सूनबाई आता तूच अद्दल घडव माझ्या लेकाला..

 


#सूनबाई_आता_तूच_अद्दल_घडव_माझ्या_लेकाला 


©️ जया पाटील 


" हॅलो अभि , अरे किती वेळ झाला कॉल करते आहे तूला ..? 

साधा रिप्लाय सुद्धा करत नाहीस तू ..!

काळजी वाटते रे तुझी...

ऑफिसला पोहोचला की एक मेसेज टाकायला काय होतं रे ...

माहिती आहे तूला खूप कामं असतात पण एक मेसेज करायला कितीसा वेळ लागतो असा ..?

तू फोन उचलला नाही की अभि ऑफिसला नीट पोहोचला असेल की नाही...? 

तो वेळेवर जेवला असेल की नाही ..? 

असे अनेक प्रश्न मनात येत राहतात म्हणूनच तूला फोन करते मी ..

तू ऑफिसला व्यवस्थित पोहोचला की चिंता दुर होते आमची..."

नलिनीताई आपल्या लाडक्या लेकाला अर्थातच अभिजीतला समजावणीच्या सुरात म्हणाल्या.

" पुरे झाले ग आई ...

ऑफिसला नीट पोहोचला का .? 

जेवलास का ...? 

असले फालतू प्रश्न विचारायला मी काही लहान राहिलो नाही.  

ऑफिसला पोहोचलो की खूप कामं असतात मला ..

आणि त्यात तू सारखीच फोन करून कटकट करत असते

ठेव ना आता फोन..

पोहोचलो मी नीट आणि जेवलो सुद्धा...

कामं आहेत मला खूप.." 

असं बोलून रागात अभिजीतने नलिनीताईंचा फोन कट केला.

त्याच्या अशा वागण्यामुळे नलिनीताई खूप दुःखी झाल्या.

त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.

मनातल्या मनात त्या स्वतःशीच म्हणू लागल्या.

" अभि ,आई आहे रे मी तुझी..

माझी काळजी तूला नाही समजायची कधीच..

जेव्हा तू स्वतः बाबा होशील तेव्हाच समजेल तूला आईबाबांची काळजी. " 

अभिजीत काळे एक मध्यवर्गीय परिवारातील मुलगा.

आई नलिनी ताई आणि बाबा विश्वासराव काळे दोघांचाही एकुलता एक मुलगा.

विश्वासरावांनी त्याला खूप लाडाकोडात वाढवले.

अभ्यासात हुशार असल्यामुळे लहानपणापासूनच शिष्यवृत्ती मिळाली.

मेरिट आणि उत्तम गुण यामुळे त्याला इंजिनीरिंगला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळाला.

तिथे कॅम्पस सिलेक्शन मध्ये चांगल्या आय टी कंपनी मध्ये त्याला जॉब मिळाला.

त्याच्या गुणवत्तेच्या जोरावर त्याला प्रोमोशन मिळत गेले.

अवघ्या दोन वर्षात तो टीम लीडर झाला.

विश्वासरावांना आणि नलिनीताईंना त्याच्या या यशाचे खूप कौतुक होते.

विश्वासरावांनी अभिजीतला घडवण्यासाठी खरंच खूप मेहनत घेतली होती.

पण त्याच्या यशात नलिनीताईंचा देखील तितकाच हात होता.

मात्र ही गोष्ट विश्वासरावांना कधीच मान्य नव्हती.

ते स्वतः देखील नलिनी ताईंना नेहमीच गृहीत धरत आले होते.

प्रत्येक वेळी त्यांच्या बोलण्यात हेच शब्द असायचे..

" नलिनी ..असे काय काम करतेस ग तू दिवसभर ...

मला दिवसभर ऑफिसमध्ये किती काम असते . 

तुला नुसता ब्रेकफास्ट आणि जेवण बनवायचे काम , 

ते सुद्धा वेळेवर बनवून होत नाही तुझ्याकडून.."  

विश्वासरावांच्या अशा वागण्यामुळे अभिजीत देखील नलिनीताईंना गृहीत धरू लागला होता.

नलिनीताईंची काळजी त्याला कटकट वाटत असे.

नलिनीताईंना या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असे ,

पण तरीही त्या मुकाट्याने सहन करत असत.

दिवसामागून दिवस पुढे जात होते.

अभिजीत साठी विश्वासरावांनी वधू संशोधन सुरु केले.

पण अभिजीतचे त्याच्या ऑफिस मधील नयनावर प्रेम होते.

नयना सोनवणे - एक टॅलेंटेड , स्मार्ट , मॉडर्न , डॅशिंग , स्टायलिश मुलगी...  

