अश्शा नणंदा सुरेख बाई..!
© Velvet Kavisha
रश्मी माझी मैत्रीण. पहिल्या दोन प्रेग्नन्सींच्या मध्यातच बाळांनी नाकारलं. आई होण्याचं सुख हिरावलं गेलं आणि ती डिप्रेशनमध्ये गेली. एकदा टेरेसवर जाऊन उडी मारायचा अंदाज घेत असतानाच नवरा हजर झाला. त्याच्या लक्षात आलं की, दुःख खोलवर आहे. आपण वरवर समजावून जमणार नाही. त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला.
त्यांनी मानसोपचारतज्ज्ञांचं नाव सुचवलं. सोबत मेडिटेशन, नामस्मरण आणि योगा ही सांगितला. रोज पाच positive thoughts वाचायला सांगितले. नवरा संध्याकाळी कामावरून येऊन आदिवासी पाड्यांवर नेऊन आणायचा. निसर्गाच्या सान्निध्यात, कुडाच्या झोपडीत आनंदाने राहणारी कुटुंब पाहून तिला ही आनंद व्हायचा.
सहा महिन्यांची मानसोपचारतज्ज्ञांची ट्रिटमेंट घेऊन ती या साऱ्या डिप्रेशनमधून बाहेर पडली. पुन्हा कधीही त्यात न फसण्यासाठी. पण आजुबाजुचे लोकं आठवण करून देत राहिले. आवर्जून विचारायचे " दोन मुलं गेली ना तुझी." तर कोणी म्हणायचं, " खोडंच लागली हो तुझ्या कुशीला", "देवाचं असेल तर बघा काही" , " माहेरचं असेल तर बघा" , " हाजी मलंगला चादर चढवा." , " हडपीड गावात एक मंदिर आहे. तिथे नवस बोला. मुलं झालं की ऐपतीप्रमाणे चांदीचे, पितळेचं पाळणं नेऊन बांधा.", कोणी मुल्लाचा पत्ता दिला तर कोणी भगताचा. तिच्या नवऱ्याचा गणपतीबाप्पा आणि डॉक्टरांवर विश्वास. हार्मोन्सचा प्रॉब्लेम झाला आणि दोन बाळं गमावली. प्रत्येक वेळी कारण वेगळं होतं.
लग्नानंतर तीन वर्षांत हिची दोन मुलं गेली होती. शेजारी भाड्याने राहणाऱ्या बाईला मुलगा झाला. सहा महिन्यांचा झाला तेव्हा त्याला घेऊन ती इकडे आली. कधीं कधीं हिच्या घरी यायची पण बाळाला कोणाकडे देत नसे. ही बाहेर गेलेली असताना कधीतरी मुलाला हिच्या सासुबाईंकडे सोडून जायची. हिने कधी घेतलंच उचलून तर त्याची भूकेची वेळ झाली म्हणत घेऊन जायची.
त्याच दरम्यान वर्षभरापूर्वी लग्न झालेली तिची नणंद श्वेता बाळंत झाली. श्वेताचं बाळंतपण सासरी झालं. सव्वा महिन्यांनी बाळाला घेऊन श्वेता माहेरी आली. घरात बाळ आलं आणि हिच्या आयुष्यात आनंद आला. बाळानेही मामीला लळा लावला. घरात बाळाचं असणंही सुखावून गेलं. त्यात हिला हिच्या कुशीने तिसऱ्यांदा जाणीव दिली. आधीचा धसका उरात दाबलेला.
दोन महिने राहायला आलेली नणंद आग्रहाखातर चार महिने राहिली. नणंद सासरी जायला निघाली आणि ही पुन्हा भावूक झाली. नणंदेच्या लक्षात आलं. एका आठवड्यांनी बाळासहीत येऊन ती आठ दहा दिवस राहून जाऊ लागली. घरातील चैतन्य तसंच ठेवण्यात येवू लागलं. नऊ महिन्यांनी छोट्या परीचं आगमन झालं.. तिला पाहून सगळेच आनंदले. नणंद ही भरून पावली...
