#मला_साथ_देशील_ना...भाग_४
©️ जया पाटील
भाग तीन वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/07/blog-post_09.html
रागिणीच्या बाबांच्या मृत्यूची बातमी ऐकून अनुराजला खूप मोठा धक्का बसला.
तो तडक रागिणीच्या घरी जायला निघाला.
त्याच्या आईने बाहेर कुठे जातोय असे विचारले.
तेव्हा मित्राच्या वडिलांची तब्येत बरी नाहीये असे सांगून तो घराबाहेर पडला.
कारण मुलींसोबत बोललेलं सुध्दा अनुराजच्या बाबांना आवडत नव्हतं.
तर मैत्री खुप दुरची गोष्ट होती.
आईला खरं सांगण्यात सध्या तरी काही अर्थ नाही.
अनुराज घाईघाईने रागिणीच्या घरी पोहोचला.
त्याला पाहून रागिणी दुरूनच पळत येऊन त्याला बिलगली.
रागिणीचा पहिला स्पर्श त्याने अनुभवला पण ..
तोही अशाप्रकारे ...
इतक्या दुःखद अवस्थेत....
अनुराजला धरून रागिणी खूप जास्त रडत होती.
" अनुराज , सांग ना बाबांना ...
उठा म्हणून ...
कसले झोपेचे सोंग घेऊन झोपलेत..
बघ ना ...
माझी गंम्मत करताय ते ...
सांग ना त्यांना ...
अशी गंम्मत नका करू ..
तुमच्या रागिणीची ....
सांग ना ...अनुराज ...
तुझे ऐकतील ना ते ...
किती कौतुक करायचे ते तुझे ...
किती गप्पा करायचे तुझ्यासोबत ..
सांग ना त्यांना ...
नाहीतर मी रागे भरेन हा ..त्यांच्यावर .
माझा राग कसा असतो हे माहित आहे त्यांना ...
मग रानू बेटा ...
असे रागावू नये म्हणून मनवत बसतील ते मला ...
सांग ना त्यांना ...
उठा म्हणून ...
प्लीज ..अनुराज ..
सांग ना बाबांना उठायला." रागिणी
रागिणीचे अश्रू पाहून अनुराजला देखील दुःख अनावर झाले होते.
रागिणीला कसे समजवावे तेच अनुराजला समजत नव्हते.
तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.
बरोबरीने धीरजला देखील सांभाळत होता.
" रागिणी , तुझ्या बाबांना तू रडलेलं कधीच आवडलेलं नाही.
तू रडली की ते खूप दुःखी होतात.
आणि आज त्यांना शेवटचा निरोप देतांना असेच दुःखी करणार आहेस का..?
खूप साऱ्या गोष्टी आपल्या हातात नसतात रागिणी ...
तू अशी वेड्यासारखं वागशील तर ..
आईला आणि धीरजला धीर कोण देणार...?
त्यांच्यासाठी तरी तुला स्वतःला सावरायला हवं."
अशाप्रकारे अनुराजने तिला खूप समजावले तेव्हा ती थोडी सावरली.
तिच्या बाबांचे अचानक जाणे.
हा रागिणीसाठी खूप मोठा धक्का होता.
या सगळ्यामुळे ती खूप खचली होती.
रागिणीच्या बाबांचे श्राद्ध आणि इतर सगळे विधी पार पडले.
अनुराज रोज रागिणीच्या घरी येत होता.
धीरज आणि आसावरी काकूंना देखील तो खूप मदत करत होता.
रागिणीच्या बाबांच्या पॉलिसी आणि इतर सरकारी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी ही त्याने खुप मदत केली.
अनुराज देशमुख कुटुंबाचा भक्कम आधार बनला होता.
रागिणी अनुराजचे सगळे वागणे पाहत होती.
त्याला जवळून अनुभवत होती.
" खरंच अनुराज किती चांगला आहे.
तो एक मित्र म्हणून माझ्या आयुष्यात नसता तर काय झालं असतं ..?
त्याने त्याची मैत्री खूप प्रामाणिकपणे निभावली आहे.
