#तुझ्यामुळेचं_हे_शहाणपण_सुचलं_ग_सखी_भाग_२_अंतिम
©️ जया पाटील
भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंक वर 👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/08/blog-post_16.html
मागील भागात आपण पाहीले की,
प्रतीक्षा इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षात असतांनाच तिचे राजीवसोबत लग्न ठरलं.
खरंतर इतक्या लवकर लग्न करण्यासाठी प्रतीक्षा तयार नव्हती.
परंतु ती राजीवला भेटली आणि त्याच्या प्रेमातच पडली.
त्याच्यासोबतचा तिचा वेळ खूप छान जात होता.
हळूहळू ती त्याच्यात गुंतत गेली.
या सगळ्यात तिचे शेवटच्या वर्षाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते.
हे मात्र प्रतीक्षाच्या प्रिय मैत्रिणीला साक्षीला मात्र मान्य नव्हतं.
राजीव सोबतचं नातं जुळवण्यासोबतचं प्रतीक्षाने स्वतःची देखील एक ओळख बनवायला हवी.
तिने स्वतःच्या पायावर उभे रहायला हवं.
असा अट्टाहास होता साक्षीचा.
त्यामुळे साक्षी प्रतीक्षासोबत कधी कधी खूप जास्त स्ट्रिक्ट वागत असे.
प्रतीक्षाला पण याचा राग येत असे.
पण दोघींची खूप घट्ट मैत्री होती.
त्यामुळे हे रुसवेफुगवे चालूच असायचे.
आता पुढे...
.
.
प्रतीक्षाच्या लग्नाची तयारी जोरात सुरु झाली होती.
डेकोरेटर्स , दागदागिने , साड्या , कपडे , पैठण्या सगळ्यांची खरेदी झाली.
कॉलेजच्या सबमिशनची धावपळ आणि लग्नाची तयारी दोघंही एकाच वेळेस जमून आलं.
त्यामुळे प्रतीक्षाची चांगलीच ओढाताण होत होती.
एकदाचं सबमिशन झालं.
परीक्षेच्या अभ्यासासाठी प्रिपरेशन लिव्ह मिळाली.
त्याचदरम्यान लग्न आणि लग्नानंतर परीक्षा असल्यामुळे प्रतीक्षाला परीक्षा देणं जरा सोपं होणार होतं.
प्रतीक्षाचं पार्लर ,मेहंदी सगळं काही आटोपलं.
या सगळ्यात साक्षी स्वतःचा अभ्यास करून प्रतीक्षाला सोबत करतच होती.
त्याचबरोबर प्रतीक्षाला अभ्यास पूर्ण करण्याची देखील आठवण करून देत होती.
नोट्स काढून देणे , आधीच्या वर्षाचे FAQs काढून देणे अशी सगळी कामे साक्षीने करून दिल्यामुळे प्रतीक्षाला मदत झाली होती.
लग्नाची सगळी तयारी उत्तम झाली.
राजीवचं देखील प्रतीक्षासोबत फोनवर बोलणं सुरूच होतं.
भविष्याची स्वप्न पाहून प्रतीक्षा लाजून चूर होत होती.
राजीवच्या नावाची मेहंदी प्रतीक्षाच्या हातावर रेखाटली गेली.
" मेरी प्यारी बहनिया ..बनेगी दुल्हनिया.."
या गाण्यावर प्रिया आणि प्रतीकचा डान्स झाला.
संगीतसंध्या धामधुमीत पार पडली.
दुसऱ्यादिवशी हळदीचा कार्यक्रम होता.
राजीवला हळद लागली.
त्याची उष्टी हळद प्रतीक्षाला लागली.
अखेरीस लग्नाचा दिवस उजाडला.
प्रतीक्षाच्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत मोठा मंडप उभारण्यात आला होता.
राजीवचे घर दोन कॉलनी ओलांडून असल्यामुळे त्याच्याकडच्या पाहुणे मंडळीची व्यवस्था त्याच्याच आईबाबांनी केली होती.
