नाण्याची दुसरी बाजू भाग ५

 #नाण्याची_दुसरी_बाजू_भाग_५


©️ जया पाटील 


भाग चार वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/11/blog-post_19.html

मागील भागात आपण पाहीले की अभिनव आणि अंकितामधील संवाद वाढीस लागतो. कधीतरी अंकिता खूप छान वागते ,बोलते आणि कधी तरी तिच्या वागण्यातून अभिनवचे मन दुखावते. गणपतीच्या कार्यक्रमात ही अंकिताने काढलेली रांगोळी अभिनवने सीमाताईंना दाखवल्याबद्दल अंकिता अभिनवसोबत खूप वाद घालते. 

जगात कोणाचाही अपमान मी सहन करू शकेल पण माझ्या आईबाबांचा मात्र नाही. त्यांची काहीच एक चुकी नसताना तर मुळीच नाही. आता अंकिता स्वतःहून बोलल्याशिवाय मी तिच्यासोबत स्वतःहून बोलणार नाही. तिला माफ करणार नाही असं तो मनोमन ठरवतो. आता पुढे ..

अंकिता आणि अभिनव दोघांमधील वादामुळे दोघांमधील बोलचाल बंद असते. अभिनव खूप नाराज असतो. त्याची नाराजी शरदराव आणि सीमाताईंच्या लक्षात येते. ते दोघेही त्याच्या नाराजीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. 

अभिनव त्यांना झालेला सगळा प्रकार सांगतो. सीमाताई आणि शरदराव दोघंही खूप साधी माणसं असतात त्यामुळे झालेल्या प्रकारावर नाराज न होता , अजिबात न चिडता सीमाताई त्याला समजावतात ...

"अभिनव , अंकिता नवीन आहे. तुझ्या बाबतीत पझेसिव्ह असेल. आजकालच्या मुलींना नाही आवडत सगळ्या गोष्टी आईबाबांना सांगितलेल्या.  प्रत्येकाला आपली प्रायव्हसी महत्वाची असते.त्यामुळे इतक्या छोट्याश्या कारणावरून तू तिच्यासोबत अबोल राहू नकोस." तितक्याच शामकांतरावांचा शरदरावांना फोन येतो. अभिनव आणि अंकिता दोघात झालेल्या वादाची त्यांना काहीच कल्पना नसते. ते शरदरावांसोबत अगदी नेहमी प्रमाणे बोलत असतात ..

" नमस्कार शरदराव , सगळं काही छान चालू आहे. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट विचारायला मी फोन केला आहे. अभिनव आणि अंकिताचा साखरपुडा पार पडून आता बरेच दिवस झाले आहेत. मी गुरुजींना विचारून चांगले मुहूर्त काढून घेतले आहेत. 

तुलसीविवाहानंतर पहिल्याच आठवड्यात उत्तम मुहूर्त आहे. तेव्हा आपणास योग्य वाटत असेल तर पंधरा नोव्हेंबर हीच आपण लग्नाची तारीख ठरवूया. लग्नाला आमंत्रित करायच्या पाहुण्यांची यादी , लग्नाचे ठिकाण ,कपडे खरेदी वगैरे सगळं थोडं आधी पार पडले तर फार बरं होईल कारण मग आपली धावपळ देखील होणार नाही. ताईसाहेब आणि अभिनव सगळ्यांसोबत बोलून मला तुमचा निर्णय नक्कीच कळवा. नमस्कार. " 

इतकं बोलून शामकांतरावांनी फोन ठेवला. शरदराव आणि सीमाताईंनी देखील अभिनवची समजूत काढली. तू अंकितासोबत एकदा बोल असा सल्ला आईबाबांनी अभिनवला दिला.तोवर आम्ही लग्नाच्या इतर तयारी विषयी शामकांतराव आणि शैलजाताईंसोबत बोलतो.

खूप विचार केल्यावर अभिनव अंकिताला फोन करतो. दोनदा - तीनदा फोन करूनही अंकिता त्याचा फोन उचलत नाही. शेवटी अभिनव तिला मेसेज करतो ..." सॉरी अंकिता ....प्लीज अशी नाराज होऊ नकोस. हा अबोला त्रास देतोय मला..प्लीज. त्यादिवशी मी जे वागलो ते मुद्दाम नाही केले आणि मला त्यात काहीच चुकीचं वाटलं नाही पण तरीही तुला वाटत असेल की मी चुकलो तर आय एम रियली सॉरी."

