#नाण्याची_दुसरी_बाजू_भाग_१
©️ जया पाटील
" अभिनव , अरे लग्नाची गोड बातमी कधी देतो आहेस ...? अरे तुझ्यासारखी मेहनत करणारी ,अशी गुणी मुलं फार कमी आहेत जगात.आज तुझ्या मेहनतीच्या जोरावर तू करिअरच्या इतक्या मोठ्या उंचीवर येऊन पोहचला आहेस.पण तरीही गर्वाचा लवलेश सुद्धा नाही तुझ्यात..
तुझा हा साधेपणाच भावतो आम्हा सगळ्यांना..खरंच , जी पण मुलगी तुझी अर्धांगिनी होईल ..ती खूप नशीबवान असेल..."शेजारच्या लिलाकाकू देशमुखांच्या अभिनवचे कौतुक करत होत्या.अभिनव होता देखील तसाच अगदीच कौतुक करण्यासारखा.
अभिनव देशमुख. शरद आणि सीमा देशमुख या मध्यमवर्गीय दाम्पत्याचा लाडका लेक. शरद देशमुख एका कंपनीत काम करणारे एक साधारण कर्मचारी. मुलगा अभिनव आणि मुलगी अभिलाषा , पत्नी सीमा असा त्यांचा साधारण चौकोनी परिवार.
अगदी छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा घरात एकमेकांना शेयर करायच्या. आपल्या अडचणी मनात न ठेवता त्या घरातील सगळ्यांसोबत शेयर करून,त्या अडचणींवर मार्ग काढायचा ही शिकवण,लहानपणापासून शरदरावांना त्यांच्या आईबाबांनी दिली होती. त्यामुळे अर्थातच ते गुण अभिनव आणि अभिलाषा दोघांमध्येही होतेच.
कुठल्याच संकटांनी खचून न जाता सगळे मिळून त्यावर मात करायची हे सगळ्यांनी ठरवलं होतं.देशमुख परिवाराला देखील आयुष्यात अनेक अडचणीचा सामना करावा लागला , पण सगळ्यांची सोबत असल्यामुळे त्यांना ती संकटे अगदीच शुल्लक वाटली.
सुरुवातीला शरदरावांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.पण शरदरावांचे कष्ट आणि त्यांना लाभलेली सीमाताईंची साथ,यामुळे त्यांनी सगळ्या अडचणींवर मात केली. एकमेकांच्या साथीने शरदरावांनी आणि त्यांच्या परिवाराने,सगळ्या अडचणींचा धैर्याने आणि नेटाने सामना केला, त्यामुळेच ते त्यांच्या वर्तमानकाळात यशस्वी झाले. शरदराव नोकरीसोबतच काही फर्मवरची अकाउंटची कामे करून देत असत.त्यातून मिळणाऱ्या वरच्या पैश्यामुळे घराला थोडाफार हातभार लागत असे.
सीमाताई पण स्वयंपाकात खूप सुगरण होत्या. त्यांनी थालीपीठ भाजणी , लोणची , खारवलेल्या मिरच्या हे सगळे पदार्थ बनवून विकायला सुरुवात केली.या सगळ्यांसाठी सीमाताई खूप मेहनत घेत होत्या.त्यांच्या मेहनतीला यश मिळत होते.सीमाताईंच्या या कमाईमुळे शरदरावांना देखील खूप मोठा आधार मिळाला होता.
सीमाताई आणि शरदराव दोघांच्याही कमाईमुळे, घरखर्च सांभाळून थोडा पैसा शिल्लक राहत होता.त्यातून त्यांनी स्वतःचे घर उभारले. अभिनव आणि अभिलाषा पण खूप गुणी होते.आईबाबांच्या कष्टाची त्यांना जाणीव होती. त्यामुळे ते दोघेही खूप अभ्यास करत असत. त्यांच्या मेहनतीला यश देखील मिळाले.
अभिनव बारावीच्या परीक्षेत आणि इंजिनीरिंग प्रवेशासाठी होणाऱ्या पूर्वपरीक्षेत उत्तम गुण मिळवून पास झाला.त्याला आपल्या देशातील सर्वोत्तम अशा आय आय टी इन्स्टिटयूट मध्ये कॉम्पुटर इंजिनीरिंग कोर्सला ऍडमिशन मिळाली. अभिनव तिथेही प्रत्येक वर्षी अव्वल येत राहिला. शेवटच्या वर्षीही त्याला उत्तम गुण प्राप्त झाले. कॉलेजकडूनच होणाऱ्या कॅम्पस इंटरव्हिवमध्ये त्याचे सिलेक्शन एका चांगल्या कंपनीत झाले. त्याला चांगले पॅकेज देखील मिळाले.
