स्वप्न चालून आले भाग अंतिम

#स्वप्न_चालून_आले_भाग_अंतिम 


©️जया पाटील 



भाग एक वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

👉  स्वप्न चालून आले.. भाग एक

मागील भागात आपण पाहिले कि सुभाषरावांच्या कमजोर आर्थिक स्थितीमुळे रोहिणी तिच्या आवडत्या फार्मसी क्षेत्रात ऍडमिशन घेऊ शकली नाही आणि तिने आर्टस् क्षेत्रात प्रवेश केला. त्याचदरम्यान तिला निलेशचे स्थळ सांगून आले आणि वडिलांची आर्थिक स्थिती आणि इतर सर्व बाबींचा विचार करून तिने लग्नाला होकार दिला.


आता पुढे ....


अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने निलेश आणि रोहिणीचा विवाहसोहळा पार पडला. दोघांचेही नवीन दिवस अगदी स्वप्नवत होते. निलेश आणि रोहिणी दोघांच्याही प्रेमाला बहर आला आणि रोहिणीने लग्नानंतर दोन महिन्यातच गोड बातमी दिली. सगळ्यांच्या आनंदाला पार उरला नाही. नवीनच लग्न झालेली रोहिणी या सगळ्यामुळे गोंधळली. यानंतर आपण आपले राहिलेले शिक्षण कधीच पूर्ण करू शकणार नाही याची तिला जाणीव झाली परंतु कितीही झाले तरी आता ती एक आई होती..त्यामुळे तिचे होणारे बाळच तिच्यासाठी जास्त महत्वाचे होते.  


रोहिणीचे डोहाळेजेवण आणि कौतुक सोहळे थाटामाटात पार पडले. नऊ महिने नऊ दिवस दिवस पूर्ण झाल्यावर रोहिणीने एका गोड राजकन्येला जन्म दिला.


बाळाचे नाव ठेवले .. ... " सावी "


छोट्या सावीच्या बाललीलांमुळे रोहिणीचा वेळ कसा जाऊ लागला हे तिलाच कळेनासे झाले. तिचे गोड हसणं, घरभर पळणं, सगळ्या घरात  खेळण्यांच्या पसारा करणे, कारणाशिवाय तिचे  रुसुन बसणे या सगळ्यात रोहिणीचा वेळ कुठे जात असे ते तिलादेखील समजत नसे.   


दिवसामागून दिवस सरत होते. काळ आपल्या गतीने पुढे जात होता. सावीच्या पालनपोषणात  रोहिणी पूर्णपणे अडकली होती पण या सगळ्यात तिचे शिक्षण मात्र अर्ध्यावरच थांबले होते. एक आई म्हणून रोहिणी आपल्या मुलीच्या संगोपनालाच स्वतःचे प्रथम कर्तव्य मानत होती पण स्वतःचे शिक्षण मात्र अर्ध्यावर थांबायची तिला मनातून खंत होतीच.


सावीच्या जन्मानंतर तीन वर्षांनी रिषभचा जन्म झाला. दोन मुलांमुळे तिच्या जबाबदाऱ्या आणखीनच वाढीस लागल्या. या सगळ्या जबाबदाऱ्यांच्या व्यापामध्ये स्वतःच्या स्वप्नांचा मात्र रोहिणीला पूर्णपणे विसर पडला. निलेशला मात्र रोहिणीच्या या सगळ्या स्वप्नांची सुभाषरावांनी आधीच कल्पना दिलेली होती. एक बाप म्हणून लेकीची इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही ही जाणीव त्यांना सतत टोचत होती.


रोहिणीने आपल्या संसारासाठी खूप तडजोडी केल्या आहेत. खूप कमी वयात तिच्यावर मुलांची आणि आईबाबांची जबाबदारी पडली. मी देखील तिच्या इच्छा-आकांक्षांचा कधी विचारच केला नाही. रोहिणी मात्र स्वतःच्या स्वप्नांना मागे सारून फक्त कुटुंबाचा विचार करत राहिली. तिचे स्वप्न पूर्ण करणे हे माझे देखील काम आहे याची जाणीव निलेशला देखील होती.  


त्यामुळे रोहिणीच्या येत्या वाढदिवसाच्या दिवशी फार्मसी कॉलेजला तिची ऍडमिशन घेऊन तिला सरप्राईज द्यायचे निलेशने ठरवले. त्याच्या या प्लॅन मध्ये निलेशचे आईबाबा , रोहिणीचे आईबाबा सुभाषराव , तिच्या आई स्मिता ताई , धीरज आणि सुरज हे दोघेही सामील होते.  


