ठेच

ठेच 


©️जया पाटील 


" आहो ऐकलंत का विराजचे बाबा , आपला विराज आता मोठा झाला आहे. चांगल्या नोकरीला देखील लागला आहे. आता त्याच्यासाठी वधूसंशोधनाला सुरुवात करावी लागणार आपल्याला .." 


" मी काय म्हणते ,  आजच जाऊन वधुवर मंडळात नाव नोंदवून या त्याचे. आपण आपल्या कडून तयारीला सुरुवात करायलाच हवी. " 


" अगं हो सुमती , इतकी घाई का आहे पण तुला ..? विराजची इच्छा काय आहे ..? त्याला कोणी मुलगी आवडते का ? या सगळ्या गोष्टींचा विचार देखील करावा लागेलच ना आपल्याला .." 


" अहो विराजचे बाबा , आपला विराज कधी आपल्या शब्दाबाहेर गेला आहे का ? मग आता तरी कसा जाईल ..? " 


" मला खात्री आहे तो आपल्याच पसंतीच्या मुलीसोबत लग्न करेल. मी आजच विवाहमंडळात  जाऊन त्याची नोंदणी करून येते आणि त्यांनी सुचवलेल्या मुलींचे पत्ते आणि फोटोपण घेऊन येते ..." 


" अग पण सुमती माझे ऐकून तरी घे. एकदा विराज सोबत बोलून तर पहा. " 


" आता पण नाही आणि बिण नाही. लवकरात लवकर विराजच्या लग्नाचा बार उडवून टाकू आपण .." 


विराजच्या आई सुमतीताई मोठ्या उत्साहाने विराजच्या बाबांना सांगत होत्या. 


श्रीरंगराव मोहिते बँकेत काम करणारे सर्वांनी साधारण कर्मचारी. एका फर्मवर काम करणारी त्यांची बायको सुमती मोहिते. त्यांना एक मुलगा विराज. खूप काही श्रीमंत नसले तरीही खाऊन - पिऊन सुखी असलेले कुटुंब .


काटकसरी , सोज्वळ बायको ,  गुणी , संस्कारी मुलगा विराज असा त्यांचा छोटासा त्रिकोणी परिवार. त्यामुळे त्यांचा संसार अगदी सुखात चालू होता. 


हळूहळू दिवस पुढे लोटत होते. श्रीरंगराव आणि सुमतीताईंनी काटकसरीने संसार केला. विराजचे शिक्षण केले. श्रीरंगराव आता निवृत्त झाले होते.


 सुमतीताईंची कामाची पाच वर्ष बाकी होती पण विराजचे लग्न झाले की त्या स्वेच्छानिवृत्ती घेणार होत्या. सुमतीताईंनी विराजसाठी वधू संशोधनाला जोरदार सुरुवात केली. 


श्रीरंगरावांना सांगून त्या लगेच वधुवर मंडळात गेल्या आणि त्यांना योग्य वाटलेल्या मुलींचे फोटो आणि पत्ते घेऊन घरी आल्या. विराज घरी आल्यावर त्या विराजला ते फोटोज दाखवणार होत्या. 


विराज ऑफिस मधून घरी आल्यावर सुमतीताईंनी त्याला वधुवर मंडळातून आणलेल्या मुलींचे फोटो दाखवले. मात्र फोटो न पाहताच तो म्हणाला ..


" आई बाबा , सॉरी पण मी एकदा गोष्ट लपवली आहे तुमच्यापासून. माझे अंकिता नावाच्या एका मुलीवर प्रेम आहे आणि गेली तीन वर्ष आम्ही ओळखतो एकमेकांना  .." 


हे सगळे ऐकून सुमतीताई थोड्या नाराज झाल्या. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली परंतु श्रीरंगरावांनी बाजू सांभाळून घेतली. 


" शेवटी संसार विराजला करायचा आहे अंकिता सोबत ...शेवटी राजाने केली आणि राणी झाली हे खरं आहे. त्या दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे तर एकदा भेटूया अंकिता आणि तिच्या आईबाबांना." 


