हुकलेला इंजिनिअर



 हुकलेला इंजिनिअर

© Velvet Kavisha


तसे ते उभयतां एका सर्वसामान्य कुटुंबातले. काटकसरी तरीही स्वावलंबी. असलेली वस्तू, पदार्थ व्यवस्थित वापरण्याकडे कल. 

दोघेही ग्रॅज्युएट. प्रायव्हेट ऑफिसमध्ये कामाला. खरंतर टेक्निकलमध्ये त्याला बराच रस होता. पण पार्ट टाइम जॉब करत ग्रॅज्युएट झाला होता. लग्न झालं तेव्हा दोघेही नोकरी करत होते. दोन लेकरं झाली आणि ती पुर्णवेळ आई झाली. तडजोडीत भर पडली.  

लेकरांना आणलेली/वाढदिवसाच्या भेटीत आलेली चावीची खेळणी रिपेअर करण्यापासून त्याच्या इंजिनिअरिंगची सुरुवात झालेली. आजवर एकही खेळणं रिपेअर करून पुर्ववत चालू झालेलं नाही. म्हणजे कधीतरी ढकलल्यावर चालणारी गाडी, याच्या रिपेअर करण्याने सूतभर हालणंही विसरून जाते. पोरं मग नाडी बांधून लॉक झालेल्या चाकासह गाडी फरफटवत खेळायला शिकली.

घरातला मिक्सर, कुकर, वॉशिंग मशीन, इस्त्री असं काही बाही बंद पडलं की हा लगेच आपला टुल्स् कीट घेऊन फतकल मारून बसलाच समजा. अप्लायसेंसच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होऊनही ती तशीच जैसे थे..!! मग बाहेरूनच रिपेअर करून आणावी लागतात.


एकदा लेकाच्या छत्रीचा रॉड जाम झाला. याने लगेच त्यात तेल वगैरे घालून मागे पुढे केला. बटण दाबले तशी छत्रीचं छप्पर वेगळं झालं आणि दांडा हातात राहिला.  

"काय बाबा आहे आपला..!! तो एक वरताण तर आई कहर. बाबाला अशा उद्योगांपासून थांबवायचं तर त्याच्याबरोबर बसून त्याला मदत करतेय..🙆‍♀️🙆‍♀️" स्वतःशीच चरफडत धारातीर्थी पडलेल्या छत्रीचे हाल लेकराने कसेबसे सहन केले. 


बाथरुममधला गिझर बिघडला. दोघांनी मिळून चेक केला. स्वीच आणि वायर जळली. याने बाजारातून नवीन स्वीच आणून बसवला. हातासरशी इनलेट आऊटलेटचे मेटलचे गंजलेले पाईप काढून नवीन  बसवले. नेहमीप्रमाणे बायको असिस्टंट. मार्गदर्शन करत.  गिझरचं बटण ऑन केलं. झाला सुरू. अर्धी बादली गरम पाणी जमा झालं आणि चालू गिझरमधून थंड पाणी येऊ लागलं...  

आता काय झालं असावं म्हणत पुर्ण गिझर खोलून पाहून झाला. काही कळेना नेमकं काय झालं ते. शेवटी इलेक्ट्रीशियनला दाखवलं. तो म्हणाला," क्वाॅईल गेली.  बाराशे रुपये खर्च येईल.."  दोघांनी डोक्यावर हात मारला. गिझरच्या पाईप बदलण्याच्या ओढाताणीत क्वाॅईल गेली वारली.  

तेरा वर्षे जुन्या गिझरला बाराशे खर्च करण्यापेक्षा नवीन गिझर घेऊ. नवीनची किंमत पाच सहा हजार. मग त्यापेक्षा बाराशे बरे. बाहेरून रिपेअर करून घेतला.  सुरू ही झाला. हुश्श..!!


दोन चार महिन्यांपूर्वी टीव्हीचा आवाज एकाएकी बंद झाला. त्याची आई आणि लेकरं महाभारत पाहत होते. आवाजाशिवाय नुसती चित्र हलताना पाहिलं.  

"बंद करा टीव्ही जरा.. बघतो काय प्रॉब्लेम आहे तो.!!" म्हणत हा ड्रॉवरमधल्या टुल्स बॉक्सकडे वळला. बायको ही सज्ज झाली. टीव्ही भिंतीवरून उतरवायला.

"नकोऽ ऽ  आम्ही चित्र पाहू पण तुम्ही चेक नका करू आता.."  " म्हणत आई आणि पोरांनी त्याला अडवलं.


दोन वर्षांपूर्वी  EMI वर घेतलेला LED टीव्ही. बावीस हजारच्या टीव्हीसाठी सव्वीस हजार भरून झालेले.   "टेक्निशियन आणून काय झालं ते बघून घे. आपल्याला त्यातलं कळलं तर बरं." आई न राहवून म्हणाली.

टेक्निशियन एकदम स्पेशालिस्ट डॉक्टरच्या थाटात आला. "साडेतीन हजार लागतील." म्हणाला आणि व्हिजीटचे ३००/-₹ घेऊन गेला.

