समजूत

 #समजूत

✍©️जया पाटील 



" ह्या निशाचं नेहमीचचं झालं आहे. 

अर्धवट काम करून ऑफिसला निघून जायचे. 

पुढे मग सासू आहेच उरलेले काम करायला."

"माझं पण वय झालेय विशाल आता ...

नाही होत इतके कष्ट.

सून आली की जरा आराम मिळेल.

अशी स्वप्न पाहत होती पण...

कसले काय ...? 

सून येऊन काम कमी होण्यापेक्षा वाढलं आहे माझं. " 

" एकाच सोसायटी मध्ये माझी लेक पूर्वा राहते.

पण निशाला मात्र कधीच वेळ नसतो.

तिला कधीच वाटत नाही की आपण देखील वहिनी आहोत पूर्वाची ...

एखाद्या सणाला पूर्वाला आणि जावईबापुंना जेवायला बोलवू...

हे नाही सुचत कधीच...

कसल्याच चाली-रीती नाहीत.

सगळेच कसे मी समजवायचे ....? 

तिला आपणहून नको का समजायला...? 

सून म्हणून तिची देखील काही जबाबदारी आहे ना या घराविषयी ..

पण ऑफिस आणि काम या दोन गोष्टी सोडून दुसरे काही जमतच नाही तिला...

फक्त करिअर हेच आयुष्य आहे आजकालच्या मुलांचे ...

नातीगोती नकोसे झालेय सगळे..." 

"तुमची आजकालची संपूर्ण पिढीच खूप प्रॅक्टिकल झाली आहे.

त्यामुळे आमचे विचार तुम्हाला मागासलेले आणि जुनाट वाटतात. " 

शैलाताई आज खूप चिडलेल्या होत्या.

त्यामुळेच त्या आज विशालची चांगलीच खरडपट्टी काढत होत्या.

शैलाताई आणि सुनीलरावांचा मुलगा विशाल आणि मुलगी पूर्वा. 

छोटासा सुखी चौकोनी परिवार.

विशाल एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होता.

त्याचे लग्न होऊन सहाच महिने झाले होते. 

दोघांचाही प्रेमविवाह.

त्याची बायको निशा...

निशा कारखानीस - एक टॅलेंटेड , स्मार्ट , मॉडर्न , डॅशिंग , स्टायलिश मुलगी...  

एका आय टी कंपनीत सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणारी.

अतिशय फोकस्ड , करियर ओरिएंटेड मुलगी.

तीचे स्वप्न म्हणजे सतत पुढे जाण्याचे , 

यशाचे नवीन क्षितिज गाठण्याचे ...!

त्यातच तिची भेट तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या विशाल सोबत झाली. 

विशाल देखील तिच्याच सारखा एकदम फोकस्ड..

आपले ध्येय गाठण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असलेला अतिशय हुशार मुलगा.

प्रोजेक्टच्या कामाच्या निमित्ताने दोघांच्याही भेटी वाढल्या. 

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 

दोघेही वयात आले होते.

त्यामुळे त्यांच्या घरी त्यांच्या लग्नासाठी वर-वधू संशोधन सुरु झाले.

घरच्यांची लगीनघाई पाहून त्यांनी आपले नाते घरी सांगायचे ठरवले.

योग्य वेळ आणि संधी चालून आली.

आणि 

दोघांनीही आपल्या नात्याबाबतीत आपापल्या घरी सांगितले.

दोघेही समवयस्क , हुशार त्यामुळे घरच्यांकडून देखील त्यांच्या लग्नासाठी लगेच होकार मिळाला.

परंतु निशा मात्र हे लग्न करण्याच्या बाबतीत थोडी सांशक होती.

कारण तिचे करियर अगदी यशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले होते.

लग्न झाल्यावर घर आणि ऑफिस हे सगळे मॅनेज करताना तिची ओढाताण होणार होती.

त्यामुळे अजून एक दोन वर्ष तरी लग्न नको.

असे निशाने तिच्या आईबाबांना सांगितले.

तिच्या या शंकेमुळे निशाच्या आई सुलभाताई देखील चिंतेत पडल्या.