अभिनवची मेहनत आणि त्याच्या आईबाबांचे आशीर्वाद फळाला येत होते.नोकरीत देखील त्याच्या कामाच्या डेडिकेशन मुळे अभिनव लवकरच मॅनेजरपदावर पोहोचला. अभिलाषाला देखील देशातील चांगल्या इन्स्टिटयूट मध्ये एमबीए ला ऍडमिशन मिळाली.
सद्गुणी मुले हीच खरी संपत्ती असं आपण नेहमीच म्हणतो. शरदराव आणि सीमाताईंना ही संपत्ती भरभरून प्राप्त झाली होती. शरदराव आणि सीमाताईंच्या कष्टाला फळ मिळाले होते.आपल्या दोघीही मुलांचे यश पाहून शरदराव आणि सीमाताई भरून पावत होते.
सगळं काही वेल सेट होते. त्यामुळे शरदरावांनी आणि सीमाताईंनी अभिनवसाठी वधू संशोधनाला सुरुवात केली.अभिनव मात्र या सगळ्या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट घेत नव्हता.अजून थोडे दिवस थांबू आणि मग लग्नाचे पाहू असं सांगून तो वेळ टाळून देत होता.
अभिनवचा लग्नाबद्दलचा निरुत्साह शरदरावांच्या लक्षात आला.अभिनव थोडासा लाजरा स्वभावाचा आहे हेच शरदराव जाणून होते. म्हणूनच त्यांनी या बाबतीत अभिनवसोबत बोलायचं ठरवलं.
शरदरावांनी त्याला जवळ बोलावून त्याची विचारपूस केली..
" अभिनव , कसल्या गोंधळात पडला आहेस सध्या ..?खूप अडचणींवर मात करत आपण इथवर येऊन पोहोचलो आहे,आता सगळं काही आलबेल आहे.त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी मुलगी पहायला सुरुवात केली आहे..पण तू मात्र याबाबतीत कुठलाच उत्साह दाखवत नाही आहेस...प्रत्येक वेळी तू लग्नाची गोष्ट निघाली कि टाळाटाळ करतोस..याचा आम्ही काय अर्थ घ्यायला हवा ..?
तू आमच्या पसंतीने लग्न करावं असं नाहीच मुळी ..तुला देखील तुझ्या ऑफिस मधली किंवा कॉलेजमधली मुलगी आवडत असेल तर नक्की सांग. आम्ही तुझी पसंत देखील आनंदाने स्वीकारू ...कारण शेवटी संसार तुम्हाला करायचा आहे. तुझी पसंत आम्हाला सांग ..आम्ही भेटू तिला आणि तिच्या आईबाबांना ..."
शरदरावांनी अभिनवला स्पष्टपणे विचारलं.खरंतर शरदरावांच्या प्रश्नावर अभिनव खूपच गोंधळला.त्यांना काय उत्तर द्यावे हेच त्याला सुचेनासे झाले.
" अ...हा ....ना... नाही बाबा ...तस काहीच नाही. अजूनपर्यंत मी कोणत्याच मुलीबद्दल असा विचार केला नाही.पण मी लग्नाची गोष्ट टाळतोय कारण ...मला भीती वाटते कि यामुळे माझ्या करियरला ब्रेक लागेल.संसाराच्या अडचणी सांभाळून मी ऑफिसकडे लक्ष देऊ शकणार नाही.म्हणून अजून थोडं थांबूया असं वाटतंय मला बाबा ..."
अभिनव अडखळत शरदरावांना म्हणाला ..
शरदरावांना त्याचा गोंधळ समजला ..ते त्याला समजावणीच्या सुरात म्हणाले ..." तुझ्या मानाची घालमेल मला समजते आहे अभिनव ...बाळा , शिक्षण , करियर या गोष्टी जशा आपल्या आयुष्यात महत्वाच्या आहेत.तसंच लग्न , मुलंबाळं ह्या सगळ्या गोष्टी देखील आपल्या आयुष्यात तितक्याच महत्वाच्या आहेत.त्या देखील योग्य वयातच..
