मला साथ देशील ना भाग ११



मला साथ देशील ना भाग ११

संकल्पना आणि कथाबीज ©जया पाटील

लेखिका © Velvet Kavisha

भाग दहा वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/07/blog-post_16.html


अनुराजने सरांकडे पाहिलं. 

"सर तुम्हीच मदत करु शकता आम्हांला. " अनुराज

"सांग काय मदत करु..??" सरांनी विचारलं.

"सर येत्या रविवारी तुम्ही रागिणीचं स्थळ घेऊन बाबांना भेटायला याल का..?? 

बाबा तुम्हांला खुप मानतात. 

तन्वीने आताच लग्न केलंय त्यामुळे ते माझ्या लग्नाच्या मागे लागतीलच. 

तुम्ही एवढ्यातच बाबांना भेटलात तर ते नाही म्हणणार नाहीत. 

तसंही रागिणीच्या घरून फक्त धीरज, मामा मामी आणि मावशी आहेत. 

त्यांना माझ्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाहीय. 

त्यांनाही अजून कोर्ट मॅरेजबद्दल सांगितलेलं नाहीय..." अनुराजने आपला प्लॅन सांगितला. 

रागिणी त्याच्याकडे पाहतच राहिली. 

नुसती अभ्यासात हुशारी असून चालत नाही तर व्यवहारज्ञान आणि बुध्दीकौशल्य ही हवं. 

अनुराज खरंच हुशार आहे.

तिला अभिमान वाटला. 

ती सर काय म्हणतात याकडे लक्ष देत बसून राहिली.

"फोटो आणि पत्रिका आहे का रागिणी तुझ्याकडे...??" सरांनी विचारलं.

"सर मी उद्या तुम्हांला फोटो आणि बायोडाटा देतो रागिणीचा. 

पत्रिका वगैरे बाबांना नाही लागणार..." अनुराजने सांगितलं.

"ओके.. मी येतो मॅडमना सोबत घेऊन तुझ्या घरी. 

काळजी करू नकोस. 

बघू काय होतं ते.. " सरांनी आश्वासित केलं.

अनुराजने सरांना मिठी मारली. 

"सर मी तुमचे उपकार आयुष्यात कधीच विसरणार नाही." अनुराज भावूक झाला होता. 

सरांनी रागिणीच्या डोक्यावर हात ठेवला. 

"तु मला माझ्या लेकी सारखीच आहेस. 

सगळं ठीक होईल. 

काळजी करू नकोस." रागिणीच्या डोळ्यात अश्रू आले.

जेवणानंतर थोडं थांबून अनुराज रागिणी निघाले. 

रागिणीला बिल्डिंग खाली सोडून तो घरी गेला.

रागिणीच्या "थॅंक्यु" मेसेजसोबत झोपी गेला.

----------------

नेहमीप्रमाणे येणारा रविवार आज स्पेशल होता. 

सर यायच्या आधी तो बाहेर निघून जाणार होता. 

कदाचित आज दिवसभर बाहेरच थांबणार होता. 

जेणेकरून सरांना बाबांशी नीट बोलता येईल.  

सकाळी तो लवकर उठला.

सगळे आवरून बाहेर जायला निघाला.

तितक्यात मागुन त्याच्या आईने आवाज दिला.

" अनुराज , नेहमीच काय बाहेर बाहेर ..?

एखाद दुसरा रविवार तरी आमच्यासोबत पण घालवत जा.

गेले दोन तिने महिने तू एका सुद्धा रविवारी घरी थांबला नाहीये. " आई

" आई , सॉरी 

पण माझे दोन मित्र बंगलोरला जॉब करतात. 

सुट्टी काढून ते घरी आलेत.

त्यांना भेटायला जाणार आहे.

प्लीज , ..

मी तूला प्रॉमिस करतोय.

पुढच्या रविवारी मी घरीच असेन.

100% ...

पक्कावाला प्रॉमिस. "

आईला मनवून अनुराज घराबाहेर पडला.

रागिणीच्या घरी गेला. 

आज धीरज घरी होता. 

त्याच्याशी गप्पा करत बसला. 

रागिणीने केलेला नाश्ता खावून झाल्यावर तो जायला निघाला. 

आज नुसतीच भटकंती करायची ठरवलं होतं. 