अभिनवचा मेसेज अंकिता वाचते पण ती त्यावर देखील काहीच रिप्लाय करत नाही. अभिनवला खूप वाईट वाटतं. अश्या अबोल्यातच पुन्हा एक आठवडा निघून जातो. पुढच्या आठवड्यात कपड्यांची खरेदी करायची असं ठरतं ,  न राहवून अभिनव पुन्हा अंकिताला मेसेज करतो. 

" अंकिता , पुरे ग ...इतका काय मोठा गुन्हा केला आहे मी की इतका अबोला धरला आहे माझ्यासोबत. आपल्या घरचे आपल्या दोघांसाठी किती खुश आहेत. त्यांना नाही माहिती ग की आपण दोघेही एकमेकांसोबत बोलत नाही. प्लीज ..आपण एकदा भेटूया आणि मग बोलूया. आपल्यात जे काही मतभेद असतील ते आपण एकमेकांसोबत बोलून मिटविण्याचा प्रयत्न करू. प्लीज एकदा भेट मला. आता इतकी परीक्षा पाहू नकोस माझी. " 

अभिनवचा हा मेसेज देखील अंकिताने वाचला पण त्याला काहीच रिप्लाय केला नाही. अभिनव खूप हताश झाला. दोन तासांनी अंकिताचा मेसेज आला. 

" सॉरी अभिनव , तुला त्रास दिल्याबद्दल....प्लीज सगळ्या गोष्टी मी इथे मेसेज मध्ये लिहू नाही शकली. तुला एक मेल केला आहे. तो वाच. होप सो...की तू मला समजून घेशील.प्लीज मला चुकीचं समजू नकोस पण माझी खूप मोठी मजबुरी आहे. " 

अंकिताचा मेसेज वाचला आणि अभिनवने लॅपटॉपवर लगेचच त्याचे ई-मेल अकाउंट ओपन केले. त्याला अंकिताचा मेल रिसिव्ह झालेला होता. अभिनव मेल वाचू लागला..

" डियर अभिनव ...

खरं तर तुला डियर म्हणण्याइतकी माझी लायकीचं नाही. तू मनाने , वागणुकीने , हुशारीत सगळ्याबाबतीत माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. मी नेहमीच तुझ्यासोबत इतकी वाईट वागत आली पण तू मात्र नेहमीच मला समजुन घेतलं. माझ्या मूर्खपणाला समजुन घेतलं. मी इतक्या वेळा तुला मानसिक त्रास दिला. तू माझ्यावर चिडावास , तुला माझा राग यावा म्हणूनच मी असं वाईट वागत होती. 

तुला आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकल्यावर तुला माझा खूप राग येणार आहे पण मी मजबूर आहे. माझं अतुल नावाच्या एका मुलावर खूप प्रेम आहे. तो देखील माझ्याच कंपनीत काम करतो पण माझ्यापेक्षा लहान पोस्टवर आणि कमी पॅकेजवर. आय मिन आता सध्याच्या परिस्थितीत मी त्याची बॉस आहे. माझे  बाबा पैसा सर्वश्रेष्ठ नाही मानत हे मला माहिती आहे, त्यांचा जावई पैश्याने त्यांच्या पेक्षा श्रीमंत असावा अशी त्यांची इच्छा नाही, पण निदान त्यांचा होणारा जावई पदाने तरी माझ्या पेक्षा श्रेष्ठ असावा ही त्यांची इच्छा नक्कीच आहे.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अतुल अनाथ आहे. कुटुंबसंस्थेला आपल्या जीवनात खूप महत्व आहे त्यामुळे एका अनाथ मुलाला बाबा त्यांचा जावई म्हणून कधीच स्वीकारणार नाही. 

माझ्या बाबांना हा संबंध कधीच मान्य होणार नाही हे मला माहिती होते म्हणूनच अतुल वेगवेगळ्या कंपनीत इंटरव्हिव देतो आहे जेणेकरून त्याला प्रोमोशन मिळेल पण हे सगळं करत वेळ जात होता म्हणून मी बाबांना काहीच सांगु शकली नाही. काही विचार आणि समजुती  मी नाही बदलू शकत. 

