#अजून_मी_सासुचाच_संसार_करतेय...
© Velvet Kavisha
आज सोहा टणटणतच होती. चांगलीच वैतागलेली होती. जेव्हा माझी सूनबाई येईल ना तेव्हा मी तिच्या संसारात अजिबात लुडबुड करणार नाही. छान माझ्या बाजुच्या फ्लॅटमध्ये मुलाला आणि सुनेला संसार थाटायला सांगणार आहे. खरंतर सोहाचा मुलगा फक्त आठ वर्षांचा आहे. त्याचं लग्न फार दूरची गोष्ट होती.
आज सोहाचं टाळकंच सटकलं होतं. आजवर हे बऱ्याचदा झालं होतं. पण सोहा गप्प होती. सोहाचं अरेंज मॅरेज. वयाच्या तिशीत झालेलं लग्न. सुहास चांगला बॅंकेत कामाला होता. आता तर मॅनेजर झाला होता.
सोहा आणि दोन बहिणी. भाऊ नाही. सोहा माहेरी मोठी. साधारण मोठ्या मुलीवर जे दडपण असतं तेच सोहावर होतं... उच्चशिक्षित सोहा लेडीज हॉस्टेलमध्ये राहून नोकरी करायची. निटनेटकेपणा, शिस्तप्रिय असणारी सोहा खुप शांत होती. आपला मुद्दा नीट मांडता यायचा तिला.
सोहाचं लग्न झालं. घरात मोजून चार माणसं. सासु सासरे आणि ही दोघं. नणंद बाई तिच्या सासरी. सुरुवातीला सगळ्याच सूना सासुचं ऐकतात. तसंच सासुबाईंच्या देखरेखीखाली सोहा त्या घरात वावरत होती. नोकरी, संसार अशी तारेवरची कसरत सुरू होती. लग्नानंतर दोन वर्षांनी सोहाला मुलगा झाला. सोहाचं माहेर खेड्यातलं. तिशी नंतरचं बाळंतपण होतं. त्यामुळे ते शहरातच नीट होऊ दे म्हणत सुहासने सोहाच्या आईला इकडे बोलावून घेतलं. पंधरा दिवस सोहाची आई तिच्या बाळंतपणासाठी सासरी येऊन राहिली. बाळ पंधरा दिवसांचं होताच सोहा आईसोबत माहेरी गेली. सुहास अधूनमधून येऊन भेटून जायचा.
सोहा सहा महिने माहेरी राहिली आणि इकडे तिच्या सासुबाईंनी मुलाचे कान भरायला सुरुवात केली. "सोहा अशी, सोहा तशी. रीत नाही. घरात लक्ष नाही. एक वस्तू नीट जाग्यावर ठेवत नाही. ब्ला ब्ला ब्ला....."
सोहा साडेसहा महिन्यांचं बाळ घेऊन सासरी आली. सहा महिन्यांत सुहास बदलला होता. बाळाला सांभाळून घरातली कामं करणाऱ्या सोहाच्या कामात त्याला चुका दिसू लागल्या.
बाळंतपणानंतर सोहाने नोकरी सोडलीच होती. तिला बाळाचं नीट संगोपन करायचं होतं. त्याप्रमाणे ती घरातली कामं करून बाळाला सांभाळत होती. पण सुहासच्या रोजच्या कटकटीने तिला कंटाळा आला. एके दिवशी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं.
" दिवसभर बॅंकेत कामात असणाऱ्या तुला घरात लक्ष घालायची गरज नाही. तू तुझं ऑफिस सांभाळ आणि चोंबडेपणा करणं बंद कर. नाहीपेक्षा तू आणि तुझी आई मिळून सुयशला सांभाळा मी नोकरी करते. म्हणजे घरात कामं करण्याचा आणि तुमच्या दृष्टीने ती चुकण्याचा प्रश्नच येणार नाही." सोहाने असं ठणकावून सांगताच सुहास सुधरला.