लग्नाच्या मुहूर्तावरच त्यांचे आगमन होणार होते.
त्यामुळेच सुनीलरावांचा थोडा भार हलका झाला होता.
मंडपाच्या मधोमध एक छान स्टेज उभारण्यात आले होते.
स्टेजच्या चारी काॅर्नरला लखलखत्या पितळी हंड्यांच्या उतरंड्या लावल्या होत्या.
मंडपाची देखील छानशी सजावट करण्यात आली होती.
सनईच्या सुरांनी वातावरणात एक वेगळाच उत्साह होता.
रेडीश मरून कलरची भरजरी पैठणी,
जरीचे वर्क केलेले हिरव्या रंगाचे काठ,
संपूर्ण साडीवर असलेले बुट्टे ,
पदरावर मोरांची नक्षीदार डिजाईन ,
साडीला मॅचिंग जरी वर्कचा भरजरी शेला दोन्ही हातावर पसरलेला.
गळ्यातील चंद्रमणी ठुशी ,
लांब कोल्हापुरी साज ,
नाकात मोत्याची नथ ,
हातात मोत्यांचे तोडे ,
त्यात उठून दिसणारा हिरवा चुडा,
कानातली बुगडी ,
गुलाबीसर हातात एक नाजूक नक्षीची अंगठी ,
कपाळावर नाजूक चंद्रकोर टिकली ,
केसांच्या जुड्यावर चढवलेले गजरे....
पैठणीच्या या पेहरावात प्रतीक्षा अगदीच नक्षत्राप्रमाणे सुंदर दिसत होती.
हा सगळा सौंदर्यसाज प्रतीक्षावर खूपच शोभून दिसत होता.
मुळातच तो गोरा रंग आणि त्यावर चढलेला दागिन्यांचा साज.... !
विलक्षण सौंदर्य ते ...
नक्षत्रासारखे अनुपम ...
कोणालाही भुरळ पाडेल असे...!
राजीव देखील घोड्यावर बसून वाजत गाजत मंडपात आला.
नवऱ्यामुलीला स्टेजवर घेऊन या.
गुरुजींनी घोषणा केली.
नाजूक पावलांनी मंडपाकडे चालत येणाऱ्या प्रतीक्षाकडे पाहून राजीव तिच्यावर फिदा झाला.
मंगलअष्टकांच्या सुरांनी सगळा मंडप गजबजून गेला होता.
सप्तपदी पार पडली.
खूप जड अंत:करणाने सुनीलराव आणि स्मिताताईंनी प्रतीक्षाला निरोप दिला.
साक्षी आणि प्रतीक्षा एकमेकांना बिलगून खूप रडल्या.
प्रतीक्षाची पाठवणी झाली.
दुसऱ्या दिवशी देवदर्शन आणि सत्यनारायणाचा कार्यक्रम होता.
पण राजीवच्या गावाला कोणीतरी जवळचे काका वारले.
सुतक असल्यामुळे पुजा आणि देवदर्शन झालं नाही.
पहिल्या मुळाला प्रतीक्षा माहेरी आली.
त्यानंतर अवघ्या दहा दिवसात तिची परीक्षा होती.
त्यामुळे ती अभ्यासासाठी माहेरीच थांबली.
राजीवच्या आईबाबांनी देखील त्याची परवानगी दिली.
राजीव आणि प्रतीक्षाला एकमेकांना देण्यासाठी वेळच मिळाला नाही.
त्यांच्या मनोमिलनाचा सोहळा होऊच शकला नाही.
त्यांना एकरूप होण्याची संधीच मिळाली नाही.
लग्न आटोपल्यावर साक्षीने प्रतिक्षाला धारेवर धरलं.
तिच्याकडून खूप अभ्यास करवून घेतला.
प्रतीक्षाला सगळे पेपर छान गेले.
प्रॅक्टिकल परीक्षा देखील झाल्या.
त्यानंतर कॉलेज मध्ये एक कॅम्पस ड्राइव घेण्यात आला.
