✍©️ जया पाटील
#सांज_सोबत
©️ जया पाटील
थरथरत्या हाताने सुधीरराव लिफ्टचे बटण दाबण्याचा प्रयत्न करत होते. एका हातात फळे आणि औषधांनी भरलेली पिशवी होती. घरातीलच पायजमा आणि साधीशी बंडी घालून ते घाईघाईने बाहेर पडले होते. त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती.
त्यांच्या हालचालीतून वार्धक्याने आपली शाल अंगभर पसरल्याची जाणीव होत होती. बाजूच्या भिंतीचा आधार घेत ते हळूहळू पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते आणि तेवढ्यातच त्यांना भोवळ आली , ते खाली पडणार तितक्याच शेजारचा राहुल तिथे पोहोचला आणि त्यांना सावरले.
लिफ्ट मध्ये त्यांना सावकाश चढवत राहुल त्यांना घरी घेऊन आला. घडलेला सारा प्रकार पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या मालती नेने अर्थातच सोसायटी मधल्या सगळ्यांच्या लाडक्या मालती काकू पाहत होत्या.
त्यांना सुधीरकाकांची काळजी वाटली म्हणून तर त्या लगेच दरवाजा उघडून लिफ्ट पाशी आल्या. तोवर राहुल पाचव्या मजल्यावर पोहोचला होता. मालतीताई आणि राहुलने सुधीररावांना त्यांच्या घरात नेले आणि बेडवर झोपवले.
" काकू , मी बाहेरून काकांसाठी चहा वगैरे आणतो आणि डॉक्टरला देखील घेऊन येतो " असे सांगून राहुल निघाला तितक्याच मालतीताई त्याला थांबवत म्हणाल्या ..
" अरे राहुल , तू फक्त डॉक्टरला सोबत घेऊन ये. नेमाडेंच्या चहापाण्याचे मी पाहते. तू येतो तोवर मी इथेच थांबते. त्यामुळे तू निश्चिन्त राहा आणि सावकाश जा .."
राहुल डॉक्टरांना आणण्यासाठी निघून गेला. इकडे मालतीताई सुधीररावांच्या किचन मध्ये गेल्या. त्यांना छान आले घालून चहा करून आणला तोवर सुधीररावांना थोडीशी शुद्ध आली होती. मालती नेनेंना त्यांच्या घरात पाहून सुधीरकाका थोडे आश्चर्यचकित झाले. अडखळत तो बोलू लागले..
" आहो , नेने तुम्ही इथे कशाकाय ..? आणि मला घरी कोणी आणून सोडले..? "
" ते सगळे जाणून घेणे इतके महत्वाच नाहीये श्रीयुत नेमाडे. तुम्ही आधी चहा घ्या पाहू. चहासोबत दोन बिस्कीट देखील खा. शुगर लो झाली असणार तुमची त्यामुळेच अशी अवेळी चक्कर आली असणार तुम्हाला.. "
" सावकाश उठून बसा पाहू. तुमचा चहा घेऊन झाला की घडलेला सगळा घटनाक्रम सांगते मी तुम्हाला.... "
असे बोलत मालतीताईंनी सुधीररावांना धीर दिला.
चहा पिऊन झाल्यावर सुधीररावांना थोड बरं वाटलं तोवर राहुल डॉक्टरांना देखील घेऊन आला. डॉक्टरांनी चेकअप केले. सुधीररावांचा बीपी लो झाला होता आणि शरीरातील साखर देखील कमी झाली होती.
डाॅक्टरांनी काही टॅब्लेट्स लिहून दिल्या आणि पुढचे काही दिवस खाण्यापिण्याची खूप काळजी घेण्यास सांगितली. राहुलला काही महत्वाचं काम होते त्यामुळे तो डॉक्टर गेल्यावर लगेच निघून गेला. मालतीताई मात्र थोड्या वेळ तिथेच बसल्या होत्या.
सुधीररावांना उद्देशून मालतीताई म्हणाल्या ...
" डॉक्टरांनी काय सांगितले आहे ऐकलं ना नेमाडे ... तब्येत जपण्यासाठी खायची प्यायची खूप काळजी घ्यायला सांगितली आहे...गोळ्या औषधं सगळे वेळेवर घ्या ..."
" तुम्ही वेळेवर जेवण करत नाही का ..? करत नसणारच त्यामुळे अशी अवेळी चक्कर आली तुम्हाला. राहुल होता म्हणून निभावले नाहीतर अवघड झाले असते नेमाडे ...? "
" आणि मी म्हणते , मुळातच तब्येत बरी नसते तर स्वतः एकटे बाहेर पडायचेच कशाला ...? कोणाला तरी सांगून हवं नको ते मागवायचे ना .." मालतीताई
" हवं नको ते विचारायला घरात हक्काचे माणूस हवं ना नेने ..."
