नाण्याची दुसरी बाजू भाग अंतिम

#नाण्याची_दुसरी_बाजू_भाग_अंतिम 


©️ जया पाटील 


भाग सात वाचा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 👇👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/11/blog-post_94.html

मागील भागात आपण पाहीले शामकांतरावांकडून होणारा अभिनवचा अपमान सहन न होऊ शकल्यामुळे अंकिताने तिच्या बाबांसमोर तिच्या आणि अतुलच्या नात्याचे सत्य उघड केले. अभिनवने अतुल खूप चांगला मुलगा आहे आणि तो अंकिताला खरंच खूप खुश ठेवेल त्यामुळे तुम्ही अंकिता आणि अतुलचं नातं स्वीकारा अशी शामकांतरावांना विनंती केली. शरदरावांना देखील अभिनवच्या वागण्याचं कौतुक वाटलं.  

शरदराव आणि अभिनवचा अपमान केल्याच्या चुकीचा शामकांतरावांना खूप पश्चाताप झाला. त्यांनी अभिनव , शरदराव आणि सीमाताई सगळ्यांची माफी मागितली. त्यांनी सगळ्यांनी मोठ्या मनाने शामकांतरावांना माफ केले. अंकिताच्या सुखासाठी , तिच्या आनंदासाठी शामकांतरावांनी अतुल आणि अंकिताच्या नात्याला परवानगी दिली. सगळं आलबेल झालं. अंकिताला तिचा मनपसंद जोडीदार मिळाला. अभिनव मात्र एकटाच राहिला. आता पुढे..

शामकांतरावांनी अंकिता आणि अतुलच्या लग्नाला परवानगी दिली त्यावेळी अंकिताने अभिनव कडून त्याची मैत्रीची साथ तिला कायम हवी आहे असं सांगितलं त्यावेळी अभिनवने तिला हसतहसत होकार दिला. अंकिताचा हात अतुलच्या हातात देऊन तो घरी निघून आला.सगळ्यांसमोर अभिनव खुश असल्याचे नाटक करत असला तरीही मनातून मात्र तो खूप खचला होता.   

अभिनव घरी आला त्यावेळेस शरदरावांनी त्याला समजावलं...

" अभिनव , मला माहिती आहे तू आज कुठल्या परिस्थितीतून जात आहे. तू जो काही निर्णय घेतलास त्यामध्ये आम्ही तुला पूर्ण सपोर्ट करतो. तू खूप मोठ्या मनाने अंकिताला अतुलसोबत जाण्यासाठी सांगितलं पण तुझ्या भविष्याचं  काय..? त्याबद्दल काही विचार केला आहेस का..? तू मोठा त्याग केलास पण ते तुला योग्य वाटतंय का ..? आलेल्या परिस्थितीतीला सामोरं जाऊन तुला यातून बाहेर पडायलाच हवं कारण कितीही झालं तरी तुझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासमोर आहे."  

" हो बाबा , तुम्ही म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे. मी अंकिताला पुढे जाण्यासाठी हो म्हणालो कारण तिची इच्छा नसतांना तिला माझ्यासोबत थांबवून किंवा भांडण करून काहीच उपयोग नव्हता बाबा... आपला लाईफ पार्टनर आपल्यासोबत मनाने देखील असला तरच आयुष्य सुखाचं होऊ शकतं. त्यामुळे मी तिच्या मार्गातला माझा अडथळा दूर केला. "

"या आधीही नवीन नातं जोडण्याबाबतीत मी सांशक होतो तसं मी तुम्हाला म्हणालो देखील होतो आणि आतातर एखाद्यासोबत भविष्यात मी नवीन नातं जुळवू शकेल की नाही याबाबतीत मला स्वतःलाच शंका आहे. सॉरी टू से पण सध्या तरी माझ्या लग्नाचा विचार तुम्ही सोडून द्या. मला सावरायला आणि स्टेबल होण्यासाठी वेळ हवा आहे. प्लीज देणार ना मला थोडा वेळ. "  

अभिनवच्या या प्रश्नावर शरदराव काहीच बोलू शकले नाही. अभिनव वरून जरी खूप स्ट्रॉंग असल्याचे भासवत असला तरी मनातून तो खूप उदास होता. थोड्याच दिवसात अंकिता आणि अतुलचा विवाह थाटामाटात पार पडला. अभिनव आणि त्याचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या विवाहास उपस्थित होते.  

