माहेर म्हणजे तुमची बैंक नव्हे..

माहेर_म्हणजे_तुमची_बँक_नव्हे..!
©️जया पाटील 

" अतुल , अरे माझे बाबा पैसे देण्यासाठी तयार असतांनाही तू पैसे घेण्यासाठी नकार का देतो आहेस ..? " 

" मेघा , पैश्यांमुळे नाती खराब होतात ग...! त्यातल्या त्यात तुझे बाबा आणि माझे म्हणजे सासरा- जावईचे नाजूक नाते. उगाच त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना लुटल्यासारखे वाटायला नको ना त्यांना .. म्हणूनच नकार देतोय मी पैसे घेण्यासाठी .." 

" अरे पण अतुल , बाबांच्या आजारपणासाठी घेतोय ना आपण माझ्या बाबांकडून पैसे. हवं तर आपल्याकडे पैसे आल्यानंतर आपण त्यांचे पैसे परत करूया मग तर झालं. " 

" सध्याच्या परिस्थितीत आपल्या स्वाभिमानापेक्षा  बाबांची तब्येत आपल्यासाठी जास्त महत्वाची आहे."

"  माझे बाबा परके थोडीच ना आहेत. संकटाच्या या काळात तेच एक आशा आहे रे आपल्यासाठी. आपण सध्या त्यांच्याकडून पैश्यांची मदत घेऊया. लवकरात लवकर पैसे जमवून त्यांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करूया. " 

मेघा अतुलला समजावणीच्या सुरात सांगत होती.

मेघा आणि अतुल दोघेही कॉलेजचे मित्रमैत्रिणी. एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी नेहमी येणे जाणे असायचे. हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. मेघा आणि  अतुल दोघांनीही आयुष्यभर एकमेकांची सोबत करायची असं ठरवलं. दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली आपापल्या घरी दिली. 

खरंतर अतुलच्या आईला म्हणजेच सुधाताईंना मेघा सून म्हणून पसंत नव्हती कारण त्यांना स्वतःच्याच भावाची मुलगी अर्थातच अतूलच्या मामाची मुलगी सून करून घ्यायची होती. परंतु मेघा एका श्रीमंत व्यावसायिकाची मुलगी होती. त्यामुळे मेघा आपल्या घरी सून बनून आली तर ती आपल्यासाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरेल हे सुधाताईंच्या स्वार्थी नजरेने अचूक हेरले आणि मेघा आणि अतुलच्या लग्नाला होकार दिला. अतुलच्या बाबांना देखील त्यांनी हे लग्न मान्य करण्यासाठी मनवले.

सुधाताईंनी स्वतःच्याच भावासोबत देखील वाईटपणा घेतला कारण तुझी मुलगी माझी सून करून घेईल असा अतुलच्या आईने स्वतःच भावाला शब्द दिलेला होता. 

स्वतःच्याच भावासोबत वाईटपणा घेऊन आपल्या आईने आपले लग्न मेघासोबत लावण्यासाठी होकार दिला त्यामुळे अतुलचा आईवरचा विश्वास आणखीनच वाढीस लागला. 

मेघाच्या आईबाबांना फक्त मेघावर जीवापाड प्रेम करणारा जीवनसाथी हवा होता. त्यांना मेघासाठी ते प्रेम अतुलच्या डोळ्यात दिसले आणि लेकीच्या आनंदासाठी त्यांनी मेघा आणि अतुलच्या लग्नाला होकार दिला. 

मेघा आणि अतुलचे लग्न थाटामाटात पार पडले. माप ओलांडून मेघा अतुलच्या घरची लक्ष्मी झाली. करियर करतानाच तिच्या संसारात देखील तितकीच रुळली. 

मेघा आणि अतुल दोघांचेही लग्नानंतरचे मोरपंखी स्वप्नांनी सजलेले , आनंदाने मोहरलेले दिवस अगदी सुखात जात होते. दोघांचाही आता सप्तपदीपासून सहजीवनाचा प्रवास सुरु झाला होता.

