स्वप्नं की सत्य भाग अंतिम



स्वप्नं की सत्य..भाग 4

©️®️नियती जगताप


धरा आणि सायलीला आता ती आकृती कोण आहे आणि का आहे,

हे समजले होते पण या सगळ्याशी धराचा काय संबंध हे कोणालाच कळत न्हवतं.

इकडे दैलतराव धराला रोजच त्रास द्यायला लागले.  

एके रात्री धराला पुन्हा त्रास सुरू झाला. 

परत दैलतरावांच्या त्याच धमक्या ,

पण आज जाताना दैलतरावांनी धराला हवेत उचलून तिच्या बेड वर पाडलं.
 
तिला काही लागलं नाही पण खाली पडल्यावर आवाज झाला.  

तिची आई धावतच तिच्या रूम मध्ये आली. 

धरा आईला बघून रडायला लागली. 

तिची आई पण तिच्या अश्या अचानक रडण्याने गोंधळून गेली,

 पण धरा सद्ध्या काही बोलण्याच्या मनःस्थितीत न्हवती.  

ती आईला बिलगून तशीच झोपून गेली. 

सकाळी तिच्या आई ने तिला रात्री बद्दल विचारलं. 

धरा ने सुरवातीपासून काल रात्री पर्यंत जे काही घडलं ,

ते सगळं तिच्या आईला सविस्तर सांगितलं.  

आता तिची आई पण घाबरली. 

आयुष्यात कधी त्या घरात कोणीच भुतांवर विश्वास ठेवला न्हवता. 

काय करावं हे ना धरा ला सुचत होतं ना तिच्या आईला. 

घरात त्या दोघीच राहत होत्या. 

तिचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.  

त्यांचे पालक आणि नातेवाईक यांच्याबद्दल तिचे वडील कधीच बोलत नसत. 

त्यांचा विषय जरी निघाला तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येत असे. 

त्यानंतर कित्येक दिवस ते स्वतःला त्रास करून घेत असतं.  

धराच्या आईने भावनाने, 

सासरच्या लोकांना किंबहुना सासू सासर्यांना तिच्या लग्नाच्या वेळेस ,

आणी त्या नंतर पुढचे फक्त एक दोन वर्षे पाहिलं होतं.  

त्यानंतर ना ते कधी इकडे आले ना धरा चे वडिल कधी भावना आणी धराला त्यांना भेटायला घेवून गेले. 

नाही म्हणायला धराचा जन्म झाला ,

त्यावेळी दोघं जण दवाखान्यातच येऊन धराला पाहून गेले होते.

 त्या नंतर त्यांचा काहीच संपर्क न्हवता.  

भावना चे पालक हयात न्हवते. 

त्यामुळे कोणाला सांगावं, 

कोणाची मदत घ्यावी हे तिला कळत न्हवतं. 

ती एकीकडे आपल्या मुलीला असा भयानक त्रास होतोय म्हणून आक्रोश करत होती 

आणि एकीकडे कठीण प्रसंगी सोबतीला कोणीच नाही म्हणून चिडत होती.  

अचानक तिला आठवलं तिचा सख्खा काका ती लहान असताना घरातून निघून गेला होता. 

तो पुढं बरीच वर्षे कुठल्यातरी साधूची सेवा करत होता. 

अचानक भावनाच्या लग्नाच्या दिवशी घरी आला, 

भावनाला आशिर्वाद दिले आणि त्याचा पत्ता पण दिला होता, 

गरज पडेल म्हणाला होता.

जवळच्याच शहरात एका सुप्रसिद्ध मठात तो भावना भेटायला येईपर्यंत तो थांबणार होता. 

भावनाला नंतर कुठून तरी कळालं होतं की ते खूप सिद्ध पुरूष आहेत. 

कोणाचही भुत, भविष्य आणि वर्तमान बघू शकतात. 

त्यावेळी भावना ने अफवा म्हणून सोडून दिलं होतं.

भावनाने लगेच डोळे पुसले.  

धराला तिच्या काकांबद्दल कल्पना देऊन तयार व्हायला सांगितलं 

आणी ऑफिसमधून दोन दिवसांची सुट्टी पण काढायला लावली. 

दोघी जणी धावत पळत बस स्टॅन्ड वर पोहोचल्या, 

बस कधीची लागलेली होती पण चालू होत न्हवती.  

