शीऽऽ गप्पा



शीऽऽ गप्पा

© Velvet Kavisha

एका मैत्रिणीने गृपवर प्रॉब्लेम सांगून सोल्युशन मागितले. प्रश्न होता... 

"मी जेवायला बसले की लेकीला शी येते. त्यात इतका वेळ जातो की, पुन्हा ताटावर बसायची इच्छा होतं नाही. हल्ली दोन्ही वेळेस असंच होतंय. काय करू सांगा...??" 


"अगं डायपर घालायचं ना...??" अविवाहित मैत्रीण.


"तुला काय वाटतं?? मी डायपरचे खुप पैसे वाचवते?? घालते गं तिला डायपर. पण शी आली की तिला काय वेगळं जाणवत कळत नाही. शीऽऽ शीऽऽ  करत घरभर फिरते. थांब दोन मिनीटे म्हणेस्तोवर निकर खाली ओढून आतलं डायपर उलटवलेलं असतं आणि नंतर जो काय राडा होतो रे देवा..!! म्हणून मी हल्ली शीऽऽ ची पहिली आरोळी ऐकली की धावत सुटते." शी पिडीत मैत्रीण.  


"मुलांच्या शी ची वेळ आईच्या जेवणाच्या वेळेसोबत कशी काय मॅच होते..?? हा युनिव्हर्सल प्रश्न आहे." खुप कमी बोलणारी एक मैत्रीण. 


"सिनियर लोग हा प्रॉब्लेम साधारण किती वर्षांपर्यंत असतो सांगाल का?? .. कारण माझी लेक आताशी दोन वर्षांची आहे. मला मानसिक आणि शारीरिक तयारी करावी लागेल ना..??" पुन्हा तीच शी पिडीत मैत्रीण.  


"बाई गं, यात स्नेहल अखिला अन्वितची पीएचडी झालीय. तिने दोन वर्षांपूर्वी लेख लिहिला यावर आणि तो खुप चालला. त्यामुळे तू तिला विचारू शकतेस. तिला काही शोध लागला असेल तर ती सांगेल तुला.." एकीने सांगितलं.


"हे बघा, लेख लिहिला तेव्हा माझा मुलगा तीन वर्षांचा होता. आता साडेपाच वर्षांचा झालाय तरीही परिस्थिती बदलली नाही. जेवायला बसले की त्याला शी येते.  आता सगळं स्वतः करतो तरी त्याला टॉयलेट बाहेर "आई" उभी लागते. शिळोप्याच्या गप्पा मारायच्या असतात. आणि "टॉयलेट" या जागेचा गुणधर्म तुम्हाला माहितीच आहे. आपल्याला जशा दुनियाभरच्या गोष्टी तिथे आठवतात तशाच माझ्या मुलाला तिथे दोन पायांवर बसला की सगळं आठवतं. शी आटोपली तरी गप्पा आटोपत नाहीत आणि माझा बाहेरच्या पॅसेजमध्ये तोंड हलवणारा पुतळा झालेला असतो. पीएचडी कसली करतेय मी. मला सिलॅबस झेपेनासा झालाय आता..🙄🙄" म्हणत स्नेहलने स्पष्टीकरण दिलं.  


स्नेहलचा मेसेज वाचून मला दोन मुली आठवल्या.  ताईकडे राहायला होते मी. तिच्या समोर राहणारी मुलगी आणि ताईच्या बाजुला राहणारी मुलगी दोघी  मैत्रीणी. झोपडपट्टीत राहायला होतो. टॉयलेट सार्वजनिक. हातात बादली घेऊन बऱ्याच गल्ल्या फक्त चालतच रहायचं. मग कधीतरी ते सरकारी टॉयलेट समोर दिसायचे. संध्याकाळी दोघीही कामावरून घरी यायच्या. गल्लीतल्या नळाचं पाणी भरणं, स्वयंपाक बनवायला मदत करणं इत्यादी कामं उरकून रात्री साडेआठला  दोघी बादल्या भरायच्या. एकीच्या रिकाम्या हातात मेणबत्ती आणि माचिस तर दुसरीच्या हातात टॉर्च. इच्छित स्थळी पोचल्यावर एकजण मेणबत्ती पेटवून आत बसणार आणि दुसरी बाहेरून दिवसभराच्या गप्पा मारणार. मग दुसरी आत जाणार तेव्हा पहिली बाहेर उभी राहून गप्पा मारणार.... 😀😀 त्यामुळे मला स्नेहलच्या शिळोप्याच्या गप्पा डोळ्यासमोर दिसल्या.