ही एकच नाही तर तिला तीन नणंदा. मोठी ही आपल्या परीने उभारी द्यायचा प्रयत्न करायची. तर धाकटी मी आत्या झाल्याशिवाय लग्न करणार नाही म्हणून declare करून बसलेली. हा एक प्रसंग पण इतर बाबतीत ही कधी पोरींचा त्रास नाही माहेरी. माहेरून कशाची मागणी नाही. मला हेच हवं तेच हवं असा हट्ट नाही. उलट सासरी जाताना आईलाच पैसे देऊन जातील.
हिच्या सासऱ्यांची मिल बंद झाली. ते घरी बसले. मग घरोघरी लोणचे पापड विकून चार पैसे घरात येऊ लागले. पोरींनी लवकरच भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. मोठी बारावी शिकून नोकरीला लागली. दुसरीने ही तेच केलं. पण तिने मात्र आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. भावाला (हिच्या नवऱ्याला) शिकायचं होतं. "दादा तु शिक" म्हणत भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तो B.sc MBA झाला. अर्थात त्यानेही नोकरी करत MBA पुर्ण केलं. झोपडपट्टीतून चांगल्या सोसायटीत राहायला येताना लागणाऱ्या डाऊन पेमेंटमध्येही धाकट्या दोन्ही बहिणींनी हातभार लावला. काटकसरीने राहून स्वतःच्या लग्नासाठी लागणारी रक्कम जमा करून ठेवलेली. त्याच पैशात लग्न झाली त्यांची. थोडाफार खर्च भावाने केला.
आता परिस्थिती सुधारली. भाऊ कमवता झाला.. तरीही भावाकडून अपेक्षा नाही. भावाच्या मुलांसाठी नेहमी हात वर त्यांचा. हिने आम्ही एकच मामा मामी भाच्यांना, म्हणून कौतुकाने काही घ्यावं तर हिच्या मुलांसाठी नणंदाकडूनही काही आलचं समजा. बरं त्यांना एक एक मुलं, हिला दोन...
त्या तिघी. पण कधी आईचे (हिच्या सासूचे) कान भरले नाहीत. हिची सासू कधी काही मुलींकडे बोललीच तर, "आहेत ना दादा वहिनी. करतील सगळं नीट... तु नको टेन्शन घेऊ" असा सल्ला आईला....
बरं कुठे फिरायला निघाले की सगळी कुटुंब सोबत.. तरीही कोणा एकावर भार नाही. सगळीकडे TTMM.. आत्या हिच्या मुलांच्या लाडक्या आणि मामी त्यांच्या मुलांची लाडकी. कधी यांनी खर्चासाठी पुढे व्हावं, तेव्हा त्यांनी प्रेमाने नाकारावं...
मोठ्या नणंदच्या मुलाला admit केलेलं. मामा भाच्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला. निघताना बहिणीच्या हाती दहा हजार देऊन आला. महिन्यांनंतर मोठी नणंद राहायला आली. जाताना प्रेमाने भावाने हॉस्पिटलमध्ये दिलेले दहा हजार आईच्या हातात देऊन गेली. 'सध्या आहेत. लागले तर नक्की मागून घेईन' सांगून...
एका नणंदेला गावी घर बांधण्यासाठी जागा हवी होती. हिच्या नवऱ्याचीच जागा घेतली. नणंदेचं नावंही भावाच्या सातबाऱ्यात. तरीही भावाला जागेचे पैसे दिले. इतका काटेकोर व्यवहार. दादा वहिनींनी मग बाजारभावापेक्षा थोडे कमी पैसे घेतले.
सगळ्या नणंदा मुलांच्या सुट्टीत माहेरी येतात. जेवणाच्या मस्त पंगती उठतात. छान पदार्थ बनले जातात. हास्याचे कारंजे आणि विनोदाचे फवारे उडतात. कोणी म्हणणार नाही की ह्या नणंदा भावजय आहेत.
एकदा सगळ्यांसोबत जेवायला ओळखीच्या काकुंना बोलावलं. काकू पडल्या खान्देशी. सगळे गोल करून जेवायला बसले. ज्याला जे हवे ते तो वाढून घेत होता. काकू रश्मीला म्हणाल्या," अगं नणंदांच्या ताटात वाढ तरी. आमच्याकडे नणंदेचं ताट वाढून हातात द्यावं लागतं."
