं. 

तिचं दुःख मोठं होतं. 

तिला सावरायला हवं.  

"पुढच्या वेळेस आपण चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊ.. 

वाटल्यास आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही घेऊ. 

फक्त तू सावर स्वतःला." 

त्याने तिला जवळ घेत समजावलं. 

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तन्वी काही दिवस आईकडे गेली.  

सव्वा महिन्यानंतर ऑफिस जॉईन केलं. 

थोडी रमली. 

वर्ष असंच निघून गेलं. 

तन्वीची एक मैत्रीण नलिनी. 

तिला तन्वीबद्दल सगळं माहिती होतं. 

तिने तन्वीकडे बाळाचा विषय काढला. 

"खुप भिती वाटते गं." या तन्वीच्या उत्तरावर तिने खुप धीर दिला.

नलिनीची मैत्रीण gynecologist होती. 

तिने तन्वीला तिच्याकडे नेलं. 

सगळी हिस्ट्री चेक करून डॉक्टर मॅडमनी तन्वीची भीती दूर केली.  

काही मेडिसीन सूरू केले. 

मॅडमच्या सल्ल्याने सगळं ठीक झालं. 

नोकरी तर प्रेग्नंसीच्या पहिल्या महिन्यातच सोडली होती. 

नऊ महिने बेडरेस्ट घेऊन तन्वीने एका गोड परीला जन्म दिला. 

Labour pain सुरू झाल्या तसं तन्वीचं ब्लडप्रेशर वाढलं. 

नाईलाजाने सिझर करावं लागलं होतं. 

तरीही तन्वी खुश होती. 

दुसऱ्या दिवशी उठून बसत तिसऱ्या दिवशी चालू लागली होती. 

परीला छातीशी कवटाळून खुप वेळ बसली होती.  

हजारदा मॅडमचे आभार मानून झाले होते. अॅबॉर्शनवेळी बत्तीस धारांनी वाहणारा पान्हा औषधांनी बंद करावा लागला होता. 

यावेळी मात्र पान्हा फुटलाच नाही. 

लॅक्टोजन पावडरचं दूध बाळाला देण्यात आलं. 

बाळाचं तोंड लागलं की पान्हा येईल या आशेने तन्वी नेहमी बाळाला दुधाला घ्यायची. 

सहा महिन्यांपर्यंत पावडरचं दूध पिऊन मग नाचणी सत्त्व सुरू करुन हळूहळू परीला अन्नाची सवय लागली.  

परी सगळ्यांच्या प्रेमात मोठी होत होती. 

घरातल्या सर्वांच्या गाठीशी पहिला अनुभव होता. त्यामुळे परीला जास्तच जपलं गेलं. 

कोणीही तिला पडूसुध्दा देत नव्हतं. 

तळहाताच्या फोडासारखी जपली जात होती. 

घरी येणारे पाहुणे, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी "आता परीला भाऊ येऊ द्या." म्हणू लागले.


तन्वी भावंडात वाढलेली. 

परी तीन वर्षांची झाली आणि आपल्याला अजून एक बाळ असावं असं तन्वीला वाटू लागलं.  

मुलगा मुलगी काही असो. 

पण एकाला एक भावंडं हवंच. 

तिने रोहनला बोलून दाखवलं तसं. 

त्याने सपशेल नकार दिला. 


"एकच लेक बास झाली. 

तू काही मुलं जन्माला घालणारं मशीन नाहीस. 

एका प्रेग्नंसीत स्त्रीच्या शरीराची खुप झीज होते. दुसरं मुल नकोच." 

रोहनने निक्षून सांगितलं. 


बर्थ कंट्रोलसाठी तो स्वतःच प्रिकॉशन घेत असल्याने तन्वीचं तसंही काही चालणार नव्हतं.  

परीच्या जन्मानंतर डॉक्टर मॅडमशी तिची छान गट्टी जमली होती. 

तिने दुसऱ्या बाळाचा विचार मॅडमना सांगितला. 