हे बोलताना आलेले आपले अश्रू लपवत सुधीरराव पुढे बोलू लागले ...
" अहो नेने , दोन दिवस स्वयंपाक करणारी कमळा येणार नव्हती. दोन दिवस बाहेरचे पार्सल आणून खात होतो पण घरच्या जेवणाला बाहेरची सर कशी येणार ..? "
"कंटाळा आला ते खाऊन ..म्हणून थोडी फळं आणि औषधं घेण्यासाठी खाली गेलो होतो आणि अचानक चक्कर आली. "
" अच्छा , तर मग आता मी निघते. दुपारच्या जेवणाला माझ्याकडेच या नेमाडे. तुमच्या तब्येतीच्या दृष्टीने अगदी साधा बेत करते. वरण भात , भेंडीची साधी भाजी आणि पोळी... "
मालतीताई सुधीररावांना म्हणाल्या ..
" आहों तुम्हाला कशाला त्रास नेने ...करेन मी मॅनेज..." सुधीरराव
" त्यात त्रास काय आलाय नेमाडे. शेजारी आहोत आपण इतक्या वर्षांपासून. इतकी मदत तर करूच शकतो ना एकमेकांसाठी .... "
" मला बाकी काही माहीत नाही. एक तासात तुम्ही माझ्या घरीच जेवायला या. तोवर मी स्वयंपाक करून ठेवते."
" चला येते मी , तोपर्यंत तुम्ही आराम करा. "
हक्काने रागावून सुधीररावांना जेवण्याचा आग्रह करून मालतीताई निघून गेल्या. त्या गेल्यावर सुधीरराव ही थोडा वेळ बेडवर पडून राहिले. पडल्या पडल्या त्यांना सौ. नेमाडेंची आठवण आली आणि ते आठवणींच्या गर्दीत हरवले.
सत्तरीतील श्री सुधीर नेमाडे. पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत एकटेच राहणारे एक वयोवृद्ध गृहस्थ. चार वर्षांपूर्वी सौ. नेमाडे आजारपणाने देवाघरी गेल्या आणि श्री नेमाडे एकटे पडले. त्यांचा एकुलता एक मुलगा कुणाल देखील नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाला.
आईचे निधन झाल्यावर देखील मात्र त्याच्या बाबांसाठी तो परत आला नाही. मुल म्हातारपणाची काठी असते असे म्हणतात पण आजच्या जगात या काठीचा आधार देखील पालकांना मिळेनासा झालाय.
त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या सौ. मालती नेने. दहा वर्षांपूर्वी श्री. नेनेंचे निधन झाले. मालतीकताईंवर दुःखाचे पहाड कोसळले. मात्र
आपली लेक मालविकाला सांभाळण्यासाठी त्या सावरल्या.
मालविका त्यावेळेस इंजिनीरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. शिक्षण संपवून ती चांगल्या नोकरीला लागली. नोकरीला लागल्यावर मालतीताईंनी तिच्या साठी वरसंशोधन सुरु केले.
सुयोग्य अश्या प्रतिक सोबत त्यांनी मालविकाचे लग्न लावून दिले. नोकरीनिम्मित मालविका बंगलोरला शिफ्ट झाली. इकडे मालतीताई पूर्णपणे एकट्या पडल्या.
काहीकाळाने मालविका गर्भवती राहिली आणि तिच्या बाळंतपणासाठी त्या बंगलोर गेल्या. जाताना सोसायटीमध्ये सगळ्यांना सांगून गेल्या की आता कायम मालविकासोबतच राहणार मात्र तसे काही घडलेच नाही.
दीड वर्षातच त्या बंगलोर हून परत आल्या आणि पुन्हा त्यांचा एकटेपणा त्यांची सोबत करू लागला.
शेजारी राहून सुद्धा गेल्या एक वर्षात मालती नेने आणि सुधीर नेमाडे यांनी एकमेकांना पाहिले सुद्धा नव्हते ,परंतु आज सुधीररावांना चक्कर आली आणि त्यांची कित्येक दिवसांनी पुन्हा भेट झाली.
सुधीररावांना जेवण्याचे आमंत्रण देऊन मालतीताई घरी आल्या. लगबगीने त्यांनी आवरायला घेतले.
आज कित्येक दिवसांनी त्यांच्या एकटेपणात सोबत करण्यासाठी कोणी तरी येणार होतं त्यामुळे मालतीताईंचा उत्साह काही औरच होता.
घाईघाईने त्यांनी हॉलमधला सगळा पसारा आवरला. सोफ्याचे कव्हर आणि दिवाणचे बेडशीट बदलून घेतले.
