#नाण्याची_दुसरी_बाजू_भाग_६
©️ जया पाटील
भाग पाच वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/11/blog-post_20.html
मागील भागात आपण पाहीले की अंकिता आणि अभिनवचा खूप वाद झाला. त्यावेळी अभिनवच्या आईबाबांनी त्याची समजूत काढली त्यामुळे त्याने स्वतःहून अंकितासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. अंकिताने मात्र त्याला एक मेल पाठवून तिच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी व्यक्ती आहे हे अभिनवला स्पष्ट केले. अभिनवला खूप राग आला.
अभिनव संतापात अंकितावर खूप चिडला पण अंकिताने त्याला विनंती करून स्वतःची बाजू त्याच्यासमोर मांडली. त्याचवेळी तो घरी नसताना शरदराव आणि सीमाताईंनी तो मेल वाचला. आपल्या मुलाची झालेली फसवणूक पाहून ते खूप संतापले. ते दोघेही तडक शामकांतरावांच्या घरी जाण्यास निघाले. अभिनवने त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण शरदराव आणि सीमाताईंनी त्याचं काही एक ऐकलं नाही. आता पुढे ...
अंकिताने पाठवलेला मेल वाचून शरदराव आणि सीमाताई सुन्न झाल्या होत्या. कितीही श्रीमंत असले तरीही शामकांतराव माझ्या मुलाच्या भावनांसोबत खेळू शकत नाही. आम्ही या घटनेचा शामकांतरावांना नक्की जाब विचारू अशी शरदरावांची भावना होती. ते तडक शामकांतरावांकडे जायला निघाले. अभिनवने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण शरदराव त्याचे काही एक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
शरदराव आणि सीमाताईंसोबत अभिनव देखील अंकिताच्या घरी जायला निघाला. शरदराव ,सीमाताई आणि अभिनवला असं अवेळी आणि अचानक घरी आलेलं पाहून शामकांतराव आणि शैलजाताई चकित झाले. शामकांतरावांनी नेहमीप्रमाणे त्यांचे स्वागत केले.
" या या , शरदराव आणि ताईसाहेब... असं अचानक कसं येणं केलंत ? या बसा ना.. अंकिताच्या आई जरा चहा पाण्याचे बघता का?"
शामकांतराव शरदरावांना म्हणाले. शैलजाताई किचन मध्ये जाणार तितक्याच शरदराव त्यांना अडवत म्हणाले..
" आम्हाला तुमच्या घरचे चहा पाणी काहीच नकोय. काय मिळाले शामकांतराव तुम्हांला आमची इतकी मोठी फसवणूक करून? आम्ही तुम्हाला या पूर्वीही सांगितलं होतं. आम्ही खूप साधी माणसं आहोत. कष्ट करून आम्ही इथवर आलो पण कधीच कोणाची फसवणूक केली नाही.
आम्ही मोठ्या विश्वासाने हा संबंध जोडला पण त्यापूर्वी आमची इतकी मोठी फसवणूक होणार होती हे नव्हतं माहिती आम्हाला. आयुष्यभर विसरू शकत नाही इतका मनस्ताप दिला आहे तुम्ही आम्हाला..."
शरदराव एकसारखे बोलत होते पण शामकांत रावांच्या काहीच लक्षात येत नव्हतं. ते शरदरावांना शांत करत म्हणाले...
" शरदराव , अहो कसली फसवणूक केली आम्ही...? माझ्या काहीच लक्षात येत नाही आहे. आजपर्यंत अंकिता आणि अभिनवच्या नात्याबद्दल किंवा त्यांच्या लग्नाबद्दल जे काही निर्णय घेतले ते प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला सांगून घेतले. तुमच्यासोबत विचार विनिमय करूनच सगळ्या गोष्टी ठरल्या , तरीही काही चुकलं असेल तर माफ करा आम्हाला..."
शामकांतराव समजावणीच्या सुरात म्हणाले,पण शरदराव काहीच ऐकून किंवा समजुन घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. ते पुन्हा रागावून बोलू लागले..