अंकिता आणि अतुलच्या सुखी संसाराची सुरुवात झाली. अंकिता अतुलसोबत खूप खुश होती पण आपल्यामुळे अभिनवच्या आयुष्यात रितेपण आहे ही गोष्ट मनोमन तिला त्रास देत होती. अभिनवचे आयुष्य डिस्टर्ब करण्यासाठी आपण जबाबदार आहोत असं तिला सारखं वाटत असायचं. तिला अभिनवला सुखी पाहायचं होतं पण त्यासाठी काय करायचं , कुठला मार्ग निवडायचा हे मात्र तिला कळत नव्हतं.  

अशातच दोन वर्ष निघून गेली. अतुलने त्याच्या मेहनतीच्या जोरावर खूप प्रगती केली. त्याच्या कंपनीत त्याला प्रोमोशन मिळाले. अंकिताचा देखील जॉब सुरळीत सुरु होता. तिने दोन तीन नवीन कंपनीत दुसऱ्या जॉब पोसिशनसाठी इंटरव्हिव दिले. त्यात अभिनव काम करत असलेली कंपनी देखील होती. नशिबाने तिला अभिनव काम करत असलेल्या कंपनीतच नोकरी मिळाली. नोकरीच्या निम्मिताने तिची आणि अभिनवची वारंवार भेट होऊ लागली. अंकिता अभिनवचे एकाकीपण जवळून पाहत होती.  

ती एकदा-दोनदा अभिनव घरी नसतांना शरदराव आणि सीमाताईंना घरी जाऊन भेटली. तिने शरदरावांना सांगितलं..

" काका, माझ्यामुळे अभिनवच्या आयुष्याची वाताहत झाली पण अभिनवला जोडीदाराची गरज आहे , तुम्ही त्याला लग्न करण्याबाबतीत समजवा. त्याला असं एकाकी पाहून मला नेहमीच त्याची गुन्हेगार असल्याची चूक बोचते. मी खूप मोठी चूक केली आहे पण आपण अभिनवच्या आनंदी भविष्यासाठी मिळून काही तरी प्रयत्न करूया. " 

अंकिताच्या या प्रश्नावर शरदराव म्हणाले..

" तू म्हणते आहे ते अगदी बरोबर आहे पण आम्ही खूप वेळा समजावून देखील अभिनव लग्न करण्यासाठी तयार होत नाही. आम्हालाही हेच वाटतंय की त्याने नवीन आयुष्य सुरु करावं पण तो मनाने खूप हळवा आहे ग ..! त्यामुळे त्याच्यावर कुठलीही जबरदस्ती करायची देखील भीती वाटते आम्हाला. आम्ही आता सगळं देवाच्या भरवश्यावर सोडलं आहे. आम्ही आणि अभिनवने कधीच कोणाचे वाईट चिंतले नाही त्यामुळे आता तो ईश्वरच या संकटातून सोडवेल आम्हाला.."  

शरदराव आणि सीमाताईंचे बोलणं ऐकून अंकिताला आणखीनच जास्त अपराधी वाटू लागलं. ती घरी येऊन खूप रडली. घरी आल्यावर अंकिता अतुलला सांगू लागली ,

" सगळी माझीच चुकी आहे अतुल , मी अभिनवसोबत चुकीचं वागली नसती तर हे सगळं घडलंच नसतं... !"  

