पाहुणे नाही तर सदस्य म्हणा

#पाहुणे_नाही_तर_सदस्य_म्हणा... 

©️जया पाटील 



" अग अनुश्री , सध्या तू फार गडबडीत दिसते आहेस ... काही टेन्शन आहे का ...? ऑफिसच्या सुट्टीत पण सारखी सुधीर सोबत बोलत असते. " 

" तुला माझ्या सोबत पण बोलायला वेळ नाहीये ..घरी काहीच गडबड सुरु आहे का ..? पुढच्या आठवड्यापासून तू दहा दिवसांची सुट्टी देखील टाकली आहे.." 

" ऑफिस संपले की नेहमीतर तू आमच्या सोबत गप्पा करत बाहेर पडायची आणि आता एक आठवडा झाला मी पाहतेय तुला सगळ्यांच्या आधीच घरी निघायची घाई असते. " 

" काही अडचण असेल तर मला सांग. मैत्रीण म्हणून तुला काहीतरी मदत नक्कीच करू शकेन मी ...."

नेहा तिच्या ऑफिसच्या मैत्रिणीची म्हणजेच अनुश्रीची काळजीने चौकशी करत होती कारण अनुश्री नेहमी हसत खेळत राहणारी होती पण मागील काही दिवसात ती सतत कसल्यातरी धावपळीत दिसत होती. त्यामुळेच नेहाला तिची चिंता वाटली.

" अग नेहा , टेन्शन नाही ग कसले पण घरी पाहुणे येणार आहे. त्यामुळे त्याचीच तयारी चालू आहे. एरवी ऑफिसच्या कामामुळे घराकडे पाहायला वेळ मिळत नाही. "

"त्यामुळे घरातील स्वच्छता , किराणामाल आणणे , घरातील पडदे धुणे आणि इतर पण बरीच स्वच्छता बाकी आहे ग ..."

" सुधीर आणि मी एकमेकांच्या वेळा सांभाळून ही सगळी कामे पूर्ण करतो आहे त्यामुळे त्याला त्याच्या कामांची आठवण करून द्यावी लागते नाहीतर तो त्याची कामे विसरतो. त्यामुळे आता ऑफिसच्या सुटीत मी त्याच्यासोबत बोलत असते. " 

" आता पाहुणे घरी येणार म्हणजे त्यांना सगळे ताटावरच्या पाटावर द्यायला नको का ..? म्हणूनच  दहा दिवसांची सुट्टी टाकली आहे मी ऑफिसला.."  

" तू ना नेहा , कसलीही चिंता करतेस ..अग माझ्या आयुष्यात काही टेन्शन असले तर सगळ्यात प्रथम मी तुझ्यासोबतच शेयर करते ना सगळे... u know that very well ..." अनुश्री 

" अस्स होय , मला तुझी काळजी वाटली म्हणूनच विचारले. Anyways तुझ्याकडे येणारी पाहुणेमंडळी चांगलीच व्हीआयपी दिसताय बरं का ...? कारण कधीही तडजोड न करणारी आमची अनुश्री चक्क पाहुण्यांच्या स्वागतासाठी ऑफिसला सुट्टी टाकून घरी राहतेय ..." 

तेवढे बोलून नेहा आणि अनुश्री दोघीही मनमुराद हसू लागल्या.

अनुश्री आणि सुधीर एक मध्यवर्गीय जोडपं. त्यांना ऋतुराज नावाचा एक गोड मुलगा ही होता. सुधीर त्याच्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा. कामानिमित्त सुधीर शहरात स्थायिक झाला. त्याच्या आईबाबांना मात्र शहरात करमत नसे त्यामुळे ते गावाकडेच राहिले. 

अधूनमधून किंवा वर्षातून एकदा ते आपल्या नातवाला अर्थातच ऋतुराजला भेटण्यासाठी शहरात सुधीर कडे येत असत. एकदोन आठवडे राहून पुन्हा परतीच्या मार्गाला लागत असत. त्याकाळात अनुश्री आणि सुधीर दोघेही त्यांचे खूप स्वागत आणि आदिरातिथ्य करत असत परंतु सुधीरच्या आईबाबांना मात्र ते फारसे आवडत नसे. 

यावर्षी देखील ते येत असल्याचा निरोप त्यांनी सुधीरला कळवला आणि अनुश्रीची तयारी सुरु झाली. दुसऱ्यादिवशी आईबाबा येणार त्याच्या आठवडाभर आधीच अनुश्रीचे प्लॅनिंग करून झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच ती लवकर उठण्यासाठी सुधीरच्या मागे लागली.

" अरे सुधीर , आटोप पटकन , आईबाबांची ट्रेन येण्याचा वेळ झाला आहे.. आपल्याला लवकरच निघायला हवं स्टेशनवर जाण्यासाठी ..नाहीतर त्यांची आणि आपली उगाच चुकामुक व्हायची ..." 

