दुनिया जैसी दिखती है वैसी नहीं हैं....
©️®️उत्कर्षा नलावड़े
काही वर्षांपूर्वी मी एका वित्तसंस्थतेत काम करत होती,
जिथे पैसा असतो तिथे माणसांच्या स्वभावाचे खूप वेगवेगळे नमुने रोज नवीन नवीन स्वरूपात पाहायला मिळतात.
माझ्या ह्या प्रवासात खूप प्रकारचे अनुभव मिळाले,
ज्यातून माणूस ओळखायला लागले असे मला वाटते,
खरं का ते माहित नाही.
त्यावेळी मी ऍडमिन्सट्रेशन हेड होते,
ट्रक टेम्पो फिनान्सचे ऑफिस असल्याने कस्टमर्स जास्त करून गरीब किंवा काही होऊ घातलेले श्रीमंत असे होते,
पण साधारण राहणीमान एकसारखेच.
वाहतूक धंदा असल्याने अमराठी कस्टमर्स तुलनेने जास्त होते.
काही खूप वक्तशीर अगदी वेळेवर हफ्ता भरणारे सरळ माणसे,
काही मेटाकुटीला येऊन कर्जफेड करताना दमलेले तरी आपल्यापरीने प्रामाणिक प्रयन्त करणारे
आणि सर्वात हुशार गट म्हणजे हफ्ता न भरता राजरोस फिरणारे.
आमच्या ऑफिस मधील ज्या लोकांचा कस्टमर्सही जास्त संबंध यायचा ते फील्डवर्क वाले,
ते त्यांचे अनुभव सांगायचे तेव्हा कळायचे कि बहुतांशी कर्ज चुकवेगिरी करणारे दिसायला खूप साधे सरळ असतात
व त्यांच्याकडे आपण विचार करू शकत नाही अशी कारणे असतात,
थोडक्यात ते सर्वाना सरसकट वाईट ठरवत असत,
जे मला स्वतःला फार पटायचे नाही अतिशोयक्ती वाटायची.
मला सर्वच डिपार्टमेंट मध्ये लक्ष घालावे लागायचे,
पण खूप मजा यायची काम पूर्ण झाले कि ते समाधान खूप दिवस पुरायचे खुश राहण्यासाठी,
तेव्हा वैयक्तिक जीवनातले त्रास पण कामावरील यशाने झाकले जायचे.
प्रत्येक समस्या सोडवली कि जग जिंकल्यासारखे वाटायचं,
आणि तशीच माझी कीर्ती आणि नाव सगळीकडे झाले होत कि,
मॅडम सगळे प्रॉब्लेम सोडवून देतात.
त्यामुळे माझ्या अधिकारात नसलेले काम घेऊनहि लोक यायचे,
मुळातच लोकांना मदत करायचा स्वभाव व एखाद्याची अडचण सोडवायची इच्छा,
त्यामुळे जमेल तशी मदत मी करायचे आणि कित्येकदा स्वतःच काम वाढवून घ्यायचे.
आता आठवले कि हसू येते.
अशातच एकदा साठीचे वयस्क गृहस्थ त्यांचे प्रॉब्लेम घेऊन आले.
त्यांचा ट्रकचा अपघात झाला होता त्यामुळे त्यांचे हप्ते रखडले होते
आणि त्यात त्यांचा मुलीचे लग्नही जवळ आले होते,
अगदी हतलब परिस्थिती कथन केली त्यांनी मला.
दीनवाणा चेहरा आणि त्यांचं वय पाहता कोणालाही पटकन दया वाटली असती,
आपल्या वयाचा वास्ता आणि मी त्याचा मुलीसम असल्याचे वारंवार नमूद करत सगळे प्रॉब्लेम सांगितले.
त्यानुसार त्या गृहस्थांना त्यांच्या अपघातग्रस्त गाडीच्या विम्याचे पैसे खूप तगादा लावून सुद्धा मिळत नव्हते,
जे त्यांना कर्ज परतीसाठी व मुलीच्या लग्नासाठी अत्यंत निकडीचे होते.
त्यांच्या ट्रकचा अपघात व त्यामुळे आलेले आर्थिक संकट,
हे त्यांच्या थकीत हफ्त्या मागील मुख्य कारण आणि मुलीच्या लग्नातील मोठा अडथळा असल्याचे सांगितले,
आणि माझ्याविषयी कोणाकडून तरी चांगले ऐकले असल्याने त्यांना खात्री होती कि माझी मदत झाली तर त्यांचे सर्व प्रॉब्लेम दूर होतील,
असे त्यांनी अक्षरशः विनवले.
माझे खूप उपकार होतील,
आयुष्यभर माझे उपकार विसरणार नाही असा काहीबाही बोलणे चालू होते.
मुळातच बायका कुठच्याही पोस्टवर असल्या,
कितीही पगार घेत असतील तरी अनेकदा लवकर पाझर फुटतो त्यांना.
त्यात लग्न झालेलं असल्याने मला प्रत्येक वयस्क स्त्री पुरुषांमध्ये आई बाबा दिसायचे,
त्यामुळे त्यांना नाही म्हणणे खूप कठीण वाटले मला.
काम अशक्य नसले तरी खूप जिकिरीचे आणि वेळखाऊ होते,
पाठपुरावा करणे कागदपत्र जमा करणे वैगरे आणि हे सगळे झाले तरी योग्य रक्कम मिळेल याची शाश्वती नसतेच.
माझ्याकडे असलेल्या जबाबदारी व कामाचा ढीग पाहता हे जमवून आणणे खरतर अजिबात शक्य नव्हत,
पण तरीहि मी कामाला लागले अगदी जोरात.