एकदम संध्याकाळी घरी जाणार होता. 

--------------

इकडे साने सरांनी आपलं काम चोख बजावले होतं. 

रागिणीचा फोटो पाहून आणि आईबापाविना पोरं म्हणून बाबांना रागिणीबद्दल जास्त कणव वाटली. 

जुहू चौपाटीवर जाण्यासाठी निघालेल्या अनुराजला बाबांचा फोन आला. 

"साने सर आलेत आणि त्यांनी एक स्थळं आणलंय.

 मुलगी आईला आणि मला पसंत आहे. 

तु एकदा फोटो पाहून घे. 

तुझी पसंती नापसंती सांगू त्यांना. 

उगाच एखाद्याची मुलगी अडकवून ठेवायला नको." बाबा खुप खुश होऊन बोलत होते. 

"बाबा तुम्हांला जी मुलगी पसंत ती मलाही पसंत." अनुराज म्हणाला. 

मुलीने पळून जाऊन लग्न केलं तरी मुलगा मात्र आईबाबांच्या विचाराने लग्न करतोय याचा बाबांना अभिमान वाटत होता. 

"नको नको तू स्वतः येऊन भेट सरांना. 

त्यांना जेवायलाच थांबवून घेतलंय.

 वहिनी पण आल्यात." बाबा उत्साहात बोलत होते. 

"येतो अर्ध्या तासात" म्हणत अनुराजने फोन ठेवला. 

त्याला एकीकडे बाबांना फसवल्याचं दुःख होतं होतं तर दुसरीकडे रागिणी आई-बाबांना पसंत पडली म्हणून आनंद झाला होता. 

"बाबा तुम्ही तुमच्या तत्वात थोडी जरी तडजोड केली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती.

 तन्वीचा नवरा ही लाखात एक आहे. 

पण लव्ह मॅरेज म्हणजे फालतू असं काहीसं तुम्ही ठरवून बसलेत. 

नाईलाज झाला हो बाबा.. 

देवा माफ कर रे.. जन्मदात्याशी खोटं बोलतोय." अनुराज स्वतःशीच बोलत होता. 

------------

सरांच्या घरीच मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. 

सरांनी मध्यस्थाची भूमिका चोख बजावली होती. 

अनुराज आणि रागिणी खुप खुश होते. 

त्यांच्या नात्याला नाव मिळणार होतं समाजात, नातेवाईकांमध्ये.

 आईबाबांनी रागिणीच्या घरी जाऊन तिचं घर पाहिलं. 

धीरजला पण लवकर लग्न करायचा सल्ला दिला. 

"आईला वर्ष व्हायच्या आत लग्न करा नाहीतर तीन वर्षे थांबावं लागेल.

वय वाढत जातं पुढे. तुमच्या बहिणीची जबाबदारी आजपासून आमची आहे. 

तिची काळजी करू नका. 

सरांना सांगतो एखादी चांगली मुलगी तुमच्यासाठी पाहायला." 

बाबा एकदम धीराचं बोलत होते. 

धीरजला त्याच्या ऑफिसमधली अनघा आवडत होती. 

धीरजने केलेल्या प्रपोजला तिनेही "हो" असं उत्तर दिलं होतं. 

रागिणीच्या लग्नानंतर सगळं रितसर करून धीरज लग्न करणार होता. 

लग्न ठरल्यापासून अनुराजला धीरज आणि रागिणी "अहो जाहो" करायची प्रॅक्टिस करत होते. 

एकेरी उल्लेख करून चालणार नव्हतं ना. 

सगळ्यांच्या समोर जास्त बोलत ही नव्हते. 

कारण आधीपासून ओळख आहे हे कळलं असतं. 

-----------------

लग्नाची सगळी खरेदी, 

हॉल बुक करणं, पत्रिका छापणं, नातेवाईकांना आमंत्रण देणं यात धीरज आणि रागिणी बिझी होऊन गेले.

 ठरल्याप्रमाणे साखरपुडा आणि महिन्याभरात लग्न झालं. 

मावशी काकांनी रागिणीचं कन्यादान केलं. 

"दाजी, सांभाळा रागिणीला..!!" 

पाठवणीच्या वेळेस धीरज खुप रडला. 

अनुराज तिला सांभाळेल याची खात्री होती.