या दोघी बसमध्ये चढल्या आणी लगेच बस चालू झाली. 

जसं की कोणीतरी फक्त त्यांच्यासाठी बस थांबवून ठेवली होती. 

अडीच तासाचा प्रवास, 

अपुर्ण झोप आणि खिडकीतून येणारी थंड हवा यामुळे धराला झोप लागली. 

झोपेत परत तिला तिच्या अंगावर कोणीतरी बसल्याचं जाणवलं.

तीने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण ती पुन्हा पॅरलाईज़ झाली होती. 

पण लगेच तिला आवाज आला 

" जा, लवकर जा, 

कितीही उपाय करा पण माझी शिकार मी सोडणार नाही". 

आणि ती आकृती तिथून निघून गेली.

धरा खूप घाबरली होती, 

कसाबसा तो प्रवास संपला. 

दोघी मठात पोहोचल्या.

मठात काका त्या दोघींची वाट बघत बसले होते. 

त्यांच्या हातात एक छोटासा पाण्याचा कलश होता, 

त्यांनी धराला ते पाणी प्यायला सांगितलं. पाणी पिताच धराला तरतरी आली.  

इतके दिवस त्या आत्म्याचे त्रास सहन करून मलूल पडलेल्या शरीरात अचानक पूर्वी सारखी ताकद आली. 

धराचा चेहरा पण आता टवटवीत दिसत होता. 

धरा ने त्यांना आतापर्यंत जे घडलं ते सर्व सांगितलं. 

काकांनी मग दोघींना फ्रेश होऊन ,

आणि जेवण करून परत यायला सांगितलं. 

दोघींची राहण्या-खाण्याची सोय त्यांनी आधीच मठात करून ठेवली होती.  

धरा आणि भावना गेल्यावर काका ध्यानाला बसले. 

बरेच वर्ष काकांनी मठातील महागुरू आणि देवाची मनोभावे सेवा केली होती. 

काकांचा चांगुलपणा आणि दुसर्यांना मदत करण्याची धडपड बघून महागुरूंनी त्यांना खूप विद्या शिकवल्या.  

लोककल्याणासाठी त्यांनीही बर्याच सिद्धी प्राप्त करून घेतल्या. 

ते या सिद्धींचा वापर नेहमीच लोकांना मदत करण्यासाठी करत. 

त्यांनी स्वतःसाठी कधीच या सिद्धींचा वापर नाही केला म्हणूनच त्यांची शक्ती खूप वाढली होती. 

याच शक्तीने त्यांना धरा, दैलतराव आणि विश्वासराव यांच्याबद्दल कल्पना दिली होती.  

धरा ला समक्ष भेटल्याने नकळत बर्याच गोष्टी उलगडल्या होत्या. 

दैलतराव खरं तर पुण्यात्मा होते,

पण या पन्नास वर्ष्यांच्या बंधनामुळे मुक्त होत असताना ते पुन्हा पन्नास वर्षांसाठी अडकून पडले. 

आणि त्याच काळात त्यांनी असं काही ऐकलं, 

पाहिलं की त्यांची सूड घेण्याची भावना परत उफाळून आली.

ध्यान करताना काकांना या सर्व गोष्टी समोर घडताना दिसल्या. 

धराला या त्रासातून मुक्त करण्याचा मार्ग ही त्यांना आता कळाला होता. 

धरा मठात येऊन काकांच्या समोर बसली. 

भावना पण आता थोडी निश्चिंत झाली होती. 

तिने धरा च्या वडिलांनी फोन लावून काय घडलं,

 आणि त्या सध्या कुठे आहेत हे सगळं सांगितलं.  

तिचे वडील सगळं ऐकून एकदम शांत झाले. 

"लगेच निघतो आणि थेट मठात येतो, 

तोपर्यंत तिथेच थांबा, 

कितीही महत्त्वाचं काम असलं तरी कुठे जावू नका" 

एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला.  

भावना पण आत जावून धरा च्या शेजारी बसली. 

काकांनी डोळे उघडले. 

काका: धरा चे वडील निघाले?

भावना: हो, उद्या सकाळी पोहोचतील, 

थेट इथेच येत आहेत म्हणाले.

काका: धरा, बाळा, सायली ला फोन करून तिला मिरा बाईंना निरोप द्यायला सांग,

उद्या दुपारी पर्यंत आपण सगळे त्यांच्या वाड्यात येत आहोत.  

