दुर्दैव



दुर्दैव 

©️®️सुजाता घुगे 

"ए, सुधी चल ना गं लवकर. 

आवरतच नाही तुझं रोजच. 

शाळेला रोज उशीर होतो, 

मग छड्यांचा मार खावा लागतो."जानवी

 "हो आले , आले... 

घरातली काम आवरता आवरता होतो उशीर. 

चल आता लवकर लवकर."सुधा  

सुधा आणि जानवी बालपणापासूनच्या मैत्रिणी.

घरही शेजारी शेजारी.  

जानवी तर नेहमी सुधाच्या घरी असायची. 

बोरं चिंचा तोडायला, 

वड्यावर कपडे धुवायला, 

जिथे जातील तिथे दोघी सोबतच असायच्या.  

दोघी मैत्रिणी कमी आणि बहिणी जास्त वाटत.

पण दोघींच्या  रंगरूपात खूप फरक होता.

जानवी सडपातळ, नाकी-डोळी सरस पण रंग सावळा. 

सुधा तिच्या एकदम उलट.

अंगकाठीने जाडजूड, रंग गोरा, आणि नाक थोडं चापट. 

जानवीच्या घरची परिस्थिती थोडी बरी होती.  

सुधाच्या घरची परिस्थिती खूपच हालाखीची.

दोघी रोजचं सोबत शाळेत जात असत.  

नववी पर्यंत शाळेत गेल्या. 

शाळेतल्या कोण्या एका पोरीने लफड केलं.  

आणि शाळा या दोघींची बंद झाली.

 घरकामात मदत करू लागल्या.  

वर्षा दोन वर्षानंतर नात्यातील एका मुलासोबत जानवी चा लग्न झालं.
       

आता सुधाच्या घरच्यांना तिच्या लग्नाची काळजी लागून राहिली.  

अंग काठीने जाडजूड त्यामुळे लग्नात बरीच विघ्न येत होती. 

त्यात लोकांचे टोमणे ही सुधाच्या मनात घाव करून जात होते.  

बरीच स्थळं येत होती पण तिच्या जाडजुड पणामुळे तिला सतत नकार भेटत होता. 

असंच एक स्थळ सांगून आलं.  

मनोज नाव होतं त्या मुलाचं. 

त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली होती. 

त्यांनी सुधाला पसंती दर्शवली.  

तिच्या घरच्यांना तर अगोदरच तिच्या लग्नाची घाई झाली होती.

छोटेखानी कार्यक्रमात लग्न लावून दिलं.

 दुसरी बायको म्हणून का असेना मनोज तिची बरीच काळजी घ्यायचा.
        
काही दिवसानंतर सुधाला दिवस गेले.  

दोघांनाही खूप आनंद झाला होता. 

त्यांना एक मुलगा झाला.

 दोघांचाही सुखी संसार चालू होता.

 हळूहळू मुलगा मोठा होत होता. 

त्याचे बोबडे बोल ऐकून दोघांचाही आनंद गगनात मावत नसे.

मुलगा आता दीड वर्षाचा झाला.        

पण म्हणतात ना कधी कधी आपल्याच सुखाला आपलीच नजर लागते.  

सुधाच्या ही बाबतीत तसंच झालं. 

एके दिवशी मनोजला यायला उशीर झाला.  

बरीच रात्र झाली तरी मनोज घरी परत आला नाही.

सुधाच्या मनात  वेगळीच हुरहूरचालू होती.  

बरीच रात्र होऊनही मनोज घरी परतला नाही. 

म्हणून घरच्या लोकांनी त्याचा शोध सुरू केला.  

त्याच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर शोध घेतला. 

पण नियतीने डाव साधला होता.  

घरी परतत असताना रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक मनोजला दिसला नाही.  

आणि तो त्या ट्रक ला जाऊन धडकला.

 
धडक एवढी जोरात होती की तो खूप दूरवर उडाला 

आणि त्यांनी जागीच प्राण सोडले.  

त्याचा मृतदेह घरी आणला.

सुधाला याची काहीच कल्पना नव्हती. 

ती तर जेवणासाठी नवऱ्याची वाट बघत होती.

तिचे छोटे बाळ ही पप्पा पप्पा म्हणून हा आवाज देत होता. 

नवऱ्याचं पार्थिव शरीर पाहून तीही स्तब्ध झाली.

आणि भोवळ येऊन खाली पडली.  

आताच कुठे सुखाने तिच्या आयुष्यात यायला सुरुवात केली होती. 

पण आता सर्व संपलं होतं. 

थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली.  

तीन फोडलेला हंबरडा ऐकून तिथल्या लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं . 

तिच्या बाळाला तर काहीच कळत नव्हतं.  

तो पप्पा उठा ना, पप्पा उठा ना, म्हणून रडत होता. 

त्या इवल्याशा जिवाला काय कळणार त्याचा पप्पा आता कधीच  उठणार नव्हता.
    
सुधा सर्व देहभान विसरली होती. 

नंतर मग हळूहळू सावरत होती. 

पण तिला अजूनही विश्वासच बसत नव्हता की आपला नवरा आपल्या सोबत नाही.