माझ्या मोठ्या काकांच्या मुलीने म्हणजे केतकीताईने लव्ह मॅरेज केले. त्यामुळे काकांना हार्टअटॅक आला. घरातील सगळ्यांनी काकांच्या तब्येतीला तिला जबाबदार धरले. तिच्यासोबत कायमचे संबंध तोडले. चोरून चोरून आम्ही आजही एकमेकांना भेटतो बोलतो. त्यावेळेस केतकीताई फक्त हेच सांगते की मला आईबाबांना भेटायचं आहे. मी माझ्या जोडीदारासोबत खूप खुश आहे , पण या सगळ्यात मला तुम्ही सगळे माझे कुटुंब, सगळ्यांची सोबत मला हवी आहे. मला केतकीताई सारखं नकोय. मला पण आईबाबांपासून दूर जायचे नाही म्हणून मी तुझ्यासोबत लग्नाला होकार दिला.

ज्यावेळी तुझ्या स्थळाबद्दल मला समजलं त्यावेळेस मी बाबांसोबत बराच वाद घातला. मला अजून लग्न करायचं नाही आणि बरंच काही. पण मी म्हणेल तीच पूर्व दिशा असेल असं बोलून  बाबांनी मला एका शब्दात गप्प केले. त्यांचा रुद्रावतार पाहून मी घाबरले. अतुलला प्रोमोशन मिळेपर्यंत मला वेळ हवा होता म्हणून मी तुझ्यासोबत साखरपुडा केला. 

मला असं वाटलं मी तुझ्यासोबत अबोल राहिल , तुझ्यासोबत वाईट वागेल तर तू माझ्यावर रागावशील , माझ्यावर चिडशील. पण असं काहीच झालं नाही. आपल्यात झालेल्या वादामुळे   मी बाबांना सांगून आपला साखरपुडा तोडण्याची मागणी करेल पण तू इतका समजदार निघाला की तू प्रत्येक वेळेस फक्त मला समजुन घेत गेलास आणि मी मात्र तुला आणखी जास्त त्रास देत गेली. 

दोन दिवसात अतुल एका मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर जॉईन होतो आहे पण अजूनही मी काहीच ठरवू शकले नाही. प्लीज मला माफ कर. तुझ्यासोबत एक वेगळंच अनोखं मैत्रीचे नातं निर्माण झालं आहे माझ्या मनात. त्यामुळे तुला दुखवतांना ही खूप त्रास होतोय मला. प्लीज मला माफ कर. तूच मला या संकटातून बाहेर काढ.

अंकिता ..." 

अंकिताचा मेसेज वाचून अभिनवला काहीच समजलं नाही. आयुष्यात पहिल्यांदा इतकी मोठी फसवणूक झाली होती त्याच्यासोबत. त्याला राग अनावर झाला. त्याचे डोळे रागाने लाल झाले. हात थरथरू लागले. थरथरत्या हातांनी त्याने अंकिताला फोन लावला. 

" हॅलो अंकिता ....का वागलीस माझ्यासोबत अशी...? किती स्वप्न पाहिली होती मी आपल्या लग्नाची....? का फसवणूक केलीस माझी अशी..? असा काय मोठा गुन्हा केला होता मी की त्याची इतकी मोठी शिक्षा दिली..? तू तर अतुलसोबत लग्न करून सेट होशील पण माझं काय ..? माझ्या घरच्यांचं काय ..? त्यांना कसं समजवू मी ..? " 

अभिनव खूप चिडलेला होता. त्याच्या आवाजात वेदना होती. एक कंप होता. अंकिता देखील तिकडून रडत होती. ती अभिनवला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होती. 

" अभिनव , मला माफ कर. खरंच मला तुझी फसवणूक करायची नव्हती.मला एकदा भेटशील. प्लीज ..मला माझं मन मोकळं करण्याची फक्त एक संधी दे . प्लीज फक्त एकदा मला भेट त्यानंतर हवी ती शिक्षा दे. मी ती भोगायला तयार आहे. "

अंकिता विनंतीच्या स्वरात अभिनवला म्हणाली. इतक्या रागातही त्याने अंकिताची विनंती मान्य केली. अभिनव अंकिताला भेटण्यासाठी निघाला पण जाताना त्याचा ई-मेल लॉग आऊट करायला मात्र तो विसरला. 

थोड्याच वेळात अभिनव नेहमीच्या कॉफीशॉप मध्ये येऊन पोहोचला. अंकिता त्याच्या आधीच तिथे पोहोचली होती. अंकिता अभिनव सोबत बोलू लागली...