रोहिणीच्या वाढदिवसाच्या दिवशी ठरलेल्या वेळेवर सगळेच निलेशच्या घरी जमले. एक छानसा केक कापून झाल्यावर निलेशने काही कागदपत्र रोहिणीच्या हातात दिली. आमच्या सगळ्यांकडून तुला एक सरप्राईज आहे असे सांगून तो बोलू लागला....


" रोहिणी , मला माहिती आहे कि तुला आधीपासूनच फार्मसी क्षेत्रात पदवी घेऊन पुढे त्याच क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती परंतु आर्थिक आणि इतर कारणांमुळे , सावी आणि रिषभ दोन्ही मुलांच्या जबाबदारीमुळे तुला ती स्वप्न पूर्ण करता आली नाहीत."


"खूप लहान वयात तुझ्यावर मुलांची , माझी आणि आईबाबांची जबाबदारी येऊन पडली. सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम निभावल्यासच ...पण त्यामुळे तुझी स्वप्ने मात्र  अपूर्णच राहिली .....!


पण एक नवरा म्हणून माझ्या पत्नीची स्वप्न पूर्ण करणे , तिच्या सर्व इच्छा - आकांक्षा पूर्ण करणे हे माझे देखील कर्तव्य आहे. सातफेऱ्यांच्या वचनाला जगण्याची वेळ आता माझी आहे. "


"खरं तर या गोष्टींची जाणीव मला आधीच व्हायला हवी होती पण घरच्या जबाबदाऱ्या सगळ्यात जास्तच महत्वाच्या आहेत म्हणून मी तुझ्या मनाचा कधी विचारच केला नाही. त्याबाबतीत मी तुझा अपराधी आहे.  मला माफ कर ...."  


"आज मी माझी चूक सुधारतो आहे. यावर्षीच्या येत्या शैक्षणिक वर्षात मी तुझी फार्मसीला ऍडमिशन घेतली आहे. हेच तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांकडून तुला भेट... ! "


निलेशच्या या बोलण्यामुळे रोहिणी अगदी स्तिमित झाली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.


" कोरड्या दुष्काळ पडलेल्या जमिनीवर पावसाच्या मृदु तुषारांचा वर्षाव झाला कि काय .... " असाच अनुभव रोहिणीला आला.

तिची खूप वर्षापासूनची इच्छा आज पूर्ण होणार म्हणून ती खूप आनंदी झाली.


 मन भारावून टाकणाऱ्या या सरप्राईज मुळे ती मनोमन सुखावली. परंतु मुलांच्या काळजीने पुन्हा एकदा तिचे मन विचलित झाले. तिने निलेशला समजावले ...


"निलेश ...थँक्यू सो मच ..., तू मला इतके छान सरप्राईज दिलेस पण आता मात्र मला आपल्या मुलांच्या भविष्यापुढे , त्यांच्या स्वप्नांपुढे माझी स्वप्ने फिकी वाटतात रे ...! "


" माझी स्वप्न पूर्ण करतांना माझ्या मुलांच्या आणि घरातील कोणाचीही हालअपेष्टा होऊ नये असेच मला वाटते. "  


" हा तुझा मोठेपणा आहेत , बाळा रोहिणी ..कि तू आमचा इतका विचार करते आहेस ... पण तुझी इच्छा देखील आमच्यासाठी तितकीच महत्वपूर्ण आहे. "


" तू शिकलीस कि आमचेच नाव उंचावणार आहेस .., त्यामुळे कुठलाच किंतु मनात न ठेवता पुढे पाऊल ठेव. "


" राहता राहिल्या घरातील जबाबदाऱ्या , रिषभ आणि सावीच्या देखभालीचा प्रश्न .... तर आम्ही आहोतच ना ....! "


" मी , निलेश आणि त्याची आई सगळे मिळून तुला मदत करू. आणखीनच काही अडचण आल्यास तुझे आईबाबा देखील आहेतच ..रोहिणी ...! "


" त्यामुळे तुझ्या उज्वल भविष्याला सामोरी जाण्यासाठी तू आता तयार हो."


"आमच्या सगळ्यांचे शुभाशीर्वाद आणि शुभकामना तुझ्या सोबत आहेत. ऑल द बेस्ट , बेटा ..! " 


रोहिणीचे सासरे तिला समजावणीच्या सुरात म्हणाले.


