आई नाही सासुबाईच म्हणेन



आई नाही सासुबाईच म्हणेन

© Velvet Kavisha

शामराव आणि सत्यवती मोहित्यांना तीन मुलं.  मोठी सीमा आणि दुसरा संतोष. हम दो हमारे दो म्हणत सत्यवती बाईंनी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं. दुर्बिणीचं. म्हणजे आता जसं एक टाक्याचं लेझरचं करतात ना तसं. 

शामराव आणि सत्यवतीबाई बिनधास्त झाल्या. सीमा दहा वर्षांची आणि संतोष सात वर्षांचा झाला. तीन महिने सत्यवतीबाईंची पाळी आली नाही. तशीही तारीख लक्षात ठेवायची सवय मोडल्यामुळे दोन महिने होऊन गेले तेव्हा लक्षात आलं त्यांच्या. वाट पाहण्यात अजून एक महिना काढला. 

चक्कर, उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि बाईंच्या मनात पाल चुकचुकली. डॉक्टरांचा दवाखाना गाठला तेव्हा कळलं की बाईंना दिवस गेलेत. अंदाजे तेरा आठवड्यांचा गर्भ होता. क्युरेटीन किंवा गर्भपात करणं शक्य नव्हतं. फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन सपशेल फेल गेलं होतं. 

आधी लपतछपत आणि नंतर ऑपरेशन फेलचा गाजावाजा करतं आलेलं हे शामरावांचं शेंडेफळ म्हणजे नेहा. 

सीमाचं शिक्षण पूर्ण झालं. बीएड करून ती एका जिल्हापरीषदेच्या शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाली. शामरावांनी आपल्या तोलामोलाचं सुयोग्य स्थळ पाहून सीमाचं लग्न लावून दिलं. 

संतोषने इंजिनिअरिंग पूर्ण करून बेंगलोरला नोकरीसाठी गेला. ऑफिसमधल्याच मुलीशी त्याचंही लग्न झालं. शामराव आणि सत्यवतीबाईंना जावई आणि सून आली. 

नेहा लहान असल्यामुळे शिकत होती. घरात सगळ्यात लहान म्हणून सगळ्यांनीच लाड केले होते. नेहा पहिल्यापासूनच आगाऊ कॅटेगरीत मोडणारी. बोलण्यात स्पष्टवक्तेपणा. संतोष दादा - वहिनी आणि सीमा ताई- जिजुंचा संसार पाहत आलेली. लग्नाच्या बाबतीत तिची स्वतःची अशी काही ठाम मते होती. 

बी. कॉम नंतर accounts and finance पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. शिकता शिकता एका सीएच्या फर्ममध्ये experience साठी जात होती. डिग्री हातात मिळताच तिने एका कंपनीत Senior accountant च्या पोस्टसाठी apply केलं. आतापर्यंचा सीए फर्ममधला अनुभव कामी आला. आणि त्या कंपनीत नोकरी मिळाली.  वर्षभर नोकरी केल्यानंतर ती स्थिरस्थावर झाली असं समजून शामरावांनी तिच्या लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली. चार पाच स्थळं शोधल्यानंतर एक स्थळं फायनल झालं. अमोलच्या घरी आई-वडील, एक लग्न झालेला भाऊ आणि त्याची दोन मुलं. त्याच्या भावाचं कुटुंब वेगळं राहत होतं. अमोल आईबाबांसोबत राहत होता. म्हणजे नेहा ही सासु सासऱ्यांसोबतच राहणार होती लग्नानंतर. 


शामरावांनी आधीच ताकीद दिल्यामूळे नेहाचं स्वतःच्या लग्नात तोंड उघडणं शक्य नव्हतं. तारीख, कार्यालय, साखरपुडा, लग्न सगळं सगळं ठरलं. बस्ता खरेदी झाली. 