अभिजितच्या कंपनीत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारी ...

अतिशय फोकस्ड , करियर ओरिएंटेड मुलगी. 

तीचे स्वप्न म्हणजे सतत पुढे जाण्याचे , यशाचे नवीन क्षितिज गाठण्याचे ...!

प्रोजेक्टच्या कामाच्या निमित्ताने भेटी वाढल्या.  

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

अभिजीतने नयना आणि त्याच्या नात्याबद्दल विश्वासरावांना सांगितले,

पण नलिनीताईंना या बद्दल सांगावं याची अभिजीतला गरजच वाटली नाही.

नेहमीप्रमाणे त्याने नलिनीताईंना गृहीत धरले.

विश्वासरावांनी अभिजीत आणि नयना दोघांच्याही लग्नाला होकार दिला.

नयनाच्या घरच्यांनाही अभिजीत मनापासून आवडला.

दोघांचेही लग्न थाटामाटात पार पडले.  

माप ओलांडून नयना अभिजीतच्या घरची लक्ष्मी झाली. 

करियर करतानाच तिच्या संसारात देखील तितकीच रुळली. 

या सगळ्यात नलिनीताई मात्र दुर्लक्षित राहिल्या.

लग्नानंतर अभिजीत आणि नयना दोघेही फिरायला गेले.

परत आल्यावर नयनाने ऑफिस जॉईन केले.

नलिनीताई नयनाला अगदी मुलीसारखा जीव लावत ,

त्यामुळे त्या दोघांचीही खूप गट्टी जमली.

काही दिवसातच तिला नलिनीताईंचे घरातील स्थान लक्षात आले.

अभिजित आणि विश्वासराव त्यांना सतत गृहीत धरतात.

ही गोष्ट पण तिच्या लक्षात आली.

पण प्रत्येक वेळी विश्वासराव आणि

अभिजितकडून नलिनीताईंचा होणारा पाणउतारा तिला आवडत नसे. 

नलिनीताई मनाने खूप चांगल्या आहेत हे तिला माहित होते.

विश्वासराव तिचे सासरे असल्यामुळे ,

वयाने मोठे असल्यामुळे ती त्यांच्यासोबत काहीच बोलू शकली नाही.

पण या बाबतीत तिने अभिजीतसोबत बोलायचं ठरवलं.

एकदा दोनदा अभिजित सोबत बोलण्याचा प्रयत्न देखील केला.

पण आई घरात असते म्हणजे तिला काहीच काम नसतं, 

हा अभिजीतचा झालेला गैरसमज दुर करण्यात मात्र नयना अयशस्वी ठरत होती.

एक दिवस अभिजित , विश्वासराव आणि नयना जेवण करत असताना ,

नलिनीताईंनी अभिजीतला आग्रहाने भात वाढला.

त्यामुळे चिडून अभिजीतने त्यांचा अपमान केला.

नलिनीताई काहीच न बोलता किचन मध्ये निघून गेल्या.

अभिजितच्या वागण्याचा नयनाला मात्र खूप राग आला.

ती उठून नलिनीताईंच्या मागे गेली.

नलिनीताई आपल्या डोळ्यात आलेले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होत्या.

नयना त्यांचा हात हातात घेऊन त्यांच्यासोबत बोलू लागली ...

" आई , का सहन करतात तुम्ही अभि आणि बाबांचं असं वागणं..? 

तुमच्या मुळेच या घराला घरपण आहे.

खूप कष्ट केले आहेत तुम्ही या घरासाठी...

तुमच्या कष्टाची जाणीव त्या दोघांनाही नाही.

आणि तुम्ही जोपर्यंत हीच जाणीव त्यांना करवून देणार नाही.

तोपर्यंत असंच चालू राहिल.

त्यांना उलट बोलायला शिका आई ...

तुमच्या हक्कासाठी ...

तुमच्या स्वाभिमानासाठी बोलायला शिका. 

मी आहे तुमच्या सोबत..

नेहमीच...! "

नयनाचे बोलणं ऐकून नलिनीताईंना खूप भरून आलं.

त्यांनी नयनाच्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

" नयना .., 

आज इतक्या वर्षात कोणीतरी मला समजुन घेतलं ग बाळा ..

लहानपणी लवकर आई गेली.

आणि माझे मातृसुख हरवले.

बाबा , कडक शिस्तीचे ..

त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्याची हिम्मत नव्हतीच कधी ...

नंतर लग्न झाले.

अभिजीतच्या बाबांचा पण तसाच कडक स्वभाव.

