इंडियन मॅचमेकिंग
©️जया पाटील
स्थळ - अर्थातच नववधू होण्यासाठी बावरलेल्या पल्लवीचे घर ..
आज वरपक्षाकडची पाहूणेमंडळी , नवरा मुलगा पल्लवीला पाहायला येणार असल्यामुळे घरात सगळीकडे लगबग सुरु होती. मुलगी बघण्याचा कार्यक्रम म्हणजे एखाद्या इव्हेंट पेक्षा कमी नसतो.
पल्लवीच्या बऱ्याच मैत्रिणींच्या लग्नाची पत्रिका तिला मिळाली आणि पल्लवीच्या घरचे तिच्यापाठी लग्नाचा तगादा लावू लागले. आईच्या उपदेशाची गंगा तर हिमालयातून वाहू लागली. भगीरथाने हिमालयातून गंगेला प्रसन्न करून पृथ्वीतलावर अवतारण्यास प्रवृत्त केले होते पण उपवर मुलीच्या आईला मात्र प्रसन्न न करताच ती खूप काही बोलू लागते जसे की पल्लवीची आई ...
" मुलीचं लग्न योग्य वयातच झालं पाहिजे. तसेही तुझ्या बऱ्याच मित्र- मैत्रिणींच्या लग्नाच्या पत्रिका येत आहेत. कुठल्याच आईबाबांना मुलगी लग्न करून पाठवायची इच्छा नसते , कितीही झाले तरीही काळजाचा तुकडा स्वतःपासून दुर करणे अवघड असते परंतु मुलीची जात आपापल्या घरीच शोभते वगैरे वगैरे ..."
असो हा झाला उपदेश..मग पल्लवीच्या घरच्यांनी चार पाच स्थळं शोधली आणि फायनली एक मुलगा त्यांना योग्य वाटला म्हणून त्याला मुलगी पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. पल्लवीने ड्रग केमिस्ट्री मध्ये Msc पूर्ण केले होते. अर्थातच पाहायला येणारा मुलगा देखील त्याच क्षेत्रातील होता.
वधुपरिक्षेसाठी पाहूणे येणार हे माहित पडल्यावर पल्लवीच्या घरच्यांची तयारी सुरु झाली होती. घरातील चादरी , पडदे कोणत्या रंगाचे असावेत इथपासून ते कुठल्या कपात कुठल्या ट्रेमध्ये पाहुण्यांना चहा द्यायचा इथपर्यंत सर्व ठरवले जात होते.
मुलाकडचे पाहूणे येणार म्हणून नवीन बेडशीट , चादर , वर्षानुवर्षे कपाटात ठेवलेली क्रोकरी , नवीन शो पिसेस सगळ्यांनी आज दिवाणखान्यात मोकळा श्वास घेतला होता. पल्लवीच्या आईची ,काकूची येणाऱ्या पाहुण्यांना करायच्या पाहुणचाराची वर्दळ सुरु होती. हे सगळे करत असतानाच त्यांच्या प्रश्नांची पल्लवीवर सरबत्ती सुरु होती.
" पल्लू , आलेल्या पाहुण्यांसाठी स्वतःच्या हाताने पोहे बनवशिल का ..? कुठली साडी घालणार आहेस ...? फार जास्त मेकअप करू नकोस ..बऱ्याच लोकांना आवडत नाही ग इतका नट्टा पट्टा ...आपण आपले साधेच राहिलेले बरे ..."
" मुलासोबत त्याच्या घरची मोठी माणसं पण असणार आहेत त्यामुळे पदर व्यवस्थित खांद्यावर सांभाळून ठेव. तुम्हा आजकालच्या मुलींना तरी खूप मोकळीक मिळाली आहे. नाहीतर आमच्यावेळेस तर एक क्षण सुद्धा डोक्यावरून पदर पडलेला चालत नसे. ( काकू गेल्या फ्लॅशबॅक मध्ये ...आमच्यावेळी असे होते अँड ऑल .. )
" जरा फ्रेश हो जा... पटकन आटोप म्हणजे पाहूणे आल्यावर धावपळ होणार नाही. कंटाळली आहेस का ...माझे इतके प्रश्न ऐकून ..? "
पल्लवीची काकू तिला म्हणाली.
" नाही ग काकू ....मी कशाला कंटाळेल ..."
पल्लवी काकूंचे मन मोडायचे नाही म्हणून म्हणाली.
पाहूणे यायची वेळ झाली तशी पल्लवीच्या जीवाची मात्र घालमेल वाढली. कसं बसायचं ? कसं बोलायचं? कसं हसायचं? काय सांगायचं? कोणाकडे बघायचं, कसं बघायचं? त्याच्याकडे पाहायचं की नाही? कसा असेल तो? आवडेल का मला तो? हा सगळा विचार करून पल्लवीच्या मनाचा गोंधळ आणखीनच वाढीस लागला होता.