--------------------

सगळं मनासारखं घडलं होतं. 

आईबाबांच्या आशिर्वादाने अनुराजचं लग्न झालं होतं. 

सरांचं घर रागिणीचं माहेर झालं होतं.

 दिवसभर रितीप्रमाणे सगळे विधी पार पडले. 

रात्री सासुबाईंनी रागिणीला अनुराजच्या रूममध्ये पाठवून त्या दिवसातली शेवटचा विधी पूर्ण केला. 

नेहमी ड्रेसमध्ये असणारी रागिणी आज साडीत होती त्याच्यासमोर. 

नव्या नवरीचं तेज होतं चेहऱ्यावर. 

वेगळाच ग्लो आला होता. 

अनुराज तिचं ते नितळ, 

आरस्पानी सौंदर्य नव्याने पाहतच राहिला. 

तो असं पाहत होता. 

तिला नेमकं कळत नव्हतं काय करावं. 

ती तशीच उभी राहिली.

एवढ्या वर्षांची ओळख त्यातला मित्र अनुराज.

दोन महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग आणि त्यातला प्रियकर अनुराज. 

आता लग्न झालंय आणि नवरा म्हणून समोर असलेला अनुराज.. 

किती वेगवेगळ्या रुपात ती पाहत होती त्याला. 

"नवऱ्याच्या पाय पड पहिल्या रात्री" तिला मामीने सांगितलेलं आठवलं. 

ती पुढे झाली आणि वाकून अनुराजला नमस्कार केला. 

तिच्या कृतीने अनुराज गडबडला. 

"अगं काय हे..??

 मला नमस्कार कशाला करतेस??" 

म्हणत त्याने तिला हाताला धरून वर उठवली. 

"तुझी जागा माझ्या हृदयात आहे, मनात आहे आणि आजपासून या 

घरातही आहे.. 

पायाशी नाही.." म्हणाला.

ती तशीच त्याच्या मिठीत शिरली...

.

तिने केसांत माळलेला गजरा संपूर्ण बेडरुममध्ये आपला सुवास पसरवत होता. 

त्या वासाने अनुराग ही धुंद होऊन गेला. 

"आज बऱ्याच आहेत...

बरं झालं त्या दिवशीसारखी एकच नाही.." तिच्या हिरव्या चुड्यावर बोट फिरवत अनुराज म्हणाला.

"तरीही स्टंट नको.." रागिणी लाजत म्हणाली. 

"मग काय हवंय राणीसरकार...??" अनुराज

"ही तुझी उबदार मिठी..." रागिणी..

"बास्स..इतकंच??" म्हणत त्याने तिला मिठीत घेतलं. 

त्यांच्या नात्याची एक नवी सुरुवात झाली होती त्या मिठीने..

दोघेही एकमेकांच्या संमतीने थोडेसे चाचपडत पुढे सरकत होते. 

मागच्या वेळी थोडीशी तोंडओळख होतं ट्रेलर झाला होता. 

आता पूर्ण पिक्चर बाकी होता. 

एकमेकांच्या स्पर्शाने धुंद होत दोघांनी मिलनाचे सारे क्षण अनुभवले. 

एका उत्कट क्षणी त्यांचं आजवरचं प्रेम समर्पणात परावर्तित झालं. 

खुप वर्षांच्या तपश्चर्येनंतर एखादं वरदान मिळावं तसं काहीसं झालं होतं दोघांच्या आयुष्यात.

 खुप कसोट्यांवर त्यांचं नातं तावूनसुलाखून निघालं होतं. 

दोघांनी लग्नानंतरचे ते पहिलेवहिले क्षण आनंदाने साजरे केले. 

उद्याच्या आशेत.. 

.

.

.

क्रमशः

वाचा पुढील भागात

वाचकहो, आपण आता कथेच्या उत्तरार्धात आहोत. कथेच्या लेखिका जया पाटील यांना डेंग्यू झाल्यामुळे त्या ही कथा पुर्ण करु शकणार नाहीत. संकल्पना व कथा ज्या पाटील यांचीच असून आजपासून या कथेचे पुढील भाग आमच्या  लेखिका वर्षा ठुकरुल लिहिणार आहेत...


प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞


सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 


फोटो साभार - Google  

© Velvet Kavisha

Post a Comment

0 Comments