सगळे काही अगदीच सुरळीत चालू होते. मेघाचे बाबा नेहमीच तिला खूप चांगले चांगले गिफ्ट्स देत असत. अतुलच्या घरची परिस्थिती साधारण होती. अडचणीच्या काळात मेघाचे बाबा नेहमीच तिला मदत करत.

अतुल मात्र त्याच्या बाबांसारखा स्वाभिमानी होता त्यामुळे अतुल  वेळेवर हे सगळे पैसे परत करत असे त्यामुळे मेघाच्या बाबांनाही जावयाचा अभिमान होता. सुधाताईंना मात्र असे अतुलचे पैसे मेघाच्या बाबांना परत करणे खटकत असे.

अचानक एकदा अतुलच्या बाबांची तब्येत खूप बिघडली तेव्हा बाबांचा जीव वाचवायचा म्हणून अतुल नाही म्हणत असतानाही मेघाने तिच्या बाबांकडून पैसे आणले.

अतुलच्या बाबांचे ऑपेरेशन वेळेवर झाले आणि त्यांच्या तब्येतीत देखील हळूहळू सुधारणा होऊ लागली. अतुल मेघाच्या बाबांचे पैसे परत द्यायचे म्हणून पैश्यांची जुळवाजुळव करू लागला.

त्याचवेळेस अतुलची बहीण तन्वी साठी एक चांगले स्थळ सांगून आले. कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला. मुलाकडचा लग्नाला होकार आला परंतु नुकतेच अतुलचे बाबा आजारातून उठल्यामुळे लग्नासाठी लागणाऱ्या पैश्यांची व्यवस्था करणे शक्य नव्हते. 

इतके चांगले स्थळ हातातून घालवायचे नाही म्हणून सुधाताईंनी अतुलला मेघाच्या बाबांकडून मदत घेण्यास सांगितले परंतु आधीचेच पैसे आपण अजूनपर्यंत परत करू शकलो नाही आणि लगेच दुसऱ्यांदा पैसे मागायचे हे अतुलला मान्य नव्हते मग सुधाताईंनी मेघाला हाताशी धरले.

त्यांनी तिला समजावले ..

" हे बघ मेघा , तन्वीला आता इतके चांगले स्थळ सांगून आले आहे पुन्हा तसेच स्थळ मिळेल की नाही माहीत नाही. "

"अतुलचे बाबा आणि अतुलला तुझ्या बाबांकडून पैसे मागणे पटत नाहीये पण तन्वीच्या भविष्याचा प्रश्न आहे. " 

" तुझे बाबा कोणी परके थोडीच आहेत. आपल्या हक्काच्या माणसाकडूनच आपण मदतीची अपेक्षा करू ना ..? त्यांच्या कडून घेतलेले पैसे आपण कसेही करून परत करू. " 

" प्लीज मेघा बाळा , तुझ्या बाबांकडून मदत घेण्यासाठी अतुलला तयार कर ना ..." 

सुधाताईंच्या गोड बोलण्याला मेघा देखील भाळली. तिने अतुलला तन्वीच्या लग्नासाठी तिच्या बाबांकडून पैसे घेण्यासाठी मनवले. तन्वीचे लग्न एकदम थाटामाटात पार पडले.

सुधाताईंचा स्वार्थीपणा इथेच संपला नाही. तन्वीला देण्यासाठी मेघाला तिच्या माहेरून मिळालेल्या कितीतरी भेटवस्तू त्या घेऊ लागल्या. मेघा साधीभोळी असल्यामुळे त्यांच्या बोलण्याला भाळून जात असे. 

तन्वीचे सासरचे थोड्या कडक स्वभावाचे आहेत त्यामुळे तिचे माहेरपण आणि देणेघेणे नीट केले तर तिला सासरी त्रास होणार नाही असे काहीबाही सांगून सुधाताई मेघाला गोलमाल करत असत. 

मेघाला तिच्या माहेरकडून मिळालेल्या सगळ्या वस्तू स्वतःकडे घेऊन काही स्वतःला आणि काही तन्वीला देत असत. आपली आई आपल्या वहिनीच्या साधेपणाचा फायदा घेऊन तिच्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आणून देते आहे हे तन्वीला देखील माहित होते परंतु आपल्या आईच्या वागण्याला ती कधीच रोखत नसे. तन्वीला देखील तिच्या नसलेल्या मेघाच्या हक्काच्या वस्तू मिळविण्यात आनंद मिळत असे.

