श्रीगणेशा...
©️ जया पाटील
" काय बाई सुमन , नशीब काढून आलीस हा पोरी ...! थोरातांच्या घरची सून होणार आहेस तू ...! "
" मुलगा इतका मोठा व्यावसायिक , इतके श्रीमंत सासर , नोकरचाकर , इतका मोठा वाडा , कसली म्हणून कमी नाही ... इतके सगळे मिळायला नशीबच लागते ग बाळा ..."
" नलिनीवहिनींची पुण्याई कामाला आली आणि लेकीला इतके छान सासर मिळाले. "
" हा पण सुमन , सगळे काही व्यवस्थित असले तरी तुझ्या सासूबाई पार्वतीबाई मात्र खूप कडक शिस्तीच्या आहेत. संपूर्ण गावात त्यांचा दरारा आहे. त्यांचे मन तेवढे मोडू नकोस हा पोरी.. ! "
सुनीताकाकू त्यांच्या लाडक्या भाचीला अर्थातच सुमनला समजावत होत्या.
सुमनचा विवाह जवळच्याच गावातील अनिल बाळकृष्ण थोरात यांच्या सोबत ठरला होता. अनिल हा बाळकृष्ण थोरात यांचा एकुलता एक मुलगा होता.
श्री बाळकृष्ण थोरात गावातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व होते. प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांचा संपूर्ण तालुक्यात वचक होता. शेतीसोबत पोल्ट्रीफार्म , आणि इतर अनेक लघुउदयॊगात देखील ते अग्रेसर होते. कित्येक होतकरू तरुणांना त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु करून देण्यास मदत केली होती.
अनेक शेती पूरक लघुउद्योग उभारून त्यांनी गावातील कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. सगळे व्यवस्थित चालू असतानाच बाळकृष्ण थोरात यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि ते अंथरुणाला खिळले.
अनिल तेव्हा बारावीत शिकत होता त्यामुळे उद्योगांचा हा व्याप अनिलला सांभाळने शक्य नव्हते. अशा बिकट परिस्थितीत अनिलच्या आईने अर्थातच पार्वतीबाईंनी उद्योग सांभाळण्याची धुरा स्वतःकडे घेतली.
त्या फार काही शिकलेल्या नसल्या तरीही चतुर, चाणाक्ष आणि व्यवहार कुशल होत्या. या गुणांच्या बळावर पार्वतीबाईंनी उद्योगात टिकून राहायचे म्हणून सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या.
व्यवहारातील सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवले. व्यसायातील कर्मचाऱ्यांवर देखील त्यांचा चांगला वचक होता. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी थोराताचा व्यवसाय खूप पुढे आणला होता.
त्यांचा मुलगा अनिल देखील अत्यंत गुणी आणि संस्कारशील मुलगा होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसाय आणि शेतीची सगळी जबाबदारी त्यांनी अनिलवर सोपवली होती.
त्यांचा हा लघुउद्योगांचा सगळा व्याप आता अनिल पाहत होता.
बाळकृष्ण थोरात अंथरुणावर खिळलेले असल्यामुळे अनिलसाठी वधूसंशोधन करण्याची जबाबदारी देखील पार्वतीबाईंवर येऊन पडली होती.
पार्वतीबाईंचे अगदी विश्वासू कर्मचारी सुनील काळेंनी अनिलसाठी सुमनचे स्थळ आणले. सुमन पाहताक्षणीच पार्वतीबाईंच्या नजरेत भरली आणि त्यांनी अनिल आणि सुमन यांच्या विवाहाला होकार दिला.
पार्वतीबाईंनी आधीपासून सगळे एकटीने सांभाळले असल्यामुळे कमी वयात पडलेल्या या जबाबदारीमुळे त्या मितभाषी आणि कडक शिस्तीच्या होत्या. त्यामुळे पंचक्रोशीत त्यांचा स्वभाव अत्यंत कडक आणि गंभीर आहे अशी चर्चा होती.
सुमनच्या कानावर देखील या सगळ्या गोष्टी पडल्या होत्या. त्यामुळे लग्नापूर्वीच तिला पार्वतीबाईंची भीती वाटत होती. तिच्या मनात पार्वतीबाईंच्या स्वभावाविषयी अनेक समज-गैरसमज निर्माण झाले होते.