" इतका साधेपणाचा आव आणू नका शामकांतराव. अहो तुमच्या या फ़सवूणुकीमुळे आयुष्यातून उठायची वेळ आली आहे आमच्यावर. अभिनव आणि अंकिताचा साखरपुडा झाल्यावर देखील अंकिताच्या वागणुकीमुळे आमच्या अभिनवला खूप काही सहन करावं लागलं , तरीही अंकिता नवीन आहे , तुमच्या नात्याला वेळ द्या म्हणून आम्ही फक्त अभिनवलाच समजावत राहिलो पण त्या सगळ्यामागे हे कारण होते ते लक्षातच आले नाही आमच्या..."
शरदरावांचे बोलणं मध्येच थांबवत सीमाताई बोलू लागल्या..
"शामकांतराव , शैलजाताई .अहो ,अंकिताला मुलीसारखा जीव लावला आम्ही. हे लग्न ठरविण्यापूर्वीच आम्ही तिला आमच्या घरच्या वातावरणाची..... , घरच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव करून दिली होती. तरीही तुम्ही आम्हाला फसवलं याचे जास्त वाईट वाटतंय आम्हाला. "
शामकांतराव आणि शैलजाताईंच्या काहीच लक्षात येत नव्हतं. ते पुन्हा म्हणाले ..
" शरदराव , सीमाताई ..तुम्ही काय बोलता आहात खरंच आमच्या काहीच लक्षात येत नाहीये. प्लीज आम्हाला स्पष्टपणे सांगणार का नेमकं काय घडलंय..? "
शरदराव पुढे बोलणार तितक्याच अभिनवने त्यांना थांबवले..
" जाऊ द्या बाबा , आपण ह्या विषयावर नंतर बोलूया. सध्याच्या क्षणी हा विषय काढून फक्त वाद निर्माण होतील पण त्यातून सोल्युशन काहीच मिळणार नाही..सो लिव्ह इट. "
" गप्प बस अभिनव. प्रत्येक वेळी आम्ही तुला तुझं आणि अंकिताचे नातं नवीन आहे म्हणून सांभाळून घे , सांभाळून घे म्हणून समजदारी घेण्यास भाग पाडले पण आता मात्र नाही. तुझ्या समजदारीचा कोणी गैरफायदा घेतलेला आता आम्हाला आवडणार नाही. आज आम्ही गप्प बसणार नाही त्यासाठी आम्हाला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण आमच्या मुलाचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या लोकांना आम्ही कदापिही माफ करणार नाही. "
शरदरावांनी अभिनवला गप्प केले आणि पुढे बोलू लागले..
" ऐका शामकांतराव , अंकिता आणि अभिनवचा साखरपुडा पार पडला त्यानंतर अभिनव नेहमी अंकितासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असे पण ती नेहमीच टाळाटाळ करत असे. तुमच्या दोघांचं नातं नवीन आहे त्यामुळे अंकिताला वेळ दे म्हणून आम्ही सांगत राहिलो पण तुमच्या मुलीचे दुसऱ्या कोणत्या मुलाबरोबर अफैर असताना ती अभिनव सोबतच्या नात्याला काय न्याय देणार.?आपल्या मुलीची थेरं तुम्हाला माहिती नसतील का ..? तरीही तुम्ही अंकिता अभिनवचा साखरपुडा केला. अशी लफडेबाज मुलगी आमच्या गळ्यात मारून काय मिळाले तूम्हाला ..? "
शरदरावांचं बोलणं ऐकून शामकांतरावांचा संताप अनावर झाला...
" खबरदार शरदराव ....! माझ्या लेकीबद्दल अजून एकही शब्द वाकडा काढला तर ...तुम्ही होणारे व्याही आहात म्हणून नात्याची तमा बाळगतो आहे नाहीतर दुसरं कुणी असतं तर त्याच्या दोन मुस्काटात वाजवून त्याला घराबाहेर काढलं असतं.
माझी मुलगी अंकिता माझी शान आहे माझा मान आहे. ती कधीच माझी अशी फसवणूक करणार नाही याची मला खात्री आहे. एकदा ऐकून घेतलं पण आता परत अंकिताच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले तर मी ऐकून घेणार नाही. दुसऱ्या कोणाचे ऐकून तुम्ही तिच्यावर असा आरोप करत असाल तर हे पाप आहे. "
शामकांतरावांचा रुद्रावतार पाहून शरदराव थोडे शांत झाले आणि बोलू लागले..
