मैत्री जपावी मनातून...



 मैत्री जपावी मनातून...

© Velvet Kavisha


विषय मैत्रीचा आणि जिव्हाळ्याचा. माझ्या दोन मैत्रिणी एकदम खासमखास. आम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकतो. एड्सपासून एडिसनपर्यंत किंवा सेक्सपासून सेन्सेक्सपर्यंत. कोणताही विषय वर्ज्य नाही.‌  


एकीशी गेली सोळा वर्षे मैत्री. एकाच फास्ट ट्रेनने जायचो. ५.२ इंचात ४० किलो कोंबलेली मी. वर हात पोचायचा काही प्रश्नच येत नव्हता. गर्दीत कोणाला धक्का लागला तर भितीच वाटून जायची. ओरडतात हो...  

सुरुवातीला ट्रेनमध्ये माझी दया येऊन ती मदत करायची. एकाच लोकेशनला वर्किंग. विक्रोळी ते चर्नीरोड. Office time एकच. रोज भेट व्हायची. पुढे हळूहळू ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. खुप गाढ मैत्री झाली. खुप भटकायचो. सगळीकडे TTMM. तरीही कधी कधी मोठ्या बहिणीच्या नात्याने खाऊ घालायची. साऊथ मुंबईतील बरीचशी ठिकाणं कळली मला. बिनधास्तपणात जास्त भर पडली तिच्यामुळे.. 


एक किस्सा सांगते. एल्फिन्स्टनला उतरून परेलला यायचो लेडीज स्पेशल पकडायला. बऱ्याचजणी आमच्या सारख्याच. कारण दादरला प्रचंड गर्दी असते चढता येत नाही पटकन.त्यामानाने परेल जरा ठीक. निदान सीट तरी मिळायची. 


खुप दिवस पाहत होतो. वेस्टर्नवरून सेंट्रलला येणाऱ्या ब्रीजवर एक काका उभे असायचे. जिन्यावरून उतरताना  बायकांच्या घोळक्यात शिरायचे. उगाचच स्पर्श करत. नंतर तिच्या लक्षात आलं की ते आधीपासूनच थांबलेले असतात. आणि घाईगडबडीत लेडीज स्पेशलसाठी येणाऱ्या बायकांच्या घोळक्यात शिरतात. आंबटशौकीन.


नेहमीच्या पाच-सहा जणींनी मिळून फुल्ल प्लॅन रेडी केला.  ही मागे थांबली.  आम्ही चार पाचजणी पुढे. तो नेहमीसारखा घोळक्यात शिरला ही त्याच्या मागोमाग आणि आम्ही पटकन पुढच्या बाजूला. काका चार पाच पायऱ्या उतरला तसा हिने लाथ घातली पाठीत त्याच्या. धडपडलेल्या त्याला आम्ही पकडलं. नाहीतर तुडवला गेला असता गर्दीत. त्याला समज दिली. सुधारला असावा. कारण दुसऱ्या दिवसापासून दिसला नाही..


बसमधून जायची वेळ यायची कधी कधी. आता बसमध्ये गर्दीच्या नावाखाली बायकांना चिपकणारे काही कमी नाहीत. हिला कोणी चिपकायला आलं की ही मोठी सेफ्टी पिन पोटाला टोचायची. माणूस सटकन बाजूला गेलाच समजा. 


माझ्यापेक्षा साधारण सात आठ वर्षांनी मोठी असेल.. पण काळजीवाहू. माझ्याकडे कोणी वाकड्या नजरेने जरी पाहीलं तरी भांडायची. आपल्या पाठीशी कोणी खंबीरपणे उभं असल्याचा विश्वास वाटायचा.  


कितीतरी वेळा एकमेकींच्या घरी गेलोयं.. माझ्या लग्नाच्या वेळेस तर सुट्टी टाकून आलेली मदतीला चार दिवस. पार्लर वगैरे सगळं तिनेच पाहून दिलेलं. ती आईवडील आणि भाऊ भावजय सोबत राहायची. लग्नाचं वय तर कधीच उलटून गेलेलं. तिचा एक खास मित्र होता. तो भेटणार असेल तेव्हा मला म्हणायची, मी आज नाहीय ग तुझ्यासोबत. महिन्यातून चार पाच वेळा तरी मी एकटीच यायचे. तिने स्वतःहून कधी सांगितले नाही लग्नाबद्दल आणि मी आजपर्यंत तिला विचारलं नाही. तिला मी जेवढी ओळखते त्यावरुन सांगायचं असतं तर तिने मला केव्हाच सांगितलं असतं. पण काही गोष्टी अशा असतात ना  त्या आपण खुप खोलवर दडवून ठेवतो आणि त्या पुन्हा वर काढायची इच्छा नसते. तसंच असेल काही. मैत्रिणीची प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असलीच पाहिजे हा अट्टाहास कशाला??  तिची स्पेस राखावी न आपणंही. मैत्री आहे. मनातून जपावी. गुणदोषासहित. तिनेही मला जपलंच आहे की फटकळ तोंड आणि तिरसट डोक्यासहीत.