त्यामुळे सतत ऐकून घ्यायची सवयच लागली.

मग अभि चा जन्म झाला.

वाटलं ..माझा मुलगा तरी मला समजुन घेईल.

पण ती ही अपेक्षा अपूर्णच राहिली.

तो देखील त्याच्या बाबांना सामील झाला.

आता हे सगळं रोजचं झालं आहे.

त्यामुळे आता उलट उत्तर देण्याची माझ्यात हिम्मतच नाही.

आता शेवटपर्यन्त हे सगळं सोसणं हेच माझ्या हातात आहे.

आता मी मात्र त्यांना समजावू शकणार नाही. " 

नलिनीताई उदास होऊन नयनाला म्हणाल्या.

नयनाला नलिनीताईंचा स्वभाव माहिती होता.

त्या कधीच या वाईट गोष्टीला प्रतिकार करू शकणार नाही, 

हे देखील तिला माहित होते.

म्हणूनच तिने विश्वासराव आणि अभिजीतला चांगलाच धडा शिकवायचा ठरवला.

" आई , तुम्ही काही बोलू शकत नाही ,

हे माहिती आहे मला.

पण मला मात्र तुमच्या कष्टाची किंमत कळवून द्यायची आहे अभि आणि बाबांना ...

माझ्या डोक्यात एक मस्त प्लॅन आहे.

पण या सगळ्यात मला तुमची साथ हवी आहे.

आणि हो ..या सगळ्यात तुम्हाला कोणाला काहीच बोलायची गरज नाही.

त्यामुळे तुमचं काम सोपं होईल.

देणार ना मला साथ ..? "

नयनाने स्वतःचा हात पुढे करत नलिनीताईंना विचारलं.

आपल्या सुनेचे आपल्यावरील प्रेम पाहून नलिनीताईंना भरून आले.

स्वतःचा हात नयनाच्या हातात देत नलिनीताई म्हणाल्या..

" हो नयना बाळा ...

मी तुझी नक्कीच साथ देईल.

तू आणि फक्त तूच अद्दल घडवू शकतेस माझ्या मुलाला ...! "

दोन दिवस निघून गेले.

त्यानंतरच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं नाही , झोपायचं नाटक करायचं ,

असं नयनाने नलिनीताईंना सांगून ठेवलं.

नलिनीताई पण नयनाच्या सांगण्यावरून झोपून राहिल्या.

सकाळचे साडे आठ वाजले.

अभिजित झोपेतून उठून फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसला.

" आई , चहा आणि नाश्ता आण ना ग पटकन ...

कधीच वेळेवर टेबलवर नाश्ता नसतो तुझा..."

अभिजित वैतागून नलिनीताईंना हाक मारत होता.

तितक्यात विश्वासराव पण वॉक करून आले.

" नलिनी ..माझं गरम पाणी आणि औषधं घेऊन ये.

आधीच सगळं आणून ठेवता येत नाही का तूला ..

रोज रोज त्याच त्याच गोष्टींची आठवण करून द्यावी लागते तूला .."

विश्वासराव चिडून नलिनीताईंना आवाज देत होते.

त्यांचा आवाज ऐकून नलिनीताई घाबरून उठल्या.

पण तितक्यात नयना तिथे आली ,

आणि तिने खुणेनेच नलिनीताईंना पुन्हा झोपायला सांगितलं.

ती स्वतः चहा , गरम पाणी आणि विश्वासरावांची औषधं घेऊन गेली.

" हे घ्या बाबा ...तुमची औषधं ...

आणि अभि तुझा नाश्ता ...

ब्रेड टोस्ट केले आहेत...

सो त्यांना बटर लावून तू खा...

आणि बाबांना पण दे ..

तोवर मी स्वयंपाकाचे बघते.

कारण सगळं आवरून मला पण ऑफिसला निघायचं आहे. "  

" ब्रेडबटर ...? 

असला नाश्ता नाही करत मी नयना ..

आणि आई कुठे आहे..? 

हे सगळं तू का आणते आहेस ..? "

" तू जसा नाश्ता करतोस ..

तसा बनवणे मला शक्य नाही रे ..अभि ...

मला पण ऑफिसला जायचं आहे.

सो..प्लिज ..आहे ते खाऊन घे.

अभि , आईंची पाठ खूप दुखते आहे.

त्यांना बरं वाटत नाही.

बेड वरून उठणे सुद्धा शक्य नाही.

माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे.

तिला बोलवलं आहे मी त्यांच्या चेकअपला ..

येईल इतक्यातच.." 

इतकं बोलून नयना निघून गेली.