त्यांनी निशाला जवळ बोलावले.

तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून त्या तिला समजावणीच्या सुरात म्हणाल्या....

" बाळा निशा , 

लग्न आणि करियर या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात सारख्याच महत्वपूर्ण आहेत.

तुझे करियर तुझ्यासाठी महत्वाचं आहे हे मान्य आहे मला.

पण आपण करियर सेट करतो.

पैसा कमावतो.

ते आपल्या लोकांसाठीच ना ...

आपल्या मुलांसाठीच ना ...

कितीही पैसा कमावला तरीही पैसा आपल्याला सगळा आनंद नाही देऊ शकत.

आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला साथीदाराची गरज भासतेच बाळा ...! 

सगळा आनंद पैश्यांनी विकत नाही घेता येत.

आयुष्यभराचे ऋणानुबंध जपण्यासाठी जोडीदाराची गरज ही असतेच.

लग्न म्हणजे प्रेम. 

प्रेम म्हणजे समर्पण ,

त्याग , 

एकमेकांची सोबत , 

अंडस्टॅण्डिंग म्हणजेच लग्न ....

दोन जीवांची कंमिटमेन्ट ..

आयुष्यभर सोबत राहण्याची ..." 

विशालसोबत तू एकदा या विषयावर बोल हवं तर...

तुम्ही दोघेही जेव्हा एकमेकांना समजुन घेणार,

तेव्हाच तुम्ही तुमचे आयुष्य आणि करियर बॅलन्स करू शकणार. " 

सुलभाताईंच्या समजावण्यामुळे निशा थोडी रिलॅक्स झाली.

तिने तिच्या मनातील सगळ्या शंका विशालला बोलून दाखवल्या.

लग्न झाल्यावर विशालचे आईबाबा , 

ऑफिस , घर , नातेवाईक , सणवार ...

हे सगळेच सांभाळताना तिची खूप त्रेधा तिरपिट उडणार....

त्यामुळे सध्या दोन वर्ष माझे लग्न करण्याची इच्छा नाही.

हे देखील निशाने विशालला सांगितले.

निशाच्या प्रश्नावर विशालने देखील विचार केला.

आणि सगळी सिच्युएशन समजुन घेत तो बोलू लागला...

" हे बघ निशा ...

I can understand u r confusion.

पण कधी ना कधी तर हे होणारच आहे.

लग्न ही आयुष्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 

आज तू म्हणतेस तुझे करियर आहे.

पण कदाचित दोन वर्षात तुझे प्रमोशन झालं तर तुझ्या जबाबदाऱ्या अजूनच वाढतील.

त्या कमी नक्कीच होणार नाहीत.

त्यावेळी कदाचित आमच्या सगळ्यांच्या मदतीने तुझ्यासाठी ते सगळेच सोपं होईल.

आणि वेडाबाई ...

टेन्शन कशाला घेतेस ...?

मी आहे ना ..तूला समजुन घ्यायला ...! 

मी करेल तूला मदत ..

घर आणि ऑफिस या दोघी गोष्टीतला समतोल साधण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूया.

लग्न म्हणजेच प्रेमाची सुरुवात असते.

इट्स बिगीनिंग ...नॉट एन्ड ..! 

लग्न एक सुंदर सुरुवात असते. 

आयुष्यभर ज्या व्यक्ती सोबत आपल्याला आयुष्य घालवायला आवडेल अश्याच व्यक्ती सोबतच्या नात्याची सुरुवात असते ती ..

आपले तर एकमेकांवर खूप प्रेम आहे.

मग तरीही घाबरतेस ...? 

प्रेम , जे आपण आपल्या पेक्षा आधीच्या पिढीमध्ये पाहतोय , 

माझे आणि तुझे आईबाबा  , 

आपले काका काकूंमध्ये , 

मामामामी मध्ये , 

मावशी काकांमध्ये पाहतोय

त्यांची एकमेकांविषयीची काळजी , 

त्यातून त्यांनी केलेला संसार ..

हे सगळे आपण पाहतोय...

त्यांनी देखील करियर केलेच की ....

