स्वप्नं की सत्य..भाग 3
©️®️ नियती जगताप
धराला दैलतराव त्रास का देत होते हे कोणालाच माहित न्हवतं.
सायलीने दुसर्या दिवशी धराला दैलतरावांविषयी सांगितलं.
पण तरीही धराचा या सगळ्याशी संबंध काय हे काही कळत नव्हतं.
दोन दिवस दोघीही विचार करत होत्या.
तिसर्या दिवशी सुट्टी असल्याने सायली उशिरा उठली.
आवरून किचन मध्ये गेली,
तिच्या आईने सकाळी सकाळीच भाताची पेज बनवली होती,
जी ती डब्यात भरत होती.
सायलीला बघितल्या बरोबर आई ने तिला आज्जी सोबत डब्बा घेऊन दवाखान्यात जायला सांगितलं.
सुट्टी च्या दिवशी पण धावपळ करणं तिच्या जीवावर आलं होतं.
पण आज्जी तिला बळजबरीने घेऊन गेली.
रस्त्यात आज्जी तिला म्हणाली
" पहिल्यांदाच हे सुचायला पाहिजे होतं.
पण आता तुमच्या बर्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील."
सायली ला काही कळलं नव्हतं.
दोघी दवाखान्यात पोहोचल्या.
एका प्रायव्हेट रूम मध्ये एक जवळपास 80 वर्ष वयाची म्हातारी काॅट वर झोपली होती.
आज्जी तिच्या जवळ गेली आणि प्रेमाने,
आदराने तिला हाक मारली " मिराबाईsss"
सायली ती हाक ऐकून आश्चर्यचकीत झाली.
आज्जी ने तिला धराला फोन करून ताबडतोब दवाखान्यात बोलावून घ्यायला सांगितलं.
धरा पोहोचेपर्यंत आज्जी ने मिराबाईंना जेवण भरवलं ,
आणि धरा सोबत जे काही घडत होतं ते सांगितलं.
आज कित्येक वर्षांनी दैलतरावांचा उल्लेख ऐकला होता,
मिराबाईंच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली होती.
धरा तिथे पोहोचली,
मिराबाईंनी स्वतःला सावरलं
आणि ते गुपित सांगायला सुरुवात केली ,
जे आत्ता पर्यंत त्यांच्या शिवाय कोणालाच माहित न्हवतं.
दैलतरावांचा आत्मा अजूनही त्या जमीनीच्या आसपास दिसतो हे विश्वासरावानी बरेचदा ऐकलं होतं.
स्वतः भोवती काही अमानवीय शक्ती पण जाणवली होती ,
पण विश्वासराव पैश्यांच्या आणि दारू च्या नशेत आकंठ बुडाला होता.
त्याचा जिगरी मित्र, सरपंचाचा मुलगा,
दिवसभर दैलतरावांच्या विरुद्ध त्याचे कान भरत असे
आणि संध्याकाळी त्याच्याच पैशाने त्याला दारू पाजत असे.
दैलतरावांची प्रतिष्ठा,
त्यांना गावात मिळणारा सन्मान बघून याच्या तळपायाची आग मस्तकात जात असे.
त्याच्या मते संपुर्ण गावात या मानसन्मानाचा हक्क फक्त त्याच्या घराण्याचा आणि ओघाने त्याचा होता.
या असूयेमुळेच त्याने एक दिवस विश्वासरावाला दारू पाजताना,
ती जमीन बळकावण्याचं आणि
त्यासाठी दैलतरावांचा खून करण्याचं खूळ विश्वासरावाच्या डोक्यात घालून दिलं.
एका रात्री उशिरा दारु पिऊन फेस झालेला विश्वासराव दैलतरावांना शिव्या देत घराकडे चालला होता.
अचानक तो थांबला
आणि समोरच्या वाड्याकडे बघून विकृत हसू लागला.
तो वाडा दैलतरावांचा आणि दैलतरावांनंतर आता मिराबाईंचा होता.
मिरा बाईंना मारून आता तो वाडा पण स्वतःच्या नावावर करायचे वेध विश्वासरावाला लागले.
तो लगेच वाड्याच्या दारापाशी आला.
त्याच्या सैतानी डोक्यात लगेच पूर्ण प्लॅन तयार झाला.
झोपेतच मिरा ला ठार करून तिला फाशी लावायची आणि नवरा मेल्यामुळे तिने पण आत्महत्या केली असं दाखवायचं.
दुसरं कोणी जवळचं नातेवाईक नाही म्हणजे वाडा आपलाच.
स्वतःवरच खुश होउन दार वाजवायची तसदी न घेता एका उघड्या खिडकीतून तो वाड्यात शिरला.
मिराबाई दैलतरावांच्या फोटोखालीच झोपल्या होत्या.
विश्वासरावांनी बैठकीत ठेवलेली एक उशी उचलली आणि मिराबाईंच्या तोंडावर दाबली,
तितक्यात त्यांनी डोळे उघडले.
मिराबाई स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होत्या पण विश्वासरावाच्या ताकदीपुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडू लागले.
त्या शेवटचे श्वास घेवू लागल्या.
विश्वासरावांनी उशी त्यांच्या तोंडावर पूर्ण शक्तीनिशी दाबली,
आणि अचानक विजेचा झटका लागल्या सारखं तो लांब उडून पडला.
सगळी नशा एका झटक्यात उतरली.
तो रागाने लालबूंद होउन उठला
आणि तसाच घाबरून थरथरू लागला.
मिराबाईंच्या तोंडावरची उशी आपोआप हवेत फेकली गेली.