ब्रेडबटर आणि नयना दोघांकडे विश्वासराव आणि अभि आ-वासून पाहत होते.

आजपर्यंत इतक्या वर्षात अभिने आईला आजारी असल्यावर सुद्धा झोपून राहिलेले पाहिले नव्हते.

थोड्यावेळात स्मृती म्हणजेच नयनाची मैत्रीण नलिनीताईंचे चेकअप करण्यासाठी घरी आली.

नयनाने तिला घरातील परिस्थिती आधीच सांगितली होती.

त्यामुळे स्मृतीने देखील तिची साथ दिली.

चेकअप झाल्यावर बाहेर येऊन ती म्हणाली ..

" गेली कित्येक वर्ष शारीरिक कष्ट आणि सतत उभ्याने काम केल्यामुळे, 

नलिनीकाकूंच्या हाडांची प्रचंड झीज झाली आहे.

त्यामुळे सध्या काही दिवस तरी त्यांना बेडरेस्ट घ्यावी लागणार आहे.

कोणतेही काम त्यांना करू देऊ नका.

अन्यथा ऑपेरेशन करायची वेळ येईल.

आणि त्याचा सक्सेस रेट पण फारसा नाही.

त्यामुळे त्या कायमच्या अधू होऊ शकतात.

काळजी घ्या...

येते मी .." 

इतकं बोलून स्मृती तिथून निघून गेली.

स्मृतीचे बोलणं ऐकून विश्वासराव आणि अभि खूप टेन्शन मध्ये आले.

दुसऱ्या दिवसापासून नयनाला ऑफिस मध्ये जायचं असल्यामुळे 

तिने अभिला तिला मदत करायला सांगितली.

ऑफिस आणि नयनाला मदत करून अभि खूप थकून जात होता.

त्याला सारखी नलिनीताईंच्या जेवणाची आठवण येत होती.

नयना आणि अभिची उडणारी तारांबळ पाहून ,

कधीही कामाला हात न लावणारे विश्वासराव  पण त्यांना मदत करू लागत होते.

दोन दिवसांनी नयना एक आठवडा कंपनीच्या कामा निमित्ताने बाहेरगावी गेली.

कितीही काहीही झालं तरी जागेवरून उठायचं नाही.  

अशी नयनाने नलिनीताईंना ताकीद दिली होती.

घरच्या स्वयंपाकाची जबाबदारी नयनाने घरातील धुणी-भांडी करणाऱ्या मावशींना सोपवली.

अभि आणि त्याच्या बाबांचे होणारे हाल नलिनीताईंना बघवत नव्हते ,

पण नलिनीताई मजबूर होत्या.

नयना नसतांना कामवाल्या बाईने सुट्टी घेतली.

मग मात्र अभिची त्रेधा तिरपीट उडाली.

त्याने स्वतःला तर जेवण बाहेरून मागवले , 

पण विश्वासरावांना मात्र बाहेरचे जेवण पचत नसल्यामुळे ,

अभिने त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला घेतला.

एकटा अभि काय काय करणार म्हणूनच त्याला बाकी कामात मदत ,

म्हणून विश्वासरावांनी लादी पुसायची ठरवलं.

बादली मध्ये पाणी भरून आणून त्यांनी मॉपने फरशी पुसायला सुरुवात केली.

ओल्या फरशीवर चालताना त्यांचा पाय जोरात सटकला.

ते जमिनीवर पडणार इतक्यात नलिनीताईंनी त्यांना सावरले.

त्यांना खुर्चीवर बसवून त्या किचन मध्ये गेल्या.

पोळ्या भाजताना अभिला लागणारे चटके पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

" बास अभि ..

तू जा इथून ...

मी करते सगळं .." 

" अग आई पण तूला डॉक्टरने नाही सांगितलं आहे ना .." अभि 

" ते पाहू आपण नंतर ..

आधी तू जा इथून .." 

आईला किचन मध्ये पाहून अभि आश्यर्यचकित झाला.

नलिनीताई विश्वासरावांना पाणी घेऊन गेल्या.

आणि लगेच स्वयंपाकाला लागल्या.

नलिनीताईंनी वरणभात त्यावर तुपाची धार ,

चपाती , 

भेंडीची भाजी , 

टमाट्याची कोशिंबीर असा साधा बेत बनवला.

नलिनीताईंच्या हाताचे साधे पण रुचकर जेवण जेवून विश्वासराव आणि अभिजित तृप्त झाले.

जेवणं झाली आणि डोअरबेल वाजली.

अभिने दरवाजा उघडला.

