तुझ्यामुळेचं हे शहाणपण सुचलं ग सखी भाग १

 #तुझ्यामुळेचं_हे_शहाणपण_सुचलं_ग_सखी_भाग_१


©️ जया पाटील



" काय मग प्रतीक्षा , मज्जा आहे बुवा एका मुलीची...

अजून कॉलेजच्या शेवटच्या वर्षालाच आहे.

परीक्षा देखील व्हायच्या आहेत.

तेवढ्यातच वरसंशोधन करायला सुरुवात देखील केली तुझ्या बाबांनी ....

तुझ्या बाबांनी सुरुवात केली की तूच उतावीळ आहेस लग्न करायला.

बाय द वे..

कांदेपोह्यांचा कार्यक्रम पण झाला बहुतेक.

असं ऐकलं मी तर...

हमारे जासूस हर तरफ फैले हुए है...।

त्यामुळे तु नाही सांगितलं तरीही मला माहित पडणार होतेच.

कसे होते ग माझे होणारे जीजू...

एकदम हँडसम असतील ना...!

त्यांची होणारी बायकोच इतकी सुंदर आहे.

मग काय तूला पाहून तर एकदम लट्टू झाले असतील ते प्रतीक्षा तुझ्यावर.

तुझ्याघरापासून तर घर पण जवळ आहे म्हणे होणाऱ्या जीजूंचे ...

मग काय रोजच्या रोज आंखो देखी होईल.

दुरावा म्हणून नाही.

मज्जा आहे बुवा एका मुलीची...!

स्वाती तुझ्या घराशेजारी राहते म्हणून मला समजलं. 

नाही तर तु तर सांगितलंच नसतं मला..

मला तुझी प्रिय मैत्रिण म्हणतेस...

तुझ्यापासून मी काहीही लपवून ठेवत नाही ग साक्षी.

असं नेहमीच म्हणत असते ना तू मला ..

आणि तुझ्या आयुष्यातील इतक्या महत्वाची गोष्ट मला स्वातीकडून समजली.

यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल ग माझ्यासाठी.

सांग की ग प्रतीक्षा ...

इतकी लाजते का आहेस ..? 

जिजुंना तु पसंत आहेस. 

हे पण समजलं बरं का मला ...

स्वातीकडूनच ...

मी काही तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पळवून नेणार नव्हती.

इतके सगळं सीक्रेट ठेवलंस तु माझ्यापासून.."

प्रतीक्षाची सगळ्यात जवळची प्रिय मैत्रिण साक्षी तिला चिडवत होती.

" अगं माझ्यासाठीच हे सगळं अनपेक्षित होतं.

अजून कॉलेज लाईफच्या विश्वात आहे ग मी ..

लग्न , संसार या सगळ्या गोष्टींसाठी प्रिप्रेयर नाही ग मी अजून ..

मला संसार करणं जमेल की नाही. 

हाच मोठा प्रश्न पडला आहे माझ्यासमोर.

अगदी गोंधळून गेलीय मी स्वतःच.

आणि तू ही गोष्ट लपवली म्हणून किती छळत आहेस मला.

अश्या असतात का ग मैत्रिणी ..? 

मला खरंच सांगायचं होतं ग तूला.

पण मागचा पूर्ण आठवडा तू कॉलेजला आली नाहीस काकांच्या आजारपणा मुळे.

आधीच तू इतक्या टेन्शन मध्ये होतीस काकांच्या तब्येतीच्या चिंतेमुळे.

त्यात माझी भर नको.

म्हणून नाही सांगितलं तूला..

आणि तूच मला आता टोमणे मारून त्रास देतेय.

अशी आहे माझी प्रिय मैत्रिण ..."

प्रतीक्षा चिडून म्हणाली.

" सॉरी ग प्रतीक्षा ...

माफ कर मला ...

मी फक्त गंम्मत करत होते तुझी..

खरंतर तूला बघायला पाहूणे येताय हे ऐकून मी पण खूप गोंधळात पडली.

अजून तर आपलं शिक्षणही पूर्ण झालं नाही.

तुझ्याघरी लग्नाची इतकी घाई का सुरु आहे..? 

अजून दोन वर्ष जरी लग्न झालं नाही.

तरी काही फरक पडणार नाही.

तु या विषयावर तुझ्या बाबांसोबत बोलली की नाही.

