युगायुगांचे नाते अपुले २

 #युगायुगांचे_नाते_अपुले_भाग_२


©️जया पाटील 



भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇

👉  युगायुगांचे नाते अपुले भाग एक


" डॅड , मम्मा खरंच किती वाईट आहे ना .." 


" मला सोडून तिने आजी आजोबा सगळयांना चूज केले आणि इंडिया मध्येच राहिली. पण तु मात्र किती करतोस माझ्यासाठी .." 


" खरं तर ती प्रत्येक वीकएंडला फोन करते ना मला .., तु सांगतोस म्हणूनच मी बोलते तिच्यासोबत ...,  अदरवाईज मी तर बोलले पण नसते तिच्यासोबत .." 


अकरा वर्षाची मिहिका तिच्या बाबाला सांगत होती.  


" डॅड साठी तर तु प्राईजलेस आहेस बाळा , तुला एकटीला मिनाक्षीकडे सोडून मी कधीच आलो नसतो. " 


" हा पण तु देखील तिच्यासाठी महत्वाची आहे ...., पण ती तुला इतके चांगले लाईफस्टाईल देऊ शकली नसती."


" तुझे आयुष्य खूप आनंदाने , सुखसोयींनी भरलेले असावे म्हणूनच तर मी तुला घेऊन अमेरिकेत निघून आलो. "  


" इथले लाईफ किती happening आहे ना..! "


" दोनच वर्षात मी कुठल्या कुठे निघून गेलो. मिनाक्षी मात्र त्याच कंपनीत आहे त्या पगारावर काम करते आहे. " 


" तिला पैश्यांपेक्षा नाती महत्वाची वाटली. तिला कधीच खूप काही वेगळे करण्याची महत्वकांक्षाच नव्हती कधी ...! "


नितेश म्हणजे मिहिकाचा बाबा मिहिका नऊ वर्षाची असताना त्याला अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी मिळाली म्हणून तिला घेऊन निघून गेला.


त्याची बायको मिनाक्षी देखील त्याच्याच कंपनीत काम करणारी. दोघांनाही अमेरिकेत जाण्याची संधी चालून आली मात्र तिच्या आईसाठी आणि नितेशच्या आईबाबांसाठी तिने अमेरिकेत जाण्यासाठी नकार दिला कारण भारतात त्यांची काळजी करण्यासाठी कोणीच नव्हते.


नितेशला त्याची महत्वकांक्षा जास्त महत्वाची वाटली तर मिनाक्षीने पैश्यापेक्षा कुटुंब महत्वाचं म्हणून कुटुंबाची निवड केली. मिनाक्षीच्या या निर्णयाचा नितेशला खूप राग आला.  


त्याने अमेरिकेत आपल्या मुलीला घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. छोटी मिहीका देखील डॅडीची खूप लाडाची असल्याने तिने नितेश सोबत जाण्याचा हट्ट धरला. 


नितेश वरच्या प्रेमामुळे आपल्या काळजावर दगड ठेऊन मिनाक्षीने आपल्या लेकीला नितेश सोबत अमेरिकेला पाठवले.मिहीकाला घेऊन नितेश अमेरिकेत सेटल झाला. त्याने तिथे एक मोठे घर विकत घेतले. घरातील सगळ्याच वस्तु आलिशान होत्या. 


पैशात मोजता येणारी सगळी सुखं होती त्याच्याकडे.... !  


पण मिहीकाचे पालनपोषण करण्यात मात्र तो कमी पडला. मिहिकाला नितेशने सगळी भौतिक सुख दिली , पण संस्कार देण्यात मात्र तो अपुरा पडला. आपलेपणा, नात्यांचे महत्त्व, नीतिमूल्यांची शिकवण , प्रेमाच्या बंधनांचे महत्व समजवण्यात मात्र तो अपयशी ठरत होता.


हळूहळू मिहिका मोठी होत होती. ती देखील नितेश सारखीच महत्वकांक्षी होती आणि नितेश इतकीच प्रॅक्टिकल ....!


प्रत्येक वीकएंडला मिहिका सोबत बोलण्यासाठी मिनाक्षी फोन करत असे , परंतु आपल्या कोडगेपणाने मिहिका मिनाक्षीचे नेहमीच मन दुखवत असे.