सगळ्यांनी साहाय्य करायचे ठरविल्यामुळे रोहिणी पुढील शिक्षणासाठी तयार झाली.पण खरी परीक्षा तर पुढे होती ....


रोहिणीने ऍडमिशन घेतलेल्या कॉलेजचा गणवेश पॅन्ट आणि शर्ट असा होता परंतु एक आई असलेल्या रोहिणीला मात्र हा गणवेश योग्य वाटत नव्हता. त्यामुळे तिने कॉलेज मधील प्रिंसिपल सरांची भेट घेण्याची ठरवली. त्यांना भेटून तिच्या मनातील विवंचना तिने त्यांच्यासमोर मांडली. प्रिंसिपल सरांना देखील तिच्या भावना योग्य वाटल्या. तिच्या स्पष्टवक्तेपणाचे खूप कौतुक देखील वाटले त्यांना ....! त्यामुळेच त्यांनी तिला गणवेश म्हणून पंजाबी सूट घालण्याची परवानगी दिली.


कॉलेज , घरच्या जबाबदाऱ्या , सावी आणि रिषभ  दोघांचाही अभ्यास , त्यांची शाळा हे सगळे करतांना रोहिणीची ओढाताण होऊ लागली. निलेश आणि त्याचे आईबाबा तर मदत करतच होते पण ऑफिसामधल्या जबाबदाऱ्या , वेळेचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे निलेशची देखील खूप ओढाताण होत होती. दरम्यान निलेशच्या आईची तब्येत खूप खराब झाली. रोहिणीची परीक्षा जवळ आलेली होती.  


त्यातच सावी आणि रिषभ दोघांचीही शाळा आणि रोहिणीच्या कॉलेजची वेळ देखील एकच होती. निलेशच्या आईच्या तब्येतीमुळे सावी आणि रिषभ दोघांचीही तयारी करणे त्यांना शक्य होत नव्हते. निलेशच्या बाबांचा वेळ देखील पत्नीची देखभाल करण्यात जात होता. शेवटी रोहिणी पहाटे पाच वाजता सावी आणि रिषभला उठवून त्यांना तयार करून त्यांना पुन्हा झोपवून कॉलेजला जात होती. निलेश त्यांच्या शाळेच्या वेळेत पुन्हा त्यांना उठवून शाळेत नेऊन सोडत असे.


घरातील सगळे कुटुंबीय रोहिणीला शक्य तितकीच मदत करण्याचा प्रयत्न करत होते. तरीदेखील रोहिणी समोरच्या अडचणी मात्र कमी होत नव्हत्या. अडचणींच्या न थांबणाऱ्या ससेमिऱ्यात देखील रोहिणीने रात्रीचा दिवस करून तिचा अभ्यास सुरूच ठेवला होता.


रोहिणीच्या कष्टाला फळ देखील मिळाले. उत्तम गुण मिळवून ती अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाली. निलेश आणि सुभाषरावांचा आनंद गगनात मावेनासा झाला. घरातील सगळ्यांनाच रोहिणीचा खूप मनापासून अभिमान वाटत होता.


रोहिणीला फार्मसीची पदवी तर मिळाली पण संशोधन क्षेत्रात काम करण्यासाठी प्रवेशपरीक्षा घेतली जाते. ती परीक्षा देण्याचे रोहिणीने ठरवले.


सगळ्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडत तिने तिने प्रवेशपरीक्षेचा अभ्यास जोमाने सुरु केला. त्यादरम्यान निलेशच्या आईची तब्येत आणखीनच  खराब झाली. त्यांच्या सेवासुशुश्रेत तिचा सगळा वेळ जाऊ लागला. परंतु तरीदेखील तिने हार न मानता अभ्यास सुरूच ठेवला. हळूहळू निलेशच्या आईच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. प्रवेश परीक्षेला अवघा आठवडा बाकी होता आणि त्याच वेळेस रिषभला अंगात फणफणात ताप भरला. रोहिणी आणि निलेशने त्वरित त्याला डॉक्टरकडे हलविले. सगळ्या टेस्ट केल्यानंतर त्यात न्यूमोनियाचे निदान झाले. रिषभचा प्लेटलेट  काउंट खूपच कमी झाला होता. पुढचे 48 तास रिषभसाठी जड असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