"नको हो काकू. आम्ही घेतो आमच्या हाताने जे पातेलं लांब आहे त्यातलं वाढतंच ना कोणीतरी. आम्ही कुठेही गेलो तरी असेच बसतो जेवायला." रश्मीची नणंद श्वेताने सांगितलं.
"खरंच भारी आहेत गं रश्मी नणंदा तुझ्या" काकू अवाक् होत म्हणाल्या. आता जेव्हा कधी घरी येतात तेव्हा तिच्या नणंदांबद्दल भरभरून बोलतात.
पोरी माहेरी येतात तेव्हा सुट्टी फक्त आठ दिवसांची असते. त्यातही एक वेळ ढाब्यावर जेवण ठरलेलं. या आठ दिवसांत कोणी केक, तर कोणी आईस्क्रीम, कोणी मसाला पान, कोणी एखादा चायनीज पदार्थ, कोणी फालुदा मिल्कशेक अशा वेगवेगळ्या फर्माईशीचे स्पॉन्सरर असतात. धाब्यावरचं बील पाच-सहा हजारांच्या घरात जातं ते मात्र सगळेजण मिळून कॉन्ट्रीब्युट करतात.
अशाच नणंदा सुट्टीत आलेल्या असताना एकदा ही म्हणाली नणंदांना "काय सारखी परतफेड करत राहता छोट्या छोट्या गोष्टींची ?? " तर म्हणाल्या "तुम्ही आईला सन्मानाने वागवता. आम्हाला कधी काळजी नाही वाटतं तिची. म्हणून आम्ही आमचा संसार सुखाने करतोय. आम्हाला काही नको. परमेश्वराने सगळं दिलयं. आपुलकीने माहेराची ओढ लागते आम्हांला. हेच खुप आहे आमच्यासाठी. आईला सुखात पाहिलं की समाधान मिळतं."
"तुमच्याकडून आमच्या संसाराला काही घेतलंच तर ते किती दिवस पुरणार आहे. त्यापेक्षा आम्ही आमचा संसार आमच्या मिळकतीवर चालवणंच योग्य नाही का...?? नात्यात देणंघेणं, व्यवहार आले की ओलावा कमी होतो नात्यातला. आई किंवा तुम्ही कधी माहेरुन काही घेत नाहीत मग आम्हीही घेणार नाही...." पोरींच्या अशा पावित्र्यामुळे सासरच्यांची ही काही मागायची हिंमत होत नाही. घरच्या लोकांना त्या माहेरापर्यंत पोहोचू देत नाही काही मागण्यासाठी. रश्मीच्या करारी स्वभावाचा वचक नणंदांच्या सासरी चांगलाच आहे.
एकमेकांत विचारविनिमय पण मस्त. सगळ्यांना एकमेकींचं सगळं माहिती. एखाद्या प्रॉब्लेमवर, तोडगा काढण्यातही पोरींचा हातभार. भावाला खंबीर साथ. वहिनीचाही सल्ला आणि मत. सगळ्याची उत्तम देवाणघेवाण. ही सुद्धा क्रुतक्रुत्य. नातं मैत्रीचं..
हे इतकं सुंदर चित्र आणि नातं असलं तरी प्रत्येकाच्या घरात काही न काही प्रसंग घडत असतात. एकमेकांच्या मदतीला धावून जात हे सगळेजण त्यातून निभावून जातात.
तिचं ऐकून घेतलं आणि " छान आहेत हो तुझ्या नणंदा.. एकदम भारी" असं म्हटल्यावर ती उचकली.... " ए बाई माझ्या नणंदाना नजर लावू नकोस हं, आधीच सांगून ठेवते.."….
बाब्बो...🙆 आता हिच्या नणंदाना मी कशाला नजर लावू...??? माझ्याकडे पण एकदम भारी नणंदा आहेत.. हिच्या नणंदाना मागे टाकतील अशा..
मी वटपौर्णिमेला वडाला फेऱ्या मारताना दोन जास्तीच्या फेऱ्या नणंदा आणि आईंसाठी मारते. या उपवास आणि पुजेमुळे पुढचे सात जन्म जर हाच नवरा मिळणार असले तर family पण हीच हवी बाब्बो आपल्याला. कारण आपलं कसं सगळं grand scale वर असतं ना राव...
काय समजलात.. 🤔🤔
© Velvet Kavisha

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box