खरंच तो माझा चांगला मित्र आहे.
की त्यापेक्षा अजून जास्त जवळचा ....?
छे....छे ... !
तो फक्त माझा चांगला मित्र आहे...!
त्यापेक्षा जास्त नाही. "
अश्या अनेक विचारांनी रागिणी च्या मनात गोंधळ निर्माण झाला होता.
अनुराज सोबतचे तिचे नातं फक्त मैत्री आहे की प्रेम ...
हे तिचे तिला समजत नव्हते.
आणि समजत असले तरी ते तिला कबूल करायचे नव्हते.
इकडे अनुराजची अवस्था काही वेगळी नव्हती.
पहिल्यांदा पाहिल्यावरच तो रागिणीच्या प्रेमात पडला होता.
परंतु त्याला रागिणीला गमवायचे नव्हते.
रागिणी त्याला चांगला मित्र समजते असेच त्याला वाटत होते.
आणि मैत्रीण म्हणून असलेली रागिणीची सोबत त्याला गमवायची नव्हती.
आणि अनुराजने स्वतःच्या भावना रागिणीला सांगितल्या तरी....
त्याचे बाबा त्या दोघांचेही नातं कधीच मान्य करणार नाहीत.
हे अनुराजला माहित होते.
म्हणूनच अनुराज गप्प होता.
रागिणीच्या बाबांना जाऊन एक महिना झाला होता.
रागिणी मनातून खूप खचलेली होती.
पण धीरज आणि आईला आणखीन त्रास नको.
म्हणून ती स्वतःला सावरत होती.
काही दिवसात लगेचच बारावीचा आणि एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट लागला.
रागिणी कॉलेजमध्ये पहिली आली होती.
अनुराजने रिझल्ट पाहिला.
आणि तो तडक रागिणीच्या घरी गेला.
जाताना त्याने पेढे घेतले.
रागिणीच्या घरी गेल्यावर ..
सर्वप्रथम ते पेढे आणि रागिणीचा रिझल्ट त्याने तिच्या बाबांच्या फोटोसमोर ठेवला.
" काका , तुम्ही आज असतात तर तुमच्यासाठी आजचा क्षण गर्व करण्यासारखा असता.
तुमची रागिणी बारावीच्या परीक्षेत कॉलेजमधून सर्वप्रथम आलीय.
तुम्ही जिथून कुठून आम्हाला पाहत असणार.
तिथून तिला भरभरून आशीर्वाद देत असणार.
असेच कायम तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. "
अनुराजचे बोलणे ऐकून...
रागिणी ,
तिची आई ,
आणि धीरज सगळेच भावनावश झाले.
सगळ्यांना अश्रू अनावर झाले.
पण सगळ्यांनी स्वतःला सावरले.
आणि रागिणीच्या यशाचे कौतुक केले.
अनुराज देखील उत्तम मार्कांनी पास झाला होता.
त्याचे देखील रागिणीने अभिनंदन केले.
इतर कुटुंबीयांनी देखील अभिनंदन केले.
स्वतःचा रिझल्ट घेऊन अनुराज जेव्हा त्याच्या घरी गेला तेव्हा..
रिझल्ट लागण्याच्या आनंदात,
तन्वीने त्याच्यासाठी खूप मोठे सरप्राईज प्लॅन केले होते.
अनुराजचे आईबाबा देखील खूप खुश होते.
संध्याकाळी तो घरी आला.
तेव्हाच दरवाजा उघडून आत येताच ...
त्याच्यावर तन्वीने फुलांचा वर्षाव केला.
अनुराजचे आई , बाबा आणि तन्वीने टाळ्या वाजवत त्याचे स्वागत केले.
घराची केलेली सुंदर सजावट ..
डायनिंग टेबलवर ठेवलेला केक ,
आणि सुंदर भेटवस्तू पाहून अनुराज आनंदी झाला.
त्याच्या आईबाबांनी त्याची आवडती बाईक सरप्राईज म्हणून आणली होती.
घरातील सगळ्यांना आनंदी पाहून तो देखील आनंदी झाला.
पण लगेचच त्याला रागिणीची आठवण आली.