दिवसांमागुन दिवस सरत गेले. नितेशला अमेरिकेत स्थायिक होऊन चौदा वर्ष झाली. मिनाक्षीने चौदा वर्षांचा वनवास भोगला परंतु त्या काळात नितेश एकदाही भारतात आला नाही. मिनाक्षीचे डोळे मिहिकाच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. कधीतरी नितेश मिहिकाला घेऊन भारतात येईल या वेड्या आशेवर मिनाक्षी जीवन जगत होती.


आता मिहिका 23 वर्षाची झाली होती. तिचे ग्रॅजुएशन संपवून ती चांगल्या नोकरीला लागली होती. ती इंडिपेन्डन्ट झाली होती. रात्री उशिराने घरी येणे , मित्र-मैत्रिणीसोबत पार्टीला जाणे ह्या सगळ्या गोष्टी आता रोजच्या झाल्या होत्या. मिहिकाच्या ह्या सगळ्या गोष्टी नितेशला आवडत नव्हत्या परंतु ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आधी त्यानेच तिला करवून दिली होती. अमेरिकन लाईफस्टाईलची सवय तिला लावली होती. अमेरिकेत असला तरी नितेश एका तरुण मुलीचा भारतीय बाबा होता त्यामुळे इतर आईबाबांप्रमाणे त्यालाही ह्या गोष्टी खटकत असत.  


नितेश मिहिकाला तिच्या स्वतःच्या मर्यादा जपण्याविषयी अनेकदा सांगत असे परंतु मिहीका  कोणतीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नसे...तिचे सतत एकच म्हणणे असे ...


i am an adult. I will lead my life the way i want. its none of u r business dad..!


मिहिकाच्या अश्या बोलण्यामुळे नितेशचे मन खट्टू होत असे. त्यावेळेस नितेशला खूप एकटे एकटे वाटत असे. मिनाक्षीच्या आठवणी त्याला घायाळ करत असत. फक्त पैसे आणि करियर करण्याच्या नादात आपण खूप काही गमावून बसलोय याची जाणीव त्याला खूप वेदना देत असे परंतु चूक त्याचीच होती. ह्या सगळ्यात आपण मिहिकाला तर गमावणार नाही ना ..! ही चिंता त्याला मनोमनी सतत छळत असे.  


त्याचवेळेस मिहिकाच्या आयुष्यात समीर आला. समीर एक स्मार्ट , टॅलेंटेड आणि हुशार मुलगा. लहानपणीच आईवडील एका अपघातात देवाघरी गेल्यामुळे त्याचा सांभाळ त्याच्या आजी आजोबांनी केला होता. मिहिकाच्याच ऑफिस मध्ये काम करणारा. Onsight मिळाल्यामुळे तो काही वर्षासाठी भारतातून अमेरिकेत आलेला. मिहिका आणि समीर दोघांचेही ऑफिसच्या कामामुळे एकमेकांसोबत बोलणे वाढले. त्यांच्या भेटी वाढल्या. अधून मधून मिहिका समीरला घरी देखील आणत असे. मुळातच समीर स्वभावाने खूप सोज्वळ आणि त्यातल्या त्यात भारतीय त्यामुळे नितेशला देखील समीर सोबत मिहिकाच्या मैत्रीला हरकत नव्हती. त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले दोघांनाही समजले नाही.   


मिहिका आणि समीर दोघेही एकमेकांना आवडत होते त्यामुळे समीरने स्वतःच्या प्रेमाची कबुली देण्याचे ठरवले. मिहिकाला एका सुंदर रिसॉर्टवर समीरने बोलावले. एका रूम मध्ये सुंदर सजावट केली होती. लाल गुलाबांनी सजवलेली रूम , मंद आवाजात सुरु असणारे संगीत , टेबलवर सजवून ठेवलेला केक ..त्यावर लिहिलेली अक्षरे ...


I Love u मिहिका ....!  


हे सगळे पाहून मिहिका खूपच खुश झाली. समीरने गुडघ्यावर बसून मिहिकाला फुल दिले आणि म्हणाला ..


" माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझी साथ देशील ना ..? I love u मिहिका ..." 