पण प्रॉब्लेमवर सोल्युशन मागणाऱ्या मैत्रिणीची तंतरली. 

"म्हणजे अजून कमीत कमी चार वर्षे मला हे करायचं आहे तर...!! 🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️ देवा पांडुरंगा, तूच शक्ती दे रे...!!" शी पिडीत मैत्रीण घायकुतीला येत देवाची प्रार्थना करू लागली. 


तिच्या या मेसेजवर एकीने 😂😂 हसण्याचा ईमोजी टाकला. हसरे ईमोजी पाहून पिडीत मैत्रीणीची सटकली.  

"तू दात काढशीलच ना..?? दोन्ही पोरं सासुबाईंकडे सोडून जातेस ऑफिसला. तुला कुठे पोरांचं करायला लागतं..??" वैतागलेली मैत्रीण. 


"दोन्ही मुलं दिवसभर आजीआजोबांकडून खाऊन, पिऊन, न्हाहूनही घेत पण दोघांना शी मात्र मी रात्री जेवायला बसले की यायची. सासुबाई चांगल्या आहेत माझ्या. त्या पोरांना त्या परीस्थितीतही सांभाळायचा प्रयत्न करायच्या पण ऐकतील ती पोरं कसली..?? त्यांना मम्मीच लागते. "तूच चल" म्हणत भोकाड पसरायचे. धाकटी अजूनही तेच करतेय. अगं म्हणूनच मला हसू आलं की, तुम्ही काही करा पोरांची शी ची वेळ आणि तुमच्या जेवणाची वेळ तुम्ही टाळू शकत नाही." 😂😂😂 ईमोजीबहाद्दर मैत्रिणीने हसत स्पष्टीकरण दिलं.  


एवढी सगळी चर्चा वाचताना माझ्या डोक्यातलं चक्र गरगर फिरत होतं. 


माझी आई म्हणायची गाठीशी पुण्य नसलं की भरल्या ताटावरून उठावं लागतं. आईच्या म्हणण्यानुसार पुण्य कधी साठवणार हो..?? इथे रोज एक कांड होतं. नरक फिक्स आहे आपला. फक्त रौरव नरकात जायला लागू नये याची काळजी घेतोय. लैच वाईट असतो म्हणतात तो रौरव नरक.   


मला आधी वाटायचं, की ज्यांना आपण मागच्या जन्मात खुप छळलंय तीच मंडळी आपल्या पोटी जन्म घेत असावीत. आपण जे स्प्रिंगसारखे लवचिक होतो ते या पोरांच्याच बालराज्यात. कारण पोटच्या पोरांइतकी आपल्याला हाताच्या बोटावर नाचवण्याची कोणात बिशाद नाही. बाकी आपण कोणाला ऐकत नसतो. अगदी आपल्या पोरांच्या बापालाही...😜😜😜  


माझ्या अनुभवावरून मुलांना जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत शी धुण्यासाठी मदत करावी लागते. बाकीची सगळी कामे ते आधीच करु लागतात. ते शीचं जरा लेफ्ट राईट प्रकरण, पाणी कुठून सोडायचं हे समजायला त्यांना वेळ लागतो. 


या विषयात आपण सिनियर. दोन मुलांमागे जवळपास दहा वर्षे आपण शी धुण्याचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. दहा वर्षांची भावनिक गुंतवणूक प्रत्येक आईची त्या शी धुण्यामध्ये असते. एवढ्या सगळ्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर मी मैत्रिणीला सल्ला तर देऊच शकते अगदी easily..😊😊


मी टायपून टाकलं. 