दैलतरावांना मुक्त करायचे आहे. 

धरा: लगेच सांगते. पण उद्या तुम्ही नक्की काय करणार आहात?

काका: दैलतरावांना समजावण्याचा प्रयत्न. ते

वाईट नाहीत की त्यांचा बंदोबस्त करावा. 

पुण्यात्मा आहेत, 

त्यांना पुन्हा बांधणं म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखं होईल.  

धरा: हे तर खूप अवघड आहे,

 त्यांनी ऐकलं नाही तर ते आपल्या सगळ्यांना मारून टाकतील. 

काका: सगळ्यांना नाही.

भावना: म्हणजे?

काका: उद्या कळेल. 

तुम्ही आता आराम करा. 

धरा, निश्चिंत झोप, 

इथे तुला कसलाच त्रास होणार नाही.

धरा: थँक्यू काका

दुसर्या दिवशी धरा चे वडील सकाळी सहालाच मठात पोहोचले. 

काका त्यांचीच वाट बघत होते. 

काकांनी त्यांना महत्वाचं बोलायचं आहे ,

लगेच अंघोळ करून मठात या म्हणून सांगितलं 

आणि त्यांना भावना ची रूम दाखवली. 

धरा आणि भावना शांत झोपलेल्या पाहून आवाज न करता धरा चे वडील पटकन फ्रेश होऊन मठात आले.  

त्यानंतर ते आणि काका एक तास बोलत होते.

सगळी योजना ठरली. 

भावना आणि धरा पण तयार होउन मठात आल्या. 

काकांनी एका बॅग मध्ये काही वस्तू भरून घेतल्या, 

धराच्या वडिलांनी प्रायव्हेट गाडी केली 

आणि दोन तासात ते सायलीच्या घरी पोहोचले.  

सायली सगळ्यांना मिराबाईंच्या घरी घेवून गेली. 

मिराबाईंची प्रकृती खूप खालावली होती. 

काका मिराबाईंशी एकांतात बोलले. 

त्यांची योजना ऐकवली. 

मिरा बाईंना त्या क्षणी खूप राग आला, 

त्या पहिल्या तयार न्हवत्या.  

त्या सगळ्यांना वाड्याबाहेर जायला सांगू लागल्या. 

शेवटचा प्रयत्न म्हणून काकांनी त्यांना दैलतरावांची सद्ध्याची अवस्था सांगितली. 

आपल्या नवर्याची अशी स्थिती ऐकून त्या काकांना मदत करायला तयार झाल्या. 

आता धरा, भावना, धरा चे वडील, काका, मिराबाई, सायली, सायली ची आज्जी धराच्या कंपनी जवळ पोहोचले.  

परवानगी शिवाय कंपनी गेट च्या आत प्रवेश न्हवता पण कंपनी च्या मागच्या भागात,
जिथं ते गेस्ट हाऊस होता, 

तिथं कंपाउंड ला मोठं बिळ पडलं होतं. 

सायली ला ते माहित होतं. ती सर्वांना तिथून गेस्ट हाऊस च्या पाठीमागे घेऊन गेली. 

काकांनी तिथली थोडी जागा सगळ्यांना साफ करायला लावली.  

सिद्ध केलेल्या कुंकवाच्या पाण्यात भिजवलेल्या तांदळाने मोठं रिंगण आखलं, 

त्या रिंगणात तिचे आई वडील आणि त्यांच्या मागे सायली, आज्जी आणि मिराबाई बसल्या. 

काका रिंगणाच्या एका बाजूला बसले,

 त्यांच्या समोर होम प्रज्वलीत केला.

 होमाच्या समोर धराला झोपवलं 

आणि दैलतरावांना समोर येण्याची विनंती केली.  

धराला झोपलेलं पाहुन दैलतराव नक्की येतील याची काकांना खात्री होती. 

ते सर्व बाजूंना दैलतरावांना शोधत होते. 

अचानक ती काळी आकृती गेस्ट हाऊस मधून वेगाने धरा जवळ आली. 

धरा ने मनाची पूर्ण तयारी केली की ती जड आकृती पुन्हा तिच्या धातीवर बसणार आणि तिला श्वास सुद्धा घेता येणार नाही.  

पण असं काही झालं नाही. 

ती आकृती धरा च्या अगदी जवळ आली 

आणि तिचं रिंगणाकडे लक्ष गेलं.