" मी स्वतः एका लेकीचा बाप आहे त्यामुळे मुलीची अब्रू काय असते हे मी जाणून आहे. त्यामुळे कोणाचे ऐकून अंकितावर मी आरोप करेल इतक्या हलकट बुद्धीचा मी निश्चितच नाही. पण हे सगळं तिने स्वतः कबूल केले आहे. तिने तसा मेल देखील केला आहे अभिनवला. हवं तर विचारा तुम्ही अंकिताला ...बोलवा तिला समोर.."
" अंकिताची आई बोलवा अंकिताला ...' दूध का दूध और पानी का पानी ' होऊन जाऊदे. मेल किंवा मेसेज या गोष्टींवर माझा विश्वास नाही ते कुणाचं कारस्थानही असू शकतं. शरदराव तुम्ही बोललेल्या गोष्टी जर अंकिताने स्वतः कबूल केल्या तर तुमच्या पायावर डोकं ठेवून मी तुमची माफी मागेल , तुम्ही दयाल ती शिक्षा मला मान्य असेल पण जर अंकिताने जर तुम्हाला खोटं ठरवलं तर मात्र तुम्हाला धक्के मारून मी या घरातून हाकलून लावेल हे लक्षात ठेवा. "
शामकांतराव तावातावात शरदरावांना म्हणाले , पण अंकिता त्यावेळी घरात नव्हती हे शामकांतरावांना माहितच नव्हतं.
" अंकिता या वेळी घरात नाहीये अंकिताचे बाबा. ती मैत्रिणीला भेटायला बाहेर गेलीय. " शैलजाताई घाबरत घाबरत शामकांतरावांना म्हणाल्या...
" मग बोलवा तिला आताच्या आत्ता फोन करून. खरं काय आहे हे जाणून घ्यायचं आहे मला. "
शैलजाताईंनी अंकिताला फोन केला.
" अंकिता , कुठे आहेस तु..? आताच्या आत्ता घरी ये. तुझे बाबा खूप चिडले आहे. अभिनवचे आईबाबा पण इथे आले आहेत , त्यामुळे तु लवकर घरी ये. "
शैलजाताईंनी फोन ठेवला पण अंकिताच्या हृदयाची धडधड मात्र वाढली. तितक्याच तिला अभिनवचा मेसेज आला.
" अंकिता , मी तुला भेटायला आलो तेव्हा तुझा मेल माझ्या आईबाबांनी वाचला आणि सगळा घोळ झाला. तू घरी आली तरी तू तुझ्या आणि अतुलच्या नात्याला मान्य करू नकोस. मी तुझ्या बाबांच्या नजरेत वाईट ठरलो तर तुझे बाबा नंतर तू सांगशील त्या मुलासोबत तुझं लग्न लावून देतील. "
त्यावेळी अतुल देखील तिच्या सोबत होता. अतुलने तिला समजावले.
" अभिनवने जसं सांगितलं आहे तसंच कर अंकिता तरच आपल्या नात्याचं भविष्य सुरक्षित होऊ शकेल. आपण दोघे नाही राहू शकत एकमेकांशिवाय त्यामुळे प्लीज सगळं नीट सांभाळून घे. "
अतुलच्या बोलण्याला होकार देऊन अंकिता घरी आली. शरदराव , सीमाताई ,शैलजाताई तिच्याकडे रागाने पाहत होते. शामकांतरावांच्या डोळ्यात तर अंगार दिसत होता. शामकांतराव अंकिताला उद्देशून बोलू लागले.
" अंकिता , आज तुझ्या बापाची इज्जत पणाला लागली आहे. खरं सांग तुझ्या आयुष्यात कोणी मुलगा आहे की नाही ..? शरदरावांनी तुझ्या चारित्र्यावर दोष उमटवला आहे. तुझ्या बापाची अब्रू आता तुझ्या हातात आहे. सांग यांना सत्य काय आहे..? खरं सांग ..तुझ्या आयुष्यात कोणी आहे की नाही..? "
शामकांतरावांच्या या प्रश्नावर अंकिता गप्प उभी होती. तिच्या अश्या गप्प राहण्यामुळे शामकांतराव आणखीच चिडले..