त्याच्या हातातील गुलाबाचे फुल तिने अलगद पणे स्वतःच्या हातात घेतले आणि समीरला हसून तिने म्हटले ..


" l love u too समीर ...फक्त एक प्रॉमिस कर मला ..काहीही झाले तरी मला सोडून जाणार नाहीस ना ...u never leave me ..."


त्यावर समीर तिला म्हणाला ..


" मी तुला कधीच सोडून जाणार नाही. आयुष्यभर प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणी तुझी कायम सोबत करेल असे म्हणून खिशातून त्याने एक सुंदर डायमंड रिंग काढून समीरने मिहीकाचा हात हातात घेतला आणि तो बोलू लागला ...


आयुष्याच्या प्रत्येक क्षणात मला तुझी साथ हवी आहे मिहिका ..मला आयुष्यभर तु फक्त माझी म्हणून हवी आहेस ...


Be my happiness forever ...will u marry me ..? माझ्याशी लग्न करशील ..?


हे सगळे ऐकून मात्र मिहिका शॉक झाली आणि तिने लगेचच समीरच्या हातातून स्वतःचा हात खेचून मागे घेतला. तिच्या अश्या वागण्याने समीर ओशाळला. तो तिची माफी मागू लागला.  


" सॉरी मिहिका , इतके अचानक मी माझे प्रेम जाहीर केले आणि लगेच लग्नाबद्दल विचारले , ते नको विचारायला हवे होते. लग्न हा आयुष्याचा निर्णय आहे आणि तो घेण्यासाठी मी तुला थोडा वेळ द्यायला हवा होता. Sorry , Take your  time .." 


हे सगळे ऐकून मिहिका समीरला समजावू लागली.  


समीर , I love u ..आणि तु मला आयुष्यभर असाच हवा आहेस... आणि लग्नाबद्दल बोलशील तर लग्न म्हणजे प्रत्येक लव्हस्टोरीचा शेवट असतो. - मिहिका 


असे नाही मिहिका ...लग्न म्हणजेच प्रेमाची सुरुवात असते. इट्स बिगीनिंग ...नॉट एन्ड ..!  


लग्न एक सुंदर सुरुवात असते. आयुष्यभर ज्या व्यक्ती सोबत आपल्याला आयुष्य घालवायला आवडेल अश्याच व्यक्ती सोबतच्या नात्याची सुरुवात असते ती ..- समीर 


" हो, पण लग्न म्हणजेच संसाराची सुरुवात ..आपण दोघेही एकमेकांसाठी नसून फक्त आपल्या घरच्यांसाठी जगू ..कोणाची सून मामी , मावशी , काकू ..या सगळ्या नात्यांमध्ये गुरफटण्याची सुरुवात असते ती..."  


" लग्न म्हणजेच बॉयफ्रेंडचा नवरा आणि गर्लफ्रेंड ची बायको होते फक्त...ज्या प्रेमामुळे आपण बांधले जातो ते संसाराच्या गर्दीत , कर्तव्याच्या नावाखाली हरवते रे कुठेतरी ..." मिहिका 


" तुला नेमके काय म्हणायचं आहे मिहिका . प्रत्येक प्रेमाचा शेवट हा लग्नातच असतो. मग लग्न नको होते तर प्रेम का केलेस माझ्यावर..? मला असं फसवून काय मिळाले तुला ...? "  समीर  


" तुला फसवलं नाही मी समीर ...माझे खरंच प्रेम आहे तुझ्यावर ...ठरवून प्रेमात पडता येत नाही ते आपोआप होते. तसेच माझ्यासोबत देखील झाले.  कळत नकळत तुझ्यात गुंतत गेली मी ...आणि कधी तुझ्या प्रेमात पडले ... मला देखील समजलं नाही..." 


" कुठल्याही नात्याला बंधन घातले कि तुटते. त्यामुळे मला या बंधनात अडकायचे नाहीये पण तरी देखील तु मला हवा आहेस ..." 


" हृदयाच्या तारा जुळल्या की मग रीतिरिवाजांची काय गरज?" मिहिका  


" अग पण प्रेम म्हणजे समर्पण , त्याग , एकमेकांची सोबत , अंडस्टॅण्डिंग म्हणजेच लग्न ....दोन जीवांची कंमिटमेन्ट ..आयुष्यभर सोबत राहण्याची ..." 


