#नाण्याची_दुसरी_बाजू_भाग_७
©️ जया पाटील
भाग सहा वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇👇
https://velvetkavisha.blogspot.com/2021/11/blog-post_22.html
मागील भागात आपण पाहीले अंकिताचा मेल वाचून शरदराव आणि सीमाताई दोघेही खूप चिडले आणि शामकांतरावांकडे जाब विचारण्यासाठी गेले. शरदरावांनी शामकांतरावांना अंकिताच्या अफैर बद्दल सांगितलं. शामकांतरावांना मात्र अंकितावर पूर्ण विश्वास होता.
त्यामुळे तिच्या तोंडातून सत्य ऐकल्याशिवाय मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही असं शामकांतरावांनी शरदरावांना ठणकावून सांगितलं. अंकिताने मात्र सगळ्यांसमोर तिची चूक नाकबूल केली त्यामुळे शामकांतराव खूप चिडले. माझ्या मुलीवर आरोप केले आणि त्यांचा अपमान केल्याबद्दल शामकांतरावांनी अभिनव आणि त्याच्या कुटुंबियांना अपमानित केले.आता पुढे...
शामकांतराव खूप चिडले होते. शामकांतरावांची माणसं अभिनव आणि शरदरावांना धक्का बुक्की करत होते. शामकांतरावांनी अभिनवचा हात हातात घेतला आणि त्याला खेचत खेचत दरवाज्याकडे नेऊ लागले. शामकांतराव त्याचा खूप अपमान करत होते. त्याला खूप काही बाही बोलत होते.
" मघाशी जेव्हा तू तुझ्या बाबांना सगळं काही सांगण्यापासून रोखत होता तेव्हाच मी तुझा पळपूटेपणा ओळखायला हवा होता. तुझ्यासारखी आतल्यागाठीची माणसं फक्त दुसऱ्यांचं आयुष्य खराब करू शकतात.
माझ्या मुलीची फसवणूक केल्याबद्दल मी तुला सोडणार नाही अभिनव. महेशला सांगून तुला नोकरीवरून हाकलून लावेल. माझ्या मुलीचे आयुष्य खराब केले ना तुम्ही ...तुझ्या करिअरची वाट लावेल मी अभिनव...तुला कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचा ठेवणार नाही मी. "
शामकांतरावांचा तोंडाचा पट्टा सुरु होता. अभिनवचा, त्याच्या कुटुंबीयांचा होणारा अपमान पाहून अंकिता व्यथित झाली होती. शामकांतरावांनी अभिनवचा हात घट्ट पकडला , त्याला गरागरा फिरवले आणि त्याला दरवाज्याबाहेर काढणार तितक्याच अंकिता जोरात ओरडली.
" थांबा बाबा , पुरे झालं. अभिनवचा अपमान मी नाही सहन करू शकत. थांबवा हे सगळं आत्ताच्या आता. अभिनव आणि त्याच्या कुटुंबियांना असं अपमानित करू नका बाबा ..प्लीज. थांबवा हे सगळं. "
" अंकिता , अग हे काय तू बोलते आहेस .....? ज्या माणसांनी तुझ्यावर नको नको ते आरोप लावले. तुझ्या चारित्र्यावर संशय घेतला अश्या माणसाला पाठीशी घालते आहेस तू ..? स्वतःचा इतका मोठा अपमान कसा विसरू शकतेस तू ..? तू यांना माफ करण्याइतकी मोठ्या मनाची असशील पण मी मात्र यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. "
शामकांतराव चिडून अंकिताला म्हणाले. त्यावेळेस अंकिता शामकांतरावांना म्हणाली..
" बाबा , अभिनवची यात काहीच चूक नाहीये. खरी चूक तर माझीच आहे. त्याने न केलेल्या चुकीची शिक्षा तो फक्त माझ्यासाठी भोगतोय आणि मी इतकी स्वार्थी झाले की माझ्या स्वार्थासाठी त्याचा अपमान माझ्या डोळ्यांसमोर पाहतेय. मला स्वतःचीच लाज वाटतेय बाबा ,पण आता मात्र मी अभिनवचा आणखीन अपमान नाही होऊ देणार.