लग्नाआधी नेहाला फारच सूचना येत होत्या.  सासरी जाऊन हे कर ते कर. सगळ्यांचा आदर कर. सासुबाई, जाऊबाईंशी प्रेमाने वाग. सासुबाईंना आई म्हण. नणंदेला ताई म्हण. जावेला वहिनी म्हण. अमोल ज्या व्यक्तीला जे म्हणेल तेच तू ही म्हण. पटकन उलटून काही बोलू नकोस. आई, सीमाताई सगळे सारखे सांगत होते. नेहा फक्त हो हो म्हणत होती. 

ठरल्याप्रमाणे लग्न ही झालं.  नेहा अमोलच्या घरी आली. नव्या नवलाईचे दिवस संपले. नोकरी, घरसंसार सुरू झालं. सगळे खुश होते. 

सासुबाई तशा खुश होत्या नेहावर. सकाळी उठून टिफीन बनवायचा. छोटी मोठी कामं करायची आणि ऑफिसला जायचं. मागे उरलेलं सगळं काम सासुबाई करायच्या. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर मात्र संध्याकाळचा स्वयंपाक नेहा करायची. सगळं सुरळीत सुरू होतं. 

नेहाचं पहिलंच हळदीकुंकू. सासरच्या रितीप्रमाणे नेहाने सगळं सामान आणलं. हळदीकुंकवाला सोसायटीतल्या सगळ्या बायका आल्या. सासुबाईंच्या मार्गदर्शनाखाली नेहा सगळं करत होती. सासुबाई आत गेल्या आणि नेमक्या सासुबांईच्या भिशीतल्या बायका घरी आल्या. नेहाने त्यांचं हसून स्वागत केलं. बसायला सांगितले आणि तिथूनच सासुबाईना आवाज दिला.

"सासुबाई, तुमच्या भिशीच्या मैत्रिणी आल्यात." 

आलेली मंडळी आश्चर्यचकित झाली. नेहा सासुला "सासुबाईच" म्हणत होती. "आई किंवा आत्या" नाही.

मंडळी कुजबुजतच हळदीकुंकू घेऊन घरी गेली. या महिन्यातल्या भिशीसाठी सगळ्याजणी जमल्या. कोणीतरी नेहाच्या सासुबाईंसमोर विषय काढला. "तुमची नेहा तुम्हाला आई नाही म्हणत का..??" 

झालं... सासुबाईंच्या डोक्यात किडा सोडून दिला. 

सासुबाईंनी लगेच लेकीला फोन केला. लेकीने तिच्या बुध्दीप्रमाणे आईला अक्कल दिली. 

रविवार नेहमीप्रमाणे उजाडला. शामराव आणि सत्यवतीबाईं सकाळी दहा वाजता नेहाच्या सासरी हजर... नेहाला कळेना ते असे अचानक कसे काय आलेत. तिने विचारलं तर दोघेही काही बोलले नाहीत. 

चहापाणी झालं आणि सासुबाई येऊन बसल्या. विषयाला सुरुवात केली.

" नेहा मला सासुबाईच म्हणते. आई किंवा आत्या म्हणत नाही. आमच्याकडे सगळे सासूला आई किंवा आत्या म्हणतात. हिच्या तोंडून सासुबाई असं ऐकून हळदीकुंकवाला बायका कुजबुजत होत्या... तुम्ही सांगितलं नव्हतं का तिला सासुबाईंना आई म्हणतात ते." नेहाच्या सासुबाईंनी सांगितले. 

"ओह्... असं झालं होय. तरीच आईबाबा आलेत घरी." नेहाने मनात म्हटलं. 

"नेहा बेटा, आपल्याकडे सासुबाईंना आईचं म्हणतात. तुझी आई नाही का माझ्या आईला आई म्हणायची. तुम्ही मुलं पण आजीला मोठी आई म्हणायचेत. सासुबाईंना आई म्हणायची पद्धत आहे आपल्याकडे." शामरावांनी लेकीला समजावलं. नेहाने शांतपणे ऐकून घेतलं. 