याच्यातला इंजिनिअर याला काही केल्या स्वस्थ बसू देईना. त्याने बेडमध्ये टाकून ठेवलेले जूने स्पिकर काढून टीव्हीला जोडले. आणि टीव्ही सुरू झाला. तिनशे गेले तरी बत्तीसशे वाचले.  

असंच कधीतरी काहीतरी रिपेअर करतांना वायर जळली. घरभर धूर झाला. 

"हुकलेले इंजिनिअर तुम्ही..!! कोण सांगतं तुम्हांला नसत्या उचापती करायला.. शॉर्ट सर्किट झालं असतं म्हणजे..?? अख्खं घर जाळलं असतं तुम्ही.. " थोरलं पोरगं वैतागून म्हणालं. तो नेहमीप्रमाणे शांतच होता. तिला मात्र सहन झालं नाही. आजवर बारीकसारीक कुरकुरणारं पोरगं तावात बोललं होतं.  

तिने पोराच्या हाताला धरलं आणि ओढत आत घेऊन गेली. "तू बस इथेच मी आले." म्हणत बाहेर गेली. 

"असू दे. वायरच जळली ना..?? हे काही पहिल्यांदा नाही झालं. तुम्हांला येत ना सगळं..?? तुम्ही किती पुस्तकं वाचून अभ्यास केलात याचा.. जोडा ती वायर. जमेल तुम्हांला." आत्मविश्वास हरवू पाहणाऱ्या त्याला उभारी देऊन ती आत आली. पोराच्या बाजूला बसली.


"आज बोललास बापाला. यापुढे बोलशील तर जीभ हासडून ठेवीन. हुकलेला इंजिनिअर काय म्हणतोस त्यांना..?? आता तुला जसं वाटतं ना तसंच त्यांनाही इंजिनिअरिंगला जायचं होतं. दहावीत असताना वडील गेले. दोन बहिणी मागे शिकणाऱ्या. आहे तो पैसा जपायला हवा म्हणून दहावीच्या परिक्षेनंतर तेलाच्या दुकानात कामाला राहिले. नाईट स्कूलमधून बारावी झाली तशी सीएकडे नोकरी शोधली. युनिव्हर्सिटीतुन ग्रॅज्युएट झाले. कामात हूशार आणि सीए ऑफिसचा अनुभव. पगाराची सुरुवात चांगली झाली. एक एक करत कष्टाने सगळं जोडत गेले. पागडीच्या घरातून स्वतःचं घर घेतलं.   तु इंजिनिअर व्हावं ही त्यांची सुप्त इच्छा. तुला MS करायला अमेरिकेत पाठवायचे आहे म्हणून पै पै जोडतोय तो माणूस आणि तू त्यांना बोलतोस?? घर जाळाल म्हणून.. तुला त्यांच्यातला बाप कळला नाही कधी. त्यांच्यातला कंजूसपणाच दिसला तुला. ज्या दिवशी तुला तो बाप म्हणून कळेल तेव्हा तू "बाबा" म्हणून हाक मार तोवर नाही.." खुप शांत आवाजात तिने लेकराला समज दिली. पोरगं पण हललंच जरासं  आतून. आईच्या पाठिब्यांचं गणित कळलं होतं त्याला.  


"बाबा, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये संडे स्पेशल क्लासेस असतात. तुम्ही तिथे ॲडमिशन घ्या. काही समजलं नाही तर मी आहे ना..!! फी पण जास्त नाही काही. तुमचं ॲडमिशन हेच या बर्थडेचं गिफ्ट असेल माझं. यावेळी थोडं महागडं आहे. पण तुमच्याकडून तेच हवंय मला." पोराने दुसऱ्या दिवशी सकाळीच बाबाला सांगितलं. आई बापाचा ऊर भरून आला.


" आपल्या कधी लक्षात का नाही आलं आतापर्यंत..?? आजकालची मुलं स्मार्ट असतात हेच खरं. फक्त योग्य वेळी त्यांना जाग्यावर आणलं पाहिजे.." तिला वाटून गेलं..

हुकलेला इंजिनिअर तो आता टेक्निशियन होणार होता. दुधाची तहान ताकावर भागवल्याचं अनोखं समाधान उराशी घेऊन...

तसं पाहायला गेलं तर आपल्या आजूबाजूला असे कितीतरी हुकलेले इंजिनिअर सापडतील. पाहायला मिळतील. माझी एक मैत्रीण नेहमी म्हणते, "नवऱ्याने लग्नवेदीवर नवरीच्या गळ्यात हार घातला की तो नवरा तर होतोच पण त्याचबरोबर तो इंजिनिअर ही होतो. कारण आईच्या संसारात ढुंकूनही न पाहणारा तो बायकोच्या संसारात मात्र प्रत्येक बिघडलेली वस्तूचे स्क्रू खोलून पाहिल्याशिवाय रिपेरींगला देत नाही.."🙆‍♀️🙆‍♀️

आता तुमचे अनुभव काही वेगळे असू शकतात... नक्की सांगा कमेंटमध्ये...

थॅंक्यु सो मच 💞💞

© Velvet Kavisha




Post a Comment

2 Comments

  1. हृदयस्पर्शी कथा हो ताई

    🙏

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box