नाण्याची दुसरी बाजू भाग २

 #नाण्याची_दुसरी_बाजू_भाग_२

©️ जया पाटील 


भाग एक वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/11/blog-post_17.html

मागील भागात आपण पाहिलं कि अभिनवच्या कर्तृत्वावर खुश होऊन शहरातील मोठी असामी शामकांत देसाई यांनी आपली मुलगी अंकितासाठी त्याला पसंत केले.


त्यांनी कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला अभिनव आणि त्याच्या परिवाराला आमंत्रित केले. अभिनवचा सगळा परिवार आनंदित झाला. अंकिता मात्र फार काही खुश नव्हती. तिने याबाबतीत तिच्याबाबांसोबत म्हणजे शामकांत देसाईंसोबत बराच वाद घातला.  


" मी सांगतो तिच पूर्व दिशा असणार. यानंतर मी कोणाचा एकही शब्द ऐकून घेणार नाही. दोन दिवसात कांदेपोह्यांचा कार्यक्रम असेन. यात काहीच बदल होणार नाही. " 

असे शामकांतरावांनी ठणकावून सांगितलं आणि त्या वादाला तिथेच पूर्णविराम मिळाला.


 ठरल्याप्रमाणे शरदराव , सीमाताई अभिनव आणि अभिलाषा सगळे देसाईंच्या घरी वेळेवर पोहोचले. सोबत अभिनवचे बॉस आणि शामकांतरावांचे जिवलग मित्र महेश आनंदकर देखील होते.


शामकांतरावांचा बंगला बाहेरूनच खूपच आलिशान दिसत होता. गडद अक्षरात बंगल्यावर त्याचे नाव झळकत होते ' यशोनील ' ...

अगदी घराच्या नावातूनच शामकांतरावांचे यश प्रतीत होत होते. गेटवर सुंदर नेमप्लेट लावलेली होती.वरती मोठा गणराज ... त्याखाली 


"श्री शामकांत देसाई व शैलजा देसाई" अशी नावे झळकत होती.


शरदराव आणि परिवार गेट उघडून आत आले. समोरच शामकांत उभे होते. शुभ्र पांढरा कुर्ता आणि पायजमा , त्यावर एक राखाडी जॅकेट , हातात उंची घड्याळ , बोटात दोन अंगठ्या , गळ्यात सोन्याची असा त्यांचा पेहराव होता. चेहऱ्यावरची पांढरी दाढी त्यांच्या व्यक्तिमत्वाला चांगली शोभा आणत होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते.  


त्यांच्या शेजारीच त्यांच्या धर्मपत्नी शैलजाताई उभ्या होत्या. वय साधारण पंचेचाळीस , मोरपंखी रंगाची साडी. कपाळावर मेडीयम साईझची टिकली , भांगात भरलेले सिंदूर , दोन्ही हातात दोन दोन काचेच्या बांगड्या. त्यातून हळूच डोकावणाऱ्या सोन्याच्या पाटल्या , गळ्यात ठसठशीत सोन्याचे मंगळसूत्र , डोक्यावरून घेतलेला पदर त्यांच्या शालीनतेला दर्शवत होता.


शामकांत देसाई आणि त्यांच्या धर्मपत्नी शैलजाताईंनी अभिनव आणि त्याच्या परिवाराचे मनापासून स्वागत केले. 


शामकांतरावांचा बंगला खूप मोठा होता. सुंदर सोफे , भरजरी पडदे , खूपच सुंदर आणि महागड्या शोभेच्या वस्तू , मोठ-मोठे झुंबर , सुंदर रंगसंगती , एथनिक इंटिरियर सगळेच उत्तम जुळून आले असल्यामुळे यातूनही घर खूपच सुरेख दिसत होते. शामकांतरावांचे वैभव पाहून शरदरावांचे डोळे दिपून गेले.


 " खरंच ही आपल्या मुलासाठी योग्य सोयरीक आहे ना... उगाचच सगळं काही डोईजड व्हायला नको." असा विचार त्यांच्या मनात डोकवत होता. तशी ही शंका त्यांनी या पूर्वीही अभिनवचे बॉस आणि शामकांत रावांचे मित्र असलेल्या महेश आनंदकर यांना बोलून दाखवली होती. 