" मला अभिनव साठी खूप वाईट वाटतं आहे , माझ्यामुळे त्याच आयुष्य नको रे खराब व्हायला!त्याच्या आयुष्यात असलेल्या रितेपणाला फक्त मी जबाबदार आहे आणि मला त्याच्या आयुष्यातलं ते एकटेपण संपवायचे आहे. मी हे नाही करू शकली तर मी आयुष्यभर नाही माफ करू शकणार स्वतःला....! "

रडणाऱ्या अंकिताला अतुलने सावरले आणि तो तिला समजावणीच्या सुरात म्हणाला ...

" अंकिता , चुकी तुझ्या एकटीची नाही. त्याला मी देखील तितकाच जबाबदार आहे. सध्या तरी आपण अभिनवला त्याच्या एकटेपणातून बाहेर काढायला हवं. हळूहळू तो नवीन बदलांना स्वीकारेल फक्त आपण प्रयत्न करायला हवे. " 

अभिनवच्या ऑफिसमध्येच अंकिताचे काम सुरु झालं. ऑफिसमध्ये देखील अभिनव त्याच्या गोड स्वभावामुळे सगळ्यांचा फेव्हरेट होता. तो वरवर खुश राहण्याचा प्रयत्न करतो परंतु मनातून मात्र तो खूपच दुखावलेला असतो. अंकिता त्याच्या सोबत वेळ घालवते आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करते.

 अभिनव ऑफिसच्या कामात स्वतःला गुंतवून घेतो. तिथे सगळे लोक त्याचं खूपच कौतुक करतात त्यातच त्याची एक सहकारी असते तन्वी.

तन्वी देखील खूपच सुंदर , स्मार्ट आणि चुणचुणीत मुलगी असते आणि ती अभिनवच्याच ऑफिस मधेच एका चांगल्या पदावर काम करत असते. तन्वीच्या स्मार्टनेस वर ऑफिसमधले खूप लोक फिदा असतात पण तन्वीला मात्र अभिनवचा स्वभाव , त्याचा साधेपणा मनापासून भावतो.

प्रोजेक्ट्सच्या कामा निम्मिताने अंकिता आणि तन्वीची देखील चांगली मैत्री होते. हळूहळू तन्वी तिचे सगळे सीक्रेट अंकितासोबत शेयर करू लागते.

एक दिवस तन्वी अभिनव सोबत बोलायचं ठरवते. तन्वी अभिनवसोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करते परंतु अभिनव प्रत्येक वेळेस कामाव्यतिरिक्त तन्वीसोबत बोलणं टाळतो.

या गोष्टीचा तन्वीला खूपच राग येतो आणि ती अभिनवला जाब विचारण्याचं ठरवून ऑफिस सुटल्यावर त्याच्या सोबत बोलायला जाते.

"अभिनव , मला तुझ्यासोबत थोडंसं बोलायचं आहे. प्लीज ,आपण सोबत कॉफी प्यायला जाऊया का ..? " तन्वी  

" सॉरी तन्वी , पण मला नाही जमणार .." अभिनव अगदी निर्विकारपणे तन्वीला उत्तर देतो. 

आता मात्र तन्वीचा राग अनावर होतो ..

" काय रे अभिनव , किती दिवसापासून मी तुझ्यासोबत बोलायचा प्रयत्न करते आहे. एक मुलगी तुला स्वतःहून इतका भाव देते आहे आणि तुझी काय रे अशी टाळाटाळ ....! माझ्यासोबत कॉफी पिण्यासाठी , माझ्यासोबत बोलण्यासाठी , मला कंपनी द्यायला ऑफिस मधले किती तरी लोक तयार आहेत ,पण मला मात्र तुझ्यासोबत जायचं आहे. का नाही म्हणतोस तु ...? का टाळतोस असा मला ..?   प्लीज , टेल मी....नाहीतर विचार करून वेड लागेल मला अभिनव ...प्लीज .... ! " तन्वी चिडून अभिनवला म्हणाली.

तन्वीच्या प्रश्नावर अभिनव अगदी निश्चलपणे उभा होता. अगदी शांतपणाने तो तन्वीला म्हणाला..

