आस पुन्हा त्याच वैभवाची..
©️ जया पाटील
प्रसंग एक ...
ठिकाण - कोविड लसीकरण कक्ष
साधारण फेब्रुवारी मार्च महिन्याच्या दरम्यान अनेक खासगी दवाखान्यांमध्ये लस साठ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी उपलब्ध झाली.
त्यावेळेस माझे आजोबा वय ऐंशी वर्ष आणि आजी वय साधारण बहात्तर या दोघांनाही मी जवळच्याच एका खासगी रुग्णालयात लसीकरण करून घेण्यासाठी घेऊन गेली.
रुग्णालयातील लसीकरण व्यवस्था अगदी व्यवस्थित होती. आलेल्या सर्व लोकांना नंबरप्रमाणे टोकन देऊन ते खालच्या माळ्यावर असलेल्या बैठक व्यवस्थेवर बसवून घेत होते आणि त्यानंतर नंबरप्रमाणे चार व्यक्तींना ते वरच्या माळ्यावर लस टोचण्यासाठी नेत होते.
माझ्या आजीआजोबांचा लसीकरणाचा नंबर आला. आजीला गुढघ्याचा त्रास असल्यामुळे मी देखील आजी-आजोबांसोबत वरच्या माळ्यावर गेली.
नोंदणी करण्यासाठी दोन काउंटर होते. एका काउंटर वर आजी उभी होती आणि दुसऱ्या काउंटरवर आजोबा.
आजोबांचे आधारकार्ड घेऊन तेथील पारिचारिकेने योग्य ती सर्व नोंदणी केली आणि आजोबांना लस घेऊन अर्धा तास आराम करण्यासाठी बाजूच्या रूम मध्ये पाठवले.
आजोबांचा टोकन नंबर होता साठ आणि आजीचा होता एकसष्ट. आजोबांची लस घेऊन नंतर पासष्ट नंबर पर्यंतच्या लोकांची लस घेऊन झाली तरीही आजीला मात्र त्यांनी लसीकरणा साठी आत घेतले नाही.
मला आपली शंका वाटली म्हणून मी आजी उभी असलेल्या काउंटरवर नोंदणी करणाऱ्या मुलाला जाऊन भेटले.
त्या मुलाचे वय साधारण सत्तावीस ते तीस वर्ष असावे त्यामुळे त्याला दादा म्हणूनच बोलावणे मला योग्य वाटले.
त्या दादाला जाऊन मी विचारलं ..
" दादा , आहो माझ्या आजीचा एकसष्ट नंबर होता आणि त्यानंतरचे चार नंबर होण्यात आले तरी आजीचा नंबर अजून लागला नाही काही अडचण आहे का...? "
" वेळ लागणार असेल तर आजीला बसण्याची व्यवस्था करून देणार का..? तिला पायांचा त्रास आहे म्हणून फार वेळ ती उभी राहू शकत नाही. " मी
" Mam , u have to understand. Why u people don't understand....? There is server problem so we cant do anything. "
" आपको समझना चाहिये ना ...सर्वर प्रॉब्लेम हे इसीलिये तो ऑंटी को अंदर नाही भेजा। हमे भी खुशी नही होती आप लोगोको बिना मतलब यहा खडे रखकर.... "
काउंटर वरच्या दादाने मला उत्तर दिले.
मी खरं तर खूप सभ्य शब्दात प्रश्न विचारला होता तरीही त्याचे उत्तर मात्र मला तितक्याच असभ्य भाषेत मिळाले. असू शकते हॉस्पिटलचे कर्मचारी सतत मानसिक तणावाखाली असतात त्यामुळे चिडचिड होऊ शकते.
त्यामुळे त्याच्या वागण्याचा मला राग आला नाही मात्र मी मराठी भाषेत विचारलेल्या प्रश्नाला मात्र त्याने इंग्लिश आणि हिंदी भाषेत उत्तरे दिली याची मात्र मला खरोखर चिड आली.
कारण बराच वेळ मी पाहत होते माझ्यासोबत बोलण्याआधी मी त्या दादाला कोणासोबत तरी मराठी भाषेत बोलताना ऐकले होते याचा अर्थ त्याला मराठी भाषा व्यवस्थित बोलता येत होती.