अभिनवचे बाबा म्हणताय ते अगदी खरं आहे बाबा. खरंच माझ्या आयुष्यात दुसरे कुणी आहे. माझ्याच कंपनीत काम करणाऱ्या अतुलवर माझं खूप प्रेम आहे. अतुल आणि मी आम्ही दोघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करतो. फक्त तो माझ्या पेक्षा लहान पदावर काम करतो. तो एक अनाथ मुलगा आहे. पैसा ही तुमच्यासाठी गौण गोष्ट असली तरीही माझ्यापेक्षा कनिष्ठ पदावर काम करणारा जावई तुम्ही स्वीकारणार नाही असं मला वाटत होतं म्हणून मी आमच्या नात्याचं सत्य तुमच्या पासून लपवलं.
अभिनवच्या आधीही मला खूप सारी स्थळं सांगून आली पण सगळीच मुलं फक्त तुमचा पैसा पाहून मला होकार देत असत. त्यांना मी नाही तर तुमचा पैसा प्रिय होता. तेव्हाच माझी भेट अतुलसोबत झाली. अतुल अनाथ असला तरीही कुटुंबसंस्थेचे महत्व जाणून होता. पाच वयोवृद्ध जोडप्यांचा तो आईवडील म्हणून सांभाळ करतो. त्याच्या कर्तृत्वाच्या आणि प्रेमळ स्वभावाच्या मी प्रेमात पडली.
त्याच दरम्यान मला अभिनवचे स्थळ सांगून आले. अभिनवने देखील तुमच्या पैशावर भाळून मला होकार दिला असं मला वाटलं. म्हणून मी त्याच्या सोबत साखरपुडा केल्यावर त्याच्याशी विचित्र वागायला सुरुवात केली , त्याला खूप मानसिक त्रास दिला. जेणेकरून त्याच्या आणि माझ्यात वाद निर्माण होऊन हा साखरपुडा तुटेल आणि अतुलसोबत लग्न करण्यासाठी माझा मार्ग मोकळा होईल, पण झालं मात्र उलटंच.
ज्याला मी कोळसा समजायची चूक केली तो अभिनव मात्र हिरा निघाला. त्याला मेलवर जेव्हा मी माझ्या जीवनाचे सत्य सांगितले त्यावेळी माझ्या आणि अतुलच्या आनंदासाठी तो हसत-हसत त्याग करायला तयार झाला , स्वतः वाईट होऊन माझं आयुष्य सुखकर करायला तयार झाला.
अभिनवने खूप काही सहन केले माझ्यासाठी पण मी , मी मात्र स्वार्थी झाले. स्वतःच्या सुखासाठी मी त्याचंही आयुष्य पणाला लावलं. मी खरंच नालायक आहे. मला स्वतःचीच लाज वाटतेय बाबा ...मला स्वतःचीच खूप लाज वाटते आहे.
मी आणि अतुल आमच्या सुखासाठी स्वार्थी झालो. पण आमच्या नात्याचे भविष्य काहीही असले तरी अभिनवचा मान जपायचा असं आम्ही दोघांनीही आता ठरवलं आहे. तुम्हाला जी शिक्षा करायची आहे ती मला करा...मी आनंदाने ती शिक्षा भोगायला तयार आहे."
इतकं बोलून अंकिता हमसून हमसून रडू लागली. अंकिताचे बोलणं ऐकून शामकांतराव आणि शैलजाताई तर सुन्न झाल्या होत्या. त्याचवेळी तिथे अतुल आला. अतुलला पाहून शामकांतरावांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. रडणाऱ्या अंकिताला सावरत अभिनव अंकिताला म्हणाला...
" अंकिता , स्वतःला चुकीचं ठरवत किती मोठं मोठेपण दिलेस तू मला. ज्यादिवशी तुला पहिल्यांदा पाहिलं त्याचवेळी मी ठरवलं होतं तुझा नवरा होण्याच्या आधी तुझा चांगला मित्र होण्याचा प्रयत्न करेल. मी तुला सगळ्यात आधी माझी प्रिय मैत्रीण म्हणून स्वीकारेल म्हणूनच तुझ्या सुखासाठी हे वाईटपण घ्यायला तयार झालो मी....पण कदाचित माझ्या मैत्री पेक्षा तुझ्या मैत्रीचं पारडं जड होतं म्हणूनच माझा अपमान तुला सहन झाला नाही. "
इतकं बोलून अभिनव शामकांतरावांजवळ गेला आणि त्यांना समजावणीच्या सुरात म्हणाला...
" काका , तुम्हाला मी चुकीचं ठरवणार नाही कारण कुठलेच आईवडील आपल्या मुलांचा वाईटाचा विचार करणार नाहीत , पण अतुल खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याच्या कष्टाच्या बळावर तो आणखीन प्रगती नक्कीच करेल. सगळ्या गोष्टी एका झटक्यात प्राप्त झाल्या तर आपल्यालाही त्याची किंमत कळत नाही त्यामुळे अतुलवर विश्वास ठेवा.