मेघा आणि अतुल असेच विरंगुळा म्हणून महाबळेश्वरला फिरायला गेले. त्यांनी तिकडून येतांना दोघांच्याही घरच्यासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू आणल्या. घरी येऊन मेघाने सगळ्या भेटवस्तू सुधाताईंना दाखवल्या.

मेघाने तिच्या आईबाबांना भेटवस्तू आणणे सुधाताईंना फारसे आवडले नाही मात्र त्यांनी मेघासमोर तसे दर्शवले नाही. मेघाने त्या वस्तू कपाटात ठेऊन दिल्या. आईबाबांना भेटायला जातांना या वस्तू घेऊन जाऊ असे तिने ठरवले. ऑफिस आणि इतर घरातील कामांमुळे तिचे बरेच दिवस माहेरी जाणे झालेच नाही.

एक दिवस ती माहेरी जाण्यासाठी निघाली त्यावेळेस ती कपाटात भेटवस्तू शोधू लागली परंतु त्या सापडल्या नाही. तिने घरभर त्या वस्तू शोधल्या परंतु त्या मेघाला मिळाल्या नाही. सुधाताईंना विचारल्यावर त्या सांगू लागल्या ..

" तू आईबाबांना त्या भेटवस्तू देऊन आली असणार पण तुझ्या लक्षात नाहीये मेघा..नाहीतर घरातून वस्तू दुसरीकडे कुठे जाणार ..? नीट आठवून बघ. "

मेघा आणि अतुल दोघांचाही सुधाताईंवर पूर्ण विश्वास होता त्यामुळे सुधाताईंवर शंका घेण्याचा प्रश्नच नव्हता. 

आपण आईबाबांना देण्यासाठी नवीन भेटवस्तू आणूया असे सांगून नाराज मेघाची अतुलने समजूत काढली. त्यामुळे मेघाने तो विषय तिथेच सोडून दिला.

काही दिवसानी तन्वीकडे सत्यनारायची पुजा होती म्हणून अतुल आणि मेघा तिच्या घरी गेले. सुधाताईंची तब्येत ठिक नव्हती म्हणून मग त्या आणि अतुलचे बाबा घरीच होते. 

मेघा तन्वीच्या घरी गेल्यावर सगळे काम अगदी अगत्याने करत होती. किचन मध्ये काम करताना चुकून धक्का लागून तेल तिच्या साडीवर सांडले.

तिने तन्वीला सांगितले तेव्हा तन्वीने तिच्या कपाटातून दुसरी साडी घेऊन मेघाला नेसण्यास सांगितली. मेघा साडी चेंज करण्यासाठी तन्वीच्या रूम मध्ये गेली. 

कपाटात साडी शोधताना तिला तिच्या आणि तिने तिच्या आईबाबांना आणलेल्या अनेक भेटवस्तू दिसल्या आणि तिला खूप मोठा धक्का बसला. 

मेघाने ताबडतोब अतुलला तन्वीच्या रूम मध्ये बोलावले आणि घडलेला सगळा प्रकार दाखवला. त्याचवेळेला तन्वीचा लक्षात आले की आईने दिलेल्या भेटवस्तू तिने लपवून ठेवल्या नाहीत म्हणून ती धावतच तिच्या रूमकडे पळाली. अतुलला तिथे पाहून ती जरा घाबरली. त्यावेळी ती मेघाला सांगू लागली ..

" अग थांब वहिनी , तुला नाही सापडायची साडी ..मीच शोधून देते .."

" मला जे सापडायचे होते ते आधीच सापडले आहे तन्वी ..आणि त्यासाठीच मी अतुलला इथे बोलावले आहे." 

हातातील वस्तू दाखवत मेघा तन्वीला म्हणाली.

" तन्वी , मी तुला नेहमीच लहान बहिणी प्रमाणे वागवले आणि तू माझा असा विश्वासघात केलास..? " 

मेघाच्या या प्रश्नावर तन्वी काहीच बोलू शकली नाही. तिच्या वागण्यामुळे तिने लाजेने मान खाली घातली. 