आपण करियर करतो ..पैसे कमावतो कोणासाठी ..?आपल्या मुलांसाठीच ना ... आपली मुलं आपली ध्येय असतात. तुम्ही होतात म्हणूनच आम्ही इतक्या खडतर परिस्थितीवर मात करून इथवर आलोय. तुमच्यामुळे आमच्या जीवनाला देखील ध्येय आणि अर्थ प्राप्त झाला.
जोडीदार हा आपली अडचण बनत नाही तर आपला भक्कम आधार बनतो. त्यामुळे मनातील सगळे किंतु काढून टाक.आणि बोहल्यावर चढायला तयार हो...कधीही मनात शंका आली तर ..मित्रत्वाच्या नात्याने माझ्याशी बोल...." अश्या प्रकारे शरदरावांनी अभिनवची समजूत काढली.
अभिनव देखील लग्नाला तयार झाला. अभिनवच्या कामाच्या शिस्तीमुळे ऑफिस मध्ये तो सर्वांचा लाडका होता. एकदा अभिनव त्याच्या बॉसला अर्थातच महेश आनंदकर यांना कॅबिन मध्ये भेटायला गेला.त्यावेळी त्याची भेट महेशरावांच्या जवळच्या मित्रासोबत अर्थातच शामकांत देसाई यांच्यासोबत झाली.
थोड्याच वेळाच्या चर्चेतच अभिनवच्या वागण्या- बोलण्यामुळे शामकांत देसाई इंप्रेस झाले. अभिनव कॅबिन मधून बाहेर गेल्यावर त्याच्या महेश सरांनी देखील शामकांत देसाईंजवळ त्याचे खूप कौतुक केले.त्यावेळी शामकांत देसाईंच्या डोक्यात वेगळाच विचार सुरु होता.
शामकांत देसाई म्हणजे त्या शहरातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व.आधीपासूनच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन ते जन्माला आले होते. त्यांची वडिलोपार्जित भरपूर अशी शेतजमीन होती.शामकांत देसाईंचे वडील मोठे प्रगतिशील शेतकरी होते.प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांचा संपूर्ण तालुक्यात वचक होता.
शेतीसोबतच त्यांनी इतर शेतीपूरक लघुउद्योग सुरुवात केले. सुरुवातीला हे सगळे थोड्या प्रमाणात होते,पण या रोपट्याचे शामकांत देसाईंनी वटवृक्षात रूपांतर केले.शामकांतरावांनी यासाठी लागणारे उच्चशिक्षण प्राप्त केले.त्यासाठी खूप मेहनत ,कष्ट घेतले.
पोल्ट्रीफार्म , केळीपासून स्वादिष्ट पदार्थ,केळीच्या खोडापासून खत निर्मिती, केळीच्या खोडापासून धागे निर्मिती,दुग्धव्यवसाय,क्रीम सेपरेटर आणि पाश्चरायझेशन , कोंबडखत निर्मिती ,असे अनेक शेती पूरक लघुउद्योग उभारून त्यांनी कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता.
कित्येक होतकरू तरुणांना त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु करून देण्यास मदत केली होती.त्यांच्या या उद्योगाच्या शाखा आता अनेक जिल्ह्यात सुरु झाल्या होत्या. त्यांना एक मुलगी होती अंकिता आणि मुलगा श्रेणिक. श्रेणिक त्यांच्या लघुउद्योगांचा व्याप सांभाळत होता ,पण अंकिताला मात्र यात फारशी रुची नव्हती.कॉम्पुटर इंजिनीरिंग करून ,ती एका आय टी कंपनीत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून जॉब करत होती.
अभिनवला भेटल्यावर तोच आपल्या मुलीसाठी योग्य जोडीदार आहे ,असं शामकांतरावांना वाटून गेलं.अभिनव हुशार आहे , सद्गुणी आहे.पुढे जाऊन तो आपल्या उद्योगांच्या व्यापात देखील हातभार लावू शकतो हे त्यांनी अचूक हेरले. शामकांतरावांनी त्यांची इच्छा त्यांच्या मित्राला म्हणजेच अभिनवच्या सरांना महेशरावांना बोलून दाखवली.त्यांना देखील शामकांत रावांचा विचार पटला.