तेवढ्या वेळेपुरते मी काहीच उत्तर दिले नाही.
शेवटी असेच त्याचे बोलणे ऐकून सोडून देणाऱ्यातली मात्र मी नव्हती.
आजीचे लसीकरण झाल्यावर मी तिला आराम करण्यासाठी रूम मध्ये बसवले आणि पुन्हा त्या दादाच्या काउंटरवर आली.
त्यावेळेस तिथे लसीकरण करण्यासाठी आलेली बरीच जेष्ठ मंडळी आणि रुग्णालयातील कर्मचारी होते.
काउंटरवर जाऊन मी त्या दादाला विचारलं ...
" दादा , आपण कुठल्या राज्यात राहतो सांगणार का...? "
माझ्याकडे आश्चर्याने पाहत तो म्हणाला ...
"हा काय प्रश्न झाला का..?अर्थातच महाराष्ट्रात.."
"अच्छा , ठीक आहे. "
"कृपया मग आपण सध्या कुठल्या शहरात राहतो ते सांगणार का ? " मी
" आहो , काय फालतू प्रश्न विचारताय मॅडम ..आपण जळगाव मध्ये आहोत आणि हे सगळे प्रश्न विचारून तुम्हाला काय दाखवायचं आहे ते सांगणार का..? " तो दादा
" मघाशी तुम्हाला मी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी शुद्ध मराठी मध्ये विचारला पण त्याचे उत्तर मात्र मला हिंदी आणि इंग्लिश भाषेतून मिळाले."
"त्यामुळे मला शंका आली की चुकून आपण महाराष्ट्राबाहेर तर नाही आलो ना ...
" तुम्ही मघाशी माझ्यावर चिडले याचा राग नाही आला मला पण मी विचारलेल्या अगदी साध्या प्रश्नाचे उत्तर फक्त मला आपल्या मराठी भाषेत मिळायला हवं होत इतकी साधी अपेक्षा होती माझी ..."
" तुम्ही मला ते उत्तर मराठी भाषेत दिले असते तर जास्त छान वाटलं असत मला कारण आपण आपल्या राज्यात आपल्या शहरात आपल्या भाषेचा आदर करतोय हे कुठल्याही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे."
"दुर्दैवाने मात्र तसे होताना दिसत नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे तुमच्यासारखी माणसं.!"
" साधारण दोन वर्षापूर्वी माझे देखील विचार असेच काहीसे होते. काय ते मराठी बोलायचं. "
"हिंदी आणि इंग्लिश मध्ये बोललो तरी काही फरक पडत नाही. मी स्वतः देखील इतरांसोबत तुमच्यासारखीच बऱ्याच वेळा हिंदी भाषेत बोलत होती. "
" दोन वर्षांपूर्वी मात्र कामानिमित्ताने आमची दक्षिण भारतात बदली झाली आणि आम्ही तिथे स्थायिक झालो. "
" तेव्हा मात्र तिथल्या लोकांची स्वतःच्याच भाषेवरची निष्ठा पाहून मला माझी स्वतःचीच लाज वाटू लागली. "
"आपल्याला गरज असली तरीही त्यांची भाषा बोलण्याचा हट्ट ते सोडायला तयार नव्हते. "
" परराज्यात राहून मला माझ्या मायमराठीची किंमत समजली. "
" तेव्हापासून ठरवलं इतर भाषा जरूर आत्मसात करायच्या , त्यांचा ही आदर करायचा परंतु जितके जास्त शक्य आहे तिथे सगळीकडे बोलताना आपल्या मराठी भाषेचा आग्रह करायचा. "
" आपली भाषा म्हणजे आपल्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे आपण आपल्या मराठी भाषेचा आदर करून आपण आपल्या मातृभूमीसोबत प्रामाणिक असायलाच हवं. "
" स्वतःचाच अपमान करून घेतल्यावर मला खूप मोठी शिकवण मिळाली. "
"त्यामुळे तुम्हाला विनंती करतेय की अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या आपल्या मराठी भाषेचा ह्रास होण्यापासून वाचवा. "
माझे बोलणे ऐकून तो दादा मान खाली घालून उभा होता. त्याचवेळेस तिथे उभे असलेले एक आजोबा उठता येत नसताना सुद्धा प्रयत्न करून माझ्याजवळ आले आणि त्यांनी स्वतःच्या थरथरत्या हाताने माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि म्हणाले ...