किचन मध्ये जाऊन स्वयंपाक करण्यासाठी सुरुवात केली. वरणभात त्यावर तुपाची धार , चपाती , भेंडीची भाजी , टमाट्याची कोशिंबीर असा साधा पण चविष्ट भेट बनवला.
डायनिंग टेबल आवरून स्वच्छ केला. कित्येक वर्ष कपाटात धुळ खात असणारी क्रोकरी त्यांनी बाहेर काढली. नवीन क्रोकरी आणि इतर वस्तूंची त्यांनी मांडामांड केली. नॅपकिनच्या वेगवेगळ्या घड्या करून त्यांनी डायनिंग टेबल सजवला.
सगळे आवरून त्यांनी अगदीच सुंदर मोरपंखी रंगाची साडी नेसली. हॉल मध्ये एक सुगंधी अगरबत्ती लावली.
त्या अगरबत्तीच्या सुवासामुळे घरातील वातावरण पुन्हा एकदा अगदी प्रफुल्लित आणि आल्हाददायक झाले. सगळे आवरून त्या सुधीरराव येण्याची वाट पाहू लागल्या.
इकडे सुधीरराव देखील मालती नेनेंकडे जेवायला जायचे म्हणून तयार होऊ लागले. इतक्या वर्षात त्यांना कोणीतरी आपुलकीने जेवायला बोलावले होते. त्यांची मनापासून काळजी घेतली होती आणि हे सगळे त्यांना मनापासून आवडले ही होते.
चार ड्रेस बदलून झाल्यावर फायनली त्यांनी चॉकलेटी कलरची पॅन्ट आणि पांढऱ्या कलरचा टीशर्ट घातला. जाता जाता दोन तीन वेळा आरसा पाहून त्यांनी चेक केले केस व्यवस्थित बसले आहेत ना ...? अंगावरचा ड्रेस सूट होतोय ना ...?
सगळे चेक करून ते मालती नेनेंकडे जायला निघाले.
सुधीरराव मालतीताईंच्या घरी आले आणि डोअर बेल वाजवली. मालतीताई तयारच होत्या. साडी , ब्लॉऊस ,केस सगळे व्यवस्थित आहे ना म्हणून त्यांनी चपापून पाहिले आणि दरवाजा उघडला. दारात सुधीरराव उभे ..
" या , नेमाडे तुमचीच वाट पाहत होती. सगळा स्वयंपाक तयार झालाय. फक्त ताटाची मांडामांड व्हायचीय. " मालतीताई
" खूप वर्षात कोणी इतक्या आपुलकीने विचारपूस केली आहे हो नेने. नाहीतर आपल्यासारखी म्हातारी माणसं तर प्रत्येकाला नकोशी असतात. अगदी पोटच्या मुलांना सुद्धा .."
हे बोलताना सुधीररावांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले पण त्यांनी स्वतःला सावरले.
" आहो जगरहाटीचा नियम आहे तो. मावळत्या सूर्याला सगळेच विसरतात अन येणाऱ्या चंद्राच्या प्रकाशाचे स्वागत करतात. "
" त्यामुळे असं उदास होऊ नका. आपण दुसऱ्या काही तरी गप्पा मारूया .." असे म्हणून मालतीताईंनी विषय बदलला.
त्या दोघांच्याही गप्पा सुरु झाल्या. एकमेकांचे छंद , कॉलेज लाईफ पासून संसार अश्या विविध विषयांवर गप्पा मारताना वेळ कुठे संपला दोघांनाही समजले नाही. या सगळ्यात जेवायचे देखील भान राहिले नाही त्या दोघांना...
गप्पा सुरु असतानाच मालतीताईंचे लक्ष घडाळ्याकडे लक्ष गेले. घड्याळाचा काटा एक वर सरकलेला पाहून त्या भानावर आल्या आणि त्यांनी पानांची मांडामांड सुरु केली.
मालतीताईंच्या हाताचे जेवण जेवून सुधीरराव तृप्त झाले. जेवण झाल्यावर डायनिंग वरचा सगळा पसारा आवरून ते दोघेही हॉल मध्ये येऊन बसले. तेव्हा सुधीरराव म्हणाले ...
" थँक्यू नेने , आज आमची ही गेल्यानंतर किती वर्षांनी जेवतांना इतकी तृप्ती अनुभवायला मिळाली आहे."
"नाहीतर फक्त जगण्यासाठी दोन घास पोटात टाकायचे म्हणूनच जेवत होतो आजवर ..."
" आज हिच्या हाताची चव पुन्हा एकदा चाखून तुम्ही धन्य केले मला .."
आता मात्र सुधीररावांना हुंदका दाटून आला आणि त्यांनी आपल्या अश्रुना वाट मोकळी करून दिली.
हे सगळे पाहून मालतीताईंना देखील अश्रू आवरले नाही. त्या सुधीररावांना समजावणीच्या सुरात म्हणाल्या...