"सॉरी सासुबाई, अगदी मनापासून सॉरी म्हणते. पण नाही वाटत आई म्हणावंस. तुम्ही वाईट वागत नाहीत माझ्याशी. किंवा वाईट बोलतही नाहीत. तुम्ही एक चांगल्या सासू आहात, तुमच्या मुलांच्या सर्वोत्तम आई आहात पण माझ्यासाठी मात्र सासूबाईच आहात. मी जशी माझ्या आईशी वागते तशी मी तुमच्याशी वागू शकणार नाही. खुप छोट्या छोट्या गोष्टी आहेत.  मी ऑफिसमधून घरी आले. डोकं दुखत असेल तर आई लगेच डोक्याला तेल लावून द्यायची. तुम्ही एखादी गोळी सुचवता. आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपण्याचं सुख नणंदबाईंना विचारा त्या सांगतील. कंटाळा आलेला असताना आईने सांगितलेलं काम नाकारण्याची मुभा असते. इथे मात्र अमक्याची सून किती करते असं कौतुकाने ऐकवलं जातं. आई जरा बडबड बंद कर गं.. किती बोलतेस असं आईला म्हणू शकतो. आई म्हटलेल्या सासूला नाही. आता ही बघा ना, तुम्ही सर्वजण बसून चहा पिताहात आणि मी मात्र उभी आहे. नणंदबाईंना तुम्ही उभं इतका वेळ उभं राहू दिलं नसतं पण मी सून आहे ना...  आणि मी जिला आई म्हणते तिच्या शेजारी बसून चहा प्यायले असते.. तुम्हांला मी सासुबाई म्हटलेलं खटकलं म्हणून माझ्या आई-बाबांना बोलावून घेतलंत. ह्या ठिकाणी आई असती तर तिने मला समजावून सांगितलं असतं. माझ्याशी बोलून माझं मत ऐकलं असतं. 

"आई" हा शब्द खुप मोठा आहे माझ्यासाठी. ते सर्वस्व आहे माझं. तो शब्द ज्या व्यक्तींसाठी वापरणार ती व्यक्ती माझ्या आईसारखी असायला हवी ना...?? दुसऱ्या मुलीची आई होणं खुप अवघड आहे. कधी कधी पोटच्या मुलापेक्षाही तिच्यावर प्रेम करावं लागतं. तुम्ही सासुबाई म्हणून चांगल्या आहात. खुप काही शिकता येईल तुमच्याकडून. तुम्ही अशाच चांगल्या सासुबाई म्हणून रहा, मी चांगली सून होण्याचा प्रयत्न करतेच आहे. माझी सगळी कर्तव्य मी प्रेमाने पार पाडेन. तुम्हांला माझ्या सगळ्या चुका पोटात घालता येणार नाही. आईकडे अस्ताव्यस्त वागायच्या लागलेल्या सवयीत तुमच्यामुळे सुधारणा होतेय.  उगाचच आई मुलींचं नातं मध्ये आणून गडबड नको करायला. तुम्ही राग नका मानू कारण मी तुम्हांला आई नाही सासुबाईच म्हणेन..."

नेहा बोलून थांबली. 


"नेहा बरोबरच बोलत होती. कोणाला "आई" म्हटल्याने कोणी आई होतं नसतं. भले मग "आईचं काळीज" वगैरे असलं तरी. आपल्या आईची सर आपल्या नवऱ्याच्या आईला कशी येईल." सत्यवतीबाई मनातल्या मनात विचार करत होत्या. 

कधी कधी सासुबाईंनी "सासुबाई" बनून राहणंच फायदेशीर ठरतं. घराचा समतोल राखला जातो.  हे जरी खरं असलं तरी कधीतरी दुसऱ्याच्या लेकीला हृदयाशी धरून बघा. कवटाळून बघा. तिला स्वर्ग चार बोटांवर राहील फक्त. 

बाब्बो....!!! आज भलताच विषय घेतलाय. तुमची मतं वेगळी असू शकतात. त्यामुळे तुमच्या मतांचा नेहमीच आदर राहिलं.

© Velvet Kavisha

Post a Comment

3 Comments

  1. वाह...अगदी सुयोग्य मते...पटतील अशीच...

    ReplyDelete
  2. I like it. Mother in-law couldn't be a mother .no ever

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box