सुहास सोहाला काही बोलत नाही हे पाहून सासुबाईंनी नवीन अस्त्र काढलं. त्या सोहाच्या प्रत्येक कामाला नाव ठेवू लागल्या. कोणी आलं गेलं की त्यांच्यासमोर "हे असंच ते तसंच" सुरू झालं.
घरात काही झालं की, सासुबाई लगेच सुहासला सांगायच्या. सुहास मग चिडचिड करायचा. तो आईलाही काही बोलत नव्हता आणि सोहालाही.
मागच्या बहिणींच्या लग्न व्हायची बाकी म्हणून सोहा शांत होती. बोलणं सहन करत होती. सासुबाईंच्या वागण्या बोलण्याची सवय करून घेतली तिने. कधी कधी तिला वाटायचं, "जाऊ दे कोण आहे यांना आपल्याशिवाय..!!" आपली आई पण बोलतेच की काही चुकलं की अजूनही. सुयशला मात्र आजी-आजोबा चांगलं सांभाळायचे.
सुयश दोन वर्षांचा झाला आणि सोहाने घरी क्लासेस घ्यायला सुरूवात केली. शिकवण्याची पद्धत खुप चांगली असल्यामुळे मुलांची संख्या वाढू लागली. तिने शेजारचा १बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला. कॉलेजमध्ये जाणाऱ्या दोन मुली हाताखाली घेतल्या. गेली पाच वर्षे क्लासेस छान पद्धतीने सुरू आहेत. मागच्या वर्षी सुयश सात वर्षांचा झाला.
सासुबाईंची अगदी बारीक नजर. सोहाचं पांघरूण घेऊन कधी सुयश झोपला किंवा झोपलेल्या सोहाच्या अंगावर आपलं पांघरूण टाकून सुयश पसार झाला की, सासुबाई फरकन् ते ओढून बाजूला घडी करून ठेवायच्या. मायलेकरांच्या अशा खुप बारीकसारीक गोष्टींवर सासुबाईंचा सीसीटीव्ही कॅमेरा.
दिवाळीत सोहाच्या नणंदेने आई-वडिलांना आपल्या घरी आठ दिवस राहायला बोलावलं. सुयशही त्यांच्या सोबत आत्याकडे गेला.
क्लासला सुट्टी असल्याने सोहा दिवसभर घरात एकटीच होती. एरवी कामापुरता किचनशी संबंध येणाऱ्या सोहाला किचनमध्ये काही बदल करावे असं वाटतं होतं. तिने कारपेंटर बोलावून किचनमध्ये ग्लास कॉर्नर लावून घेतले. बेडरुममध्ये पिढीजात टांगलेला कांद्याचा करंडा रिकामा केला. मस्त कांदे बटाट्याची मांडणी आणून कांदे बटाटे सोयीस्कर रित्या सापडतील अशी किचनमध्ये ठेवली.
लग्नाला दहा वर्षे झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सोहाने स्वतःच्या मनाने किचनमध्ये बदल केले होते. चहा पावडर साखरेचा डबा बदलला होता. साखर चहा पावडर कोणत्या डब्यात आहे हे बाहेरूनच कळत होतं. सुहासला ते थोडेसे बदलही आवडले होते. कारण सोहा नसताना चहा बनवून पिणं सोपं वाटलं त्याला.
आज सासुबाई आठ दिवसांनी घरी आल्या. त्यांना सोहाने केलेले छोटे छोटे बदल रुचले नाहीत. त्यांनी मांडणीतले कांदे बटाटे पुन्हा करड्यांत भरून करंडा बेडरुममध्ये टांगला. ग्लास कॉनर्रवरचे डबे काढून पुन्हा होते तसेच ठेवले. साखर चहा पावडर पुन्हा स्टीलच्या डब्यात ठेवली.
बाहेर गेलेली सोहा घरी आली. मागोमाग सुहास ही आला. किचनमध्ये जाताच सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. तिचं टाळकंच सटकून गेलं. ती तावातावातच बाहेर आली.
"माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली पण मला या घरात एखादी वस्तू माझ्या मनाप्रमाणे ठेवण्याची मुभा नाही. स्वयंपाक कोणता करणार ते ही तुम्हीच सांगणार. तोच आणि तेवढाच करायचा. एखादा पदार्थ मी स्वतःहून बनवला तर तुम्हाला चालत नाही. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा आणि कराल तो कायदा. आजवर मी सगळं तुमच्या मनासारखं केलं पण आता नाही. माझी ही माझ्या संसाराची काही स्वप्नं आहेत. मलाही वाटत मी माझ्या हाताने माझं घर नटवावं. आपल्या आवडीच्या काही वस्तू किचनमध्ये, घरात आणाव्यात. सासुबाई मी तर आतापर्यंत फक्त तुमचाच संसार करत आलेय. लग्नाला दहा वर्षे झाली माझ्या वयाची चाळिशी आली. तुम्हीच सांगा आता मी माझा संसार कधी करणार...??"
कधी सासुबाईंना उलटून न बोलणारी सोहा आज प्रचंड चिडली होती. थोडा वेळ थांबून म्हणाली., "जे झालं ते झालं. मला वाटतं नाही सासुबाई मी यापुढे तुमचा संसार करू शकेन. त्यापेक्षा तुम्ही ह्या घरात तुमच्या मनासारखा संसार करा आणि मी बाजूला भाड्याच्या घरात माझा स्वतःचा माझ्या मनासारखा संसार मांडते. तुमच्या मुलाला कुठे खायचं जेवायचं तिथे खावू दे. जेवू दे. माझी काही हरकत नाही."
सुहासला आता भांडणातून आईचे एक एक गूण कळत होते. सोहा मात्र काही ऐकून घ्यायला तयार नाही. शेवटी सोहाने बाजुच्या भाड्याच्या घरात आपल्या मनासारखा संसार मांडला. सुयश आणि सुहास कधी इकडे कधी तिकडे जेवत होते. सोहाचं वागणं सासुबाईंना अजिबात आवडलं नव्हतं. त्यांनी सोहाशी बोलणं बंद केलं. सुहास मात्र ना आईला दुखवत होता न बायकोला.
सोहा आपण चांगली सासू होण्याचा, मुलाच्या सूनेच्या संसारात ढवळाढवळ न करण्याचा निश्चय करत होती. तिने ठरवून टाकलं होतं की, मुलाचं लग्न केलं की लगेच त्याचा आणि सुनबाईंचा वेगळा संसार मांडून द्यायचा. म्हणजे दोन पिढींच्या आवडीनिवडी जपल्या जातील. दूर राहून नाती जपली जातील. प्रत्येकाला त्याच्या घरात स्वातंत्र्य मिळेल.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोहा सारखं सोहाच्या सूनबाईला म्हणावं लागणार नाही की, "सासुबाई मी तुमचाच संसार करतेय अजून..!!!"
© Velvet Kavisha
सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. लिंक सहित शेअर करण्यास आमची हरकत नाही. साहित्य चोरी हा कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे.

7 Comments
As hot kdhi kdhi.. Sasu na tyanchya goshti tya thevtil tashach havya astat.. 👍ektra rahne vait nhi fkt samjun ghene mahtvache
ReplyDeleteमस्त, अगदी मनातले.. थोड्याफार फरकाने सगळे आपलेच लिहिले आहे असे वाटत होते.. चिडचिड होते खरी..
ReplyDeleteफार छान
ReplyDeleteखरेच आहे ग..मी पण लग्नानंतर 15वर्ष सासू बाईंचा संसार केलाय..खूप त्रास झाला..आता हे मात्र माझ्या सूनांच्या वाटेला येऊ नये याचा कसोशीने प्रयत्न करतेय.
ReplyDeleteHe kharch manatal mandal aahe
ReplyDeleteअगदी खर आहे....same आहे माझ्या घरात...
ReplyDeleteअगदी असंच आहे आमच्याकडे...२५ वर्ष झाली माझ्या लग्नाला ..मला सून यायची वेळ आली ...तरी सासूबाई अजून संसार करतायत...
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box