ठरलेल्या मुहूर्तावर सुमन आणि अनिलचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. माप ओलांडून सुमन थोरातांच्या घरची गृहलक्ष्मी झाली. पार्वतीबाई सुमनला अगदी प्रेमाने आणि आपुलकीने वागवत असत परंतु त्यांच्या या प्रेमाला देखील सुमन धाकच समजत होती.
पार्वतीबाई जेव्हाही सुमनसोबत बोलण्याचा प्रयत्न करत त्यावेळी ती फक्त त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असे. त्याव्यतिरिक्त एक अवाक्षर देखील सुमन पार्वतीबाईंसोबत बोलत नसे.
सुमनच्या वागण्यातला कोरडेपणा पार्वतीबाईंच्या लक्षात येत होता. सुमन अजून नवीन आहे म्हणून थोडी घाबरत असेल असा विचार त्यांच्या मनात येत असे. इतके प्रेमाने वागून देखील सुमन आपल्यासोबत मनमोकळे पणाने का वागत नाही हा एक मोठा प्रश्न पार्वतीबाईंसमोर उभा ठाकला होता.
एक दिवस अनिल आणि सुमनने जवळच्या तालुक्याच्या गावाला नाटकाला जायचे ठरवले होते पण अनिलचे काहीतरी महत्वाचे काम निघाल्यामुळे त्याने हा प्रोग्राम रद्द केला. सुमन हिरमुसली. तिची नाराजी पार्वतीबाईंनी अचूक हेरली. त्यावेळी नाराज सुमनला त्या म्हणाल्या ...
" पोरी , अनिल आणि तू नाटकाला जाऊ शकल नाहीत म्हणून नाराज आहेस का ..?
"अं ...हं...तसे काही नाही आई ..मी नाराज नाही झाले .." पार्वतीबाईंना घाबरून सुमनने उत्तर दिले.
" चल जाऊ दे , अनिलला वेळ नसला म्हणून काय झालं ..? आपण दोघी आहोत ना .एकमेकांसोबत ...चल तयार हो ..आपण लगेच निघूया ...येताना तुला आवडते तो पदार्थ बाहेरून खाऊया. कमळामावशीला फक्त साहेबांचा आणि अनिलचा स्वयंपाक करायला सांगते. "
पार्वतीबाई सुमनला घेऊन तालुक्याच्या गावाला गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी नाटक पाहिले. सुमनला आवडणारे सगळे चाट त्यांनी तिला खाऊ घातले. दोघीनींही मस्त रगडापुरी , भेळपुरी , रगडापॅटिस अश्या सगळ्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारला. शेवटी मस्त मटकाकुल्फी खात दोघीही परतीच्या प्रवासाला लागल्या.
पार्वतीबाई अगदी छोट्या मुलाप्रमाणे सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होत्या. पार्वतीबाईंचे आजचे वागणे पाहून सुमनला थोडे आश्चर्यच वाटले.
इतके सगळे झाले तरी सुमनच्या वागण्यात मात्र फार काही बदल झालाच नव्हता. एक दिवस अनिलने बँकेतून पैसे काढून आणले. त्यातून दोन लाखांची रक्कम त्याने सुमनजवळ सांभाळून ठेवण्यासाठी दिली.अनिलसोबत बोलताना सुमनने पैसे लपवून ठेवून दिले त्यानंतर मात्र तिला पैसे कुठे ठेवले आहेत याचा विसर पडला.
काही दिवसांनी अनिल सुमनकडून ते पैसे परत मागू लागला. सुमनने पैसे कुठे ठेवले आहेत हे आठवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिला पैसे कुठे ठेवले हे तिला आठवतच नव्हते. पैश्यांची रक्कम देखील मोठी होती त्यामुळे अनिल तिच्यावर चिडचिड करू लागला.
सुमनकडून ते पैसे स्वतःसाठी खर्च झालेत असा आरोप अनिलने लावला. बोलण्याबोलण्यात अनिल आणि सुमन मधील वाद वाढत गेला. आपल्यावरचा आरोप सहन न झाल्यामुळे सुमनने देखील अनिलला उत्तरे दिली.