नोकरी आणि घर दोघातील समतोल त्यांनी देखील साधलाच ना ....! 

मग आपल्याला हे जमणार नाही असे का वाटते तूला ....? 

आता रिलॅक्स हो.

अजिबात टेन्शन घेऊ नकोस.

मी आहे तुझ्या सोबतीला ...

आणि आयुष्यभर असेन.....! "

असेल बोलून विशालने निशाला आश्वस्थ केले.

निशाच्या मनातील शंका दूर झाल्या.

आणि तिने लग्नाला होकार दिला.

निशा आणि विशाल दोघांचाही विवाह   थाटामाटात पार पडला. 

माप ओलांडून निशा विशालच्या घरची लक्ष्मी झाली. 

करियर करतानाच तिच्या संसारात देखील तितकीच रुळली. 

सुलभाताईंच्या चांगल्या शिकवणुकीमुळे निशा एक चांगली सून , चांगली बायको आणि उत्तम गृहिणी होण्याचा प्रयत्न करत होती.

पण एकाच वेळी एका व्यक्तीला ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणे थोडं अवघड असते हे मात्र तितकेच खरं.

निशा लहानपणापासून खूप मोकळ्या वातावरणात वाढली होती.

सुलभाताई आणि दिलीपराव दोघांनीही कधीच मुलगी म्हणुन निशावर फार बंधने लादली नाही.

अगदीच मुलाप्रमाणे तिला वाढवले. 

घरातील खेळीमेळीच्या वातावरणामुळे तिला फार मोकळे वागण्याची,

स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याची सवय होती.

बॅडमिंटन , कराटे , मैदानी खेळ खेळणे. 

स्कुटी पासून चारचाकी चालविण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांनी तिला योग्य रीतीने शिकवली होती.

विशालच्या घरी मात्र तिच्या माहेरच्या विरुद्ध वातावरण होते.

शैलाताई मनाने खूप चांगल्या होत्या पण निशा सून म्हणून आल्यावर मात्र त्यांच्या तिच्या कडून खूप अपेक्षा होत्या.

निशाने स्वतःहून सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून घ्याव्या अशी त्यांची अपेक्षा होती.

त्यात विशालचे बाबा सुनीलरावांचा स्वभाव देखील खूप कडक शिस्तीचा होता.

सुनीलराव शहरात राहून देखील थोड्या जुन्या विचारांचे होते. 

निशाचा ड्रेसिंग सेन्स , 

सतत कामात बुडून असणे ,   

सकाळी बरेच वेळा शैलाताईंच्या नंतर उठणं ,

या सगळ्या गोष्टी सुनीलरावांना खटकत असत.

थोडक्यात सांगायचं तर ..

सुनीलराव आणि शैलाताई दोघांच्याही निशा कडून सून म्हणून खूप जास्त अपेक्षा होत्या.

निशा त्या सगळ्या पूर्ण करायचा प्रयत्न देखील करत होती.

पण हे सगळेच एकतर्फी सुरु होते.

दोघीही बाजूने सुसंवाद निर्माण झाला तरच हे शक्य होते.

निशा घर आणि ऑफिस दोघांचाही समतोल साधण्याचा प्रयत्न करत होती ,

परंतु गडबडीत तिच्याकडून चुका होत.

रात्री जास्त वेळ ऑफिसचे काम केले की मग झोपायला उशीर होत असे.

त्यामुळे सकाळी लवकर जाग आली नाही की स्वयंपाक , नाश्ता आणि घरातील इतर कामे अर्धवट राहत असत.

घरातील कामांचा लोड शैलाताईंवर आला की त्यांची चिडचिड होत असे.

आणि त्या सगळा राग विशालवर काढत.

निशा देखील घरी येऊन विशालला प्रश्न विचारत असे की आई तिला का समजुन घेत नाही.

शैलाताईंच्या बाजूने बोलले तर विशालला निशाच्या नाराजीला सामोरे जावे लागत असे.

आणि निशाच्या बाजूने बोलले तर शैलाताई उदास होऊन बसत.

इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच अवस्था झाली होती विशालची ...