नाखुशीनेच सुमतीताईंनी होकार दिला. ठरल्याप्रमाणे विराज , श्रीरंगराव आणि सुमतीताई  अंकिताच्या घरी गेले. अंकिताला पाहताच सुमतीताईंची नाराजी दूर झाली कारण कितीही झालं तरी एका आईला आपल्या लेकाच्या आनंदापेक्षा दुसरे काहीच महत्वाचं नसतं. दोघीही परिवाराच्या भेटी झाल्यावर अंकिता आणि विराज दोघांच्याही आईबाबांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला. 


आपल्या एकुलत्या एक लेकाचा विवाह मोठ्या थाटामाटात व्हावा असे सुमतीताईंना वाटत होते परंतु विराज आणि अंकिताने रजिस्टर लग्न करायचे आहे असे ठरवले होते.


त्यांच्या हट्टापुढे सुमतीताई आणि श्रीरंगराव नमले आणि दोघांचाही विवाह अगदी साधेपणाने पार पडला. माप ओलांडून अंकिता आता मोहितेंच्या घराची गृहलक्ष्मी झाली. 


अंकिता आणि विराज दोघेही हनीमूनला उटीला जाऊन आले. परत आल्यावर दोघांनीही आपापले ऑफिस जॉईन केले. सकाळीच ऑफिसला जाताना प्रत्येक गोष्ट हातात मिळायची सवय होती विराजला.... संध्याकाळी अंकिता लवकर घरी आली आणि तिने कोबीची भाजी बनवली. 


विराज घरी आला तेव्हा अंकिताने त्याच्या ताटात कोबीची भाजी वाढली. सुमतीताई तिला रोखत म्हणाल्या..


" अग थांब अंकिता , त्याला कोबीची भाजी आवडत नाही. त्याला दुसरे काही तरी बनवून दयावे लागेल. "


अंकिता त्यांना थांबवत म्हणाली ...


" आई , मुलांना लाडावणे , त्यांना आवडेल ते करूनच देने , त्यांना सगळ्या गोष्टी हातात देने हे सगळे तुमच्या सारख्या जुनाट विचारांच्या बायकांना पटत असेल पण मी एक मॉडर्न मुलगी आहे. " 


" नवऱ्याचे इतके लाड करणे मला जमणार नाही. त्यामुळे  सगळ्या वस्तू खाणे , स्वतःची कामे स्वतः करणे हे बदल विराजला स्वतः मध्ये घडवून आणावेच लागतील. " 


" इंडिपेंडंट होणे हीच वाईट गोष्ट नाही त्यामुळे तुम्ही या बाबतीत माझ्या आणि विराजच्या मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका. 


विराजने काही एक शब्द न बोलता कोबीची भाजी खाल्ली आणि अंकिताच्या बोलण्यावर विराजही काहीच बोलला नाही आणि दोघेही निघून गेले.

 


थोड्या दिवसानंतर अंकिताला सगळ्या नातेवाइकांना भेटता यावे म्हणून सुमतीताईंनी छोटीशी पार्टी आयोजित केली परंतु अंकिताला किती वेळा सांगून पण ती लवकर आली नाही आणि ती ऑफिस मधून परत येईपर्यंत सगळे नातेवाईक आपापल्या घरी गेले होते. यामुळे सुमतीताई खूप चिडल्या...


" अंकिता , तुमच्या लग्नात कोणी येऊ शकले नाही म्हणून मी हा कार्यक्रम ठेवला आणि तुला आज देखील वेळेवर यायला जमले नाही. " 


" का वागतात नेहमीच असे ?आमच्या भावना आणि आमच्या इच्छा दोघांचीही किंमत नाहीये तुम्हाला .." 


अंकिता यावर काही बोलणार तेवढ्यात विराज म्हणाला ..


" आई , ऑफिस मध्ये महत्वाची मिटिंग होती तिची आणि इतका इश्यू करायची काही एक गरज नाहीये. त्या सगळ्यांना पुन्हा एकदा बोलावू शकतो आपण. " 


" तू आहेस ना आई , नको त्या छोट्या गोष्टी मोठ्या करतेस. अजिबात प्रॅक्टिकल नाही राहत."


" प्रॅक्टिकल म्हणजे काय असते रे.. ? मी ही नोकरी केली पण तुला आणि तुझ्याबाबांना , सासरच्यांना सगळयांना वेळ देऊन , मग आम्ही तुमचा थोडा वेळ मागितला तर काय बिघडले ..?"