तितक्यात पाहूणे आले. आल्यावर लगेच पल्लवीच्या भावाने पाणी देत त्यांचे स्वागत सुरु केले. पल्लवीचा इंटरव्हिव सूरू होणार म्हणूनच सगळेच तिला चिडवत होते तितक्यात बाहेरून पल्लवीला दिवाणखान्यात बोलवणे आल्याचे कळाले.
घाबरत घाबरत पल्लवी दिवाणखान्यात गेली. समोरच्यांनी बस सांगितल्यावर समोर ठेवलेल्या
खुर्चीवर जाऊन ती बसली. सोफ्यावर मुलगा , मुलाचे बाबा आणि त्याच्या बहिणाबाईचा नवरा ..( आहो जावई त्यांचा मानापानाचा ...) समोर बसले होते. बाजूच्या खुर्चीवर मुलाचे काका आणि पल्लवीचे बाबा बसले होते.
सगळेच निरखून फक्त पल्लवीकडेच पाहत होते त्यामुळे पल्लवीचा पुतळा झाला होता. काय करावे आणि काय नाही असा तिच्या मनाचा गोंधळ झाला होता.
पल्लवीने सगळ्यांना दिलेल्या चहाचा आस्वाद घेतल्यावर मग तिच्या प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला. आयपीस परीक्षेची मुलाखत देणे सोपे पण हा कांदेपोह्यांचा कार्यक्रम कठीण आहे असे पल्लवीला मनोमन वाटू लागले होते. मुलाच्या बाबांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.
" बाळा , तुझे नाव काय ..? मुलाचे बाबा
" माझे नाव पल्लवी ..."
नाव विचारल्यावर कधीही संपूर्ण नाव सांगायचं असते. मुलाचे बाबा म्हणाले.
" माझे नाव पल्लवी दिलीप देशमुख. "
" तुझ्या बाबांचे संपूर्ण नाव आणि गाव सांग .."
" दिलीपराव नारायणराव देशमुख. गाव - सागाव
" तुझे शिक्षण काय झाले ..? "
" Msc इन drug chemistry "
" तुला फार्मसी हेच क्षेत्र निवडावे असे का वाटले .."
" लहानपणापासून वैद्यकीय क्षेत्रात काम करावे अशी माझी इच्छा होती आणि मला मनापासून आवडणाऱ्या क्षेत्रातच काम करावे हे मी आधीपासूनच ठरवले होते. त्यामुळे मी drug chemistry मध्ये ऍडमिशन घेतले. " पल्लवी
" तुला भावंड किती ..? "
" मला एक भाऊ आहे. " पल्लवी
" भावंड विचारली म्हणजे तू आणि तुझा भाऊ असे दोघेही येतात. त्यामुळे तुझे उत्तर असायला हवे होते की आम्ही दोन भावंडे आहोत. असो , हरकत नाही. "
आता प्रश्नांचा राऊंड मुलांच्या काकांकडे ट्रान्सफर झाला.
" पल्लवी , तुला चांगला स्वयंपाक करता येतो ना ..? कारण माझा पुतण्या एकदम खवय्या आहे..." मुलाचे काका
" हो , बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक जमतो मला .."
" अभ्यास सोडून इतर काही छंद ..जसे शिवणकाम , विणकाम , ब्युटीपार्लर ..? "
" यातले काही नाही जमत पण मला चित्र काढायला खूप आवडते." पल्लवी
"अरे , चित्र काढायला आवडतात चांगली गोष्ट आहे पण याचा संसाराला काही उपयोग नाही ना ...असो .." मुलाचे काका
आता प्रश्न विचारायचा टर्न आला मुलाच्या मेव्हण्याचा ... मुलाचा मेव्हणा डॉक्टर मग काय विचारता सोयच नाही...
" मिस पल्लवी ..तुम्ही drug chemistry मध्ये Msc केले आहे ना ...मग जगात लेटेस्ट संशोधन झालेल्या औषधांची नाव सांगू शकाल का ..? "
पल्लवीच्या मनात विचार सुरु होते हा इंटरव्हिव संसार करण्यासाठी आहे की संशोधन करण्यासाठी ... असो तिने तिला माहित असलेल्या औषधांची माहिती त्यांना दिली पण त्या उत्तरांवर मेव्हणेसाहेब फार खुश झाले नाहीत. त्यांनी पुढे प्रश्न विचारायला सुरुवात केली.
" तुम्ही औषधांची नाव तर सांगितली पण त्यात वापरण्यात आलेल्या घटकांचे स्पेसिफिकेशन आणि ती औषधं तयार करण्यात येणारी पद्धत सांगू शकाल का ..? "
आता काय उत्तरे द्यावी याचा प्रश्न पल्लवीला प्रश्न पडला. तिने तिला माहित असलेली थोडीफार माहिती सांगितली. त्यावर समोरून मात्र निराश करणारे उत्तर आले.