लगबगीने अनुश्री आणि सुधीर स्टेशनवर पोहोचले. दुरूनच त्यांना पाहून आईबाबांना खूप आनंद झाला. ऋतुराजला पाहून तर त्यांच्या आनंदाला पार उरला नाही. अनुश्रीने देखील त्यांचे खूप छान स्वागत केले. छोटा ऋतुराज आजीआजोबांना म्हणाला ....

" आजीआजोबा , माझ्या घरी चला ना लवकर... तुमची किती दिवसांनी येतात माझ्या घरी मला भेटायला ..." 

ऋतुराजचे बोलणे ऐकून मात्र सुधीरच्या आईबाबांचा चेहराच पडला कारण ऋतुराजचे  " माझ्याघरी " हे शब्द त्यांच्या मनावर नकळतपणे खूप मोठा आघात करून गेले होते. 

आईबाबा आल्यापासून अनुश्री त्यांना कुठलेच काम करू देत नव्हती. रोजच्या रोज वेगवेगळे पाहुणचार , बाहेर फिरायला जाणे हे सगळे अगदीच अगत्याने सुरु होते. तरीही आईबाबांच्या मनाची घालमेल मात्र थांबत नव्हती. 

छोट्या ऋतुराज मध्ये मन गुंतवण्याचा ते प्रयत्न करत होते. अनुश्रीला त्यांचे हे वागणे खटकत होते. इतके सगळे आगत स्वागत करून देखील आईबाबांना माझे कौतुकच नाही हा प्रश्न सतत अनुश्रीला सतावत होता. 

त्याच दरम्यान ऑफिसच्या कागदपत्रांवर अनुश्रीची सही हवी होती आणि अनुश्री रजेवर असल्यामुळे नेहा ती कागदपत्र घेऊन अनुश्रीच्या घरी आली. 

अनुश्रीच्या सासूसासर्यांना भेटून नेहा खूप खुश झाली. त्यांनी दोघांनीही नेहा सोबत भरभरून गप्पा केल्या. नेहा त्या दोघांनाही प्रश्न विचारत म्हणाली ...

" काय मग काका काकू , तुमचा वेळ ऋतुराज मुळे मस्त जात असणार ना ....अनुश्री आणि सुधीर पण तुम्हाला वेळ देत आहे त्यामुळे सोने पे सुहागा ! ...खूप एन्जॉय करत असणार ना हे सगळे तुम्ही...?  " 

त्यावर सुधीरचे आईबाबा म्हणाले ...

" आपल्या मुलांना,  नातूबाला भेटून सगळ्या आईवडिलांना होतो तितकाच आनंद झाला आम्हालाही ..वर्षभर आम्ही याच सुट्यांची वाट पाहत असतो कि आम्ही सुट्टीत ऋतुराजला भेटण्यासाठी जाऊ. त्यांच्या सगळ्यांच्या भेटीला आतुरलेले असतो आम्ही ..."

" पण इथे आले कि वाटते आमच्यामुळे त्यांची खूप धावपळ आणि गैरसोय होते. अनुश्रीला आमच्यामुळे ऑफिसला सुट्टी घ्यावी लागते. आम्ही तिला मदत करण्याचे ठरवतोही पण ती मात्र आम्हाला काहीच काम करू देत नाही. अगदीच पाहुणे बनवून ठेवते. त्यामुळे आम्ही फार दिवस इथे राहतच नाही. आम्ही गेलो कि मग अनुश्री ऑफिस जॉईन करायला मोकळी होते ना ..." 

त्यांचे बोलणे ऐकून नेहाला थोडे अवघडल्या सारखे झाले. त्याच वेळेस ऋतुराज तिथे आला आणि विषय बदलायचा म्हणूनच नेहा त्याच्या सोबत बोलू लागली.

" काय मग ऋतुराज , आजीआजोबा आले कि मज्जा असते बुवा एका मुलाची ...हो कि नाही..? तुला खूप आवडते ना आजीआजोबा इथे आले की ....?  "

" हो नेहा मावशी , आजीआजोबा माझ्याघरी आले की माझी खूप मज्जा असते पण बघ ना ...मावशी आजीआजोबा त्यांचे गावाचे घर सोडून येतच नाही आमच्याघरी रहायला ..."

" आजीआजोबा आले की मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला सांगतो की आमच्या घरी माझे सगळ्यात आवडते पाहुणे आले आहेत..." 

ऋतुराजचे हे बोलणे ऐकून सुधीरच्या आईबाबांच्या डोळ्यातून नकळत पाणी तरळले परंतु कोणाच्याही लक्षात येण्याच्या आत त्यांनी ते अश्रू डोळ्याआड लपवले.