सुमनने दिलेल्या उत्तरांमुळे अनिलचा खूप संताप झाला आणि त्याने सुमनवर हात उगारण्यासाठी हात पुढे केला त्याचवेळेस पार्वतीबाईंनी तिथे येऊन त्याचा हात अडवला आणि चिडून त्या म्हणाल्या ....
" लाज नाही वाटत अनिल , बायकोवर हात उगारतोस ...? हे संस्कार दिले आहेत मी तुला ...? "
" दोन लाखांच्या रकमेसाठी तू तिच्यावर इतके नको ते आरोप लावतो आहेस..हेच संस्कार दिले आहेत का मी तुला ..? "
" खबरदार या पुढे जर सुमनच्या अंगावर हात उगारलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. "
" माझ्या सुनेची अशी हेळसांड केलेली मी सहन करणार नाही. सुमन आपल्या घरची गृहलक्ष्मी आहे आणि लक्ष्मीचा अपमान मला कधीच मान्य नाही. "
पार्वतीबाईंच्या या रौद्ररुपाला पाहून अनिल घाबरून तिथून निघून गेला. आईंनी आपली बाजू घेतली आणि माझ्यावर पूर्ण विश्वास केल्यामुळे सुमनला पार्वतीबाईंचा खूप आदर वाटला मात्र पैसे सापडले नाहीत तर मात्र आई माझ्यावर खूप चिडणार अशी भीतीही वाटली.
या सगळ्या तणावामुळे सुमनचे संपूर्ण अंग तापाने फणफणले. पार्वतीबाईंनी पैसे शोधायला सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यावर वरच्या माळ्यावरच्या बॅगमध्ये पैसे सापडले.
इकडे सुमन मात्र पैसे मिळत नाही म्हणून खूप जास्त आजारी झाली. पैसे मिळाल्यावर पार्वतीबाईंनी अनिलला सुमनसमोर बोलवले आणि त्यावेळी त्यांनी अनिलला समज दिली..
" आपल्या माणसांवर आरोप लावण्याआधी त्यांना एकदा संधी नेहमी द्यायची असते अनिल....त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी .."
" काही ओरखडे मनावर इतका खोलवर आघात करतात ना की मग त्या नात्यातला सगळा ओलावा संपून जातो ..त्यामुळे जपून वाग. "
ते पैसे घेऊन अनिल व्यवसायाचे पेमेंट करण्यासाठी निघून गेला. इकडे सुमनला मात्र घडलेल्या प्रकारामुळे खूप मनस्ताप झाला होता.
पार्वतीबाई तिला समजावण्यासाठी तिच्या जवळ आल्या. त्यांना पाहून मात्र ती जास्तच थरथर लागली त्यावेळी तिच्या डोक्यावर हात फिरवत त्याला म्हणाल्या ..
" सुमन ,बाळा घाबरू नकोस. खूप दिवसांपासून तुझ्यासोबत बोलायचं होते. माझ्या एकदा गोष्ट सतत नजरेत येतेय की तुला मला नेहमी टाळतेस पण आज सगळा प्रकार माझ्या लक्षात येतोय. तुला मला खूप घाबरतेस ...? हो की नाही खरं सांग बाळा ..."
पार्वतीबाईंच्या प्रश्नावर सुमनने मानेनेच होकार दिला.
" अग मला घाबरायला मला काय शिंगबिंग फुटले की काय ...? इतकी वाईट आहे का मी सुमन की तुला माझी इतकी भीती वाटते ..? " पार्वतीबाई
" तसे नाही आई ...पण माझे लग्न ठरले तेव्हापासूनच मी तुमच्या कडक शिस्तीबद्दल आणि स्वभावाबद्दल ऐकून होती. लग्न झाले तेव्हा देखील घरातील प्रत्येकावर असलेला दरारा मी पाहत आली आणि माझी तुमच्या विषयीची भीती वाढत गेली.."