राहता राहिली गोष्ट अतुलच्या अनाथ असण्याची तर प्रत्येक वेळेस आधार देण्यासाठी रक्ताचीच नाती असावी लागत नाही. काहीवेळा मनाने जोडलेली नाती सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरतात. अतुल तर अशा कित्येक लोकांचा आधार झाला आहे , कितीतरी मनाने आणि प्रेमाने जोडलेली नाती त्याच्या सोबत आहेत मग तो अनाथ कसा असू शकतो...? प्लीज माफ करा आम्हा सगळ्यांना. मी तुमची हात जोडून माफी मागतो. अंकिता आणि अतुलच्या नात्याला तुमचे आशीर्वाद लाभू द्या. "
अभिनवच्या या वागण्याचा , त्याच्या बोलण्याचा शरदरावांना आणि सीमाताईंना खूप अभिमान वाटला.अभिनवच्या चांगुलपणाने सर्वांचे मन जिंकून घेतले. शरदरावांनी अभिनवच्या पाठीवर कौतुकाने थोपटले आणि शामकांतरावांना उद्देशून बोलू लागले..
" शामकांतराव , एक मुलीचा बाप म्हणून तुमची अवस्था मी समजू शकतो पण शेवटी आपण मेहनत करतो , झटतो , कष्ट करतो ते आपल्या मुलांसाठीच ना ...त्यांच्या सुखातच तर आपलं सुख असतं , मग अंकिताचं सुख अतुलसोबत आहे. त्यामुळे त्या दोघांनाही तुम्ही स्वीकारावं असं मला वाटतं.
आपला निर्णय आपल्या मुलांवर थोपण्यापूर्वी त्यांची इच्छा ,त्यांची आवड आपण नक्कीच जाणून घ्यायला हवी. शेवटी आयुष्य त्यांचं आहे ,त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचाच असायलाच हवा, आपण फक्त मार्गदर्शक म्हणून काम करायला हवं.
असेही तुम्ही मघाशी म्हणाले होते की जर अंकिताचं बोलणं खोटं असेल आणि माझं बोलणं सत्य असेल तर तुम्ही मी सांगेल ती गोष्ट करायला तयार होणार. मग आता वचनपूर्तीची वेळ आली आहे. तुम्ही लवकरात लवकर अतुल आणि अंकिताच्या लग्नाचा बार उडवून द्यावा अशी माझी मागणी आहे. "
शरदरावांचे बोलणं ऐकून शामकांतरावांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. रडता रडता ते हात जोडून शरदराव आणि अभिनवच्या समोर उभे राहिले आणि बोलू लागले...
" शरदराव , अहो कही क्षणांपुर्वी तुमचा आणि तुमच्या कुटुंबीयांचा इतका अपमान करत होतो मी. धक्काबुक्की करून घराच्या बाहेर घालवायला निघालो होतो मी तुम्हाला, तरीही तुम्ही माझ्या लेकीच्या सुखाचा इतका विचार करत आहात. तुम्ही देव आहात. खरंच देवमाणूस आहात. तुमच्या सारख्या देवमाणसांमुळे आजही माणुसकी आणि प्रेम जिवंत आहे. मला माफ करा शरदराव. खरंतर माझं वागणं माफी देण्याचाही लायकीचं नाही तरीही मोठ्या मनाने मला माफ करा."
असं बोलून शामकांतराव त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शरदरावांच्या पायावर डोकं ठेवून त्यांची माफी मागण्यासाठी झुकले , पण त्याच वेळी शरदरावांनी त्यांना अडवलं.
"माझ्या पायावर डोकं ठेवून माफी मागण्याची गरज नाही शामकांतराव. एक बाप म्हणून तुम्ही जे वागलात ते अगदी योग्य होते."
शरदरावांसोबत बोलणं झाल्यावर शामकांतराव अभिनवजवळ आले आणि त्याची देखील माफी मागू लागले..