या सगळ्याला खूप घाई होतेय असं सांग तुझ्या बाबांना समजावून... " 

प्रतिक्षाची मैत्रीण साक्षी प्रतीक्षाला समजावणीच्या सुरात म्हणाली.

" मी सांगितलं ग साक्षी ..बाबांना याबाबतीत ..

बाबांना पण माझी बाजू मान्य आहे.

पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ..

मुलगा सरकारी नोकरीत आहे.

बाबांचे मित्र सुभाषकाकांनी हे स्थळ आणलेय.

दोन कॉलनी सोडून घर आहे त्याचे.

आम्ही दोघी बहिणी.

प्रतीक देखील खूप लहान आहे.

त्यातल्या त्यात बाबांची साधारण नोकरी.

हे स्थळ हातातून गेले तर..

दुसरे स्थळ खूप जास्त पैश्यांची मागणी करणारे असले तर अवघड होईल.

प्रियाच्या पण लग्नाचं पाहावं लागेल त्यांना दोन- तीन वर्षात.

माझ्या लग्नाचा खर्च होऊन थोडा गॅप मिळाला तर प्रियासाठी पण सेविंग्स करता येतील त्यांना.

मुलाकडचे लोक देखील खूप ओपन माईंडेड आहेत.

त्यामुळे माझं लग्नानंतर पुढचं शिक्षण करणं.

आणि नोकरी करणं देखील त्यांना मान्य आहे.

लग्न लवकर होतं आहे हा एक मायनस पॉईंट असला तरीही ..

खूप सारे प्लस पॉईंट पण आहेत ग यात ...

म्हणूनच मी या लग्नाला होकार दिला.

मी बरोबर केले ना साक्षी ...? " 

प्रतीक्षा साक्षीला म्हणाली.

" हो ग ..प्रतीक्षा ..

बरोबर केलेस तु.

एक दोन वर्षात तर लग्न करावचं लागणार आहे.

फक्त इतके आहे की तुझ्यावर ही जबाबदारी थोडी आधीच येऊन पडतेय. 

पण सगळ्या गोष्टींचा चौफेर विचार करता तु जो निर्णय घेतला आहेस.

तो अगदी योग्य आहे.

सगळं काही उत्तम आहे.

त्यामुळे आता बोहल्यावर चढायला तयार हो..मॅडम ..

तुझ्यासाठी खूप आनंद होतोय.

पण माझी मैत्रीण लग्न करून माझ्यापासून दुरावणार या गोष्टीच वाईट देखील वाटतंय.

लग्न झाल्यावर पण माझी अशीच प्रिय मैत्रीण राहशील ना ग .... 

जीजू आल्यानंतर आपल्याला दुरावा तर येणार नाही ना... " 

साक्षी प्रतीक्षाला विचारत होती.

प्रतीक्षासोबत बोलताना साक्षीला गहिवरून आलं होतं.

तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

" नाही ग साक्षी ...

तू तर प्रत्येक सुखदु:खातली पार्टनर आहेस माझ्या ...

तुझ्याशिवाय तर माझं पान देखील हलणार नाही." 

प्रतीक्षा साक्षीला म्हणाली. 

त्यावेळी तिच्याही डोळ्यात पाणी आले.

ती रडू नये म्हणून साक्षीने जोरात गाणं गाण्यास सुरुवात केली.

" ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...

तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे....! " 

साक्षीच्या गाण्यामुळे प्रतीक्षा आनंदी झाली.

दोघीही मैत्रिणींनी एकमेकांना कडकडून मिठी मारली.

प्रतीक्षा सुनीलराव आणि स्मिता ताईंची जेष्ठ कन्या... 

प्रिया आणि प्रतीक अश्यादोन लहान भावंडांची  लाडकी ताई .... ! 

सुनीलरावांची लाडाची लेक.

प्रेमाने सुनीलराव तिला ' नक्षत्रा ' म्हणत असत.

प्रतीक्षा होतीही तशीच...

अगदी तिच्या नावाप्रमाणे 

नक्षत्रासारखी सुंदर , सुशील , सद्गुणी , देखणी , मनमिळाऊ  ..!

कोणालाही पहिल्यांदा पाहिल्यावर आवडेल अशीच ...! 

अगदी मनापासून मनात भरणारी ..... !

सुनीलराव एका कंपनीत काम करणारे साधारण  कर्मचारी .

खूप काही श्रीमंत नसले तरीही खाऊन - पिऊन सुखी असलेले कुटुंब.