आता ती आईसोबत वेगळी राहते. हल्ली फारसं भेटणं नाही होतं आमचं. त्यादिवशी फोन आला. 


म्हणाली " मोतिबिंदुचं operation करायचं आहे. दहा दिवस सुट्टी घेतलीय.." 

थोडी घाबरल्यासारखी वाटली. आता समजवायला हवं... 


म्हटलं, " कशाला इतकं वाकड्या नजरेने पाहायचं..😜 झाला ना मोतिबिंदू आता. आता लेन्स तरी चांगली बसव बाई. म्हणजे मी तुला विक्रोळीतून दिसली पाहिजे. बरं आता operation झालं म्हातारी झाल्याचा फील आणू नकोस. ते फक्त मी म्हणणार तुला म्हातारी..." 

जोरात हसली. 

म्हणाली " खुप टेन्शन आलं होतं ग. आता गेलं.."

 

" बरचं झालं की मग. मी तुला आता म्हातारी तरी म्हणू शकेन" ...मी 


" काय हवं ते म्हणं.. मैत्रीण आहेस... तुला सगळं माफ.." ती

माझा सगळा आगाऊपणा खपवून घेणाऱ्या तिला... मी ही तितकंच जपलयं तिला मनातून...


दुसरीशी बारा वर्षे मैत्री.  Cyber cafe होता माझा. बाजूला नर्सरी. मुलाला सोडायला यायची.. सहा महिन्यांत ओळख वाढली. पुढे छान मैत्री झाली.. तिला सगळंच माहिती असतं. माझा चेहरा पाहिला की तिला कळतं. माझं अश्रू ढाळायचं हक्काचं एकमेव ठिकाण. इतरांना मी रडते हे ही माहिती नाही. माझ्या सगळ्या गोष्टींचे कौतुक आणि अभिमान तिला. मॉम्सप्रेसोवर लाईव्ह शो होता. शो सुरू व्हायच्या आधी अर्धा तास "गुलाबजाम" घेऊन हजर. "तुझ्या आयुष्यात काही चांगले घडतंय मग तुझं तोंड गोड करायला हवं ना..!!" असं म्हणत ते प्रेमाने खाऊ घातले.  


तिला नेहमी प्रश्न पडतो की, एका मागोमाग एक इतकं काही घडत असतं तुझ्या आयुष्यात तरीही तू इतकी कुल कशी काय राहू शकतेस?? मग स्वतःच म्हणेल, जिने संकटांचा हिमालय पाहिलाय तिला एखादा डोंगरकडा काहीच नाही... 

हाकेच्या अंतरावर राहतो तरी भेटणं होत नाही फारसं. पण जेव्हा दोघींनाही भेटावसं वाटत तेव्हा मात्र घरातल्या अवतारात भेटतो. चालत राहतो, बोलत राहतो. त्याच अवतारात आईस्क्रीम पार्लरमध्ये घुसतो. आईस्क्रीम खातो. घरून फोन येईपर्यंत किती तरी वेळ गेलेला असतो. "भेटू गं पुन्हा म्हणत निघतो." 


आजही चार दिवस झाले काही सुचलं नव्हतं. तब्बेतची गडबड आहे. आळस आलाय. आज तीच म्हणाली लिही ग काही छान. म्हणून मैत्रीवरचं लिहायला घेतलं. नेहमीप्रमाणेच तीच मन जपावं वाटलं मनातून.


ह्या माझ्या दोन्ही मैत्रिणी फेसबुकवर नाहीत.  


फेसबुकवरच्या मैत्रीबद्दल बऱ्याच कथा ऐकल्यात. तरीही मला फेसबुकने खुप चांगल्या मैत्रिणी दिल्यात. सरीता दातिरबद्दल काय सांगू..?? एकदम मस्तमौला आसामी. फेक अकाउंटच्या जाचाला कंटाळून, अगदी फेसबुक सोडायच्या विचारात असतानाच बाईंनी धीर दिला. स्वतःचे अनुभव शेअर केले. तेव्हा मनातून आपली वाटली. फोन नंबर दिला आणि कधीही काही अडचण वाटली तर फोन कर बिनधास्त. फक्त लिहिणं सुरु ठेव म्हणाली. पुढे बोलणं वाढलं. एकदा म्हणाली. " खुप मोठी होशील तू. पण तेव्हा मला विसरू नकोस हं." बास्सं.  तिचं वाक्य काळजात धरून ठेवलयं. आज लिखाणातून थोडंफार मानधन मिळतं. प्रत्येक महिन्यातून कुरीअरने एक कॅडबरी तिला पाठवली की बरं वाटतं. माझ्या प्रत्येक पेजची ती ॲडमीन आहे. दोघींच्या कॉमन फ्रेंड्सना माहिती आहे की, तिला टेक्निकली काही येत नाही. "तुझी सायलेंट ॲडमीन काय म्हणते.??" असं विचारतात. "चारोळींचं 'वर्षासरी पेज आमच्या दोघींच्या नावाने बनलंय."