 तसं हळूहळू त्या आकृती चा चेहरा दिसू लागला. 

दैलतराव जोरात ओरडत रिंगणाजवळ आले.  

दैलतराव: शेवटी तु आलास, आ

ज तुला सोडणार नाही. माझा सूड पुर्ण करणार. 

जसं मला मारलं तसचं तू पण मरणार.

काका: दैलतराव, शांत व्हा, त्यांचं म्हणणं एकदा एकून तर घ्या.

दैलतराव: मला शहाणपणा शिकवायला तू कोण मोठ्ठा लागुन गेलास? आहेस कोण तू?

काका: मी कोण हे महत्वाचं नाही, 

पण तुम्ही कोण होतात आणि

आता कोण झालाय हे जास्त महत्त्वाचं आहे.

दैलतराव त्यांच्या दयाळूपण आणि सारासार विचार करण्यासाठी प्रसिद्ध होते. 

स्वतःच्या आधी दुसर्याचा विचार करणारे म्हणून अख्या पंचक्रोशीत मान होता. 

पण हे सूडाला पेटलेले दैलतराव कोणीतरी वेगळेच आहेत.

दैलतराव: या सरचंचाच्या पोराने विश्वास चे कान भरले.

त्याला दारूच्या आहारी घालवलं. 

त्याचा प्रत्येक वाईट गुणांनी खतपाणी घातलं 

आणि शेवटी विश्वासला माझा खून करायला लावला.

हे ऐकताच काका आणि मिराबाई सोडून बाकी सर्व शाॅक होउन धरा च्या बाबांकडे बघू लागले. 

आता त्यांना पण सहन होत न्हवतं. 

ते लगेच रिंगणाबाहेर आले 

आणि दैलतरावांच्या समोर गुडघ्यांवर बसले.  

दैलतराव त्यांना गळ्याला धरून उचलणार होते. 

पण धराच्या वडिलांचा त्या कडे लक्षच न्हवतं.

 ते फक्त दैलतरावांच्या पायात पडून जोरात रडत होते. 

धरा चे वडील: मला जगण्याचा काही अधिकार नाही, 

मला मारून टाका. 

नुकतंच मिसरूड फुटलं होतं मला.  

एवढंच कळत होतं की कोणत्याही गावात सरपंचालाच आणि त्याच्या पदामुळे त्याच्या कुटुंबाला सर्वात जास्त मान असतो. 

माणसाला मान त्याच्या हुद्द्याने नाही,

 तर त्याच्या चारित्र्यामुळे आणि त्याने दुसर्यांशी वागण्याच्या पद्धतीमुळे मिळतो हे कळतच न्हवतं. 

गावात तुम्हाला माझ्या वडीलांपेक्षा जास्त मान होता, 

माझे वडील सरपंच असून तुम्हाला मान द्यायचे.

मला सहन व्हायचं नाही, 

मी जळत होतो तुमच्यावर. 

विश्वासरावांचा तुमच्यावर किती राग आहे हे सगळ्या गावाला माहित होतं.  

म्हणून मी त्याच्याशी मैत्री वाढवली. 

त्याला पहील्या पासून दारूचं व्यसन होतं. 

तो पिलेला असताना मी तुमचा विषय जरी काढला तरी तो तुम्हाला मारायच्या गोष्टी करायचा. 

तुम्ही मेलात तर सर्व मानसन्मान आपला म्हणून मीच त्याला भरीस घातलं. 

सिनेमांमधले खून बघून मला एखाद्याचा खून होणं हे खूप सहज सोपं वाटतं होतं.  

पण त्या रात्री जेव्हा विश्वासरावांना तुमचा खून केला तेव्हा मला खरा खून काय असतो ते कळलं.

विश्वासरावाच्या नकळत मी तुम्हा दोघांचा पाठलाग केला आणि माझ्या डोळ्यांनी सगळं पाहीलं. 

मी तसाच पळत घरी गेलो 

आणि माझ्या वडीलांनी सगळं सांगितलं.  

आम्ही दोघं पोलिसांकडे निघालो पण वाटेतच विश्वासरावानी आम्हाला गाठलं, 

पोलिसांना एक अक्षर जरी सांगितलं तर अख्ख्या घराण्याचा नायनाट करण्याची धमकी दिली. 

घाबरून आम्ही गप्प बसलो.  