तन्वीच्या सासरी तिच्या माहेरची शोभा व्हायला नको म्हणून मेघा आणि अतुल कार्यक्रम पार पडेपर्यंत शांत राहिले आणि घरी निघून गेले.

घरी पोहोचेपर्यंत मेघाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या. गेल्यावर लगेच तिने सुधाताईंना प्रश्न विचारला ..

" आई , किती विश्वास होता माझा तुमच्यावर पण का वागल्या तुम्ही माझ्यासोबत अश्या..? "

" मला मिळालेल्या अनेक भेटवस्तू तुम्ही तन्वीला खोटेपणाने नेऊन दिल्या. " 

" इतकेच नाही तर महाबळेश्वरहून माझ्या आईबाबांना आणलेल्या भेटवस्तू सुद्धा तुम्ही तन्वीला नेऊन दिल्या आणि मीच त्या नीट सांभाळल्या नाही असे सांगून मलाच विसराळू ठरवले. "

" आई , तुम्हाला प्रत्येक शब्दाला मान देऊन मी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकली. चोरून न देता या सगळ्या वस्तू तुम्ही माझ्या समोर दिल्या असत्या तर मी तुम्हाला नाही म्हणाली असती का ..? "

" इतका मोठा विश्वासघात का केलात तुम्ही माझ्यासोबत ..? "

मेघाचे हे बोलणे ऐकून सुधाताई खूप गोंधळल्या. त्या अतुलला सांगू लागल्या ...

" अतुल , बघ ही तुझी बायको मेघा .. माझ्यावर कसे नको नको ते आरोप करते आहे..अरे माझ्या भावासोबत वाईटपणा घेऊन मी तुझे लग्न हीच्यासोबत लावून दिले आणि हिच माझ्यावर असले घाणेरडे आरोप करतेय. " 

" अतुल , समजाव तुझ्या बायकोला आणि माफी मागायला लाव माझी ...! "

" तुझ्या आईवर तुझा विश्वास नाही का ..? मायलेकराचे आणि बहीणभावाचे नात तोडायला निघाली आहे ही मेघा .." 

सुधाताईंच्या या बोलण्यावर अतुल बोलू लागला ..

" आई , मेघाने मला तुझ्याविषयी किंवा तन्वी विषयी काहीही भरवले नाहीये. हा पण ती सांगते आहे ते खरे आहे. त्या सगळ्या वस्तू मी तन्वीच्या कपाटात स्वतःच्या डोळ्याने पाहिल्या आहेत." 

" मेघाच्या बाबांनी आपल्याला प्रत्येक संकटात मदत केली आहे. मेघाचे बाबा श्रीमंत असले तरीही त्यांच्या कष्टाच्या पैश्यांवर आपला काही एक अधिकार नाहीये आई .."    

" हे सगळे असतांनाही मेघाने वेळोवेळी आपल्या घरासाठी तिच्या बाबांकडून मदत मागितली ती फक्त आपल्यासाठी ..आणि आपण ...आता पुढे मी काही बोलूच शकत नाही. " 

अतुलच्या ह्या बोलण्यानंतर मेघा बोलू लागली..

" तन्वीने माहेराहून काहीच नेऊ नये असा माझा उद्देश मुळीच नाही. खरंतर गरजेनुसार वस्तू न्यावी मात्र पद्धतशिरपणे ... तुम्ही जेव्हा चोरून तन्वीला वस्तू देत होत्या त्यावेळी तिने तुम्हाला नकार द्यायला हवा होता. " 

" देवाणघेवाण ही योग्य रीतीने झाली तरच कुटुंबीयांमध्ये प्रेम राहते नाहीतर गैरसमज होऊन ही नाती तुटायला वेळ लागत नाही..." 

" सुनेचे माहेर कितीही श्रीमंत आणि संपन्न असले असून म्हणून तिने सतत माहेराहून काही ना काही आणले पाहिजे ही तुमची अपेक्षाच चुकीची आहे आई ...." 

" कारण ते माझे माहेर आहे आणि माझे माहेर म्हणजे तुमची बँक नव्हे .....! "

समाप्त ! 

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - Google & Instagram 

Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box