नाण्याची दुसरी बाजू भाग ३

 #नाण्याची_दुसरी_बाजू_भाग_३


©️ जया पाटील 


भाग दोन वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/11/blog-post_34.html

मागील भागात आपण पाहिले की अभिनव आणि त्याचे कुटुंबीय अंकिताच्या घरी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला जातात. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. अभिनव आणि त्याच्या कुटुंबियांना अंकिता पसंत पडते. शामकांतरावांनी तर अभिनवला आधीच जावई म्हणून पसंत केलेले असते. दोघीही कुटुंबांच्या आपसी संमतीने ते आधी साखरपुडा करून काही दिवसांनी लग्न करायचे असा निर्णय घेतात. येत्या पंधरा दिवसात साखरपुड्याची तारीख असल्यामुळे दोघीही कुटुंबांची लगबग सुरु होते. आता पुढे....

शरदराव आणि सीमाताई दोघेही पैश्यांची जुळवाजुळव करतात. अंकितासाठी त्यांना दागिन्यांची खरेदी करायची असते. अभिनव त्यांना थोड्या पैश्यांची मदत करायची ठरवतो पण शरदराव स्पष्टपणे नकार देतात. त्यांनी अभिलाषा आणि होणाऱ्या सुनेच्या दागिन्यांसाठी लागणाऱ्या पैश्यांची व्यवस्था आधीच केलेली असते. अभिनवला त्याच्या आईबाबांच्या दूरदृष्टीचे आणि आर्थिक व्यवस्थापनाचे खूप कौतुक वाटते.  

शरदराव आणि सीमाताई अंकितासाठी एक छानशी कांजीवरम मोठ्या काठाची साडी घेतात. डार्क मोरपंखी रंग , त्यावर गोल्डन जरीच्या बुट्ट्या आणि गोल्डन नक्षीकाम असलेला भरजरी पदर. साडीतील ब्लॉउजपीस काढून त्या अंकिताला ब्लॉउज शिवण्यासाठी तिच्या घरी पाठवतात.

साडीसोबतच ते अंकितासाठी सुंदरसा नाजूक राणीहार ,कानातले ,अंगठी आणि नथ घेतात. अभिलाषाच्या मदतीने त्या अंकितासाठी सगळ्या मेकअपच्या वस्तूंची खरेदी करतात. साखरपुड्याच्या एक दिवस आधी त्या फळ - सुकामेवा या सगळ्या वस्तू आणून सुंदर नक्षीदार टोपल्यांमध्ये सजवून घेतात. दोघीही कुटुंबीय आपल्या नातेवाईकांना द्यायच्या शगुनाची खरेदी करतात. सगळ्या पाहुण्यांची यादी तयार होते. आमंत्रण देऊन होतात.  

शामकांतरावांच्या घरी देखील खूप तयारी सुरु असते. शामकांतराव स्वतः अभिनवला घेऊन जाऊन त्याच्या साखरपुड्याच्या ड्रेसची खरेदी करतात. त्याच्यासाठी सोन्याची चैन आणि ब्रेसलेट खरेदी करतात. खूप महागड्या वस्तू ते त्याच्यासाठी घेत असतात पण इतक्या सगळ्या वस्तू मला नको असे सांगून अभिनव शामकांतरावांना नम्रपणे नकार देतो. त्याच्या या स्वाभिमानाचे आणि प्रामाणिकपणाचे शामकांतरावांना खूप कौतुक वाटते.  

अंकिता शामकांतरावांची एकुलती एक लेक असल्यामुळे त्यांना तिचे लग्न ,साखरपुडा खूप धुमधड्याक्यात करायचे असते त्यामुळे ते अगदीच जोरात तयारीला लागलेले असतात.शामकांतरावांच्या मुलीचा साखरपुडा म्हणजे तो खास असणारच...!  साखरपुड्याचा व्हेन्यू , तिथले डेकोरेशन , थीम्स , जेवणाचा आणि नाश्त्याचा मेनू , डेझर्ट या सगळ्या गोष्टी शामकांतराव स्वतः इव्हेंट प्लँनर्स सोबत चर्चा करून ठरवत असतात.

शेवटी तो दिवस आला. शरदराव , सीमाताई अभिनव ,अभिलाषा आणि त्यांचे पाहुणे ठरलेल्या वेळेस तयार होऊन साखरपुड्याच्या लोकेशनला पोहोचले. एका मोठ्या रिसॉर्टमध्ये साखरपुडा पार पडणार होता.

साखरपुड्याच्या हॉल खूप सुंदर पद्धतीने सजविलेला होता. दाराच्या बाहेरच खूप सुंदर आणि मोठी रांगोळी रेखाटलेली होती. स्टेजच्या आजूबाजूला सुंदर पाण्याचे कृत्रिम धबधबे होते. स्टेजच्या पाठीमागे फुलांच्या साहाय्याने मोराची आरास करण्यात आली होती. त्यावर अंकिता आणि अभिनवचे दोन मोठे फोटो लावलेले होते.  