या निम्मिताने खूप वेळा त्यांच्याशी बोलणे व्हायचे,
न चुकता ते फोन करून माहिती घ्यायचे,
असे चालू होते ,
त्यावेळी जेव्हा जेव्हा ते ऑफिस मध्ये यायचे,
तेव्हा तेव्हा माझ्या जवळ बसून त्यांची परिस्थिती किती बिकट होता चालली आहे याच वर्णन करायचे.
माझी त्या काकांचं काम लवकर होऊन जाऊ दे ,
ह्यासाठीची तळमळ पाहून माझे सहकारी,
आणि मुख्यत्वे माझा बॉस जो माझा आधीपासून मित्र होता माझी मस्करी करायचे.
एवढे काम करू नको काही उपयोग नसतो असा चिडवायचा.
एकदा मी ऑफिस वेळेनंतर थांबून पण त्यासाठी फोन कॉल्स आणि धावपळ करतेय ,
असे त्याचा काचेच्या केबिन मधून तो पाहत होता त्याने न राहवून इंटरकॉम केला
" क्या हुआ मॅडम क्यू रुके हो?".
माझं नवीन झालेलं लग्न व त्यानंतरची घर ऑफिस सांभाळण्याची तारांबळ तो बॉस नव्हे तरी मित्र म्हणून पाहत होता.
तेव्हा थोडं त्या काकांचा विम्याच पाठपुरावा बाकी आहे,
ते झाले कि निघते असे बोलली मी,
त्यावर हसून त्याने म्हंटले,
"बुरा मत मनो लेकिन ये लोग इस लायक नाही है,
हम फील्ड वाले लोग इन लोगोंको अच्छी तरह से समजते है ,
सब नाटक होता है,
बहुत पैसे है इतके पास लेकिन हफ्ता नही भरेंगे और उपर से हमें काम पे लगा देंगे जैसे अब आप लगे हो,
छोडो घर जाओ कल देखो, बाय"
मी ठीक आहे म्हणाली ,
पण मला काही मनापासून पटले नाही एवढे खोटं कोण कसे बोलेल.
ह्यांना सगळे जग नेहमी वाईटच का दिसते कळत नाही मी मनाशीच विचार केला.
काही लोक असतील पण सरसकट सगळेच वाईट कसे असतील.
असो माझ्या मेहनतीला फळ आले
आणि रेकॉर्डब्रेक २० दिवसात त्यांचे विम्याचे पैसे चेक स्वरूपात मुख्य ऑफिस मधून पाठवले गेले
व तिथून मला तसं त्यांनी इन्फॉर्म केले होते.
मी माझ्या बॉसच्या व सहकार्याच्या कानावर घातले,
त्यांनी माझे नेहमीप्रमाणेच कौतुक केले.
आपण कोणाच्या तरी कमी आलो हि भावनाच खूप सुखावह असते
त्याचा अनुभव परत एकदा येत होता मला.
ऑफिस नियमानुसार माझ्याकडे आलेला विम्याचा चेक मी माझ्या बॉस कडे सुपूर्द केला,
त्यांनी त्या गृहस्थांना बोलावून घेतले.
सकाळी जोपर्यंत कस्टमर्स आले नव्हते सर्वजण मला चिडवत होते "
रोज ते काका येऊन मॅडमच डोकं खायचे आज पेढे घेऊन येणार मजा आहे तुमची,
आज आणि आभार प्रदर्शनाचा मोठा कार्यक्रम होणार आपल्याकडे."
मस्करी असली तरी त्यात माझ्यासाठीच कौतुक होता त्यांचा मनात,
त्यामुळे मी पण लटका राग दाखवत होते.
थोड्या वेळाने सगळेच आपापल्या कामात व्यस्त झालो,
आणि साधारण दुपारी १२ च्या सुमारास काका आले.
सर्वांच्या नजारा अपेक्षित घटनाक्रमानुसार त्यांच्यावर खिळल्या होत्याच,
पण सर्वाना खोटं ठरवत,
कुणाकडे हि न पाहता सरळ केबिन मध्ये शिरले,
तिथे आमच्या बॉस ने त्यांचं स्वागत करून लगेचच चेक सुपूर्द केला,
चेक मिळताच बॉसशी हस्तांदोलन करून काका निघाले ते,
माझ्यासकट इतर सर्वांकडे दुर्लक्ष करत थेट दरवाजाच्या बाहेर.
माझ्यासकट सर्वजण अवाक,
मी केले ते माझं काम होते हे जरी खरं असले,
तरी त्यासाठी एक थँक्स किंवा एक हसरा कटाक्ष हि पुरेसा होता माझ्यासाठी.
सर्वात महत्वाचं म्हणजे त्या काळातील आधीच्या वागण्याच्या अगदी विरोधी वागले होते ते गृहस्थ त्या दिवशी,
गरज नव्हती पण माझं मन दुखावले होते नक्की.
एवढा वेळ माझ्या मस्करीत बोलणारे माझे सहकारी काहीसे नाराज वाटले,
काहींनी उघड बोलून नाराजी व्यक्त केली सुद्धा,
तरीही वरवर मला काही वाईट न वाटल्याचे दाखवून कामाला लागले मन वळवण्यासाठी.
तेवढ्यात माझा बॉस आलाच इंटरकॉमवर,
"सॉरी मॅडम, लेकिन बोला था ना मैने,
ये दुनिया वैसी नाही है मॅडम जैसी दिखती है और दिखाती है,
सब गोलमाल है "
स्वतःच्याच विनोदावर जोरात हसत सुटला तो.
थोड्या खेदानेच पण मी हि तेव्हा मान्य केले खरंच
"ये दुनिया वैसी नहीं जैसी......"
आणि स्वताशीच हसले.
©️®️उत्कर्षा नलावडे ✍️
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box