त्यांचे हे दुःख नेहाने अचूक हेरले. आमचे घर आणि पाहुणे हे ऋतुराजचे शब्द त्यांच्या काळजावर मोठा घाव घालून गेले होते.

त्याचवेळेस अनुश्रीने नेहाला किचन मध्ये बोलावले. अनुश्री नेहासोबत बोलू लागली. 

" अग नेहा , थकली ग मी खूप , काय सांगत होते ग आईबाबा तुला ...त्यांचे इतकेच सगळे नीटनेटके करून सुद्धा नाराजच असतात ते नेहमीच ...कसे वागावे ना त्यांच्यासोबत आता मलाच कळेनास झालंय..? "

अनुश्रीच्या बोलण्यावर नेहा तिला म्हणाली ...

" अग स्वतःच्याच घरात जेव्हा तू त्यांना पाहुणे बनवले आहे तर कसे खुश असणार ते ...? स्वतःचा नातू जेव्हा आमच्याघरी आजीआजोबा आले आहेत असे सांगतो तेव्हा कसे आनंदी होतील ते ...? "

" तुला नेमके काय म्हणायचं आहे नेहा ...मला तुझ्या बोलण्याचा अर्थ लागत नाहीये ...तुला नेमके काय म्हणायचे ते नीट सांगशील का .?" 

अनुश्री नेहाचे बोलणे अर्धवट थांबवून नेहाला म्हणाली.
 
" अग अनुश्री , आईबाबा ही माणसं आहेत की ज्यांना आपण न सांगताही आपल्या मनातील भावना समजतात. ते आपले पालनपोषण करू शकतात तर ते स्वतःची काळजी देखील घेऊ शकतात. त्यांना आपल्याकडून अपेक्षा असते ती म्हणजे फक्त थोड्याश्या प्रेमाची ,आपलेपणाची! "

" ज्यावेळी तुझा मुलगा त्यांना " आपले घर "  म्हणण्याऐवजी " आमचे घर " असे संभोधतो. त्यावेळी काय वाटत असेल ग त्यांना ...? कारण सुधीर त्यांचा मुलगा आहे म्हणजेच हे घरही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांचेच आहे ना ...! " 

" स्वतःच्याच घरात जेव्हा त्यांना पाहुण्यांसारखी किंवा बाहेरच्यासारखी वागणूक मिळते तेव्हा ते कसे खुश राहू शकतील? "

" प्रत्येक पालक आपल्या मुलांना स्थिरस्थावर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचतात. तीच मुले जेव्हा सेटल होतात तेव्हा आपल्यात आईबाबांचे आपल्या घरी येणे मोकळेपणाने का स्वीकारू शकत नाही..? "

" अनुश्री , तू नोकरी करते आहेस .. सुधीर इतकी मेहनत करतो आहे ती ऋतुराजसाठीच ना ..मग ऋतुराज मोठ्या झाल्यावर त्याची बायको जेव्हा तुला पाहुण्यासारखे वागवेल तर ते तू आणि सुधीर सहन करू शकशील ..? जेव्हा तुम्ही दोघेही असेच ऋतुराजच्या घरी उपेक्षित असाल तर मान्य होईल तुला ..? " 

" तू जेव्हा ऋतुराजच्या मनात त्याच्या आजीआजोबांविषयीचा आपलेपणा जपशील. त्यांच्याविषयी त्याला सवेन्दनशील ठेवशील त्याच वेळेस तो तुझे आणि सुधीरचे म्हातारपण देखील समजून घेईल."  
"आजीआजोबा पाहुणे नाही तर आपल्या घरातील सदस्य आहे, हे घर आपल्या आजीआजोबांचे आहे हे तू जेव्हा तुझ्या मुलाला शिकवशील त्याचवेळेस तो खऱ्या अर्थाने त्यांना आपले मानू शकेल." 

" ऋतुराजने प्रेमळपणे त्याच्या आजी आजोबांसोबत एकत्र घालवलेले क्षण म्हणजेच तुमच्या उत्तरार्धाच्या रोपट्याला , त्याच्या मुळांना घातलेले खत-पाणी असेल. " 

" नाती ही कळसूत्री बाहुल्यांसारखी असतात. ज्यांची दोरी आपल्या समजदारपणात , सुसंवादात , एकमेकांच्या एकरूप विचारात असते. त्यामुळे सगळेच एकमेकांपासून दुर राहा पण एकमेकांच्या हृदयात आणि मनात मात्र प्रत्येक क्षणी राहा. " 

नेहाचे बोलणे ऐकून अनुश्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिचे अश्रूच तिला झालेल्या  पश्चातापाची पोचपावती होती. 

या पश्चातापामुळे अनुश्रीच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडून येणार होता हे मात्र नक्कीच .....! 

समाप्त !

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - pixels


✍©️ जया पाटील

Post a Comment

0 Comments