साक्षीने प्रतीक्षाला देखील इंटरव्हिव देण्यासाठी भाग पाडले.
दोघांचेही सिलेक्शन एकाच कंपनीमध्ये झाले.
तीन महिन्यानंतरची जॉइनिंग डेट मिळाली.
परीक्षा पार पडली.
प्रतीक्षा सासरी गेली.
देवदर्शन आणि सत्यनारायणाची पूजा पार पडली.
त्याच रात्री राजीव आणि प्रतीक्षा हनिमूनला जाण्यासाठी निघाले.
संपूर्ण रात्र प्रवासात निघून गेली.
प्रतीक्षा आणि राजीव हॉटेलवर थांबले.
राजीव फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेला.
त्याचवेळी त्याचा फोन पुन्हा पुन्हा वाजत होता.
प्रतीक्षा कोणाचा फोन म्हणून उचलणार तितक्याच फोन कट झाला.
लगेचच मेसेज ब्लिंक होऊ लागला.
कोणी तरी श्रेया नावाच्या मुलीचे मेसेजेस होते.
राजीव आणि तिचे सगळे मेसेज प्रतीक्षाने वाचले.
कोणत्याही नात्याला मर्यादा असतात पण त्या मर्यादा ओलांडून हे नातं पुढे गेलेय हे प्रतीक्षाच्या लक्षात आलं.
हे सगळे पाहून प्रतीक्षाला धक्का बसला.
राजीव बाथरूम मधून बाहेर आला.
" काय आहे हे राजीव ...?
कोण आहे ही श्रेया . .?
तुझं तिच्यावर प्रेम आहे असे मेसेजेस केले आहेत ना तु तिला ...
मग माझ्यासोबत प्रेमाचं नाटक का केलंस ..? "
हे सगळं बोलताना प्रतीक्षा हमसून हमसून रडत होती.
राजीव मात्र पुतळ्यासारखा उभा होता.
" हो , आहे माझं प्रेम श्रेयावर ...
पण आईबाबांना त्यांच्याच पसंतीची मुलगी सून म्हणून आणायची होती.
म्हणून मला हे सगळं करावे लागले.
त्यांना माझं श्रेयासोबतचे नातं मान्य नव्हतं.
म्हणून मला हे सगळं करावं लागलं.
आणि हो ..
तु माझं श्रेयासोबतचं नातं मान्य कर.
मी तुझ्यासोबतच्या नात्याला देखील न्याय देण्याचा प्रयत्न करेन. "
राजीव निर्लज्जपणे प्रतीक्षाला सांगत होता.
" का वागलास राजीव माझ्यासोबत असा ...?
फक्त तूझ्या आईबाबांचे मन मोडायचे नाही म्हणून माझं आयुष्य उध्वस्त केलंस तू ..
आणि वर निर्लज्जपणे तुझं आणि श्रेयाचे नातं मला मान्य करायला सांगतो आहे.
मी अशी परपुरुषासोबत संबंध ठेऊन तुझ्यासोबत राहिले तर घेशील मला घरात ..?
राहशील माझ्या सोबत ..? "
" तुम्ही पुरुष बायकांच्या चारित्र्याची चर्चा करता ना..
मग तुम्हीच पुन्हा तसेच वागता मग आम्हा बायकांना तुम्हाला याबाबतीत प्रश्न विचारता येतो का ?
नाही ना विचारता येत मग...
का असं वागलास तू ..? "
प्रतीक्षा आणि राजीवचा वाद वाढत गेला.
प्रतीक्षा तडक माहेरी निघून आली.
सुनीलरावांना आणि स्मिताताईंना सगळी हकीकत माहिती पडल्यावर खूप मोठा धक्का बसला.
कधीतरी आपल्या समोर काही चांगल्यावाईट घटना घडतात.
काही गोष्टी खूप आनंद आणि समाधान देतात.
कधीतरी मात्र दिसतं तसं काहीच नसतं.