 " तन्वी , सॉरी टू से , एकदा या बंधनात बांधण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरलो मी. त्यामुळे नवीन कुठलंही नातं बनवण्याची हिम्मत होत नाही माझी. यापेक्षा जास्त काही नाही सांगू शकणार मी तुला.. आय एम रियली सॉरी.. प्लीज सॉरी तुला दुखावलं त्याबद्दल .."

इतकं बोलून अभिनव तिथून निघून गेला. अभिनव बोलला त्या गोष्टीचं मात्र तन्वीला कोडं पडलं. अभिनवच्या बोलण्याचं तिला खूप वाईट वाटलं. ती चिडून तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी कॉफी टाईम मध्ये अंकिता आणि तन्वी दोघीही भेटल्या. त्यावेळी तन्वी खूप नाराज होती. अंकिताने तिच्या नाराजीचं कारण विचारलं त्यावेळेस तन्वीने तिला काल घडलेला सगळा प्रकार आणि तिचं आणि अभिनवचे बोलणं सांगितलं. अंकिताचा सगळा प्रकार लक्षात आला. ती समजावणीच्या सुरात तन्वीला म्हणाली ...

" तन्वी , तुला ऐकायचं आहे ना अभिनवच्या या एकाकीपणाचे कारण तर ऐक... त्याची दोन वर्षापूर्वी एंगेजमेंट झाली आणि त्या मुलीने त्याची फसवणूक केली. ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून मी आहे. ..." असं बोलून अंकिताने घडलेला सगळा प्रकार तन्वीला सांगितला.  

सगळं काही ऐकून तन्वीच्या मनातील अभिनव विषयीचा आदर खूप वाढला. अभिनवला तन्वीसारखी जोडीदार मिळाली तर त्याचं आयुष्य खरंच खूप सुखी होईल याची अंकिताला जाणीव झाली. अभिनव आणि तन्वीला एकत्र आणण्यासाठी अंकिताने प्रयत्न करायचा ठरवला. तिने त्यासाठी अतुलच्या मदतीने एक प्लॅन बनवला. या प्लॅन विषयी तिने शरदराव आणि सीमाताईंना देखील सगळी पूर्वकल्पना दिली. अभिनवच्या आयुष्यात पुन्हा सुख रंग भरणार म्हणून त्याचे आईबाबा खुश झाले.  

एका आठवड्यानंतर अंकिताने तिच्या घरी एक छोटीशी पार्टी आयोजित केली. त्यात तिने अभिनव आणि त्याच्या कुटुंबियांना इन्व्हाईट केले. त्या पार्टीला तन्वी देखील उपस्थित असेल याची अभिनवला पुसटशीही कल्पना नव्हती. ठरलेल्या वेळी अभिनव अंकिताच्या घरी आला. अभिनव आणि अंकिताचे घरचे सगळे आधीच अंकिताच्या घरी उपस्थित होते. थोडा वेळ झाल्यावर अंकिता अनाउन्समेंट करण्यासाठी स्टेजवर गेली आणि बोलू लागली...

" हॅलो एव्हरीवन...आजची पार्टी खूप स्पेशल आहे कारण त्याच्यामागे तसंच स्पेशल रिझन आहे. माझ्या आयुष्यात आज अतुल आणि जो काही आनंद आहे तो फक्त अभिनवमुळे....! अभिनव माझ्या आयुष्यातला जादूगार आहे. माझ्या आयुष्यात त्याच्या जादूने त्याने रंग भरले पण त्याची दुनिया मात्र भूरसट झाली. आज नव्याने मला त्याच्या आयुष्यात रंग भरायचे आहेत. त्याला आज मला छोटंसं गिफ्ट द्यायचं आहे. त्याचं हे गिफ्ट मला त्याच्याच आईबाबांच्या हस्ते द्यायचे आहे. प्लीज अभिनव नाही म्हणू नकोस..."  