" ओह ...मिस पल्लवी ..फारसा अभ्यास दिसत नाहीये तुमचा ...जरा अपडेटेड राहत चला."
पल्लवीला मनोमन वाटू लागले की समोर जो मुलगा माझी वधू परीक्षा घेण्यासाठी आला आहे तो देखील त्याच क्षेत्रातील आहे तरीही प्रश्नाची सरबत्ती फक्त माझ्यावर का ..? तसे असेल तर आम्हा दोघांनाही सारखेच प्रश्न विचारा.
" तुमचे आतापर्यंतचे मार्कशीट आणि इतर ऍक्टिव्हिटीचे सर्टिफिकेट पाहायला मिळतील का ..? "
पल्लवीने सगळी कागदपत्रे मुलाच्या मेव्हण्याकडे सुपूर्द केली. सगळी कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर आता प्रश्नांचा टर्न मुलाकडे गेला.
" लग्नानंतर घरच्यांना सांभाळून घ्यावे लागेल. नोकरी करायची इच्छा आहे का ..? " नवरा मुलगा
" हो , लग्नानंतर देखील मला नोकरी करायला आवडेल." पल्लवी
" ओके , गुड पण लग्नानंतर मात्र घर सांभाळून नोकरी करावी लागेल ..जमेल ना .? " मुलगा
" हो ,मी प्रयत्न करेन. पल्लवी
ह्याच्यासारखी नोकरी तर मी पण करणार आहे पण मग घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्या एकटीवरच का ? संसार दोघांचाही असेल तर घर सांभाळण्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या फक्त माझ्या एकटीच्याच का ? पल्लवीचे विचारचक्र पुन्हा सुरु झाले.
तितक्यात मुलाचे काका पुन्हा प्रश्न विचारू लागले.
" तुला देवाची पूजा करता येते ना ..कारण आमच्या वहिनीसाहेब फार देवभक्त आहेत आणि हो तुझे आवडते दैवत कुठले..? "
" हो... मी स्वतः आस्तिक आहे. " पल्लवी
आवडते दैवत हा काय प्रश्न आहे का ..? लग्नानंतर तुमच्या पुतण्याचे जे कुलदैवत असेल त्यांनाच आवडून घ्यावे लागेल ना ..पल्लवी मनोमन म्हणाली.
" पल्लवी , पाय ओले करून जरा चार पावले चालून दाखव ना .."
पल्लवीने ते देखील करून दाखवले.
आणि फायनली मुलगी पाहण्याचा कार्यक्रम संपला आणि पल्लवी आतल्या रूम मध्ये निघून गेली. जाता जाता मुलाच्या काकांनी पल्लवीचा साडीतील उभा असलेला फोटो मागुन घेतला.
मुलाकडची मंडळी निघून गेली आणि पल्लवीने मात्र तिच्या बाबांना स्पष्टपणे ह्या लग्नासाठी नकार दिला. ती बोलू लागली...
" बाबा , आलेल्या पाहुण्यामंडळींनी विचारलेले प्रश्न वाईट अथवा चुकीचे वाटत नाही परंतु हे प्रश्न मात्र ' फक्त मुलींनाच ' का विचारले जातात , ह्या सगळ्या अपेक्षा मुलांकडून केल्या जात नाही. आणि हा सगळा विचार करताना मुलीचे म्हणजेच माझे स्थान दुय्यमच आहे ह्याची जाणीव झाल्याशिवाय होत नाहीये. "
" लग्नाची पहिली पायरीच इतकी कठीण असेल तर लग्न करून एका स्त्रीचे आयुष्य कसे असणार बाबा ..? "
" कारण आपल्या भारतीय संस्कृतीत ' पुरुष ' हा कसाही असला तरीही तो सर्वमान्य का असतो ?
हीच वागणूक एका स्त्रीला मात्र का मिळू शकत नाही. तिला प्रत्येक वेळेस अग्नीपरीक्षा द्यावी लागते मग ती देवी असली तरी देखील तिची यातून सुटका नसते. का ती एक स्त्री आहे म्हणून ..? "
" सांगा ना बाबा , माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.."
पल्लवीचे बाबा खाली मान घालून फक्त ऐकत होते कारण पल्लवीच्या विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला ते निरुत्तर होते.
विचार नक्कीच करा...
समाप्त !
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google
✍©️ जया पाटील
2 Comments
katha apurn vatate
ReplyDeleteajun likhan vadhvayla scope ahe
Ok sir..
DeleteThank you for replying
Please do not enter any spam link in the comment box