शामकांतराव हे अतिशय विनम्र गृहस्थ आहेत. त्यांनीही पूर्वी हलाखीचे दिवस , जीवनातील चढउतार पाहीले आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही असे महेशरावांनी समजावले आणि शरदराव थोडे निश्चिन्त झाले होते.  


महेशरावांनी समजावले तरी कितीही झालं तरी शरदरावांचे बापाचे काळीज होते. त्यामुळे मुलाच्या भविष्याची काळजी त्यांना अस्वस्थ करत होती.


शामकांतरावांनी शरदरावांच्या परिवारासोबत त्यांच्या घरातील सगळ्या सदस्यांची ओळख करून दिली. श्रेणिक आणि अभिनव बराच वेळ गप्पा करत होते.


टेबलवर विविध मिठाया जसे काजूकतली , सीताफळ बासुंदी , कालाजामून , चॉकोलेट बर्फी ,कोकोनट बर्फी , नाश्त्याचे पदार्थ जसे चकली, बाकरवडी , राजकचोरी ,खट्टामिठा चिवडा , पोहे , उपमा  अश्या अनेक पदार्थाची रेलचेल होती.  


नाश्ता झाल्यावर मुलीला बोलवा असं शरदरावांनी सांगितलं. शामकांतरावांनी देखील होकार दिला. अंकिता समोर येणार म्हणून अभिनवच्या हृदयाची गती वाढली. तो आधीच मनाने हळवा होता. त्यात कुठल्याही मुलीबाबाबतीत असा विचार करण्याची त्याची पहिलीच वेळ होती त्यामुळे त्याच्या मनात धाकधूक होती.


अंकिता अगदी सुंदर सजून हातात चहाचा ट्रे घेऊन जेव्हा बाहेर आली, तेव्हा अभिनव तिच्याकडे पाहतच राहिला.जणू स्वर्गातून अप्सरा पृथ्वीवर उतरून समोर उभी आहे असा भास अभिनवला झाला.

  

अंकिता तिच्या गोर्या कांतीवर सुंदर पिवळ्या  रंगाची साडी , त्यावर सुंदर मखमली लाल रंगाचे ब्लॉउज , गळ्यात एक नाजूकशी चैन , हातात मोत्यांचे तोडे ,  गुलाबीसर हातात एक नाजूक नक्षीची अंगठी , कपाळावर नाजूक टिकली , मधोमध पिनअप करून बांधलेले केस  , हा सगळा पेहराव लेवून जेव्हा बाहेर आली , तेव्हा अभिनव पाहताक्षणीच तिच्यावर लट्टू झाला .  


हा सगळा सौंदर्यसाज अंकितावर खूपच शोभून दिसत होता. त्याचबरोबर चेहऱ्यावर रेंगाळणारी कुरळ्या केसांची बट अंकिताच्या सौंदयाला आणखीन जास्त खुलवत होती.


अंकिताने आल्याबरोबर चहाचा ट्रे सेंटर टेबलवर मधोमध ठेवला. शरदराव आणि सीमाताईंना वाकून नमस्कार केला. टेबलवरील चहाचा ट्रे उचलून सगळयांच्या हातात अंकिताने चहाचा कप दिला आणि एका जागेवर उभी राहिली.तिचा हा नम्रपणा सगळयांनाच खूप भावला.  


" अंकिता , बाळ उभी का ...? बस ना ..." 


शरदराव अंकिताला म्हणाले आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरु झाला. शरदरावांनी अंकिताला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. 


" बाळ अंकिता तुझे पूर्ण नाव काय ..?" 


" अंकिता शामकांतराव देसाई " 


" तुमचे मुळगाव ..? "


" सागाव.." 