खूप सारे फोकस लाईट स्टेजची शोभा वाढवत होते. झुंबरांची सजावट खूपच मनमोहक वाटत होती. सगळ्या हॉल मध्ये आणि बाजूच्या गार्डन मध्येही फुलमाला आणि लायटिंग लावण्यात आली होती. सनईचे सुरु वातावरण प्रसन्न बनवत होते.

गेटवरच शामकांतराव आणि शैलजाताई प्रत्येक  पाहुण्यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करत होते. अभिनव आणि त्याच्या परिवाराचे आगमन झाले. सनई ,चौघड्याच्या सुरांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. अभिनवच्या स्वागतासाठी पायघड्या टाकण्यात आल्या होत्या.  

अभिनव आणि त्याच्या कुटुंबियांवर फुलांचा वर्षाव करून त्याचे स्वागत करण्यात आले. पंचारती घेऊन शैलजाताई दारातच उभ्या होत्या. आरती ओवाळून अभिनवचे स्वागत करण्यात आले. अभिनव घरूनच तयार होऊन आला होता तरीही त्याच्या खातिरदारीसाठी शामकांतरावांनी खास मेकअप आर्टिस्टची व्यवस्था केली होती. अभिनव तयार होण्याच्या रूममध्ये गेला.  

आलेल्या पाहुण्याची तेथील मदतनीस काळजी घेत होते. अंकिता तयार होऊन स्टेजवर आली. मरून रंगाच्या पैठणीत ती खूपच खुलून दिसत होती. मरून रेडिश पैठणी ,त्यावर बुट्ट्यांची रेलचेल , सुबक नारळी काठ ,पिसारा फुलविले मोरांची नक्षी..सगळंच कसं सुरेख जमून आलेले होते.

गळ्यातील चिंचपेटी , लांब तन्मणी , कानात सुंदर इअरकफ , दंडावर सुंदरसे खडे आणि मोतीचे बाजूबंद ..केसांचा जुडा आणि कपाळावर पाडलेल्या भांगातून सजणारी नाजुकशी बिंदी , नाकाची शोभा वाढविणारी नथ , हातात साडीला मॅचिंग बांगड्या आणि मोत्याचे तोडे हा सगळा पेहराव अंकिताचे सौंदर्य आणखीनच खुलवत होते.

मुळातच तो गोरा रंग आणि त्यावर चढलेला दागिन्यांचा साज.... !विलक्षण सौंदर्य ते ...नक्षत्रासारखे अनुपम ... कोणालाही भुरळ पाडेल असे...!अगदी अप्सरेसोबत तुलना व्हावी अशीच होती  अंकिता..... अगदी लावण्यवतीच जणू ... !

अंकिता पाटावर येऊन बसली. शरदराव आणि सीमाताईंनी तिची गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे पूजा केली. घरची होणारी लक्ष्मी म्हणून तिचे पाद्यपूजन केले. तिच्यासाठी घेतलेल्या सगळा  शगुन तिच्या हातात दिला. पाच सवाष्णींनी अंकिताची ओटी भरली. सजविलेला साखरेचा पुडा तिच्या हातात दिला. सासरची साडी आणि दागिने परिधान करण्यासाठी अंकिता पुन्हा तिच्या रूम मध्ये गेली.

त्यानंतर अभिनव तिथे आला. पर्ल रंगाचा कुडता , रेडिश मरून रंगाची चुडीदार , त्यावर सुंदरसा ब्रोच , पायात कोल्हापुरी चप्पल या सगळ्या पेहरावात अभिनव अगदीच राजकुमार भासत होता. तो देखील विडा घेऊन पाटावर येऊन बसला. शामकांतराव आणि शैलजाताईंनी त्याची देखील गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे पुजा आणि पाद्यपूजन केले. त्याच्यासाठी घेतलेले कपडे त्याच्या हातात दिले. त्यांच्याकडच्या पाच सवाष्णींनी त्याचे औक्षण केले आणि तो तयार होण्यासाठी निघून गेला.  

अंकिता तिचा सासरचा पेहराव म्हणजेच सीमाताईंनी घेतलेली मोरपंखी पैठणी , राणीहार , कानातले सगळे काही परिधान करून हॉल मध्ये आली. या सगळ्यात देखील ती खूपच सुंदर दिसत होती. अंकिताचे सौंदर्य ,शिक्षण आणि श्रीमंती पाहून मंडपातील प्रत्येक जण मनोमन फक्त हेच बोलत होता की.. ' "अभिनव ,खरंच खूप नशीबवान आहे. त्याला अगदीच परिपूर्ण बायको मिळाली आहे. "  

अंकिताच्या मागोमाग अभिनव देखील तयार होऊन आला. राखाडी कलरचा सूट ,त्याला साजेसे शूज , हातात छान असे घड्याळ , डोक्यावर टोपी अश्या पेहरावात तो अगदीच राजबिंडा दिसत होता. त्याची विनम्रता त्याच्या वागण्यातून , बोलण्यातून दिसत होती. आलेली पाहूणे मंडळी इतका सुशील आणि हुशार जावई मिळाल्याबद्दल शामकांतरावांचे अभिनंदन करत होती. या सगळ्यामुळे शामकांतरावांचा उर गर्वाने फुलून येत होता.  