आणि तो पुन्हा दुःखी झाला.
खरं तर त्याला देखील असा आनंदसोहळा अपेक्षित होता.
पण हा सगळा आनंदसोहळा मात्र अनुराज मनापासून जगू शकत नव्हता.
कारण त्याची रागिणी दुःखी होती.
इंजिनीरिंगच्या ऍडमिशनचा कॅप राऊंड सुरु झाला .
ऑपशन्स फॉर्म भरण्यासाठी रागिणी आणि अनुराज सोबत गेले.
त्यांनी एकमेकांच्या मदतीने कॉलेज निवडले.
जेणेकरून दोघांनाही एकच कॉलेज मिळेल.
पण दोघांच्याही मार्कांमध्ये बराच फरक होता.
रागिणीचा नंबर पहिल्याच राऊंड मध्ये मुंबई मधील सर्वोत्तम कॉलेज मध्ये लागला.
पण अनुराजला सीट अलाॅट झालं नाही.
तिला अनुराज सोबतच ऍडमिशन हवी होती.
म्हणून तिने फर्स्ट राऊंडला ऍडमिशन घेतली नाही.
सेकंड राऊंडला देखील तिला चांगले कॉलेज मिळाले.
पण त्या राऊंडला देखील अनुराजला कॉलेज मिळाले नाही.
तिने पुन्हा सेकंड राऊंडला ऍडमिशन न घेण्याचे ठरवलं.
पण अनुराजने तिला समजावले.
" रागिणी, या राऊंडला तरी तू ऍडमिशन घे.
तुला मुंबई मधले उत्तम कॉलेज मिळते आहे.
तुझ्या आणि माझ्या मार्क्स मध्ये बराच फरक आहे.
त्यामुळे तुला आणि मला सारखेच कॉलेज मिळणे जरा अवघड आहे.
आणि कॉलेज वेगवेगळे असले म्हणून काय झालं ..?
आपण चांगले मित्रमैत्रीण आहोत आणि असणार.
एका कॉलेज मध्ये नसलो.
तरीही आपल्या मैत्रीवर त्याचा कुठलाच परिणाम होणार नाही.
एकाच कॉलेजमध्ये नसलो तरीही आपण एका शहरात असणारच..
त्यामुळे तुला मिळालेल्या कॉलेजमध्ये तू ऍडमिशन घे. "
असेच अनुराजने समजावल्यावर रागिनीने मुंबई मध्ये ऍडमिशन घेतली.
पण त्या दोघांचेही दुर्दैव म्हणावं.
अनुराजचा नंबर मुंबईमध्ये कुठल्याच कॉलेज मध्ये लागला नाही.
शेवटच्या कॉउंसिलिंग राऊंड मध्ये त्याला पुण्यात चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळाली.
तो ही ऍडमिशन घेणार नव्हता.
पण बाबा सोबत होते.
त्यांना काय कारण सांगणार ..?
पुण्यात ऍडमिशन नको म्हणून ..
शेवटी नाईलाजाने त्याने पुण्यातील कॉलेजला ऍडमिशन घेतली.
अनुराजची ऍडमिशन पुण्यात झाली म्हणून रागिणी खूप नाराज झाली.
तिला ही बातमी समजताच रडूच कोसळले.
" अनुराज , सगळीकडे माझ्याच सोबत असे का होते?
तू एकच मित्र आहेस माझा.
ज्याच्या खांद्यावर डोकं टेकवून मी माझ्या दुःखाला वाट करून दिली.
ज्याने मला दुःखात साथ दिली.
सावरलं.
आपलं ॲडमिशन एकाच कॉलेजमध्ये व्हावं.
इतकीच इच्छा होती रे माझी..
पण ते ही नाही.
माझी जवळची माणसंच माझ्यापासून दूर जाताहेत.
तू आता पुण्याला जाशील.
बाबा सगळ्यात जवळचे.
पण ते ही बघ ना कसे कायमसाठी दूरच्या प्रवासाला निघून गेले.
माझ्यासोबतच असे का होतेय..? " रागिणी
एवढं बोलून ती रडू लागली.