एक दिवस निशाच्या ऑफिस मध्ये पार्टी होती.

पार्टी साठी ड्रेसकोड फिक्स होता.

ब्लू कलरची जीन्स आणि व्हाईट टीशर्ट.

निशा जीन्स घालून बाहेर पडली.

त्यावेळी सुनीलरावांनी तिला पाहिलं.

त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

त्यांनी लगेचच तिला विचारलं...

" हे सगळे काय आहे निशा ...? "

" काही नाही बाबा ...

आज कंपनीत पार्टी आहे सो... 

ड्रेस कोड आहे जीन्स आणि टॉप म्हणून घातला ..." निशा 

" तूला माहीत आहे ना ...

मला असले कपडे घातलेले आवडत नाही. " सुनीलराव 

निशाला वाटले सुनीलराव आपल्या बाबांसारखेच आहे ...

म्हणूनच लाडात येऊन ती म्हणाली ...

" हो बाबा , ....पण कधीतरी चालते ना ....

माझ्या बाबांना पण नाही आवडायचे जीन्स वगैरे घालायला ..

पण कधीतरी ते पण मान्य करायचे.

तसेच तुम्ही पण मान्य करा ना ....प्लीज बाबा .." निशा 

निशाचे उत्तर ऐकून सुनीलराव चिडले.

आणि अगदी जोरात ओरडले ...

" जे मला मान्य नाही. 

ते या घरात कधीच होणार नाही. " 

त्यांचा तो अवतार आणि अटीट्युड पाहून निशा खूप घाबरली.

तिला जागीच घाम फुटला.

घडलेला सगळा प्रकार विशालने देखील पाहिला.

त्याला बाबांचे वागणे आवडले नाही.

पण तो काहीच बोलू शकला नाही.

निशा त्या दिवशी ऑफिस पार्टीला गेलीच नाही.

त्यादिवशी रात्री निशा विशालजवळ खूप रडली.

तिला खूप मोठा धक्का बसला होता.

" माझे बाबा म्हणून मी थोडे लाडात बोलायला गेली विशाल ....

पण मला माहिती नव्हते बाबांना इतका राग येईल.

मी खूप प्रयत्न करतेय सगळेच सांभाळून घेण्याचा पण नेहमीप्रमाणे सगळेच उलट घडते.

म्हणूनच मी इतक्या लवकर लग्न करायचे नाही असे म्हणत होती. " निशा 

विशालने निशाची समजूत काढली.

थोडावेळात ती झोपी गेली.

विशाल मात्र घडलेल्या प्रकाराचा विचार करत बसला होता.

निशासाठी आता काहीतरी करावेच लागेल.

कारण शेवटी माझ्यावर विश्वास ठेवून ती या घरात आली आहे.

असा विचार विशालच्या मनात सुरु होता.

तो आठवडा निघून गेला.

पुन्हा निशाच्या ऑफिस मध्ये एक टीम पार्टी होती. 

पुन्हा एकदा ड्रेस कोड असल्यामुळे निशाने नकार दिला. 

विशालने मात्र तिला पार्टीला जाण्यास सांगितले.

त्याने तिला एक छानसे लॉंग जॅकेट आणले.

निशाने जीन्स टॉप आणि त्यावर लॉंग जॅकेट घातले. 

आणि घरातून बाहेर पडली. 

सुनीलरावांना मात्र ड्रेसकोड बाबतीत लक्षात  आले नाही.

निशाने पार्टी एन्जॉय केली.

त्या दिवशी तिचा मूड खूप छान होता.

घरातील छोट्या मोठ्या कुरबुरी मात्र संपत नव्हत्या.

शैलाताई आणि सुनीलराव दोघांच्याही निशाकडून असलेल्या अपेक्षा वाढत चालल्या होत्या.

खरं तर निशा त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न करत होती परंतु शैलाताई आणि सुनीलरावांची तिला साथ मिळत नव्हती.

आता मात्र काहीतरी करायला हवं असे विशालने ठरवलं.

त्याने आपल्या बहिणीची पूर्वाची मदत घेण्याचे ठरवलं.