आपण पाहतो तो भ्रम सुद्धा असू शकतो अश्याच काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात ,
आपल्याच जवळचा व्यक्ती आपल्या आयुष्यात असं काहीतरी वादळ निर्माण करतो की ,
तो बदल स्वीकारणे आपल्यासाठी अतिशय कठीण होऊन बसतं.
तसेच प्रतीक्षाच्या आयुष्यात देखील घडलं.
राजीवच्या अश्या फसवणुकीमुळे ,
त्याच्या आईबाबांच्या अतिअपेक्षेमुळे राजीवने एका मुलीचे आयुष्य खराब केले.
या सगळ्यामुळे प्रतीक्षाच्या कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसला.
पण खऱ्या अर्थाने मनाने खचली ती प्रतीक्षा ...
आपण ज्याच्यावर खूप मनापासून प्रेम केले ,
सुखी आयुष्य घालवण्याचं स्वप्नं पाहिलं.
त्या राजीवने तिला इतका मोठा धोका दिला हे तिला सहनच होत नव्हतं.
तिला या मानसिक धक्यातून बाहेर पडणे खूप कठीण होतं.
सुनीलरावांनी राजीव आणि त्याच्या आईबाबांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचं ठरवलं.
परंतु राजीवच्या आईबाबांनी सुनीलरावांच्या हातपाया पडून केस मागे घेण्याची विनंती केली.
एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेण्यात आला.
खरंतर यात राजीवच्या आईबाबांचा देखील राजीव इतकाच दोष होता.
त्यांच्या खोटी शान टिकविण्यासाठी त्यांनी राजीववर जबरदस्ती करणं खूप चुकीचं होतं.
सुनीलराव ,स्मिताताई ,प्रिया ,प्रतीक सगळेच प्रतीक्षाला या मानसिक धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत होते.
या सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र साक्षी तिचा मोठा आधार झाली.
साक्षीच्या प्रेमळ आधारामुळे प्रतीक्षा सावरली पण तिचा प्रेमावरचा विश्वास उडाला तो कायमचाच...!
साक्षीने प्रतीक्षाला नव्याने आयुष्य सुरु करण्याची प्रेरणा दिली.
" आयुष्य कोणासाठीच थांबत नसतं प्रतीक्षा ..
मला मान्य आहे...
तुझी खूप मोठी फसवणूक झाली आहे.
पण त्यातून सावरून तूला स्वतःच्या पायावर उभं रहायलाच हवं.
तू मला नेहमीच म्हणायची ना...
किती शंकिष्ट स्वभाव आहे तुझा ...
अग पण, या जगाच्या अनुभवाने खूप काही शिकवलं आहे मला...
तेच माझ्या मैत्रिणीच्या वाट्याला येऊ नये म्हणून धडपडत असायची मी ...
पण शेवटी नशिबापुढं कोणाचेच काही चालत नाही.
पण आता मात्र तू हरलेली मला आवडणार नाहीस.
तूला खंबीर व्हायलाच हवं प्रतीक्षा..."
साक्षीने तिला समजावले.
कॅम्पस इंटरव्हिव मध्ये सिलेक्शन झालं असल्यामुळे नोकरी शोधण्यासाठी प्रतीक्षाला फार धावपळ करावी लागली नाही.
साक्षी आणि प्रतीक्षा एकाच कंपनीत असल्यामुळे प्रतीक्षासाठी सगळं काही सोपं झालं.
प्रतीक्षा आणि साक्षीने नोकरीला सुरुवात केली.
प्रतीक्षाने पूर्णपणे स्वतःला त्यात गुंतवून घेतले.
साक्षी सोबतीला होतीच.
प्रतीक्षाच्या प्रत्येक संकटात ती तिच्या पाठीमागे उभी होती.
प्रतीक्षाने तिच्या गोड स्वभावाने आणि कामामुळे कंपनीत सगळ्यांचं मन जिंकून घेतलं .