जेव्हा विश्वासरावाचा पण खुन झाला तेव्हा आमची खात्री पटली की तुम्ही अजूनही आहात ,

आणि आज ना उद्या माझं पण बरं वाईट करालं.  

म्हणून माझ्या आई वडिलांनीच माला बाकी लोकांबरोबर गावाजवळच्या या शहरात पाठवलं. 

त्यांनी मला परत कधीच या गावात राहू दिलं नाही.  

काही वर्षांनी आई वडील गेले त्यानंतर या गावाशी संबंधच तुटला. 

मला माझ्या वागण्याचा खूप पश्चात्ताप होतो, 

त्यामुळेच मी जेव्हा कधी गावी आलो तेव्हा तेव्हा इथं येऊन माझा गुन्हा कबूल करायचो, 

तुमची माफी मागायचो.  

मला माफ करा. 

एवढं बोलून ते परत रडायला लागले. 

त्यांना तसं रडताना पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांना पाणी आलं. 

पण दैलतराव अजूनही रागात होते.

 धराला त्रास देऊन तिच्या वडिलांना इथं आणून त्यांना मारण्याचा दैलतरावांचा उद्देश होता.

ते परत जाऊन धरा च्या अंगावर बसले. 

आता मात्र धरा जोरजोरात हलायला लागली,

ओरडायला लागली. 

तिचे हात पाय हलत होते पण आवाज येत न्हवता. 

धरा चे वडील गयावया करत होते.  

"मला मारून टाका पण माझ्या मुलीला सोडा". 

एकीकडे काकांचा होम चालू होता. 

त्यांनी मिराबाईं कडे बघितलं. 

अशक्त मिराबाई जागेवरून उठल्या, 

चालता येत न्हवतं म्हणून आज्जींचा आधार घेऊन 

दैलतरावांच्यासमोर उभ्या राहिल्या.  

मिराबाई: अहो, पन्नास वर्षांपूर्वी तुम्हाला शेवटचं बघितलं होतं. 

तेव्हा तुमची आकृती पांढरीशुभ्र होती. 

आता तुम्ही बदला घेण्यासाठी एवढे वेडे झालातं की तुमच्यातला चांगुलपणाच रागाने, 

सूडाच्या भावनेने झाकून गेला. 

त्या बिचार्या पोरीचा यात काय दोष? 

तिला का विनाकारण त्रास?  

तुम्हाला पहिल्यांदा हे सहन व्हायचं नाही 

आणि अत्ता तुम्हीच असं वागताय? 

तिच्या वडिलांना पण स्वतःच्या वागण्याचा पश्चात्ताप होत आहे.

आता हे सगळं सोडून द्या, 

माफ करा त्याला. 

बायकोचे बोल ऐकून दैलतराव शांत झाले.  

ती काळी आकृती आता परत पांढरीशुभ्र झाली. 

धरा चे वडील आणि भावना पटकन धरा जवळ गेले. 

तिला उठवून बसवलं. 

काकांच्या चेहर्यावर समाधान होतं, 

दैलतरावांनी धरा च्या वडीलांनी माफ केलं होतं.

 ते आता धरा ला पण त्रास देणार न्हवते. 

सायली ने धरा ला पाणी पाजलं.

मिराबाई अजूनही दैलतरावांच्या जवळच उभ्या होत्या. 

मिराबाई: अहो, तुम्ही परत दिसाल या एका आशेवर इतकी वर्षे काढली.  

आता मात्र मला एकटीला टाकून जाऊ नका. 

आता सहन नाही होत. 

आता मला कायम तुमच्या सोबत रहायचं आहे.  

एवढं बोलून मिराबाईं खाली कोसळल्या. 

सगळेजण त्यांच्या जवळ पोहोचले. 

आज्जी रडत रडत त्यांना हाका मारत होती, 

उठवायचा प्रयत्न करत होती.  

सगळ्यांच्या चेहर्यावर काळजी होती.

काका मात्र आभाळाकडं बघत होते, 

चेहर्यावर स्मित हास्य घेऊन. 

दैलतराव मिराबाई हातात हात घेऊन वर वर जात हवेत विरून गेले.

**** समाप्त ****

©️®️नियती जगताप


स्वप्नं की सत्य...भाग एक ते चार ही कथा लेखिका नियती जगताप यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.

धन्यवाद..

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


 Velvet Kavisha


Post a Comment

0 Comments