"आयुष्याची इतकी वर्ष आम्हीही करियर करतच होतो पण सगळ्या नात्यांना सांभाळून.." 


" तुमचे लग्न साधेपणाने पार पडले त्यामुळे एकही नातेवाइकाला अंकिताला भेटता आले नाही त्यामुळे सगळ्यांना तिला भेटता यावे म्हणून मी ही पार्टी अरेंज केली होती ते देखील अंकिताला विचारून..तरीही अंकिता वेळेवर आली नाही. "


" आठवड्यात एकदा तुम्ही हॉटेलिंग करता , मूवी पाहायला जातात. काय तर म्हणे तुम्ही काॅलिटी टाइम स्पेंड करतात एकमेकांसोबत .." 

"तुमचा काॅलिटी टाइम थोडा आम्हाला ,आपण जपलेल्या नात्यांनाही  द्या , इतकीच साधी अपेक्षा आहे आमची.." सुमतीताई 


" फक्त पैसा कमवला म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ झालो असं नसतं पण तुम्हाला मात्र मूव्ही पाहिले ,मज्जा केली, बाहेर फिरायला गेलो , वेगळे वेगळे कपडे ,गॅजेट खरेदी केले म्हणजे आयुष्य सुंदर होते असा भ्रम झाला आहे आजकालच्या पिढीला..." 


" आई , म्हणजे प्रत्येक गोष्ट तुला विचारून करायची का मी ..?  मी अगदी सामान्य मुलगा आहे. तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणे शक्य नाही मला.. ! " विराज


" आजवर प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही तुला दिला. तुला कायम आनंद मिळावा म्हणून झटलो. आमच्या वयात तर कुठलेच निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता आम्हाला ..तरीही आमच्या ज्येष्ठ लोकांचा आदर करून आम्ही सगळे निर्णय मान्य करतच होतो."

 

" प्रत्येक आईबाबा आपले मुल सुखी व्हावे म्हणूनच झटत असतात. आपल्या मुलांना त्यांच्या जोडीदारासोबत सुखात राहताना पाहणे या पेक्षा दुसरा आनंद नसतोच दुसरा ..." 

आणि तू असा विचार करतोस की तू सगळ्या तू माझ्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या तुमच्यात वाद व्हावेत. कुठल्याही गोष्टी अंकिताच्या ऐकू नये, आणि त्यातून मला तृप्ती मिळावी इतक्या वाईट विचारांचे नाही तुझे आईबाबा .."


"आपल्या मुलाचा संसार अगदी सुखाने भरलेला असावा अशीच इच्छा आहे आमची..फक्त त्या सुखाने भरलेल्या संसारात आम्हाला देखील एक छोटीशी जागा असावी अशी साधीशी अपेक्षा आहे आमची...का गैर आहे का ही इच्छा बाळगणे ..? "

     

"तुम्ही स्वतःला प्रॅक्टिकल म्हणवता ना ..पैसा असला की कसले नातेवाईक आणि कसले  काय ..? अशी बोलणारी तुमची आजची पिढी..." 


" पण आम्हाला नाही होता येत रे तुमच्या सारखे प्रॅक्टिकल... आम्ही आपले नाती जपणारे साधे माणसं ...आम्हाला नाही जमत रे असं वागणं .."


" तुझा जन्म झाला आणि आमची प्रायोरिटी फक्त तू बनून गेलास. यापुढे जे काही करायचे ते फक्त तुझ्यासाठी ..हेच एक ध्येय ठेवणार आम्ही जगू लागलो 


" विराजला हे आवडतं.. विराजला हे घ्यायचे आहे.. विराजच्या भविष्यासाठी गुंतवणूक करावी लागेल ...विराज , विराज आणि फक्त विराज ..."  


" आजही आमचे सारे आयुष्य फक्त तुझ्याभोवतीच रेंगाळत आहे पण आम्हाला मात्र तुझ्या आयुष्यात आता कुठेच स्थान नाहीये. " 


" ज्या मुलासाठी आम्ही आमच्या आयुष्याची पंचवीस वर्ष खर्च केली त्याला आमच्या प्रेमाची आणि कष्टाची थोडीही किंमत नसावी हे आमचेच दुर्दैव म्हणावे. "


हे बोलून सुमतीताईं आपल्या खोलीत निघून गेल्या. काही दिवस गेले. सगळे पुन्हा सुरळीत झालं आणि सुमतीताईंना नातवंडांची ओढ लागली. त्या ही गोष्ट अंकिताला समजवायला गेल्या तर अंकिताने उत्तर दिले की ...