ती वरवर खुश राहण्याचा प्रयत्न करत होती परंतु मनातून मात्र ती खूप दुखावलेली होती.
प्रतीक्षाच्या कामाचे तिच्या सगळ्या सहकार्यांना कौतुक होते.
त्यातच तिचा एक सहकारी होता स्वप्नील..
स्वप्नील देखील एकदम हँडसम , स्मार्ट आणि डॅशिंग मुलगा.
त्याच ऑफिस मध्ये तो एका चांगल्या पदावर काम करत होता.
स्वप्नीलच्या स्मार्टनेस वर ऑफिसमधल्या खूप मुली फिदा होत्या,
पण स्वप्नीलला मात्र प्रतीक्षाचा स्वभाव , तिचा साधेपणा मनापासून भावला.
स्वप्नील प्रतीक्षासोबत बोलण्याचा खूपच प्रयत्न करत असे ,
परंतु प्रतीक्षा प्रत्येक वेळेस त्याला टाळून निघुन जाई.
हे सगळं साक्षीच्या लक्षात आलं.
साक्षीने प्रतीक्षाला समजावलं...
" एक मुलगा तुझ्या आयुष्यात वाईट आला म्हणून प्रत्येक माणूस वाईट असेल.
प्रत्येक मुलगा वाईट असेल असं नाही.
मी नेहमीच तूला सांगते माणसं पारखून वागत जा ..
पण माणसांना टाळत जाऊ नकोस.
तुझी जशी फसवणूक झाली आहे राजीव कडून ..
तशी अनेक मुलांची देखील फसवणूक होते मुलींकडून ...
त्यामुळे फक्त बाह्यरुप पाहून आपण कोणाला जज नाही करू शकत.
तू लोकांसोबत बोलशील ,भेटशील तेव्हाच त्यांना ओळखू शकशील.
त्यामुळे स्वप्नीलला टाळू नकोस.
बोल त्याचाशी ..
भेट त्याला .. "
साक्षी प्रतीक्षाला समजावणीच्या सुरात म्हणाली.
साक्षीचे बोलणं प्रतीक्षाला पटलं.
साक्षीने स्वप्नीलला भेटून प्रतीक्षासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला.
स्वप्नीलला देखील खूप वाईट वाटलं.
हळूहळू प्रतीक्षा स्वप्नील सोबत बोलू लागली.
त्यातच त्यांची मैत्री वाढीस लागली.
एक दिवस स्वप्नीलने प्रतीक्षाला लग्नासाठी प्रपोज केलं.
प्रतीक्षाची राजीवसारखी तो फसवणूक करणार नाही असा विश्वास त्याने प्रतीक्षाला दिला.
प्रतीक्षाने स्वप्नीलला लग्नासाठी होकार दिला.
आपल्या मुलीचा मोडलेला संसार पुन्हा बसतो आहे म्हणून सुनीलराव आणि स्मिताताई देखील खुश झाल्या.
स्वप्नील आणि प्रतीक्षाचा विवाह अगदी साधेपणाने पार पडला.
दोघांचाही सुखाचा संसार सुरु झाला.
ते दोघेही खूप आनंदी होते.
प्रतीक्षाच्या या सुखाच्या वाटेत साक्षी खऱ्या अर्थाने तिची सोबती झाली होती.
साक्षी होती म्हणूनच आज मी खूप खुश आहे.
असं प्रतीक्षाचे म्हणणं होतं.
प्रतीक्षाच्या मनातील भावना फक्त हेच सांगत होत्या ...
तू होतीस सखी म्हणून माझ्या जीवनाला नवीन अर्थ मिळाला.
तू होतीस सखी म्हणून माझ्या आयुष्यात सुखाचे दिवस आले.
तुझ्या होतीस सखी म्हणूनच मला हे शहाणपण सुचलं .....
तू होतीस सखी म्हणूनच माझं आयुष्य सुंदर झालं....!
साक्षी आणि प्रतीक्षा दोघांच्याही मैत्रीची ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण...!
समाप्त !
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google & Instagram
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box