" तुझं शिक्षण काय ..?  कुठून पूर्ण केलेस..? " 


" बीई कॉम्पुटर ..पुण्यातील एम आय टी कॉलेजमधून पूर्ण केले. "


" तुम्ही किती भावंड आहात ..? "


" मला एक भाऊ आहे. " 


" बाळा , तुला किती भाऊ आहे तर एक पण तुला किती भावंड आहेत तर दोन. भावंड म्हणजे त्यात तू देखील आलीच ना ,म्हणूनच दोन. असं स्वतःला विसरून कसं चालेल ..? हो कि नाही ..?"


शरदरावांनी हसतच अंकिताला सांगत वातावरण हलकंफुलकं करण्याचा प्रयत्न केला. सगळे दिलखुलास हसले. अंकिताने हसतच शरदरावांच्या म्हणण्यावर मान डोलावली.


सीमाताईंनी देखील खूप समजुतीने अंकिताला तिच्या भविष्यविषयी प्रश्न विचारले.


" अंकिता , तुला करियर आणि संसार दोघेही मॅनेज करायचे आहे ..? ते तू कसे काय जमवून आणशील ..? " 


" संसार आणि करियर मॅनेज करतांना कुटुंबाची साथ असणं खूप महत्वाचं आहे. तुमची साथ मिळाली तर मी नक्कीच माझं करियर उत्तम रित्या घडवू शकते. "  


अंकिताच्या या उत्तराचा सीमाताईंना खूप आनंद झाला. त्या तिला प्रतिउत्तर करत म्हणाल्या..


" खूप छान अंकिता.. मला अश्याच उत्तराची अपेक्षा होती. तू आणि अभिलाषा दोघेही आमच्यासाठी सारखेच आहात. तुझे करियर करतांना आम्ही तुला संपूर्ण साथ देऊ. तू खूप मोठी हो. तुझी प्रगती आमच्यासाठी आणि तुझ्या आईबाबांसाठी खूप मोठे भूषण असणार आहे. "  


सीमाताईंच्या या उत्तराचा शामकांतराव आणि शैलजाताईंना खूपच आनंद झाला. आपली मुलगी खरंच खूपच नशीबवान आहे असं त्यांना मनातून वाटून गेले.शरदरावांनी आणि शामकांतरावांनी अभिनवला देखील अंकिताला काही प्रश्न विचारण्यास सांगितले. अभिनवने मात्र नम्रतेने नकार दिला.


 अभिलाषा मात्र तोंड फुगवून म्हणाली ...

" मला प्रश्न विचारायला कोणीच सांगितलेच नाही...! "  


" अग बाळा , मग विचार की ...तुला कुणीच अडवलं नाहीये. तुला हवे तितके प्रश्न विचार. " 

शामकांतराव अभिलाषाला समजावणीच्या सुरात म्हणाले. 


" नाही हो ..मी गंम्मत करते आहे. मला काहीच प्रश्न विचारायचे नाही. मला फक्त शॉपिंग पार्टनर हवा आहे. त्यासाठी मी खूप खुश आहे. " 

अभिलाषाच्या या उत्तरावर सगळेच खूप हसले. 

प्रश्न-उत्तरांचा कार्यक्रम संपला.  


शरदराव अभिनव कडे पाहत म्हणाले..

" अभिनव आणि अंकिता तुम्हाला दोघांनाही  एकांतात काही बोलायचं असेल तर बोलू शकतात. तुमच्या फ्युचर प्लॅन्स विषयी काही डिसकस करायचे असेल तर करू शकतात. " 


" नाही नाही ..नको ..याची काहीच गरज नाही. " 

शामकांतराव शरदरावांना मध्येच अडवत म्हणाले.


" अहो , शामकांतराव ..असं का म्हणत आहात...? मुले आपल्या समोर मोकळेपणाने बोलू शकणार नाही. त्यांची देखील भविष्याची स्वप्न असतील. एकमेकांविषयी काही अपेक्षा असतील. बोलू द्या त्यांना मोकळेपणाने.." 

शामकांतरावांनी नाराजीने शरदरावांना होकार दिला.  