एक पांढरी शुभ्र आकृती त्यांना उठवून बसवत होती.
त्या आकृतीने विश्वासरावाकडे बघितलं,
दोन सेकंदांसाठी विश्वासरावाला दैलतरावाचा चेहरा दिसला.
भितीने गाळण उडालेला विश्वासराव कसाबसा धडपडत उठला.
दार उघडून वाट मिळेल तिथं धावत सुटला.
दैलतरावांनी मिराबाईंना सावरलं,
त्या शुद्धीवर आल्या,
त्यांनाही दैलतरावांचा चेहरा ओझरता दिसला.
त्यांना काही कळायच्या आत ती आकृती दरवाज्यातून बाहेर पडली
आणि विश्वासरावाचा पाठलाग करू लागली.
पळता पळता विश्वासराव गावाबाहेरच्या माळरानावर पोहोचला.
तिथे त्याला एक अघोरी साधू तपस्या करताना दिसला.
ती आकृती जवळ पोहोचली होती.
विश्वासराव जमेल तेवढ्या जोरात पळत जावून त्या साधूच्या पुढ्यात पडला.
ती आकृती पण साधूच्या थोडी लांब जावून थांबली.
साधनेसाठी आखलेल्या वर्तुळात आकृती ला प्रवेश करता येत न्हवता.
अघोरीने पुढ्यात पडलेल्या विश्वासरावाकडे
आणि त्या आकृती कडे पाहिलं.
हातात भस्म घेउन काही मंत्र पुटपुटत अघोरीने ते भस्म आकृती वर फेकलं.
ती आकृती एका क्षणात गायब झाली.
विश्वासराव हे सगळं आश्चर्याने आणि भितीने पाहत होता.
विश्वासराव मरता मरता वाचला होता,
पण त्याच्यातली वाईट प्रवृत्ती अजूनही कायम होती.
त्याने खरं सांगण्याऐवजी एका माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नात,
चुकून दैलतरावांचा त्याच्या हातून खून झाला असं सांगितलं.
हे ऐकून अघोरी त्याला मदत करायला तयार झाला.
अमावस्येला दैलतरावांच्या आत्म्याला कायमचं बांधायचं ठरलं.
दोन तीन दिवसांसाठी अघोरी ने विश्वासरावाला आणि त्याच्या माणसांना,
वाईट शक्तींपासून वाचण्यासाठी सुरक्षा कवच दिलं.
विश्वासराव आता बिंदास फिरत होता,
इथेच तो फसला.
कवच वाईट शक्तींपासून बचाव करण्यासाठी होतं
पण दैलतराव पुण्यात्मा होते.
त्याच रात्री ती आकृती विश्वासरावाच्या वाड्यात शिरली.
पिऊन झोपलेल्या विश्वासरावाला एका झटक्यात त्या आकृतीने लोळवलं.
विश्वासरावाला काही कळायच्या आत एक जड हातोडा येऊन त्याच्या डोक्यात आदळला.
विश्वासरावांनी जागेवर जीव सोडला.
पुढच्या दोन रात्रींत त्या आकृतीने त्याच्या साथीदारांनाही संपवलं.
दैलतराव आता पुर्णपणे शांत झाले होते.
मुक्त व्हायला तयार होते तेवढ्यात कुठल्यातरी शक्तीने ते जोरात खेचले गेले
आणि जाऊन एका रिंगणात आपटले.
अघोरीने त्याची पुजा सुरू केली होती.
दैलतरावांना सुटण्याचा खूप प्रयत्न केला
पण अघोरीने दैलतरावांना एका काळ्या बाहूली मध्ये बांधले.
ती बाहुली त्यांचा खून जिथं झाला त्याच जमीनीत पुरली.
सर्व विधी आटोपून अघोरी विश्वासरावाला शोधण्यासाठी गावात आला.
गावकर्यांकडून त्याला खरं कळालं.
पश्चात्ताप करण्यासाठी उत्तर पुजा करताना अघोरीने दैलतरावांच्याच पुण्याईने ,
त्यांची बंदी पन्नास वर्षांसाठी सिमीत केली.
या बंदीने दैलतरावांची सर्व ताकद बांधली गेली,
ते काहीच करू शकत न्हवते.
गावात चाललेल्या या सर्व घडामोडींमुळे त्या वेळी गावातल्या कित्येक लोकांनी ,
आपल्या मुलांना शिक्षण किंवा नोकरी च्या निमित्ताने गावाबाहेर धाडलं.
पुढच्या काही वर्षांत धरा काम करत असलेली कंपनी त्याच जागेवर उभी राहिली.
गाव सोडून गेलेली बरीच लोकं परतली पण काही परत आलेच नाहीत.
एवढं बोलून मिराबाई शांत झाल्या.
आज्जी त्यांच्या जवळ बसून राहिली.
धरा आणि सायली दवाखान्यातून बाहेर आल्या आणि सगळ्या घटनांची जुळवाजुळव करू लागल्या.
धरा ज्या दिवशी गेस्ट हाऊस रूम मध्ये राहीली होती ,
ती रात्र दैलतरावांच्या बंधनमुक्ती ची रात्र होती.
पण अजूनही मुख्य प्रश्न सुटला न्हवता,
दैलतराव धरा ला त्रास का देत होते आणि या सगळ्यातून सुटण्याच्या मार्ग काय?
क्रमशः
भाग अंतिम वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇
©️®️नियती जगताप
स्वप्नं की सत्य...भाग एक ते चार ही कथा लेखिका नियती जगताप यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.
धन्यवाद..
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Velvet Kavisha
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box