" नेमाडे , सौ नेमाडे गेल्यावर तुम्ही एकटे राहण्यापेक्षा कुणालकडे जाऊन का नाही राहिले ..? "
" मी इथून बंगलोरला गेली त्यावेळी कुणालला मुलगी झाली होती असे ऐकले होते. नाती मध्ये जीव रमला असता तुमचा .." मालतीताई
" मुलं मोठी होतात तशी नाती बदलतात हो , नेने.."
" कुणाल आमचा एकुलता एकदा मुलगा. खूप स्वप्न पाहिली त्याच्या बाबतीत. त्याच्या आनंदासाठी प्रेमविवाह करण्याची परवानगी दिली."
"निशाला घेऊन तो घरी आला पण चार भिंतींना घर बनवण्याच्या प्रयत्न निशा आणि कुणालने केलाच नाही. "
" घरातील वाद वाढीस लागले आणि कुणालने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दहा पावलांवर त्याने घर घेतले तरी कुणाल या भिंतीआड नसणार आहे याची जाणीव मनाला बोचत होती."
"काही दिवसांनी त्याला परदेशी जाण्याची संधी चालून आली आणि आमचा कुठलाही विचार न करता तो दूरदेशी निघून गेला. "
" आपण अलगदपणे उडायला शिकवलेले पाखरू जेव्हा घरटे सोडून उडून जाते ना ..तेव्हा त्या वेदना सहन होत नाही पण त्या गगनभरारी घेणाऱ्या पाखराला मात्र आपली पर्वाच नसते. "
" या सगळ्या दुःखातून सावरताना आमची ही एका आजाराचे निम्मित करून कायमची निघून गेली ..आणि सोबत उरला तो फक्त एकटेपणा ..."
" आजही फक्त एकटेपणाच सोबत करतोय ..पण हे एकटेपण बोचते हो खूप ...या आयुष्याच्या सांज वेळी कोणाची तरी सोबत असावी असे नेहमीच वाटते. "
सुधीररावांच्या बोलण्यावर मालती ताई म्हणाल्या ..
" अगदी बरोबर आहे नेमाडे तुमचे ...आपल्याच मुलांना आपण अलगद पणे जपतो आणि म्हातारपण आले की मात्र आपण त्यांना नकोसे होतो. "
" मी देखील मालविकाचे बाबा गेल्यानंतर तिला एकटीने वाढवले. तिचे लग्न लावून दिले. "
" मालविकाने गोड बातमी दिली. तेव्हा ती म्हणाली ..आई ,आता कायमच माझ्या सोबत राहायचं ...माझं मनाचं आभाळ जणू आनंदाने भरून आले."
" माझ्या दुधावरच्या सायीच्या येण्याने माझे एकटेपण संपणार म्हणून मी खूप आनंदी होती. मालविकाला मुलगा झाला. "
" छोट्याश्या स्वरीतच्या बाललीलांमुळे माझा वेळ कसा जाऊ लागला हे मलाच कळेनासे झाले. त्याचे गोड हसणं, घरभर पळणं, सगळ्या घरात खेळण्यांच्या पसारा करणे, कारणाशिवाय त्याचे रुसुन बसणे या सगळ्यात माझे आयुष्य आनंदाने फुलले होते. "
" पण एक दिवस मुलगी आणि जावयाला बोलताना ऐकले ..आई आली आणि आपली प्रायवेसीच संपली. अंगावर विज कोसळणार की काय असाच भास झाला .."
" आणि तिथून लगेच निघाली पुन्हा माझ्या घरी येण्यासाठी माझ्या एकटेपणाला सोबत घेऊन..."
" त्या क्षणापासून फक्त आयुष्य जगते आहे नेमाडे ...!
कुठल्याही ऋणानुबंधाशिवाय ...कुठल्याही साथी शिवाय ..! "
हे सगळे सांगताना मालतीताईंना देखील अश्रू अनावर झाले. मालतीताईंना शांत करत सुधीरराव म्हणाले ..
" आपण दोघेही समदुःखी आहोत पण आयुष्य जगण्याचा नवा सूर्य मला उगवताना दिसतो आहे ...तुम्ही मला साथ देणार मैत्रीची ...? "
" एकमेकांच्या मैत्रीच्या साहाय्याने कदाचित आपल्याला जगण्याचा आधार मिळेल."
"आयुष्याच्या या सांजवेळी माझी मैत्री रुपी सोबत होणार ...? "
एवढे बोलून सुधीररावांनी आपला हात पुढे केला आणि मालतीताईंनी देखील त्यांच्या हातात हात मिळवून त्यांना होकार दिला.
मैत्रीच्या या ऋणानुबंधाच्या रूपात त्या दोघांनाही एक नवी सांज सोबत मिळाली होती.
समाप्त !
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box