काटकसरी बायको आणि तिघीही गुणी , संस्कारी मुले.

त्यामुळे त्यांचा संसार अगदी सुखात चालू होता. 

थोडक्यात सांगायचे तर आर्थिक श्रीमंती नसली ,

तरीदेखील खूप मोठी मनाची श्रीमंती असलेले हे सुनीलरावांचे एक समाधानी कुटुंब होते.

दिवसामागून दिवस सरत होते. 

प्रतीक्षा मोठी होत होती. 

प्रतीक्षा दिसायला जितकी देखणी होती तितकीच ती अभ्यासात देखील हुशार होती.

त्यामुळे प्रत्येक वर्षी उत्तम गुण मिळवून ती पास होत होती.

इतर वर्षांप्रमाणेच प्रतीक्षाने बारावीच्या परीक्षेत देखील खूप छान यश मिळवले. 

उत्तम गुण मिळवून तिने तिच्या महाविद्यालयातून सर्व प्रथम येण्याचा मान पटकावला. 

लेकीच्या या यशामुळे सुनीलरावांच्या आनंदाला पार उरला नाही. 

सुभाषराव आणि स्मिताताई दोघांचाही उर अभिमानाने भरून आला.

ते आनंदाने भरून पावले. 

सुनीलरावांची आर्थिक परिस्थिती साधारण असली तरीही त्यांनी प्रतीक्षाला इंजिनीरिंगला टाकले.

हा खर्च त्यांच्या डोईजड असला तरीही आपली मुलं हीच आपली संपत्ती.

असं समजुन ते सगळं निभावून नेत होते.

त्यांची मुलं देखील खरंच गुणी होती.

प्रतीक्षा , प्रिया आणि प्रतीक तिघांनाही आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव होती.

त्यामुळे शिक्षण करण्यासाठी कष्ट करण्याची जिद्द तिघीही मुलांकडे होती.

या सगळ्यात प्रतिक्षाला साठी देणारी अजून एक व्यक्ती म्हणजे साक्षी.

प्रतीक्षा आणि साक्षी बालपणीच्या प्रिय मैत्रिणी.

दोघांचीही अगदीच घट्ट मैत्री.

एकमेकांच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या वाईट क्षणात त्या एकमेकांच्या साक्षीदार होत्या.

प्रतीक्षा अभ्यासात हुशार असली तरीही माणसं ओळखण्यात मात्र अगदी झिरो.

कोणावरही पटकन विश्वास ठेवायचा.

त्याला मदत करायची.

कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता समोरच्याला मदत करायची हा प्रतीक्षाचा स्वभाव.

त्याउलट साक्षी..

माणसं ओळखण्यात अगदी चपखल ...

प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करूनच मग ती कुठलाही निर्णय घेत असे.

थोडक्यात सांगायचं तर पुस्तकी अभ्यासात प्रतीक्षा खूप हुशार असली तरी ..

आयुष्याच्या अनुभवाने शिकवणाऱ्या शाळेत मात्र साक्षीच अव्वल होती.

" प्रत्येकावर लगेच विश्वास नको ठेवत जाऊ ग प्रतीक्षा ...

थोडा मागचा पुढचा विचार करायचा जरा ...

प्रत्येक व्यक्तीला थोडं पारखून घ्यायचं.

समोरचा गोड बोलला की लगेचच त्याच्या बोलण्याला भुलून नाही जायचं.

तुझं आपलं हे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं बंद कर. " 

साक्षी नेहमीच प्रतीक्षाला समजावत असे.

" हो,साक्षी मॅडम ..

असं प्रत्येक गोष्टीत शंका घेणं योग्य नाही.

मला नाही जमत बुवा ..

प्रत्येक गोष्टीचा इतका खोलवर विचार करणं." प्रतीक्षा 

" अगं प्रतीक्षा , 

अश्याने फसवणूक होईल ग तुझी ... 

म्हणून काळजी वाटते ग तुझी..." साक्षी 

" अगं , तुझ्यासारखी मैत्रिण असताना काळजी करण्याची गरज आहे का मला ..? 

तू आहेस ना.. 

माझी प्रोटेक्टर ..

द साक्षी भाई .....! " 

प्रतीक्षा आणि साक्षी अशी दोघांचीही जुगलबंदी सुरु असे.