" असं नाहीये रागिणी ....
खरं तर मी पण या कॉलेजला ऍडमिशन घेणार नव्हतो.
पण बाबा समोर होते.
त्यांना आपल्या मैत्रीबद्दल माहित देखील नाही.
खूप वर्षापूर्वी काही घटना अश्या घडल्या आहेत की त्यामुळे..
माझ्या बाबांना एका मुलाची आणि मुलीची मैत्रीच मान्य नाही.
त्यामुळे मी त्यांना काहीच बोलू शकलो नाही.
आणि एका शहरात नसलो तरीही पुणे खूप दूर नाही.
आपण नेहमी संपर्कात असू.
तुझ्या प्रत्येक अडचणीत मी तुझ्यासोबत होतो आणि कायमच असेल. " अनुराज
" ते सगळे असले तरीही तू दूरच असशील ना ..माझ्यापासून ..." रागिणी
" अगं जेव्हा जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा येईन ना तुला भेटायला.
आपण अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलंय ना मग आता study first...
आपली मैत्री अभंग होती,
आहे आणि यापुढेही राहील.
तेव्हा रागिणीबाई,
आता रडणं पुरे झालं...
मला पुण्याला जाताना असा रडून सेंडऑफ देणार आहेस का..? "
आणि एक नाराज तर व्हायचंच नाही हां.
मैत्रीच्या या टप्प्यावर ही आपण एकमेकांसमोर नसतानाही सोबतच असू.
कधीही आवाज दे....
जसा असेन, जिथे असेन तिथून तुझ्यापर्यंत पोचेन.
& It's my promise..
और तुम तो जानती हो हमें वचन तोडने की आदत नहीं...
So... आता हसायचं छान...
स्माईल प्लीज... "
असे बोलून अनुराजने रागिणीची नाराजी दूर केली.
तिने बाय केलं,
आणि दोघे आपापल्या रस्त्याने चालू लागले.
त्याने तिला समजावलं होतं.
पण स्वतःला कसं समजवायचं हा प्रश्नच होता त्याच्यापुढे.
त्यालाही ती आता आपल्याला रोजच्या रोज दिसणार नाही,
भेटणार नाही याची खंत वाटतं होती.
शूरवीरासारखं मोठं मोठं बोलून तर झालं होतं ,
पण निभावताना मात्र मनाची कुतरओढ होतं होती.
पण एकदा का एका वाटेवर चालायचं ठरवलं की,
ती वाट कशीही असली तरी पार करावीच लागते.
विचारांच्या नादातच तो घरी पोचला...
------------------
अनुराज पुण्याला गेला तेव्हा रागिणीला दुःख अनावर झाले होते.
पण अनुराजला दुखवायचे नाही म्हणून तिने अनुराजला हसत हसत निरोप दिला.
ते एकमेकांपासून दूर झाले.
कॉलेजच्या निम्मिताने अनुराज आणि रागिणी वेगवेगळ्या शहरात राहु लागले.
तरीही ते कायम एकमेकांच्या संपर्कात होते.
अनुराज पुण्याला गेल्यावर रागिणीच्या अडचणी आणखीन वाढीस लागल्या.
पण अनुराजला टेन्शन नको म्हणून तिने त्याला काहीच सांगितले नाही.
अनुराग आणि रागिणी दोघेही एकमेकांना खूप मिस करत होते.
दोघांनाही एकमेकांचा विरह सहन होत नव्हता.
पण तरीही ते सगळे सहन करत होते.
दोघांचेही एकमेकांवर मनापासून प्रेम होते.
पण प्रेमाची कबुली देण्याची हिम्मत दोघांमध्येही नव्हती.
.
.
.
अनुराज आणि रागिणी दोघांपैकी कोण देणार प्रेमाची कबुली ...?
रागिणीच्या नेमक्या कुठल्या अडचणी वाढल्या ..?
अनुराजला न सांगता ती एकटी यातून मार्ग काढू शकेल का..?
वाचू पुढच्या भागात ...
.
.
.
.
क्रमश:
प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो. सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
फोटो साभार - Google
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box