" पण आता वाटते आहे आई की मी चुकीची होती. तुम्ही तर खूपच छान आहात. सॉरी आई , मला माफ करा. मी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतले." सुमन
"तू चुकीची नाहीस पोरी पण परिस्थितीने मला तसे वागायला शिकवले. मी आणि साहेब आमचा दोघांचाही संसार अगदी सुखात सुरु होता. मी त्यांना नेहमी साहेबचं म्हणावं अशी त्यांची इच्छा होती."
"चांगले घर , मनमिळाऊ आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा , गोड मुलगा अनिल ...सुख म्हणजे या पेक्षा जास्त काय असते ..? अगदी सुखाचा संसार होता आमचा.."
"सारेकाही आलबेल चालू होते. साहेबांनी मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने इतके मोठे विश्व उभारले होते. अनिल देखील लहानपणापासूनच गुणी होता. "
" सारे काही खरे असले तरी नशीब मात्र आपल्या हातात नसते. सुखासोबत दुःख हे येतच असत. दुःखाचे हे चटके सोसण्याशिवाय कोणाचीच सुटका नसते. "
"अनिल बारावीत गेला आणि त्यावेळी साहेबांना अर्धांगवायूचा झटका आला आणि ते अंथरुणाला खिळले ते कायमचेच.."
" त्यांच्या या अवस्थेमुळे काही लोकांना दुःख झाले तर काही लोकांना आनंद झाला. बाळकृष्ण थोरात आता पुन्हा कधीच यशस्वी होऊ शकत नाही म्हणून कित्येक लोकांना आसुरी आनंद झाला परंतु साहेबांचे कष्ट मला असे वाया जाऊ द्यायचे नव्हते म्हणून मी व्यवसाय सांभाळण्याचे ठरवले पण यात देखील कित्येक लोकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला परंतु मी मात्र मागे हटली नाही ..."
" स्त्रीची अब्रू म्हणजेच काचेचं भांडं असते. नवरा अधू , त्यात एक लहान मुलगा अशी एकटी होती ग मी .... परिस्थितीपुढे हतबल होती."
"माझ्या ह्या हतबलतेचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून मी स्वतःच एक मुखवटा घालून जगू लागली. माझ्या वैयक्तिक बाबतीत कोणीही बोलू नये म्हणून मी कणखर बनली आणि तेव्हापासूनच मी कडक शिस्तीची आणि पुरोगामी विचारांची आहे असे सगळे बोलू लागले. "
" अनिल देखील वडिलांची अशी हालत पाहून वाईट वळणाला लागू नये म्हणून मी त्याच्यासोबत देखील कोडगेपणानेच वागली. त्यामुळेच तो आज सगळे व्यवस्थित सांभाळू शकतोय."
" मला मुलगी नव्हती त्यामुळे ज्यावेळी मी तुला पहिल्यांदा पाहिले त्यावेळेस माझी लेकचं मला मिळालीय असा भास झाला परंतु माझ्या स्वभावाच्या प्रसिद्धीमुळे लेकीचं सुख देखील मला मिळू शकले नाही ..! "
पार्वतीबाईंचे बोलणे ऐकताना सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आईंनी किती आणि काय काय सोसलं आहे याची तिला जाणीव झाली.
आपण खरंच आईंना ओळखण्यात चूक केली या गोष्टीचा तिला पश्चताप होऊ लागला. ती पार्वतीबाईंचा हात हातात घेऊन म्हणाली ..
" मला माफ करा आई , लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन मी तुमच्याविषयी गैरसमज करून घेतले आणि तुमच्यासोबत इतकी कोडगेपणाने वागली. तुमच्या स्वभावातील आईची माया मला कळलीच नाही ..."
" आयुष्यभर एक मुखवटा लावून जीवन जगल्या, खूप काही सहन केले पण आता मात्र नाही कारण तुमच्या प्रत्येक संकटात ,सुखा- दुःखात साथ देण्यासाठी तुमची ही लेक खंबीरपणे उभी आहे. "
एवढं बोलून सुमनने पार्वतीबाईंना घट्ट मिठी मारली. आजपासून सासू-सुनेच्या नात्यातून माय-लेक या नवीन नात्याचा श्रीगणेशा झाला होता. 🙏🙏
समाप्त !
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box