" अंकिता ..बोल पटकन ..अशी गप्प का..? तुझ्या आयुष्यात कोणी दुसरी व्यक्ती आहे का..?
बोल ..हो की नाही ..? "
"नाही बाबा ..."
थरथर कापत अंकिताने उत्तर दिले. तिच्या या उत्तरावर शामकांतराव शांत झाले. तिच्या या उत्तराने शरदराव , सीमाताई मात्र सुन्न झाले. झालेल्या प्रकारात अभिनव मात्र एकही शब्द बोलला नव्हता. अंकिताचे उत्तर ऐकून शामकांतराव शरदरावांकडे गेले आणि बोलू लागले...
"काय शरदराव , झाल्या का तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर ... माझ्या मुलीवर आरोप लावण्यापूर्वी तुम्ही चार वेळा विचार करायला हवा होता. फसवणूक मी नाही तर तुम्ही केलीय आमची...
तुमच्याच मुलात खोट असेल म्हणूनच असे घाणेरडे आरोप लावले तुम्ही अंकितावर जेणे करून तुम्हाला पैसा लुटता येईल आमच्याकडून. तुमच्या मुलाचा खोटेपणा लपण्यासाठीच तुम्ही हा खेळ खेळला असणार म्हणूनच आल्यापासून तुमचा मुलगा मूग गिळून गप्प बसला आहे.
माझ्या मुलीला सून करून घेण्याची लायकी नाही तुमची. अंकितासारखी मुलगी बायको म्हणून मिळावी इतक्या लायकीचा नाही तुमचा मुलगा.. मी माझ्या मुलीचे नातं मोडतोय तुमच्या मुलासोबतचे ...आणि हो तुम्हाला धक्के मारून हाकलण्याचा माझा शब्द ही मी खरा करणार आहे.
त्याच्या चारित्र्यात दोष आहे म्हणून मघाशी पळपूटेपणा करत होता तो. हा विषय आता नको बोलूया असं बोलून इथून काढता पाय घेण्याचा प्रयत्न करतोय तुमचा मुलगा. अशा निर्लज्ज आणि नालायक मुलाला मी क्षणभर ही इथे उभा करणार नाही. आणि हो माझ्या मुलीची फसवणूक केल्याबद्दल मी तुला सोडणार नाही. महेशला सांगून तुला नोकरीवरून हाकलून लावेल. माझ्या मुलीचे आयुष्य खराब केले ना तुम्ही ...तुझ्या करिअरची वाट लावेल मी अभिनव...
तुमच्या सारख्या माणसांना धक्के मारून हाकलून लावण्यासाठी मी खास माणसं मागवली आहेत.
सेक्युरिटी ,या तिघांना धक्के मारून हाकलून द्या."
शामकांतरावांच्या सांगण्यावर ती माणसं घरात आली. अंकिता हे सगळं पाहत होती. अभिनव साठी तिला खूप वाईट वाटत होते. त्याच्या आईबाबांचा होणारा अपमान तिला अस्वस्थ करत होता. तिचं मन हे मान्य करत नव्हतं पण काय करावं तिला समजत नव्हतं.
अंकिताच्या बोलण्यातील खोटेपणा शामकांतरावांच्या समोर येईल का ..?
अंकिता आणि अतुलच्या नात्याची नवीन सुरुवात होईल का..?
अंकिता स्वतःच्या स्वार्थासाठी अभिनवला दोषी ठरू देईल की नाही ..?
वाचूया पुढच्या भागात..
क्रमश :
या कथेचा एक भाग रोज सकाळी अकरा वाजता आमच्या " Velvetkavisha-वेलवेटकवीशा" या फेसबुक पेजवर प्रकाशित होईल. सगळ्यात आधी नवीन भाग वाचण्यासाठी आमच्या या पेजला लाईक आणि फोल्लो करायला विसरू नका.
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google & Instagram
✍©️ जया पाटील
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box