" मला माफ कर अभिनव ..मी खरंच खूप चुकली. पहिल्यांदा जेव्हा तू मला माझ्या आयुष्यात कोणी आहे का ..? असा प्रश्न विचारला तेव्हा मी होकार द्यायला हवा होता पण माझी मजबुरी होती. 

अतुलचे प्रोमोशन होईपर्यंत काहीही सांगणं मला कठीण वाटलं. आजपर्यंत तुझ्या आधीही मला खूप सारी स्थळं आली पण प्रत्येकजण मला होकार देत होता ते फक्त बाबांचा पैसा पाहून...एक मुलगी म्हणून मला मनापासून स्वीकारणारा कोणी भेटलाच नाही. त्यातच माझी भेट अतुल सोबत झाली. 

अनाथ असतानाही पाच वयोवृद्ध जोडप्यांना आईबाबा म्हणून सांभाळणारा अतुल माझ्या मनाला खूप जास्त भावला. त्याचवेळेस तुझं स्थळ मला सांगून आलं. इतर मुलांसारखा तू देखील माझ्या वडिलांच्या पैश्याला भुलून मला होकार दिलास असं मला वाटलं म्हणून तुझ्यासोबत वाईट वागून हा साखरपुडा तुटावा असं मला वाटत होतं. 

पण झालं मात्र वेगळंच... तुझ्यासारखा हिरा माझ्या आयुष्यात आला ज्याला मी नाकारू देखील शकत नाही. " अंकिताचे बोलणं चालू असतांना अतुल तिथे आला. त्यानेही अभिनवची माफी मागितली. त्यावेळी अभिनवचा राग शांत झाला. त्याने अंकिताला सांगितले ...

" जे झालं ते झालं अंकिता ..पण खूप पुढे जाण्याआधी आता हे थांबवायला हवं. तुझ्या बाबांना अतुल आणि तुझ्या नात्याबद्दल सांग.त्यासाठी मला वाईटाचा वाटा घ्यावा लागला तरी हरकत नाही. तुमच्या उज्वल भविष्यासाठी मी तुला नक्की मदत करेल. मला शक्य आहे तितकी साथ देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. मी तुझ्या बाबांच्या नजरेत वाईट ठरून जर तुझं आणि अतुलचे नातं जुळत असेल तर मी ते देखील नक्कीच करेन. तू चिंता करू नको. " 

इतकं बोलून अभिनव पाणावलेल्या डोळयांनी  तिथून निघून गेला. इकडे अभिनव गेल्यावर मात्र अभिलाषा त्याचा लॅपटॉप ओपन पाहून त्याला शटडाउन करण्यासाठी गेली तर तिथे तिला अंकिताचा मेल दिसला. 'चोरून लपून अभि काय बोलतोय वहिनीसोबत..? ' असं वाटून तिने तो मेल वाचला आणि तिच्या पायाखालची जमीनचं सरकली.

तिने ताबडतोब शरदराव आणि सीमाताईंना तो मेल वाचायला सांगितला. इतकी मोठी फसवणूक झाली म्हणून शरदराव आणि सीमाताईंचा संताप अनावर झाला. ते ताबडतोब शामकांतरावांच्या घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी अभिनव घरी आला. तो त्यांना शामकांतरावांकडे न जाण्यासाठी विनवू लागला पण ते दोघेही काही एक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेवटी शरदराव आणि सीमाताईंसोबत अभिनव शामकांतरावांकडे पोहोचला.

शामकांतराव अंकिताची चूक मान्य करतील का ..? 

शरदरावांनी अंकितावर केलेले आरोप शामकांतराव मान्य करतील की नाही ..? 

या सगळ्यात अभिनव तर दोषी ठरणार नाही ना ..? 

अंकिता आणि अतुलच्या नात्याचं काय होईल ..?

हे सगळं जाणून घेण्यासाठी एकाच नाण्याची दुसरी बाजू या कथेचा पुढचा भाग वाचायला विसरू नका. 

क्रमश :

या कथेचा एक भाग रोज सकाळी अकरा वाजता आमच्या  " Velvetkavisha-वेलवेटकवीशा" या फेसबुक  पेजवर प्रकाशित होईल. सगळ्यात आधी नवीन भाग वाचण्यासाठी आमच्या या पेजला लाईक आणि फोल्लो करायला विसरू नका.

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & Instagram 

✍©️ जया पाटील


Post a Comment

1 Comments

  1. खूपच छान लिहिलंय तुम्ही पुढे काय होणार

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box