" आम्हाला दोघांनाही अजून पाच वर्ष मुल नकोय आणि हो विराज जवळ हा विषय काढू नका कारण हा निर्णय आमच्या दोघांचाही आहे. " 


तेवढे बोलून अंकिता तिथून निघून गेली. पुन्हा एकदा अंकिताच्या वागण्याने सुमतीताई खचल्या. मुलांच्या अश्या वागण्याने घरातील कुरबुरी वाढल्या आणि अंकिता - विराजने वेगळे होण्याचा  निर्णय घेतला. सुमतीताई आणि श्रीरंगराव खुप दुःखी झाले त्यावेळेस स्वतःला सावरत  सुमतीताईंनी श्रीरंगरावांना समजावले..


" किती सहज बोलून जातात ही मुले .. वेगळे  राहायचं आहे.  यांच्यासाठी हे इतके सहज आहे तर आपणच का या गोष्टीचे दुःख बाळगत आयुष्य घालवायचे. " 


" त्यांना आपल्या प्रेमाची , कष्टाची किंमत नसेल तर आपण तरी का झुरत बसायचं त्यांच्यासाठी..." 

 

" मला माहिती आहे मी जे बोलते ते बोलायला खूप सोपं आहे आणि प्रत्यक्षात वागायला मात्र खूप कठीण पण आपल्याला हे करावं लागणार आहे. आता आपल्याला देखील या पिढी सारखं प्रॅक्टिकल व्हावेच लागेल. " सुमतीताई 


" तू बोलते आहे ते पटतंय ग मला सुमती ....पण आईवडील आहोत ना आपण ...मन मानत नाही हे सगळे एकसेप्ट करायला..." 


" आपल्या मनात , स्वप्नात वागण्यात , ह्या घराच्या आपल्या श्वासाश्वासात विराज आणि त्याच्या आठवणी भिनलेल्या आहेत. हे घर खरंच मिस करेल ग ..विराजला." श्रीरंगराव


" मला माहित आहे हो , मी जे बोलते आहे ते मला सुद्धा प्रत्यक्षात वागणे कठीण आहे पण आपले अख्खे आयुष्य पणाला लावून ही मुले आपल्याला विसरू शकतात. तर त्यांना सोडून आपण सुखी राहू शकतो हे आपण देखील त्यांना दाखवून द्यायला हवं. आपल्याला देखील कठोर व्हायलाच हवं. "


ओघळत्या अश्रुंना सावरत सुमतीताई श्रीरंगरावाना म्हणाल्या.


सुमतीताई आणि श्रीरंगरावांनी अंकिता आणि विराजला अगदीच सहजतेने निरोप दिला. आपल्या आईबाबांची हे वागणे विराजला खटकले. आपण घर सोडून जाऊ तेव्हा आईबाबा नाराज होतील अशी विराजची अपेक्षा होती पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. 


सुमतीताई आणि श्रीरंगराव दोघांनीही विराजला दाखवून दिले होते की त्याच्यावाचून त्या दोघांचेही काहीही अडत नाही. सुमतीताई आणि श्रीरंगरावांनी विराजसाठी जमा केलेले सगळे पैसे आणि इतर वस्तू वेळ आल्याशिवाय त्याला द्यायच्या नाही असे ठरवलं. अप्रत्यक्षपणे त्यालाही अद्दल घडवली होती त्यांनी ...विराजला एक दिवस तरी त्याच्या चुकीची जाणीव होणार हे निश्चित होतेच. 


 ते दोघेही निघून गेल्यावर मात्र ते घर सुमतीताई आणि श्रीरंगरावांना अगदी रिकामे रिकामे वाटू लागले. श्रीरंगराव खूप उदास उदास राहू लागले ..


श्रीरंगराव सुमतीताईंना म्हणाले  ...