रिषभच्या तब्येतीचे ऐकून रोहिणीच्या पायाखालची जमीन हादरली. प्रवेशपरीक्षेचा विचार सोडून ती फक्त रिषभची काळजी घेण्यात गुंतली. कितीही झाले तरी ती एक आई होती..आणि कोणत्याही आईला जगातील कुठलीही गोष्ट आपल्या मुलांपेक्षा जास्त महत्वाची कधीच नसते. निलेशने तिला परीक्षा देण्यास सांगितले परंतु रोहिणीने नकार दिला. परीक्षा देऊन पाहायला काय हरकत आहे. परीक्षेच्या वेळेपुरता मी रिषभची काळजी घेईल असे आश्वासन निलेशने रोहिणीला दिले. सगळ्यांच्या समजावण्यानंतर रोहिणी परीक्षेला जाण्यास तयार झाली.


प्रवेशपरीक्षेच्या आदल्या रात्री रोहिणी रिषभ जवळ हॉस्पिटल मध्ये होती. रिषभ गाढ झोपलेला होता आणि रोहिणी अभ्यास करत होती. ती राऊंड मारायला म्हणून बाहेर गेली तर बाहेर व्हरांड्यात प्रसन्न हसणारी गणपती बाप्पाची मूर्ती होती. मूर्ती पुढे हात जोडून रोहिणी बाप्पा सोबत बोलू लागली....


" कसली परीक्षा घेतोय रे बाप्पा , माझी ..माझ्या काळजाच्या तुकड्याला मरणाच्या दारात उभे केले आहेस तू .. ..माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या चिमण्या पाखरांची देखील तितकीच मेहनत आहे रे बाप्पा ...! "


" आई , डोन्ट वरी .. तू कॉलेजला जा ..आम्ही आमचे जेवण ,अभ्यास सगळे वेळेवर करू ...आजी बाबा कोणालाच त्रास देणार नाही ...इतक्या लहान वयात किती समजदारी ...माझ्या पाखरांची ...! "  


" माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी देखील खूप धडपड केली आहे. पहाटे पाच वाजता थंडीत उठून शाळेसाठी तयार होऊन पुन्हा झोपणाऱ्या माझ्या मुलांकडे पाहून मला किती वेदना होत होत्या , हे तुला तरी कसे समजावू रे ...बाप्पा ..?"


" उद्याची परीक्षा मी पास झाली नाही तरी हरकत नाही , पण आईपणाच्या परीक्षेत मात्र मला पास कर ..माझ्या रिषभला लवकर बरे कर ....बाप्पा "


रोहिणीने गणपती बाप्पा समोर तिची सगळी व्यथा बोलून दाखवली.


प्रवेशपरीक्षेचा दिवस उजाडला. रोहिणी काळजावर दगड ठेवून निलेशला रिषभची काळजी घेण्यास सांगून परीक्षेला गेली. परीक्षा सुरु असतानाही फक्त रिषभचाच विचार तिच्या डोक्यात होता. परीक्षा देऊन ती त्वरित हॉस्पिटलला आली. अजूनही काही दिवस रिषभला हॉस्पिटल मधेच ठेवणार होते. रिषभच्या तब्येतीत सुधारणा होत होती.  


रिषभला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होता. रिषभला घरी घेऊन जाण्यासाठी सगळे कुटुंबीय हॉस्पिटलला येणार होते. रोहिणी सगळ्यांची वाट पहात होती आणि लगेच सावीचा आवाज तिला ऐकू आला .....


" congratulations ...आई ...i am so proud of you ....तू परीक्षेत खूप छान मार्कांनी पास झालीस ..." 


मागावून सगळे कुटुंबीय टाळ्या वाजवत पुढे आले. " congratulations and celebration " असा सुर संपूर्ण हॉस्पिटल मध्ये होता. रोहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ते आनंदाश्रू पाहून हॉस्पिटलच्या देवघरातील गणपती बाप्पा गालातल्या गालात हसत होता.


रोहिणीच्या मनात एकच गाण्याची धून वाजत होती.....


स्वप्न चालून आले बघता बघता ....

माझे होऊन गेले हसता हसता ....


रंग रंगीत झाले दिसता दिसता ....

श्वास संगीत झाले जुळता जुळता ....


स्वप्न चालून आले बघता बघता ....

माझे होऊन गेले हसता हसता ....


समाप्त.


कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - pixels & google 


✍©️ जया पाटील








Post a Comment

0 Comments