ऋणानुबंध... भाग 2
© सौ.सपनारवि
मागील भागात आपण पाहिलंय की नंदिनी ला बघायला पाहुणे आलेले.. पुढे..
आपण उगा इथे गॅलरीत उभे राहिलो.. आता नकोच जायला परत पाहुण्यापुढे.. असा विचार करत श्रुती माघारी वळली.. तेवढ्यात नंदिनीच्या आई लगबगीने वर आल्या..
''श्रुती बाळा नंदू कुठे आहे.. पाहुणे आलेत बघ.."नंदिनीकडे बघून म्हणाल्या " चल बाळ ..तुला बोलावताहेत.." नंदिनीच्या सांगण्यावरूनही श्रुती खाली गेली नाही..ती तिथेच थांबली.
खाली पाहुण्यांना चहा - पोहे देऊन झालेले.. अजून नंदिनी आणि मुलाने एकमेकांकडे एकदाही पाहिले नव्हते.. बैठकीमध्ये नंदिनी आणि बघायला आलेल्या मुलाशिवाय नंदिनी चे आई-बाबा, अभिदादा, दादू, आज्जी आणि पाहुणे मंडळी इतके जण बसलेले.. सगळे नवऱ्यामुलाकडे सारखे बघत होते.. आणि नंदिनी ची ही अशा प्रकारे चहा पोह्यांची पहिलीच बैठक म्हणून दोघेही अवघडून गेलेले.
हे लक्षात येऊन सुमती वहिनीने ओळख करून दिली.
"नंदिनी हा माझा लाडका देर क्षितिज.. आणि क्षितिज ही नंदिनी"..
तसे दोघांनी एकमेकांना पाहिले..
" तू..!!!"
"तुम्ही?????" दोघांच्याही तोंडातून एकाच वेळी हे उद्गार ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटले..
" क्षितिज तुम्ही ओळखता एकमेकांना??"
"हो.. म्हणजे नाही.." क्षितिजला नेमकं काय बोलावं कळत नव्हतं..
"छान आहे की मग ! आता फारशी ओळख करून द्यायला नको.." वहिनी म्हणाल्या...
नंदिनीच्या आई बाबांना पण आनंद झाला की पाहुणे अगदीच अनोळखी नाहीत.. पण नंदिनी अस्वस्थ पणे हातांच्या बोटांशी चाळा करत होती.. आज्जीच्या लक्षात आलं..
"नंदू बाळा" आज्जीने बोलताच... " आज्जी मी हे लग्न नाही करू शकत" नंदिनी एका श्वासात बोलून गेली..
" नंदू.. काय बोलत आहेस?? बाबांचा करारी आवाजाने शांतता भंग पावली.. तशी ही पहिलीच बैठक. इतक्यात काही ठरत नव्हते शिवाय नंदिनीच्या होकाराशिवाय बाबा काही निर्णय पण घेणार नाही.. अशावेळी बैठकीत नंदिनीचं असं काही बोलणं कुणाला अपेक्षित नव्हते..
"मी पण नाही करू शकत हे लग्न "क्षितिज च्या बोलण्याने वहिनी पण विचारात पडल्या.
" क्षितिज.. बाळा काही मिसअंडरस्टॅनडिंग आहे का?? असेल तर स्पष्टपणे सांगा.. आपण काही मार्ग काढू.."
क्षितिज अजूनही नंदिनी कडेच सूचक बघत होता.. जणू विचारत होता की तू सांगतेस की मी सांगू??
नंदिनी ने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि डोळ्यानेच होकार भरला.. सगळ्यांच्या गोंधळलेल्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव..
नंदिनी ने एकदा डोळे गच्च मिटून दीर्घ श्वास घेतला क्षणभरासाठी आणि मग सांगायला सुरुवात केली..
"आई बाबा तुम्हाला आठवतंय मी बारावी नंतर पॉलीटेकनिक साठी नांदेड ला ऍडमिशन घेतली होती..तेंव्हा..
" हो.. पण फर्स्ट सेमिस्टर नंतर तू परत कॉलेजमध्ये गेलीच नाहीस.. पूर्ण वर्ष वाया घालवलस. मग पुढे काकांकडे पुण्याला गेलीस.."
"हो अगं.. तुझं अगदी बरोबर आहे.. तुम्ही सगळ्यांनी कितीदा विचारलं पण मी सांगितले नाही.."