" आयुष्यभर आपण ज्या मुलांसाठी झटतो किती सहजतेने ते आपण त्यांच्यासाठी सजवलेले घरकुल सोडून जातात..याच साठी करतो का सुमती आपण सगळे जमवण्याचा अट्टाहास ...सगळी काटकसर कष्ट ... हे दिवस पाहण्यासाठी करतो का...? " 


" खरं पाहायला गेले तरी आपणच चूक करतो आयुष्यभर ...सगळकाही मुलांना देण्यासाठी , मुलांसाठी पैसा जमवण्याची , त्यांचे भविष्य सुखद करण्यासाठी कष्ट घेतो. या सगळ्यात मात्र आपण आपले तरुणपण मात्र वाया घालवतो."


" आजवर विराजचा सांभाळ करताना आपल्या दोघांचेही एक वेगळे आयुष्य आहे हे  विसरलोच होतो....आपल्या आवडी निवडी या सगळ्या जपायच्या राहून गेल्या. तरुणपणातील खूप काही सुखद क्षण निसटून गेले आपल्या हातून.. " सुमतीताई 


" पण आता मात्र आपल्याला दोघांसाठी जगायचे आहे ..फक्त एकमेकांसाठी ... सगळे क्षण पुन्हा एकदा जगायचे आहेत फक्त आपल्या आनंदासाठी "


" संत एकनाथांचे वचन आहे ..' पक्षी अंगणात आले आणि आपुला चारा चरून गेले.' हा जगाचा नियम आहे. "


" त्यामुळे आपली मुले आज आपल्याला सोडून गेली ही खूप मोठी ठेच आहे आणि ती लागली नसती तर आपण दोघेही एकमेकांसाठी किती खास आहोत हे आपल्याला कधी समजलेच नसते..हो की नाही ..? "


" आपल्याला लागलेली ही ठेच एक संधी आहे आपले आयुष्य पुन्हा एकदा जगण्यासाठी ..फक्त आपल्या दोघांसाठी ...तुम्ही मला यात साथ देणार ना ..? "


" ही ठेच एक संधी आहे विराजसारख्या मुलांना धडा शिकविण्याची. एक आईवडील म्हणून आपल्या मुलांना आपली किंमत कळवून देण्याची ..ही ठेच एक नवीन संधी आहे एक आपल्या पिकल्या पानांना नवीन हिरवळ फुलविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची ..."


असे म्हणून सुमतीताईंनी आपला हात हळूच पुढे केला आणि श्रीरंगरावांनी त्यांच्या हातात हळूच हात मिळवला.


श्रीरंगराव देखील सुमतीताईंच्या बोलण्यासोबत सहमत होते. आज खऱ्या अर्थाने त्या दोघांच्याही आयुष्याची  सुरुवात एक नवी सुरुवात झाली होती ...एकमेकांसोबत जगण्याची... त्यांची सेकंड इंनिंग जगण्याची ...


श्रीरंगराव सुमतीताईंनी पाहून प्रफुल्लित हसत होते आणि त्यांच्या मनातील भावना शब्दात गुणगुणत होत्या ...


" अखेरचे येतील माझ्या , हेच शब्द ओठी..

  लाख चुका असतील केल्या, केली पण प्रिती ...

   

  इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी

  साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी

  जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती....


  सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे

  मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे

  एकदाच आभाळाला अशी भिडे माती....


  गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे

  असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे

  तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी....


  आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी 

  गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी

  डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती.. "


समाप्त ! 

एखाद्या चित्रपटासोबत साधर्म्य साधणारी ही कथा असली तरीही रोजच्या जीवनात देखील आपल्या समोर अशा अनेक घटना घडतात. अनेक मुलांना आणि मुलींना प्रायव्हसी या हॅशटॅग च्या नावाखाली आपलेच आईवडील नको असतात. पालक मात्र मुलांना आपले आयुष्य मानून बसतात. आजकालच्या जनरेशन मध्ये आईवडीलांची साथ जेव्हा मुले सोडून जातात तेव्हा मात्र पालकांनी खचून न जाता आपले आयुष्य सुखी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे हाच या कथेचा उद्देश आहे. 


सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा.


फोटो साभार - Google 



✍©️ जया पाटील


Post a Comment

0 Comments