अंगठ्यांची पूजा करून गुरुजींनी अभिनव आणि अंकिताच्या हातात दिल्या. सर्वप्रथम अंकिताने अभिनवच्या हातात अंगठी घातली. तिचा तो पहिला स्पर्श अभिनवला मोहवून गेला. अभिनव आपल्या गुडघ्यांवर बसला आणि अंकिताचा हात हातात घेऊन तिच्या हातात अंगठी घातली. सगळ्यांना त्याचा हा रोमँटिक अंदाज खूप आवडला. अंकिताही मनापासून खूप हसली. 

शामकांतराव आणि शरदराव दोघांनीही एकमेकांना नारळ देत व्याहीभेट घेतली. आलेल्या पाहुणे मंडळीला मानाचे टोपी रुमाल देण्यात आले.  

साखरपुड्याच्या कार्यक्रम अगदीच थाटामाटात पार पडला. सगळेच खूप खुश होती. आता लवकरच लग्नाची धावपळ सुरु होणार होती. साखरपुड्याच्या वेळी झालेल्या भेटीत अभिनवने अंकिताचा फोननंबर घेतला. 

साखरपुड्याच्या रात्री अभिनवने अंकिताला मेसेज केला. " हाय अंकिता ..अभिनव हीयर.." अंकिताने मेसेज वाचला पण त्यावर तिने काहीच उत्तर दिले नाही. अभिनवला थोडं विचित्र वाटलं पण अजून सगळं नवीन आहे. त्यामुळे अंकिताला अवघड होत असेल म्हणून त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. दोन दिवस उलटून गेले.

अभिनवने पुन्हा एकदा अंकिताला मेसेज केला. " हाय अंकिता , हावू आर यु...? " तो पण मेसेज तिने वाचला पण अभिनवला काहीच रिप्लाय दिला नाही. अभिनवला खूप विचित्र वाटले. त्याने पुन्हा अंकिताला मेसेज केला .

" आय कॅन अनडस्टॅंड ... तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठीही हे नातं नवीन आहे. त्यामुळे माझ्यासोबत बोलताना तुला थोडं अवघडल्यासारखे वाटत असेल पण आपल्या आयुष्याची एक नवीन सुंदर सुरुवात होणार आहे.  

मग त्यासाठी आपल्या दोघांनाही एकमेकांना समजुन घ्यायला हवं ना आणि हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण एकमेकांसोबत आपल्या फीलिंग्स , आपले विचार शेयर करू. त्यासाठी आपण बोलायला तर हवंच ना ...प्लीज माझ्या या सांगण्याचा नक्की विचार करशील. "  

हा मेसेज देखील अंकिताने वाचला पण नो रिप्लाय. अभिनवला खूपच टेन्शन आले. तितक्यात अंकिताचा रिप्लाय आला. "आय एम फाईन ..थँक्यू .." तिचा मेसेज पाहुन अभिनवच्या जीवात जीव आला. हळूहळू अंकिता मोकळेपणाने आपल्यासोबत नक्कीच बोलेन अशी अभिनवने स्वतःची समजूत घातली.  

अंकिताही तुटक तुटक का असेना अभिनवसोबत बोलू लागली. फोनवर ती फारशी बोलत नसे. काम आहे , ऑफिसचा कॉल आहे असं सांगुन टाळत असे. त्यामुळे  फक्त मेसेज आणि कॉल मधून अभिनवला तिच्या मनाचा अंदाज येत नव्हता म्हणूनच त्याने तिला भेटायचं ठरवलं.  

त्याआधी त्याने शरदराव आणि शामकांतरावांकडून अंकिताला भेटण्याची परवानगी मागितली. दोघांकडून परवानगी मिळाल्यावर त्याने तिला भेटण्याविषयी कळविले. त्यावर अंकिताने अभिनवला स्पष्ट नकार दिला. अभिनवने दोनदा-तीनदा समजावल्यावर अंकिताने होकार दिला. रविवारी सायंकाळी भेटायचे ठरले.  

अभिनव आणि अंकिताची पहिली भेट कशी असेल..?

अंकिताच्या गूढ वागण्यामागे काही गुपित असेल का ..? 

ते गुपित अभिनवला समजू शकेल का..? 

काय असेल अभिनव आणि अंकिताच्या नात्याचं भविष्य ..? 

हे सगळं जाणून घेण्यासाठी एकाच नाण्याची दुसरी बाजू या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

क्रमश :

या कथेचा एक भाग रोज सकाळी अकरा वाजता आमच्या  " Velvetkavisha-वेलवेटकवीशा" या फेसबुक  पेजवर प्रकाशित होईल. सगळ्यात आधी नवीन भाग वाचण्यासाठी आमच्या या पेजला लाईक आणि फोल्लो करायला विसरू नका.

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & Instagram 

✍©️ जया पाटील



Post a Comment

0 Comments