त्याने पूर्वाच्या घरी जाऊन सगळी हकीकत तिला सांगितली.

पूर्वा खूप चांगल्या विचारांची मुलगी होती.

आपल्या आईबाबांच्या स्वभावाची देखील तिला चांगलीच कल्पना होती.

पूर्वा आणि विशालने मिळून आईबाबांची समजूत काढायची ठरवली.

निशाला यातले काहीच माहिती नव्हते.

नेहमीप्रमाणे निशा आणि विशाल सोबत ऑफिसला जाण्यासाठी निघाले.

निशाला कॅब मध्ये बसवून विशाल पुन्हा माघारी आला.

त्याने ऑफिसला सुट्टी टाकली.

पूर्वाला फोन केला.

थोड्याच वेळात विशालला घरी आलेले पाहून शैलाताई चिंतेत पडल्या.

" काय झालं विशाल ...? 

लगेचच कसा घरी परत आलास तू ...? 

तब्येत बरी नाही का ..? " 

तितक्याच पूर्वा देखील घरी आली.

शैलाताईंचे मात्र विशालला प्रश्न विचारणे बंद होत नव्हते.

" सांग ना ..विशाल ..

काही त्रास होतोय का ..? 

असा अचानक घरी कसा आलास ...

हे सगळेच निशामुळे झालेय.

वेळेवर जेवण नाश्ता काहीच मिळत नाही ना ...

त्यामुळे अशी तब्येत खराब होते.

एक जबाबदारी म्हणून नाही या मुलीला.." 

मागचा पुढचा कुठलाही विचार न करता शैलाताई निशावर आरोप लावून मोकळ्या झाल्या.

सुनीलराव देखील हे सगळेच ऐकत होते.

त्यांनी देखील शैलाताईंना सपोर्ट केला.

घडलेला सगळा प्रकार विशाल आणि पूर्वा पाहत होती. 

आता मात्र विशालला खूप राग आला.  

तरीही स्वतःवर ताबा ठेवत तो म्हणाला .. 

" आई  , मला काहीच झालं नाही.

मी आजारी पण नाही.

आणि आजारी असलो तरीही माझ्या आजारपणाशी निशाचा काहीच संबंध नाही.

तिने घ्यायला हवी तितकी काळजी ती आपल्या सगळ्यांचीच घेते आहे.

फक्त आपणच तिला समजुन घेण्यात कमी पडतोय. " 

"आईबाबा , मी तक्रार करत नाही ग ...

पण निशा या घरात सून म्हणून आली तेव्हापासून आपण सगळेच तिच्याकडून फक्त अपेक्षा करतोय 

पण तिला समजुन घेणे ..

तिला सगळ्या नवीन गोष्टी शिकताना सपोर्ट करणं हे सगळं आपण करतच नाही आहोत.   

आई , निशा अर्धवट स्वयंपाक करूनच निघून जाते असे तू म्हणतेस ..?

पण असेच जेव्हा पूर्वा काम करत असतेस तेव्हा तर तू लगेचच तिच्या मदतीला धावून जाते.

मग निशाच्या मात्र नाही 

असे का ...? 

कारण पूर्वा तुझी मुलगी आहे आणि निशा सून आहे म्हणून..." 

विशालचे बोलणे मधेच तोडत पूर्वा देखील बोलू लागली.

" हो आई , दादा बरोबर म्हणतोय ...

वहिनीला कोणत्याही गोष्टीत मदत करताना मी कधीच पाहिलं नाही तूला ...

ती देखील तुमची सेवा करण्याचा नेहमीच प्रयत्न करते. 

तीचे प्रयत्न अगदी खरे आहेत.

या घरात रुळण्यासाठी ती खरंच प्रयत्न करतेय पण तिला गरज आहे ती फक्त आपल्या सोबतीची ...

तिच्या जागी आम्ही दोघे जेव्हाही असतो तेव्हा इतक्या अपेक्षा तर आमच्याकडून कधीच करत नाहीत तुम्ही....? " 

आई , तूला नेहमीच वाटतं की वहिनी माझ्यासाठी काही करत नाही.