" पोरी, तू बोलते आहेस ते अगदी खरं आहे.
' ने मजसी परत मातृभूमीला ,
सागरा प्राण तळमळला , सागरा..! '
आपल्या मातृभूमीपासून दुर राहूनही तिच्या विषयी तळमळ बाळगणारी संस्कृती आणि संस्कार आहेत आपले ..आणि तुला त्याचे महत्व समजले याचा मला खूप आनंद आहे.
त्या आजोबांच्या थरथरत्या हाताचा स्पर्श खूप काही सांगत होता. सगळे काही विसरा पण आपल्या मराठीला , मायभूमीच्या संस्कारांना जपा.
फक्त 27 फेब्रुवारीला म्हणजेच जागतिक मराठी भाषा दिनाला तिला न जपता तिचे अस्तित्व जपण्यासाठी आपण झटले पाहिजे.
हे सगळे तुम्ही किंवा मी एकट्याने मात्र नक्कीच शक्य नाही त्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
वाचकहो , तुम्हाला वाटत असेल की चर्चा करून करून चोथा झालेला हा विषय आहे , त्यावर चर्चा करण्याचा खरंच उपयोग आहे ..?
पण मला मात्र वाटते की प्रत्येक मराठी व्यक्ती जेव्हा आपली भाषा टिकविण्यासाठी पुढाकार घेईल तेव्हाच हा बदल शक्य आहे.
आजकाल सगळीच मुले इंग्रजी माध्यमातून शिकताय. कदाचित ही काळाची गरज असेल किंवा स्टॅंडर्ड शो करण्याचे एक माध्यम. इंग्रजी भाषा शिकू नये असा माझा उद्देश मुळीच नाही.
गरजेपुरत्या सगळ्या भाषा आपल्याला यायला हव्या , कामापुरता सर्व भाषांचा वापर देखील व्हावा पण फक्त गरजेपुरता आणि कामापुरता मर्यादित ...!
कारण गरज नसतानाही इतर भाषांचा वापर फक्त दिखावा म्हणून सुरु राहिला तर मात्र मराठी भाषा पडद्याआड जायला वेळ लागणार नाही.
आजची पिढी मराठी बोलते, लिहिते आणि वाचते आहे पण आपल्या पुढच्या पिढीला हे सगळे जमेलच याची मात्र शाश्वती नाही.
आताच्या पिढीचे याबाबतीतले चित्र मात्र तितके आश्वासक नक्कीच नाही.
आपण सर्वांनी ठरवलं तर हे शक्य आहे. इंग्रजी माध्यमातून शिकत असतानाही आपल्या मुलांमध्ये आपण मराठी भाषेतील पुस्तकं वाचण्याची , मराठी चित्रपट पाहण्याची गोडी नक्कीच निर्माण करू शकतो.
घरी आणि शक्य तितक्या ठिकाणी आपण मराठी बोलण्याचा आग्रह नक्कीच धरू शकतो. जिथे गरज आहे तिथे मराठी भाषेतच बोलण्याला आपण आग्रही असले पाहिजे.
भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं पहिले मनात उमटतात आणि मग ती आपल्या कृतीतून व्यक्त होतात.
फक्त दिखाऊपणा करण्यासाठी मराठीला जपण्याचा अट्टहास करू नका. कारण भाषेविषयीचे प्रेम प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि हृदयात वाढीस लागायला हवं.
चला तर मग मराठीचा जागर करून तिचे संवर्धन करूया कारण आपल्या ह्या पिढीकडेच आपली मायमराठी आस लावून बसली आहे तिचे गतवैभव परत मिळण्याची .....
मग काय मग मंडळी... आपल्या मराठी भाषेची ज्योत सदैव तेवत ठेवणार ना ....?
समाप्त !
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box