श्रेणिक अंकिता आणि अभिनवला घेऊन वरच्या मजल्यावर गेला. श्रेणिक असल्यामुळे अभिनवला थोडं अवघडल्यासारखं होत होते. अभिनवची अस्वस्थता पाहून श्रेणिक थोड्या दुर अंतरावर जाऊन उभा राहिला. मात्र तिथूनही त्याचे अंकितावर बारीक लक्ष होते.


अभिनव अंकिताला म्हणाला ...

" अंकिता , पहिलाच प्रश्न असा विचारतोय मी की ज्यामुळे तुला थोडं अवघडल्यासारखं वाटू शकत.

राग मानू नकोस थोडं स्पष्टपणे बोलतोय. तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी व्यक्ती असेल किंवा तुझ्या घरचे तुझ्यावर कुठलाही दबाव आणत असतील तर आताच सांग. मी स्वतःहून या लग्नाला नकार देईल. तुझ्यावर कुठलाच दोष येणार नाही. "  


अभिनवच्या या प्रश्नावर अंकिताचा चेहरा थोडा नाराज झाला पण तरीही ती स्वतःला सावरत म्हणाली ..

" नाही ,तस काहीच नाही. " 


" ओके , मग छानच आहे. तुझ्या होणाऱ्याबद्दल काही अपेक्षा असतील ना. त्या सांग मला.."  

अभिनव अंकिताला म्हणाला.


" अ...हा...तश्या काही जास्त अपेक्षा नाहीत माझ्या. फक्त मला समजुन घ्यावं आणि मला माझ्या करियर साठी सप्पोर्ट करावा. बाकी काहीच नाही. तुमच्याही काही अपेक्षा असतील तर सांगा मला.."  


" पहिल्यांदा हे मला तुम्ही आम्ही म्हणणं बंद कर. इतक्या फॉर्मॅलिटी करायची गरज नाही.खरं सांगायचं तर माझ्यापण फार अश्या अपेक्षा नाहीत माझ्या जोडीदाराकरून. 


फक्त माझ्या कुटुंबाला सांभाळून घ्यावं. माझे आईबाबा खूप साधी माणसं आहेत ग. त्यांना समजुन घ्यावं आणि सांभाळून घ्यावं हीच माफक अपेक्षा आहे माझी.  


आणि हो असं समजू नकोस की फक्त माझ्या आईबाबांना सांभाळून घेण्याबद्दल बोलतोय. मी देखील तुझ्या आईबाबांची काळजी घेईलच. एकमेकांच्या कुटुंबीयांची आपण दोघांनीही काळजी घ्यावी हीच एक छोटीशी अपेक्षा आहे माझी. "  


अभिनवच्या बोलण्यावर अंकिताची कळी थोडीशी खुलली. अभिनवला देखील अंकिता मनापासून आवडली. तिची कमी बोलणं थोडं खटकल खरं,  पण अजून सगळं काही नवीन आहे म्हणून थोडी घाबरत असेन म्हणून अभिनवने त्या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही.


अभिनव-अंकिताचे बोलणं झाल्यावर श्रेणिक आणि ती दोघेही खाली आली. अजून थोड्या गप्पा झाल्या. शरदरावांनी अभिनवला इशारा केला 'आता निघूया ' म्हणून.


त्यावेळी सीमाताई म्हणाल्या ..

" निघण्यापूर्वी मला अंकिता आणि शैलजाताईंसोबत थोडं बोलायचं आहे तेही एकांतात. " 


सगळे एकदम आवासून सीमाताईंकडे पाहू लागले. सगळ्यांची नजर सीमाताईंनी अचूक हेरली. त्यांच्या प्रश्नार्थक नजरेला उत्तर देत त्या म्हणाल्या ..


" अहो , असे चिंतेत नका पडू. आम्हा बायकांच्या गोष्टी आहेत. तुम्हाला काळजी करण्याचे काही एक कारण नाही. तुम्ही पुढे व्हा. मी आलेच. " 


सीमाताईंनी तणाव कमी केला. शामकांतराव , शरदराव ,अभिनव आणि श्रेणिक बाहेर निघून गेले. तिथे उभ्या होत्या फक्त अंकिता , शैलजाताई आणि सीमाताई. सीमाताईंनी वातावरण हलकं केले असलं तरीही शैलजाताईंच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे जाणवत होता. सीमाताईंना नेमकं काय सांगायचं आहे याचे त्यांना टेन्शन आले होते.