ती नागपूरला. मी कल्याणात. आयुष्यात कधी भेटलो नसतो. फेसबुकमुळे शक्य झालं. ही डिजिटल मैत्री मनातून दोन मनांनी जपलेली... 

दोघी इतक्या कल्पना रंगवायचो की बास्स. हल्ली आमच्यात डॉ. सुनिता चौधरी आलीय. आम्हांला तिघींना नाशिकच्या सुला फेस्टिव्हलमध्ये जायचं आहे. "कॉफी प्यायला हो..!!" पुण्यात एखाद्या तळ्याकाठी निळ्या दाताच्या स्पिकरवर जुनी गाणी लावून गप्पा मारायच्या आहेत. कोकणातल्या समुद्र किनारी वाळूत पाय सोडून बसायचं आहे. सरीता दातिर नॉनव्हेज खात नाही म्हणून तिच्यासोबत बसून नॉनव्हेज खायचं आहे. डॉक्टर केक आणि आईस्क्रीम खात नाही म्हणून तिच्या पुढ्यात बसून केक आणि आईस्क्रीम खायचं आहे. असे बरेच प्लॅन ठरवलेत. जेव्हा प्रत्यक्षात यायचे तेव्हा येतील पण ते ठरवताना एक वेगळीच गंमत येते. त्या क्षणापुरतं का होईना आपण ते जगतो...


अर्चना धवडबद्दल काय बोलू...!!! तिच्या पन्नाशीच्या सोहळा करायचा हे आम्ही तिच्या वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षीच ठरवलंय. ती ही आता पन्नाशीची वाट पाहतेय आमच्यासोबत..😘😘😍😍💞🤗🤗


या सगळ्याजणी माझ्या तिरसटपणाने, शाब्दिक बाणाने  होरपळलेल्या तरीही मनातली मैत्री जपून ठेवलेल्या.  त्यांना फार मनापासून ..थँक्यु!!!


बाकीच्या ब्लॉगर मैत्रिणीही फेसबुकची देणं. सगळ्याच भारी लिहिणाऱ्या. एकमेकींबद्दल नितांत आदर, आपुलकी असलेल्या. अडणाऱ्याला हात देणाऱ्या, थांबलेल्याला थांबू न देणाऱ्या, कोणाबद्दल ही वाईट न बोलणाऱ्या आणि ranking चा तीळमात्र फरक न पडणाऱ्या. उत्साहाने सळसळत्या. स्वतःची ठाम मतं असणाऱ्या. शरीराने खुप दूर तरीही फार जवळच्या वाटणाऱ्या. कारण अर्थातच त्या ही  मनात जपलेल्या. फार खोलवर नाही पण वरवर ही नाही...


मैत्री निरपेक्ष असावी. जात, धर्म, पंथ याच्या पलिकडची असावी. श्रेष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित असा भेदभाव नसावा. मैत्रीला वय नसावं. अबोला, मतभेद असावेत पण अपमान नसावा. मताचा आदर असावा.  मत लादण्याचा मुर्खपणा असू नये. मोकळी झालेली मन जपली जावीत. त्यांचा "तुला म्हणून सांगते" म्हणत बाजार केला जाऊ नये.  एकमेकींना काहीही बोलण्याची मुभा असावी. अशी मनमोकळी आणि दिलखुलास मैत्री ही मानसिक आरोग्यदायीच. हे एकच असं नातं जे रक्ताचं नसूनही खुप जवळंच असतं. दुरूनही मैत्रीची "प्यारभरी झप्पी " अनुभवता येते. 


खुप साऱ्या मैत्रिणी माझ्याकडे व्यक्त होतात. त्यांची सिक्रेट माझ्यापाशी सेफ आहेत. मी त्या गोष्टींची त्यांना ही कधी आठवण करून देत नाही. त्यामुळे इतरांना काही सांगायचा प्रश्न येत नाही. उद्या त्यांनी मैत्रीत ब्रेक अप केलं तरीही.


मी तोपर्यंत काही विचारत नाही जोपर्यंत त्या स्वतःहून काही सांगत नाहीत. कारण काही वेळेस फक्त शांत राहून समजून घेणं ही गरजेचं असतं.  जपावी हो मैत्री मनातून... 


मैत्रीच्या नावाखाली होणाऱ्या ब्लॅकमेलिंगच्या बातम्या पाहिल्या की मन खट्टू होतं. त्याचबरोबर माझ्याकडे अशा मैत्रिणी आहेत या विचाराने फार ग्रेट वाटतं...!!


बाब्बो..!!! आठवल्या ना तुमच्या खास मैत्रिणी?? मग लिहा त्यांच्याबद्दल भरभरून..!!!

 


© Velvet Kavisha


Post a Comment

0 Comments