एवढं बोलून अंकिताने शरदराव आणि सीमाताईंना त्याचं गिफ्ट देण्यास सांगितलं. शरदराव आणि सीमाताई चालत चालत अभिनवच्या समोर येऊन उभे राहिले आणि हळूच बाजूला झाले तर मागे तन्वी उभी होती...

अंकिताने तन्वीला अभिनवच्या समोर आणून उभं केलं आणि बोलू लागली...  

" अभिनव , माझ्या चुकीमुळे तुझ्या आयुष्यात जे रितेपण आले होते त्याची ही भरपाई आहे. प्लीज तुझं आयुष्य आनंदी करण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि हो हे जबरदस्तीने जोडलेलं नातं नाही. तन्वी मनाने तुझ्यासोबत जोडली गेली आहे. हवं तर तू तिच्याच कडून ऐक.."  

"अभिनव , प्लीज आज तरी माझं बोलणे ऐकून घे ... , मी ऑफिस जॉईन केलं त्या दिवसापासून तु मला आवडू लागला होता. ज्यावेळी मला तुझ्या आणि अंकिताच्या रिलेशनशिप बद्दल सगळं माहित झालं त्यावेळी माझ्या मनात तुझ्या विषयी असलेला आदर आणखी जास्त वाढला कारण त्यावेळीही समाज , बदनामी यापेक्षा जास्ती तुला एका मुलीचं आयुष्य , तिचा आनंद महत्वाचा वाटला. त्यामुळे त्या दिवसापासून तर मी तुझी डाय हार्ड फॅन झाली. "

"अभिनव , तुझ्यासारख्या जोडीदारासोबत मला माझं अख्खं आयुष्य घालवायचं आहे. प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणात तुझी सोबत करायची आहे. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात मला तुझी साथ हवी आहे अभिनव.. मला आयुष्यभर तु फक्त माझा म्हणून हवा आहेस ...

Be my happiness forever ...will u marry me ..? माझ्याशी लग्न करशील ..? "  

इतकं बोलून तन्वीने स्वतःचा हात अभिनवच्या समोर धरला. तन्वीच्या या बोलण्यावर काय बोलावं अभिनवला सुचलंच नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळू लागल्या. त्याने हळूच शरदराव आणि सीमाताईंकडे पाहीलं. त्या दोघांनीही डोळ्यातील आनंदाश्रू पुसत अभिनवला मानेनेच होकार कळवला.  

तन्वीने पुढे केलेला हात अभिनवने हलकेच आपल्या हातात घेतला आणि सगळ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. सगळं वातावरण आनंदी झालं. शेवटी म्हणतात ना प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असत... त्यामुळेच अंकिताला तिचा अतुल मिळाला आणि तन्वीला तिचा अभिनव... ! सार कसं आलबेल झालं. दोघांच्याही लव्ह स्टोरी पूर्ण झाल्या. 

अंकिता-अतुल , तन्वी-अभिनव दोघांच्या  जोडीप्रमाणे तुम्हालाही तुमच्या जोडीदाराची साथ आणि एकमेकांचे प्रेम भरभरून लाभू देत हीच सदिच्छा. 

वाचकहो , ही कथामालिका वाचताना आपण अंकिताला दोषी ठरवलं असेल पण केलेल्या चुकीचा पश्चाताप आणि त्याचे परिमार्जन करण्याची तयारी हीच नाण्याची दुसरी बाजू होती. प्रत्येक वेळी आपण आपल्या डोळ्यासमोर घडणाऱ्या घटनेला एखाद्या व्यक्तीला जबाबदार धरतो पण त्या गोष्टीचा दुसरा पैलू उलगडण्याचा प्रयत्न कधीच करत नाही , पण तो पैलू उलगडण्याचा प्रयत्न जरूर करावा. कधी चूक झालीच तर ती कबूल करून तिचे परिमार्जन करणाराच श्रेष्ठ असतो.

समाप्त...!

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & Instagram 

✍©️ जया पाटील






 







Post a Comment

0 Comments