" प्रेम , जे आपण आपल्या पेक्षा आधीच्या पिढीमध्ये पाहतोय , माझे आजीआजोबा , आपले काका काकूंमध्ये , मामामामी मध्ये , मावशी काकांमध्ये पाहतोय . त्यांची एकमेकांविषयीची काळजी , त्यातून त्यांनी केलेला संसार ..हे सगळे आपण पाहतोय..." समीर  


" जर लग्नात प्रेम असते ना समीर ..तर डॅड असा माझ्या मम्माला सोडून अमेरिकेत नसता आला. त्यांनी लग्न केले आणि मम्माला तिच्या कर्त्यव्याच्या बंधनांनी बांधून ठेवले. या कर्त्यव्यामुळेच त्यांचे दोघांचेही प्रेम संपले...


आणि मला हेच बंधन नकोय ..." 


" मला आयुष्यभर तु हवा आहेस पण नवरा म्हणून नाही तर पार्टनर म्हणून ...आपण एकत्र राहूया ...फक्त आपण दोघेच ...let's live in ...."


" लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय मला जास्त चांगला वाटतोय. एकमेकांना बंधन नाही. जावई , सून असे कुठलेच टॅग नाही.  मुलबाळ , संसार कुठल्याच अपेक्षा नाही." 


" फक्त आपण दोघेही एकमेकांसाठी ..."  


" काहीही बंधन नाही... फॅमिलीचे टेन्शन नाही. सकाळ झाली कि काय स्वयंपाक करायचा पासून कामवाली बाई आली नाही इथपर्यंत कुठलेच टेन्शन नाही." 


" कुठलेच टेन्शन नसेल तर आपण आपल्या करिअर कडे देखील खूपच चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतो. " मिहिका  


" माझ्या सारख्या अनाथ मुलाला आईवडील , संसार आणि प्रेमाचे किती महत्व आहे हे तुला नाही कळणार. कारण नात्याला महत्व देणाऱ्या आईला तु नाही ओळखू शकली तर माझे प्रेम तरी तुला काय समजणार...? "


" तुझ्याकडून ती अपेक्षा करणेच चुकीचे आहे. आपली मुले , आपलं नातं , आपला संसार या सगळ्यांची खूप सारी स्वप्न सजवली होती मी ..पण तु मात्र ती सारी स्वप्न धुळीस मिळवली." 


" मला लग्न हवं आहे आणि तुला ते नकोय तर हे सगळे इथेच थांबण्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही. "  


" मला माझा एकटेपणा सहन होईनासा झाला आहे आणि मला ते बंधन हवे आहे पण तुला जर समजून घ्यायचे नसेल तर इट्स ओके ...." 


" पण फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनून मला तुझ्यासोबत राहायचे नाही. तुला लग्न नकोय तर मला तु नकोय ..." 


" आयुष्यभराचे ऋणानुबंध जपण्यासाठी मी तुझ्यावर प्रेम केले पण काही क्षणांची सोबत करणे देखील नाही जमले तुला...."  


इतके बोलून समीर तिथून निघून गेला.मिहिका साठी हा खूप मोठा शॉक होता. मिहिका स्तिमित झाली. समीरच्या या बोलण्यावर ती पुढे काहीच बोलू शकली नाही. ती फक्त त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली . आपल्या हातातून काहीतरी खूप मौल्यवान निसटलं आहे याची तिला जाणीव झाली. 


क्रमशः 


मिहिका आणि समीर पुन्हा एकत्र येतील का .? नितेश पुन्हा मिनाक्षीला भेटेल का ..?  मिहिका आणि तिच्या आईची अर्थातच मिनाक्षीची भेट होऊ शकेल का ..? या नात्यांची किंमत मिहिकाला समजेल का ..? हे सगळे जाणून घ्यायचे आहेच ना ..? मग याच कथेचा पुढचा आणि अंतिम भाग " युगायुगांचे नाते अपुले भाग 3 " वाचायला विसरू नका.


भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇

👉 युगायुगांचे नाते अपुले भाग अंतिम

कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद !🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - Pinterest 


✍©️ जया पाटील




  





 













Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box