" अभिनव तुझ्याबद्दल तर मी काय बोलू...तुझं आयुष्य , तुझं करियर सगळ्यांची नासधूस करायला निघालो होतो मी , तरीही तू गप्प राहिलास. तुम्ही काही काळापूर्वी अंकिताच्या आयुष्यात आलेली माणसं तिच्या सुखासाठी झटत होते पण मी तिचा जन्मदाता असूनही ,तिच्या सोबत एका घरात राहूनही तिचं सुख कशात आहे हे ओळखू शकलो नाही. मला माफ कर अभिनव बाळा ...खरंच माफ कर. "
अभिनवची माफी मागुन शामकांतराव अंकिताला उद्देशून म्हणाले...
" अंकिता , मला माफ कर बाळा , माझ्या एका जिद्दीमुळे तुझं आयुष्य पणाला लागलं होतं , तुझ्या या बापाला माफ करशील ना...? " म्हणून त्यांनी अंकितासमोर दोन्ही हात जोडले. अंकिता धावतच पुढे गेली. शामकांतरावांचे दोन्ही हात तिने स्वतःच्या हातात घेतले आणि " बाबा ,हे काय करताय तुम्ही " असं म्हणत ती त्यांना बिलगली. बाप-लेकीचा हा अश्रूंचा सोहळा बराच वेळ सुरु होता.
" रात गई और बात गई " झालं गेलं सगळं विसरून जाऊया , म्हणत शरदरावांनी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. शामकांतरावांनी लगेचच अंकिता आणि अतुलच्या लग्नाची तारीख काढायची ठरवली. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. अंकिता आणि शामकांतरावांनी शरदराव , सीमाताई सगळयांची माफी मागितली आणि त्यांनी मोकळ्या मनाने माफी दिली सुद्धा.
सगळं वातावरण आनंदी करून अभिनव आणि कुटुंबीय घरी जायला निघाले ,त्यावेळेस अंकिता अभिनवला थांबवून त्याच्यासोबत बोलू लागली..
" अभिनव , तू माझ्या आयुष्यातला जादूगार आहेस. तुझ्यामुळेच माझं हे आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर झालं आहे. तू खरंच खूप काही केलंस माझ्यासाठी , तरीही तुझ्याकडून अजून काही तरी मागायचे आहे मला. हवं तर माझ्या लग्नाचं गिफ्ट मागते आहे असं समज. देशील ना मला , मी मागेन ते ..? "
अभिनवने मानेनेच होकार दर्शवला.
" माझ्या आयुष्यातला जादूगार मला मित्र म्हणून कायमच माझ्या आयुष्यात हवा आहे. माझ्या मनात त्या खास मित्राची जागा फक्त तुझी आहे अभिनव. राहशील ना माझा गाईड , माझा फिलॉसॉफर , माझा खरा मित्र बनून माझ्या आयुष्यात...हेच गिफ्ट हवं आहे मला तुझ्याकडून ...तुझ्या मैत्रीची साथ माझ्यासाठी आणि अतुल दोघांसाठीही अनमोल आहे."
" अंकिता अगदी बरोबर बोलतेय. तिला हवं आहे तेच गिफ्ट मलाही हवं आहे तुझ्याकडून. देशील ना आम्हाला आमचं गिफ्ट .."
अतुल अंकिताच्या शब्दात शब्द मिसळत म्हणाला.
अभिनवने अंकिताचा हात हातात घेतला. तिचा हात थोपटत तो तिला म्हणाला ...
" तुमच्या दोघांच्याही आयुष्यात मी मित्र म्हणून कायमच असेल. तुमच्या कोणत्याही सुखात- दुःखात मला फक्त एकदाच आवाज द्या , मी नेहमीच हजर असेल. तू आणि अतुल नेहमीच आनंदी राहा , खूप सुखात राहा. " असं म्हणत अंकिताचा हात अतुलच्या हातात देऊन तो निघून गेला. अंकिता मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाणावलेल्या डोळ्यांनी एकटक फक्त पाहत राहिली.
अंकिता आणि अतुलच्या नात्याला तर शामकांतरावांनी होकार दिला.
पण अभिनवचं काय ..?
त्याच्या आयुष्यातील रितेपण भरून निघेल की नाही ..?
जाणून घ्यायच आहे ना ..मग वाचा अभिनवचा पुढचा प्रवास उद्याच्या अंतिम भागात...
क्रमश :
या कथेचा एक भाग रोज सकाळी अकरा वाजता आमच्या " Velvetkavisha-वेलवेटकवीशा" या फेसबुक पेजवर प्रकाशित होईल. सगळ्यात आधी नवीन भाग वाचण्यासाठी आमच्या या पेजला लाईक आणि फोल्लो करायला विसरू नका.
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात,त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे ,कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google & Instagram
✍©️ जया पाटील
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box