बाहेर नयना उभी होती.

नलिनीताईंना काम करतांना पाहून नयना अभिवर खूप चिडली.

त्यावर अभि तिला म्हणाला ..

" अगं आजच आईने स्वयंपाक केला.

आज स्वयंपाक वाल्या मावशींनी दांडी मारली. 

त्यामुळे नाईलाज होता...

आणि तिने स्वतःहून हट्ट केला स्वयंपाक करण्याचा ..

आम्ही तिला फोर्स नाही केला नयना ...." 

अभि स्वतःची सफाई देत म्हणाला.

" त्यांनी हट्ट केला असेल ही...

पण त्यांना बरं नसतानाही तू त्यांना स्वयंपाक करू दिलास अभि ...? 

हेच तूला बरं नसतं तेव्हा तू हट्ट केला तर आई तूला काम करू देतात अभि ..? 

आठवून बघ अभि ..? "

नयनाच्या प्रश्नावर अभि निरुत्तर होता.

तो आजारी असताना आई त्याची किती काळजी घ्यायची,

हे सगळं त्याच्या डोळ्यासमोरुन जात होते.

" तुला आणि बाबांना दोघांनाही त्रास होऊ नये ,

म्हणून आजही आजारी असताना त्या तुमच्या मदतीला धावून आल्या. 

आणि तुम्ही ...

तुम्ही मात्र त्यांना सतत गृहीत धरत आले.

आई घरीच असते म्हणजे तिला काहीच काम नसतं, 

असंच वाटत असायचे ना तुम्हाला ..

मग आता स्वतःवर वेळ आल्यावर समजलं ना ...

कि एक गृहिणी घरात किती काम करत असते.

तुम्हाला सगळ्या सुखसोई आणि आराम मिळावा म्हणून चोवीस तास राबत असते.

तिचा सन्मान करायचा सोडून आपण मात्र त्यांचा अपमान करतो ...

त्यांच्या कष्टाला कवडीमोल ठरवतो.

दिवसरात्र आपल्याला आराम मिळावा म्हणून ती झटत असते , 

पण फक्त बाहेर जाऊन ती पैसे कमवत नाही, 

म्हणून आपण तिच्या कष्टाला मातीमोल ठरवतो.

अभि तूला खूप अभिमान आहे ना ...

तुझ्या नोकरीचा ..

तुझ्या यशाचा ...

पण तुझ्या यशामागे आईंचा हात आहे.

आय एम सॉरी बाबा ...

लहान तोंडी मोठा घास घेतेय मी ..

पण आई घरी होत्या ,

म्हणूनच तुम्ही तुमच्या नोकरीतल्या जबाबदाऱ्या सहज पणे पेलू शकल्या.

अभि चे आजीआजोबा ,अभि सगळ्यांची आईंनी चांगली काळजी घेतली,

म्हणूनच तुम्ही निश्चिंत होता.

पण आईंच्या कष्टाचा आदर करायचा सोडून तुम्ही फक्त त्यांची अवहेलना केलीत.

तुमचं यश तुमच्या एकट्याचे नाहीच मुळी ...

त्या मागे आईंनी केलेले कष्ट आहेत..

त्यामुळे आता तरी त्यांच्या कष्टाचा आदर करायला शिका . " 

इतके बोलून नयना तिच्या रूम मध्ये निघून गेली.

अभि आणि विश्वासराव मात्र खाली मान घालून उभे होते.

त्यांना स्वतःच्या वागणुकीचा पश्चाताप झालेला होता.

नलिनीताई पण काहीही न बोलता निघून गेल्या.

काही वेळाने अभिने नयना आणि नलिनीताईंना डायनिंग टेबलवर बोलवलं.

विश्वासराव आणि अभिने दुपारचा चहा आणि स्नॅक्स बनवून आणलं होतं.

विश्वासरावांनी प्लेट तयार केल्या.

अभिने नयना आणि नलिनीताईंना चहा आणि नाश्ता हातात आणून दिला.

विश्वासराव आणि अभि दोघेही गुढग्यावर बसले आणि म्हणाले ..

"घरातील गृहिणी हीच खरी आदिशक्ती असते...

पण आम्ही मात्र मंदिरात तिच्या दर्शनाला जातो.

आम्ही चुकलो.

पण तुझ्या कष्टाला आमचे मनापासून नमन...!"

त्यांचे हे बोलणे ऐकून नलिनीताई आणि नयनाच्या डोळ्यात आनंदाश्रू ओघळू लागले.

समाप्त ! 

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & Instagram 

✍©️ जया पाटील






























Post a Comment

0 Comments