सीमाताई अंकिताला उद्देशून म्हणाल्या...

" अंकिता , हेच लग्न होकारात किंवा नकारात बदलण्यापूर्वी काही गोष्टी मला तुला क्लिअर करायच्या आहेत. तुझ्या मनात पुढे जाऊन कुठलाही किंतु नको म्हणूनच शैलजाताईंना देखील मी इथेच थांबवले आहे. "


" ताईसाहेब , अंकिताच्या मनात कुठलाही किंतु नसणार. .."शैलजाताई सीमाताईंच्या बोलण्याला प्रतिउत्तर देत म्हणाल्या.  


सीमाताई पुढे बोलू लागल्या.

" राग मानू नका शैलजाताई ,पण काही गोष्टी मला अंकितासोबत स्पष्टपणे बोलायच्या आहेत. बाळ अंकिता ,राग मानू नकोस पण आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. शामकांतरावांसारखे वैभव आमच्याकडे नाही.


आम्हाला शक्य आहे आणि आमची ऐपत आहे तितकी तुझी हौसमौस आम्ही नक्कीच करू. आम्हाला देखील एकच मुलगा ,एकच सून असणार आहे. फक्त आमच्या मिळकतीनुसारच हे सगळं करू हे मात्र तितकचं खरं आहे. 


ही परिस्थितीची दरी उद्या उठून तुझ्या आणि आमच्यात दुरावा निर्माण करू नये यासाठी मी तुला आजच सगळ्या गोष्टीची जाणीव करून देत आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ तुला समजला असेल. "


सीमाताईंच्या बोलण्यावर अंकिता काही बोलणार त्याआधीच शैलजाताई त्यांना म्हणाल्या ...

" अगदीच बरोबर म्हणाल्या ताईसाहेब तुम्ही..पैसा हेच फक्त आपल्या हवी ती गोष्ट मिळविण्याचे एक माध्यम आहे पण सगळी सुख पैश्याने विकत घेताच येतात असं मात्र नक्कीच नाही. आमच्या अंकितालाही ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही अगदीच निश्चिन्त राहा. "  


शैलजाताईंच्या बोलण्यामुळे सीमाताई आनंदी झाल्या. त्यांनी शैलजाताई आणि अंकिताचा निरोप घेतला. अभिनवने देखील अंकितासोबत लग्न करण्यासाठी होकार दिला. शामकांतराव आणि शरदराव दोघांचेही कुटुंबीय खूपच खुश होते.


येत्या पंधरा दिवसात अभिनव आणि अंकिताचा साखरपुडा उरकून टाकूया असं शामकांतराव शरदरावांना म्हणाले. त्यांनीही होकार दिला. साखरपुड्याची तारीख निश्चित झाली. दोन्ही परिवारांनी साखरपुड्याच्या तयारीची लगबग सुरु झाली. 


क्रमश:


अंकिता आणि अभिनवचा साखरपुडा निर्विघन पार पडणार का ..?


कसे असेल अभिनव आणि अंकिताच्या नात्याचे भविष्य..? 


अंकिता शरदरावांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात ऍडजस्ट करू शकेल का ..? 


हे सगळं जाणून घ्यायची तुम्हालाही उत्सुकता असेलच ना ..? 


मग त्यासाठी एकाच नाण्याची दुसरी बाजू या कथेचा पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका.

या कथेचा एक भाग रोज सकाळी अकरा वाजता आमच्या  " Velvetkavisha-वेलवेटकवीशा" या फेसबुक  पेजवर प्रकाशित होईल. सगळ्यात आधी नवीन भाग वाचण्यासाठी आमच्या या पेजला लाईक आणि फोल्लो करायला विसरू नका.

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & Instagram 

✍©️ जया पाटील






Post a Comment

0 Comments