त्यांनीही काही टेस्ट करून तन्वीला ग्रीन सिग्नल दिला. 

तिने रोहनचं मन वळवायचं ठरवलं.  

तो काहीच ऐकायला तयार नव्हता. 

तन्वीने त्या विषयावर बोलणं सोडून दिलं. 

मात्र मनात काही प्लॅन आखत होती. 

योगा, प्राणायाम सुरू होतं. 

सकस आहार घेत तब्बेतीकडे लक्ष दिलं होतं. 


अशात वर्ष सव्वा वर्ष निघून गेलं.  

एकदा पंधरा दिवसांच्या वर्क टूरनंतर रोहन चार दिवसांसाठी घरी आलेला. 

Marriage anniversary होती. 

सेलिब्रेशन छान झालं. 

तो मूडमध्ये होता. 

रात्री जवळ येताच "आज प्रिकाॅशन नको. 

तसेही सेन्सेंटिव्ह दिवस कधीच संपलेत." म्हणाली. तिच्या बोलण्यात रोहन फसला. 

चार दिवसांचा संग पुढची पाळी चुकवण्यात यशस्वी झाला.  

आणि दुसऱ्या बाळाची चाहूल लागली. 


तन्वीने "रागावणार नाही" 

असं वचन घेत आपण खोटं बोलल्याचे रोहनला सांगितले. 

काय करणार होता तो...!! 

डॉक्टरांच्या फेऱ्या सुरू होत्या. 

तन्वी आनंदात होती. 

पोटातलं बाळ वाढत होतं. 

तिसऱ्या महिन्यात उलट्यांचा कहर झाला. 

बीपी लो झालं आणि तन्वीला पहिल्यांदा हॉस्पिटलाइज केलं.  

सोनोग्राफी केल्यावर गर्भाशयाचं तोंड उघडं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 

रोहनच्या पोटात गोळा आला.  

बीपी आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्यावर स्टिचेस टाकायचं ठरलं. 

दहा दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. 

घरी पुर्ण काळजी कशी घ्यावी हे डॉक्टरांनी समजावून सांगितलं.  

Head Low पोझिशनमध्ये तन्वीला आता पूर्ण बेडरेस्ट. 

बरेचसे मेडिसीन high range.  

सगळेच काळजीत. 

तन्वीने काही खाल्लं तरी त्रास व्हायचा तिला. 

खुप धैर्याने तिने सहन केलं.  

सगळी पथ्य, डॉक्टरांचे सल्ले तंतोतंत पाळले. 

तरीही आतापर्यंत तिला आठ वेळा अॅडमीट करून झालंय. 

परवाच डॉक्टरांना भेटून काळजीचं काही कारण नाही कळल्यावर तो नाशिकला गेला होता. 

सकाळीच आईच्या फोनने भिरभिरत तो आता इथे येऊन पोचला.

तन्वीला खुप वेळा अपराधी वाटून गेलं होतं.

 भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे सगळेच काळजीत होते. 

काही भलतंच झालं असतं 

तर सावरणं कठीण होतं.  

आईने देवाला वेठीस धरलं होतं. 

जिथे जाईल तिथे हात जोडून प्रार्थना करत होती. 


"माझ्यामूळे सगळ्यांच्याच 

जीवाला घोर लागला रे. 

वाटलं नाही इतकं सगळं होईल. 

पण आपलं पिल्लू fighter आहे. 

सगळ्या परिस्थितीवर मात करतंय. 

एक एक दिवस मोजत नवव्या महिन्यापर्यंत आलोय आपण. 

आता काळजी नाही." परवाच तन्वी बोलली होती रोहनला.  


"आपण प्रयत्न करु. सगळं नीट होईल." 

असं जरी डॉक्टर म्हणाल्या असल्या तरी रोहनचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. 

मिटल्या पापण्यांसमोर त्याला सगळं लख्ख दिसत होतं. 