महेशराव अंकिताचे स्थळ घेऊन अभिनवच्या घरी आले.महेशरावांनी शरदरावांना अंकिता आणि तिचे बाबा शामकांत देसाई यांच्याबद्दल सगळी माहिती दिली.इतक्या मोठ्या माणसाची मुलगी अभिनवला सांगून आली म्हणूनच शरदरावांना आश्चर्य वाटले.अंकिता आपल्या घरात मॅनेज होईल कि नाही अशी शंकाही त्यांच्या मनात आली.त्यांनी आपला विचार महेशरावांना बोलून दाखवला.
" महेशराव आम्ही ठरलो सामान्य माणूस.शामकांत देसाई साहेबांसारख्या इतक्या मोठ्या माणसाने,माझ्या अभिनवला स्वतःच्या लेकीसाठी आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडण्याचा विचार करणे.ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे ,पण आमची उंची इतक्या मोठ्या माणसाच्या व्याही होण्याची आहे कि नाही ...? हेच आम्हाला समजत नाही.कृपया गैरसमज करू नका,परंतु आम्हाला हा संबंध म्हणजेच 'नाकापेक्षा मोती जड' असा वाटतो आहे."
शरदराव शांत स्वरात महेशरावांना म्हणाले. महेशरावांना शरदरावांची विवंचना समजली. ते समजावणीच्या सुरात बोलू लागले..
" शरदराव , तुमच्या मनाची घालमेल मी समजू शकतो पण ,मनावर कसलेच दडपण ठेऊ नका. शामकांत देसाई हे अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे.त्यांनी देखील शून्यातून इतके मोठे विश्व उभारले आहे. त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. त्यामुळे त्यांना पैसेवाला खूप श्रीमंत असा नाही तर ..कष्टाची जाण असणारा , प्रामाणिक ,मेहनती मुलगा जावई म्हणून हवा आहे.अभिनवला तर मी ओळखतोच.त्याच्या सारखा गुणी मुलगा तर शोधूनही सापडणार नाही.त्यामुळे निश्चिन्त राहा.
एक दोन दिवसात शामकांतराव तुम्हाला मुलगी पहायला येण्याचे आमंत्रण देतीलच.वहिनीसाहेब , अभिनव आणि तुम्हीही त्या दिवशी अंकिताला भेटून घ्या. शामकांतरावांच्या संपूर्ण परिवाराची भेट त्या दिवशी होईलच.त्यांचीही दोन्ही मुले खूप गुणी आहेत.त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.लवकरच भेटू.येतो मी. " इतकं बोलून महेशराव तिथून निघून गेले.
शरदरावांनी महेशरावांसोबत झालेली सगळी बातचीत सीमाताई आणि अभिनव दोघांनाही सांगितली.त्यांनाही सगळं बोलणं पटलं.इकडे शामकांतरावांनी देखील अभिनवबद्दल आपल्या घरी आणि अंकिताला सांगितलं.अचानक लग्नाचा विषय काढल्यामुळे अंकिता खूपच बिथरली.तिने या विषयावर शामकांतराव आणि तिच्या आईसोबत बराच वाद घातला.बराच वेळ त्यांच्यात बोलचाल सुरु होती.
" मी सांगतो तिच पूर्व दिशा असणार.यानंतर मी कोणाचा एकही शब्द ऐकून घेणार नाही.दोन दिवसात कांदेपोह्यांचा कार्यक्रम असेन.यात काहीच बदल होणार नाही. " असे शामकांतरावांनी ठणकावून सांगितलं.आणि त्या वादाला तिथेच पूर्णविराम मिळाला.
शामकांतरावांनी शरदरावांना फोन करून मुलगी पाहायला येण्याचे आमंत्रण दिले.शरदरावांनी देखील होकार दिला.दोन दिवसांनी कांदेपोह्यांचा कार्यक्रम ठरला.
क्रमश:
हा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरळीत पार पडेल कि नाही ..?अंकिताच्या मनात काय असेल ..?अभिनवला अंकिता पसंत पडेल कि नाही ..?
अभिनव आणि अंकिताच्या नात्याचे भविष्य काय असेल ..?हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता आहे ना ...? मग त्यासाठी एकाच नाण्याची दुसरी बाजू या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका.
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात, त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google & Instagram
✍©️ जया पाटील
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box