आज प्रतीक्षाचे लग्न ठरल्यामुळे मात्र त्यांच्या मैत्रीत दुरावा येणार होता हे मात्र नक्की होतं. 

सुनीलरावांच्या मित्राने राजीवचे स्थळ प्रतीक्षासाठी आणले. 

कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाल्यावर राजीवकडून प्रतीक्षाला होकार आला.

प्रतीक्षाने देखील लग्नाला होकार दर्शवला.

प्रतीक्षाच्या नवीन आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.

लग्न ठरल्यानंतरचे दिवस प्रत्येकाचे आयुष्य  मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे मोहवून टाकणारे असतात.

प्रतीक्षा आणि राजीव दोघांचेही आयुष्य अशाच क्षणांनी फुलले होते.

एकमेकांसोबत सतत फोनवर बोलणे ,

वीकएंडला एकमेकांसोबत वेळ घालवणे यात त्या दोघांचा वेळ कसा जात होता दोघांनाही समजत नव्हते. 

प्रतीक्षाने तर मनाने संपूर्णपणे राजीवला समर्पित केले होते. 

ती दोघांच्याही सुंदर भविष्याच्या स्वप्नांत रममाण होती.

प्रतीक्षा आणि राजीवचा साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला. 

त्यानंतर काही काळ लोटला.

दोघांच्याही घरी लग्नाची तयारी आणि घाईगडबड सुरु झाली. 

राजीव आणि प्रतीक्षाचे आईबाबा आपल्या मुलांचा विवाहसोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आतुर होते. 

खरेदी सुद्धा जोरात सुरु झाली होती. 

पैठण्या , घागरे , दागदागिने सगळ्यांची अगदी रेलचेल सुरु होती. 

प्रतीक्षाचे सगळे शॉपिंग अगदीच राजीवच्या आवडीनुसार सुरु होते. 

राजीवने देखील प्रतीक्षाला तिच्या आवडीच्या काही वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. 

राजीव सारखा इतका छान जोडीदार मिळाला ,

 जो मला समजून घेतो ,

माझ्या आवडीनिवडी इतक्या जीवापाड जपतो म्हणूनच प्रतीक्षा स्वतःला मनोमन खूप भाग्यवान समजत होती. 

तिला तिच्या स्वतःच्या सुखाचा हेवा वाटत होती.

प्रतीक्षाच्या इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाचे एक सेमिस्टर बाकी होतं.

साक्षी तिच्या मागे सतत तगादा लावत असे.

" मॅडम , राजीव मध्ये गुंग होणं जरा कमी करा.

आता काय राजीव सोबतचं राहायचं आहे आयुष्यभर.

राजीव आयुष्याचा होणारा जोडीदार आहे मान्य आहे मला..

पण त्याचबरोबर तुझं स्वतःचे असं अस्तित्व आहे. 

तुला स्वतःलाही घडवायचे आहे. 

हे लक्षात ठेव म्हणजे झालं.

कॉलेजचे शेवटचं सेमिस्टर आहे.

मग कॅम्पस इंटरव्हिव असणार आहे.

मला काहीच माहित नाही.

आपण दोघीही सिलेक्ट व्हायलाच हवं.

राजीवला तुझं आयुष्य किंवा अस्तित्व बनविण्यासाठी आधी तू स्वतःचं अस्तित्व निर्माण करशील.

असं प्रॉमिस केले आहे ना तू मला.

चल मग लाग अभ्यासाला. " 

राजीवच्या स्वप्नांमध्ये रमलेल्या प्रतीक्षाला पुन्हा मार्गाला लावण्याचे काम साक्षी करतचं होती.

कधीतरी प्रेमाने समजावून तर कधी रागाने...

साक्षी प्रतीक्षाचा अभ्यास पूर्ण करून घेत होती.

प्रतीक्षाला मात्र कधी कधी साक्षीच्या स्ट्रिक्ट होण्याचा राग येत असे.

.

.

.

.

.

साक्षीचे वागणं बरोबर होतं का ..?

प्रतीक्षा तिचे इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण करू शकेल का ..? 

राजीव सोबत प्रतीक्षाचे पुढचं आयुष्य कसे असेल ..? 

हे सगळं जाणून घेण्यासाठी उद्याचा अंतिम भाग वाचायला विसरू नका.

भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून 👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/08/blog-post_17.html

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & Instagram 

✍©️ जया पाटील 

Post a Comment

0 Comments