"तो माझ्या आयुष्यातील काळा दिवस मी कधीच विसरू शकत नाही.. त्या दिवशी अभिदादाला नांदेड ला काही काम होतं म्हणून मी त्याच्या सोबत गेले होते.. मला रश्मी कडे काही काम होतं.. "
दादा मला तिच्या घरी सोडून संध्याकाळ पर्यंत परत घ्यायला येणार होता.. माझ्या काही महत्वाच्या नोट्स ज्या रश्मीकडे होत्या त्या अनघा ने नेलेल्या.. आम्ही दोघी अनघाकडे जायला निघालो तर नेमकं रश्मीकडे पाहुणे आलेले..म्हणून मी एकटीच तिची गाडी घेऊन गेले..
मी अनघाकडे यापूर्वी कधी गेले नव्हते.. पण तिचा पत्ता मला माहित होता.. अनघाचे घर मेन वस्तीपासून जरा लांब होतं.. ते एक नव्याने पडलेलं ले-आऊट.. असंही शहराच्या त्या भागात शाळा, कॉलेजेस अधिक.. त्यामानाने घरं कमी..
जी घरं होती ती बंगलो टाईप.. मोठमोठाल्या कंपाउंड वॉल.. वर्दळ कमीच.. सलग सुट्टयामुळे शाळा-कॉलेज बंद होते.. बरंच दूर गेल्यानंतर मला रस्ता चुकल्या सारखं वाटले..
मी परत फिरणार एवढ्यात च माझी गाडी बंद पडली.. नेमका मोबाईल ला नेटवर्क पण येत नव्हतं.. मी गाडी रस्त्याच्या कडेला लॉक करून काही मदत मिळते का ते बघायला पायी चालत समोर आले..
आडरस्त्याला मला एक अँम्बुलन्स उभी दिसली..काही मदत मिळते का बघायला मी त्याच्या जवळ गेले आणि... आणि.."
एवढं बोलून ती ओक्साबोक्शी रडायला लागली...
सगळे स्तब्ध होते.. क्षितिज आपल्या जागेवरून उठून कधी नंदिनीच्या बाजूला सोफावर जाऊन बसला ते कुणाच्या लक्षात पण आलं नाही.. त्याने टी-पाय वरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि तिच्या हातात दिला..
एक हात तिच्या पाठीवर फिरवीत जणू तिला धीर देत होता.. त्याची ही कृती बघून क्षणभर नंदिनी चा अभिदादा च बाजूला बसलाय असं च तिच्या घरच्यांना वाटलं..
नंदिनी शांत झाली मात्र तिचा आवाज थिजून गेला.. अँम्बुलन्स जवळ जाताच मला काही तरी विचित्र वाटलं.. राकट चेहऱ्याची ती दोन माणसं कुठूनही मेडिकल स्टाफ वाटत नव्हती.. मी त्यांना पेट्रोल पंप आहे का जवळ??माझी गाडी बंद पडली असं सांगितलं..
ते आपल्या भागातील नव्हते कदाचित.. त्यांना माझं बोलणं नीट कळलं नाही.. त्यातील पहिल्या माणसाने लांब हात करून रस्त्याकडे बोट दाखवले..
मी त्या दिशेने बघतच होते तर दुसऱ्या माणसाने मागून येऊन मला एका हाताने गच्च पकडून ठेवलं आणि दुसऱ्या हाताने माझं तोंड दाबलं.. हे सगळं इतक्या लवकर आणि अनपेक्षित पणे झालं की मला काही कळलंच नाही ..
मी खूप घाबरले.. हातपाय झाडायचा प्रयत्न करत होते.. पण मी हलू शकत नव्हते आणि ओरडूही शकत नव्हते...
तेवढ्यात विरुद्ध दिशेने गाडीचा आवाज आला.. मला थोडा धीर आला.. मी त्या दिशेने पहात होते तर त्या दोघांनी मला अक्षरशः उचलून आत गाडीत टाकलं.. आणि दार बंद केले..
आमच्या गाडीच्या जवळून एक मोटारसायकल धडधडत निघून गेली.. माझ्या हातापायातील त्राणच नाहीसे झाले.. माझ्या समोर आता काय वाढून ठेवलं आहे याची मला जाणीव झाली होती.. माझ्या डोळ्यासमोर अभिदादा येत होता..