तिचं बाळ हे पप्पा पप्पा म्हणून आवाज द देई तेव्हा तीही लगबगीने दरवाजात येऊन पाही. 

पण आता काहीच उपयोग नव्हता.  

हळूहळू तिने सत्य स्वीकारलं आणि आपल्या मुलासाठी जगायचं ठरवलं. 

घरच्यांनी तिच्या सुखासाठी तिच्यापुढे दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव मांडला.

 पण तिच्या मनात फक्त आणि फक्त मनोज लाच नवरा म्हणून स्थान होतं.

 म्हणून तिने आता फक्त आणि फक्त आपल्या मुलासाठी जगायचं ठरवलं.

आपल्या मुलाला आई आणि वडील  दोघांचेही प्रेम देण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. 

हळू हळू ती आता सावरली.  

आणि पुन्हा एकदा जगण्याच्या लढाईशी दोन हात करण्यास सज्ज झाली. 
   
 घरच्या लोकांच्या मदतीने तिने पोलीस स्टेशनमध्ये त्या ट्रक मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली.  

पोलिसांनी ट्रक चालकाचा कसून शोध घेतला. 

कारण अपघात त्याच्या घटनेनंतर तो फरार झाला होता.  

पोलिसांनी ट्रक चा नंबर वरून वक मालकाचा शोध घेतला. 

आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला.  

कायदेशीर कारवाई सुरू झाली. 

कोर्टामध्ये केस दाखल झाली. 

सुधा लाही कोर्टामध्ये हजर राहण्याची नोटीस पाठवली गेली.  

कधी आयुष्यातही पोलीस स्टेशन किंवा कोर्टाची पायरी न चढलेली सुधा थोडी घाबरली होती. 

पोलीस ,कोर्ट कचेरी, न्यायालय ,गुन्हेगार, ह्या गोष्टी तिने फक्त चित्रपटातच पाहिल्या होत्या.
       
शेवटी कोर्टाच्या तारखेचा दिवस उजाडला.  

सुधाच्या मनात धाकधूक चालू होती. 

पण तिच्या घरच्या लोकांनी तिला धीर दिला.  

आणि ती आपल्या बाळाला घेऊन कोर्टात दाखल झाली. 

आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असलेला ट्रक मालकाकडे कडे बघून तिच्या पायाची आग मस्तकात गेली.  

कारण त्या माणसाच्या निष्काळजीपणामुळे तिचं कुंकू हिरावलं गेलं होतं. 

तिचं अख्ख आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं.  

बाप म्हणजे काय असतो हे कळायच्या अगोदरच तिचे मूल बापाच्या प्रेमाला पोरक झाले  होत. 

त्या ट्रक मालकाचा नरडीचा घोट घ्यावा असं तिच्या मनात येऊन गेलं.
     
पुढे एक दोन वर्ष कोर्टाच्या तारखांमध्ये गेलं. 

आणि एक दिवस कोर्टाच्या निकालाचा दिवस उजाडला.  

सुधाच्या मनात 'काय निकाल लागेल'याच भिती होती. 

कोर्टाची सुनावणी सुरु झाली. 

न्यायाधीशांनी सगळे पुरावे, 

पोलिसांनी केलेला पंचनामा, 

याच्यावरून निकाल दिला.

 ट्रक मालकाने रस्त्याच्या कडेला उभे केलेल्या ट्रकला रेडियम चा मुलामा दिलेला नव्हता. 

त्यामुळे समोरून मोटर सायकल वर येणाऱ्या मनोजला अंधारात तो ट्रक दिसला नाही 

आणि तो त्याच्या वर जाऊन धडकला 

आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

ट्रक मालकाला दहा वर्षाची शिक्षा सुनावली गेली. 

आणि सुधा आणि तिच्या मुलाच्या भविष्याचा विचार करून ,

ट्रक मालकांनी सुधाला वीस लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावी, असा निकाल कोर्टाने दिला.
     
सुधाला नुकसान भरपाई मिळाली परंतु तिचं नुकसान पैशांनी भरून निघणार नक्कीच नाही.

 ते पैसे तिने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवले 

आणि आपला उदरनिर्वाहासाठी तिने नोकरी करायची ठरवले. 

एका ओळखीच्या कापड दुकानदाराने तिला नोकरीवर ठेवलं.  

आता ती एक चांगले आयुष्य जगत आहे. 

पण तिच्या आयुष्यातला खरं सुख तिला पुन्हा मिळेल की नाही हे देव जाणे....

सुधाने वरून ती आनंदी असल्याचे किती जरी दाखवला असला तरी एका जोडीदाराची साथ म्हणजे जगण्याचा आधार असतो. 

हसतमुखाने वावरणारी सुधा आपले दुःख लपवण्याचा प्रयत्न करत असते. 

देव करो आणि तीच सुख तिला परत मिळो....

 ©️®️सुजाता घुगे 

दुर्दैव .... ही कथा लेखिका सुजाता घुगे यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.

धन्यवाद..

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


 Velvet Kavisha





Post a Comment

0 Comments