"बाळा, तु सुखरूप रहा आणि आईलाही वाचव." त्याने आपल्या पोटच्या गोळ्याला साकडं घातलं. तेवढ्यात ओटीमधून टॅऽहॅ टॅऽहॅ चा आवाज कानावर पडला. 

"Thank god." म्हणत तो उठून आईकडे गेला. 


"बाळ आणि आई दोघेही ठीक आहेत. 

बाकीचं मॅम सांगतील." ओटीतून एक नर्स बाहेर येऊन सांगून निघून गेली.  

रोहनच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. 

गेल्या नऊ महिन्यांचा स्ट्रेस त्या पाण्यातून निघून जात होता. 


पाऊण तासाच्या प्रतिक्षेनंतर मॅडमनी रोहनला कन्सल्टिंग रुममध्ये बोलावलं. 


"मिस्टर रोहन, तुम्हांला मुलगी झालीय. 

कमी दिवसांचं असल्याने बाळाचं वजन दोन किलो आहे. 

बाळ जन्मल्यानंतर जोरात रडलंय त्यामुळे टेन्शनचं काही कारण नाही. 

मुलांच्या डॉक्टरांनी बाळाला तपासलं आहे. 

ते तुमच्याशी बोलतील त्या बाबतीत. 

तन्वीला मात्र थोडे दिवस विकनेस जाणवेल.  

आपण सगळेच टेन्शनमध्ये होतो मागचे काही दिवस. आता थोडं रिलॅक्स व्हा." 

म्हणत मॅडम हसल्या.


"मॅम, तुमच्यामुळे आम्ही या सगळ्यात तग धरून राहिलो. थॅंक्यु सो मी." रोहनने हात जोडले.


तेवढ्यात नर्सने बाळाला आणि आईला रुममध्ये शिफ्ट केल्याचं सांगितलं. 

"या मिस्टर रोहन, 

बाळाला आणि तन्वीला भेटून घ्या." 

म्हणत मॅडम उठून रुमकडे चालू लागल्या. 

आई आणि रोहन त्यांच्यामागे चालत रुममध्ये पोहोचले.  

मॅडमनी बाळाला रोहनकडे दिलं. 

त्याने तन्वीकडे पाहिलं. 

ती  ग्लानीत होती. 

चेहऱ्यावर थकवा दिसत होता. 

बाळुत्यात गुंडाळलेल्या इवल्याशा जीवाला रोहनने छातीशी घट्ट धरलं. 

डोक्याला बांधलेल्या टोपऱ्यावर ओठ टेकवून गोड पापा घेतला आणि आईकडे दिलं.


रोहनने रुममधून निघणाऱ्या मॅडमना थांबवत, "मॅम, उद्याची अपॉइंटमेंट मिळेल का मला..?" विचारलं.


"कशासाठी.‌??" 


"माझं नसबंदीचं आॅपरेशन करून घेतो. 

उद्या तुमच्या मैत्रिणीला दोन बहिणींना भाऊ असावा असं वाटू शकतं. 

उगाच रिस्क नकोच.."  

रोहनने सांगितलं आणि रुममध्ये एकच हशा पिकला. वातावरण प्रसन्न झालं. 

हसण्याच्या आवाजाने बाळं दचकून रडू लागलं. 


रोहन बाळाकडे जात, 

" पिल्ल्या, तुझ्या आईच्या जीवघेण्या हट्टामुळे आज तू आमच्या आयुष्यात आहेस. 

नाहीतर आज मी माझ्या अजून एका लेकी पासून दूर राहिलो असतो. 

परमेश्वराने तुझ्या रूपाने सुख व्दिगुणित केलंय. 

परी दिदीला हक्काची बहिण मिळाली. 

आता सगळं छान होईल." 

म्हणत त्याने तन्वीच्या डोक्यावरून हात फिरवला. 


इति घाबरलेल्या बाबाची कहाणी सफळ संपूर्ण...


समाप्त - -

© Velvet Kavisha

Post a Comment

0 Comments