"आपण मुलांना दिवसातून सहा ते सात वेळा जेवू घालतो. आपण मोठी माणसे खासकरून आई मंडळी संध्याकाळी नाश्ता बनवला तर चार वेळा खातो नाहीतर तीनच वेळ. त्यामुळे आपल्या जेवणाची वेळ मुलांच्या दोन जेवणाच्यामध्ये फिक्स करून घ्यायची. आधी आपण जेवण जेऊन घ्यायचं आणि पोराला नंतर भरवायचं... (पोरांच्या आधी कसं जेवायचं हा दरिद्री विचार मनात आणायची गरज नाही. कारण मुलांना आपण सकाळी उठल्यापासून खाऊ घालण्याच्या मागेच असतो.)  


आपण जेवत असताना लेकरांना शी यायचं कारण म्हणजे पोरंग आधी जेवतं. चांगलं तासभर जेवत असतं. आपण जेवायला बसेपर्यंत त्याला मजबूत प्रेशर येतं. ते थांबवायचा पोरं जीवतोड प्रयत्न करतात. त्यात त्यांचा बराच वेळ जातो. पण तो प्रयत्न असफल झाल्यामुळे बरोबर आपलं अर्ध जेवून झालं की, त्याला शी येते. त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो.  


(टीप- स्वतः मुलाच्या आधी जेवलात तर मात्र स्वतःला येणारं प्रेशर सांभाळावं लागेल. नाहीतर पोरंग सल्ला मागेल...😂😂)


वाचकहो, खरंतर आयुष्यात जास्तीत जास्त प्रेम आणि सुख याच मुलांमूळे आपल्याला मिळतं. आईपणाची अनुभूती आणि स्वतःचं बालपण पुन्हा नव्याने अनुभवण्याची संधी यांच्यामूळेच मिळते. "तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हुँ मै..।" अशी काहीशी परिस्थिती मायबापाची असते. पोटच्या गोळ्यासाठी इकडचं जग तिकडे करण्याची कुवत एका स्त्रीमध्ये ती आई झाल्यावर आपसूकच येते. असंच गंमती गंमतीत एक मैत्रीण मुलाच्या शीच्या वेळेबाबत बोलली आणि खरंच लिहावंस वाटलं.  


सल्ला तर दिलाय. माहिती नाही मैत्रिणीला पटला की नाही ते. 😜😜 आपल्याला काय करायचंय. "जे जे आपणांस ठावे ते ते इतरांस सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन." आणि जे येडे होतील त्यांचं ते बघून घेतील. ती जबाबदारी आपली नाही. आपलं ध्येय एकच स्त्री स्वयंपूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही सल्ले देत झटणारच. आजवर ज्यांनी सल्ला मागितला त्यांना तो दिला पण गर्व नै केला कंदी..😜😜


बाब्बो...!! गर्व कुठून करणार.?? ज्यांनी सल्ला मागितला ते पुन्हा बोलले तर पाहिजेत ना..😂😂


तरीही आमचा पण लेक माहेरचा कट्टा बरं का..!! योग्य सल्ले देऊन मैत्रिणींच्या संसाराला हातभार लावतोच आम्ही..😜😜

(तळटीप- जे यातून गेलेत त्यांचं पुण्य कमी पडलं असं समजून बाकीच्यांनी पुण्य जमवायच्या मागे लागा.. 😂😂)


मी लावलेल्या शोधाची दखल घेऊन माझी मैत्रीण पुनम लोखंडे तावडे ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माझा जाहीर सत्कार करायच्या विचारात आहे. 🤗🤗. आणि सध्या मी बिझी असल्याने एक पिडीत आई म्हणून माझ्यावतीने तो पुरस्कार पुनम स्विकारेल.  💞💞


© Velvet Kavisha

Post a Comment

0 Comments