जो जाताना मला सांगून गेला की पिलू मी येई पर्यंत घरीच थांब.. माझा दादा जो मला जराही कुणावर विसंबून देत नाही .. आज मी त्याच्या माघारी इकडे आले नि फसले..
मी सारख्या देवाच्या धावा करीत होते एवढ्यात परत मोटरसायकलचा आवाज आला.. ती मोटारसायकल आमच्या अँम्बुलन्स जवळ थांबली..मी अँम्बुलन्स च्या दाराला आतून पूर्ण ताकदीने लात मारली..
तितक्यात त्या गाडीवरून दोघे तरुण उतरले.. गाडीतल्या एका माणसाने विरुद्ध दिशेचे दार उघडले आणि बाहेर गेला..बाहेर काय झाले माहीत नाही.. पण आतील माणसाची माझ्यावरची पकड ढिली झाली.. आणि मी पूर्ण ताकदीने त्याला लोटून बाहेर धडपडले..
मला बाहेर दादा माझा अभिदादा दिसला.. मी पळतच त्याच्याजवळ गेले.. आणि कोसळले.. जेंव्हा मला शुद्ध आलेली तेंव्हा क्षितिज दादा जवळ होते.."
"ओह माय गॉड... नंदू.. " श्रुती..
ती कधीची खाली येऊन आईच्या बाजूला उभी राहिली होती.. घरचे हे सगळं ऐकून सुन्न झालेले..त्यांना काय रिऍक्ट व्हावं कळत नव्हतं...
" मी आणि माझा मित्र जो बी एस एफ मध्ये आहे.. आम्ही काही कामानिमित्त त्या भागात आलेलो.. थोड्या वेळा पूर्वी च आम्ही तिथून पास झालो तेव्हाच माझ्या मित्राला काही शंका आली कारण ती अँम्बुलन्स महाराष्ट्र पासिंग नव्हती.. पण आम्ही दुर्लक्ष केलं..
मात्र थोडं दूर गेल्यानंतर आम्हाला काहीतरी गडबड वाटली आणि आम्ही परत फिरलो.. आणि केवढा मोठा अनर्थ टळला..
आम्हा दोघांना पाहून त्यांनी पळ काढला..नंदिनी बेशुद्ध झाली होती .. ती मला सारखी दादा दादा म्हणत होती..थोड्या वेळात ती शुद्धीवर आली.. मग तिने झालेला सगळा प्रसंग आम्हाला सांगितला.. आम्ही तिला घरी सोडणार होतो पण ती रडायला लागली...
कितीही समजावून सांगून ती ऐकत नव्हती... शेवटी आम्ही तिला तिच्या मैत्रीणच्या घराच्या अलीकडेच सोडलं.. परत आम्ही कधी भेटलो नाही .. पाच वर्षांनी हा योग आज आला.."
"आई.. बाबा.. त्या दिवशी जर क्षितिज नसते तर आज मी तुम्हाला दिसले नसते.. मी त्यांना अनावधानाने दादा म्हटले पण ते मला अभिदादा पेक्षा कमी नाही..
त्यांच्याशी लग्नाचा मी विचारही करु शकत नाही.. " नंदिनीच्या बोलण्याने सगळ्यांना तिच्या नकाराचे कारण कळले..
"पण तुम्हाला मुलगी तर याच घरची करावी लागेल.." आज्जी.. "क्षितिज राव आमची श्रुती चालेल का तुम्हाला बायको म्हणून?? " आज्जीच्या विचारताच क्षितिज च्या तोंडून इतक्या लवकर "हो..' आलं की सगळे हसायला लागले..
एवढ्या गंभीर वातावरणातही श्रेया आणि क्षितिज च्या नजरेचा लपंडाव आज्जीच्या अनुभवी नजरेतून सुटला नाही..
" आणि तुला ग श्रुती.. " वहिनीने आपलं बोलणं पूर्ण करण्याआधीच श्रुती लाजून वर पळाली..
खरच ऋणानुबंधाच्या गाठी वर देवाघरीच पडतात हे मात्र अगदी खरं आहे.
समाप्त....
कथा कशी वाटली नक्की कळवा..
तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे..
शुद्धलेखनाच्या चुकांसाठी 🙏🙏.
©✍ सौ.सपना इंद्रवार (यवतमाळ)
कथेमध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत सर्वस्वी लेखकांचे आहेत.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box