पण ती माझ्याघरी आली की मला सगळ्या कामात मदत करते.

मला नेहमीच म्हणते की पूर्वा तूला वेळ द्यावा , 

वेगळे वेगळे पदार्थ करून खाऊ घालावे.

असे नेहमी वाटते मला.

पण या ऑफिसमुळे खूप ओढाताण होते आणि हे सगळे शक्य होत नाही.

ती स्वतःला आणताना कोणतीच गोष्ट एकटीला आणत नाही.

नेहमीच मला देखील त्यातली वाटेकरू बनवते.

हे प्रेम आहे तेच खूप आहे.

अजून काय हवं असते आई ...

तिच्य डोळ्यात मला माझ्या बहिणीचे प्रतिबिंब दिसते. 

हीच खूप मोठी अचिव्हमेंट आहे ना.. आई ..! पूर्वा 

" आईबाबा , आम्ही तुम्हाला चूक नाही ठरवत आहोत. 

फक्त निशाला या घरात रुळण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे.

तिला शिकवलं तर ती नक्की शिकेल." 

हे सगळं बोलत असताना विशाल शैलाताई आणि सुनीलरावांच्या जवळ गेला.

त्यांचा हात हातात घेऊन म्हणाला ...

" आईबाबा  , हे सगळे मी निशासमोर बोललो असतो तर आपला मुलगा बायकोसमोर अपमान करतोय आपला ...

असा विचार आला असता तुमच्या मनात ..

पण माझा तुमचा अपमान करण्याचा कुठलाच हेतू नाही.

तो निशाचा हेतू देखील नाही.

पण जेव्हा आपण तिला समजुन घेऊ.

त्याचवेळी ती आपल्या सगळ्यांना आपलं माणूस मानेल.

तिचे सासूसासरे होण्याआधी एकदा तिचे आईबाबा होऊन पहा ..

आपल्या नात्यातले ऋणानुबंध जपण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायला हवेत ना  ..? " 

विशाल बोलत होता.

त्याची समजदारी पाहून शैलाताई आणि सुनीलरावांच्या डोळ्यात अश्रू उभे ठाकले होते.

त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती.

हे सगळे बोलणे झाल्यावर विशाल आणि पूर्वा निघून गेले.

सुनीलराव आणि शैलाताई मात्र घरी त्याच गोष्टीवर विचार करत होते.

त्यांना स्वतःच्याच वागण्याचा राग येत होता.

सायंकाळ झाली.

शैलाताई स्वयंपाकाला लागल्या.

त्यांनी सगळेच पदार्थ निशाच्या आवडीचे तयार केले.

छान डायनिंग टेबलवर सगळे पदार्थ मांडून ठेवले.

निशा घरी आली.

फ्रेश होऊन किचन मध्ये जाणार तितक्यात शैलाताई म्हणाल्या ...

" निशा  , सगळा स्वयंपाक तयार आहे.

सगळेच पदार्थ तुझ्या आवडीचे आहेत.

सगळे मी माझ्या स्वतःच्याच हाताने केले आहेत.

आणि आज सगळे पदार्थ तुझे बाबा तूला स्वतःच्या हाताने वाढणार आहेत."

शैलाताईंचे बोलणे ऐकून निशाच्या डोळ्यातून पाणी आले.

तिने त्यांना घट्ट मिठी मारली.

" थँक्यू सो मच ...आई ...." 

तिच्या मिठीतुन तिच्या आनंदाची तृप्तता शैलाताईंनी अनुभवली.

हा सगळा आनंदसोहळा दारात उभा असलेला विशाल पाहत होता.

त्याच्याही डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत होता.

त्याने घातलेली समजूत इंद्रधनुषी आनंद घेऊन त्याच्या आयुष्यात आली होती.

समाप्त!

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & Instagram 

✍©️ जया पाटील



 







Post a Comment

2 Comments

  1. मस्त...सुखद शेवट. समजून घेणे आणि बदल करणे आवडले.

    ReplyDelete
  2. Kharch sarv Jan as sunela mulgi mantil tar kiti chan hoil pan as nahi hot

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box